मालमत्ता गुंतवणुकीसाठी रीटचा फायदेशीर पर्याय

१९ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज घराच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किंमतीत मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी रीट हे मालमत्तेतल्या गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं.

रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवणूक करायला सगळे जण उत्सुक असतात. पण पारंपरिक माध्यमातून गुंतवणुकीचा विचार केला तर ही गोष्ट कठीण वाटते. एक तर रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. त्याचबरोबर बिल्डर, जमीनदाराशी बर्‍याच वाटाघाटी कराव्या लागतात आणि कागदोपत्री कार्यवाही करणंही गरजेचं असतं.

दुसरीकडे रिअल इस्टेटमधे गुंतवणूक केली तर त्यातला वैविध्यपणा कमी राहतो. कारण त्याचं मूल्य अधिक असतं आणि गुंतवणुकीत लिक्विडीटी कमी असते. त्यामुळे मालमत्ता विक्री करणं सोपं राहत नाही आणि त्याची तुकड्यात विभागणी करणंही शक्य होत नाही. पण रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे.

आरईआयटी म्हणजेच ‘रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट’, ज्याला आपण सोप्या भाषेत ‘रीट’ असं म्हणतो. हे एक रिअल इस्टेटमधलं गुंतवणुकीचं माध्यम आहे. कोरोना संसर्ग शेवटच्या टप्प्यात असल्याचं वाटत असेल आणि अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर रीटच्या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं.

रीट म्हणजे काय?

आरईआयटी म्हणजेच रीट अर्थात रिअल इस्टेट प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचं एक माध्यम आहे. हे बर्‍याच अंशी म्युच्युअल फंडप्रमाणेच काम करतं. ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड हे विविध गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा करून शेअर बाजार, बाँडस किंवा गोल्डमधे गुंतवणूक करतं, त्याचप्रमाणे ‘रीट’अंतर्गत गुंतवणूकदारांचा पैसा रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवला जातो.

म्हणजेच गुंतवणूकदार मालमत्तेचे मालक न होताच रिअल इस्टेटमधे गुंतवणुकीचा फायदा उचलू शकतात. भारतात ‘रीट’ची संकल्पना आता कुठं रुजलीय. इतर देशांत त्याचा इतिहास खूपच जुना आहे. पहिल्यांदा १९६० मधे अमेरिकेत त्याची सुरवात झाली होती.

विकसित देशात ‘रीट’ हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आलाय. अर्थात भारतात ही संकल्पना येण्यासाठी ६० वर्ष लागली आणि आता हे सुरवातीच्या टप्प्यातच आहे. ‘रीट’नुसार रिअल इस्टेट प्रॉपटीमधे म्हणजे निवासी, व्यावसायिक, औद्यागिक आणि हॉटेलमधे गुंतवणूक केली जाते. भाड्याच्या रूपातून आणि भांडवलात ज्या पद्धतीने वाढ होते, त्यानुसार गुंतवणुकीची विभागणी केलीय.

हेही वाचा: कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

गुंतवणुकीचं माध्यम

‘रीट’मधे गुंतवणुकीची दोन माध्यम आहेत. बहुतांश रीट हे स्टॉक एक्स्चेंजमधे लिस्टेड असतात. त्यामुळे गुंतवणूकदार जसे इक्विटी शेअरची खरेदी करतात, त्याचप्रमाणे रीटचे शेअरही खरेदी करता येऊ शकतात. भारतात सध्या तीन लिस्टेट रीट आहेत. दुसरी पद्धत म्हणजे गुंतवणूकदार ‘फंड अँड फंड ऑफ फंड स्कीम’च्या माध्यमातून रीटमधे गुंतवणूक करू शकतात.

फंड ऑफ फंड याचा अर्थ म्युच्युअल फंड स्कीमच्या अशा योजना की, त्या दुसर्‍या स्कीमच्या युनिटमधे गुंतवणूक करतात. भारतात सध्या कोटक इंटरनॅशनल रीट फंड ऑफ फंड आहे. याचं संचलन जपान इथली सुमितोमो मितुशी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी करते. दुसरी फंड ऑफ फंड स्कीम ही महिंद्रा मॅन्यूलाइफ एशिया पॅसेफिक आरईआयटीच्या युनिटमधे गुंतवणूक करते.

या फंडची गुंतवणूक सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशात आहे. तसंच ४५ मोठ्या आणि डायवर्सिफाइड रीट हे यांच्या पोर्टफोलिओत आहेत. गुंतवणूकदार हे इतर म्युच्युअल फंड योजनेप्रमाणेच आरईआयटी फंड ऑफ फंडमधे गुंतवणूक करू शकतात. आरईआयटी फंड ऑफ फंडमधे एकरकमीप्रमाणेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणं शक्य आहे. एसआयपीच्या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक होत असल्याने खूपच किरकोळ रक्कमेनं रिअल इस्टेटमधे गुंतवणूक सुरू करू शकतो.

गुंतवणुकीमागची कारण

रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्टला गुंतवणूकदारांचा पैसा अशा मालमत्तेत गुंतवावा लागतो की, तो सहजपणे भाड्याने किंवा करारावर देण्यासारखा असतो. अशा माध्यमातून होणार्‍या उत्पन्नातून किमान ९० टक्के भाग हा गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपाने द्यावा लागतो. कारण बहुतांश रीट हे स्टॉक एक्स्चेंजमधे लिस्टेड असते आणि त्यामुळे यात लिक्विडीटीची समस्या राहत नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय रीटमधेही गुंतवणूक करतात आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर वाढल्यावर रिटर्नवर सकारात्मक परिणाम पडतो.

‘रीट’ला फंड मॅनेजर हे सक्रिय रूपाने मॅनेज करतात आणि जर एखाद्या मालमत्तेतून कमी फायदा मिळत असेल, तर त्याला विक्री करून चांगल्या मालमत्तेत गुंतवणूक केली जाते. एक रीट फंड ऑफ फंडवर मिळणार्‍या निव्वळ भांडवली नफ्यावरच्या कराचा विचार केला तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळात गुंतवणूक करत राहिल्यानंतर आपण युनिटची विक्री केली तर त्यावर इंडेक्सेशनचा फायदा मिळेल. २० टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

साधारणपणे २० टक्के दराने लाँग टर्म कॅपिटेल गेन हे गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाला जोडलं जातं आणि त्यावर गुंतवणुकीच्या एकूण उत्पन्नानुसार कर भरावा लागतो. गुंतवणूकदार आपल्या इन्वेस्टमेंट पोर्टफोलिओमधे वैविध्यपणा आणण्याच्या उद्देशातून रीट फंड ऑफ फंडमधे गुंतवणूक करू शकतात.

हेही वाचा: 

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

(दैनिक पुढारीतून साभार)