रिलायन्स जिओमार्टची एण्ट्री, छोट्या विक्रेत्यांना धडकी

२६ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय.

२०१७ला मुकेश अंबानींनी आपल्या रिलायन्स कंपनीचा जिओ फोन बाजारात आणला. सगळ्यात स्वस्त असलेल्या या जिओ फोनमुळे इतर कंपन्यांची दाणादाण उडाली होती. जिओच्या भरमसाठ सवलतींमुळे एअरटेल, व्होडाफोन, बीएसएनएल या बड्या कंपन्यांचं टेंशन वाढलं. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या प्लॅनमधे बदल करावे लागले. हळूहळू संपर्क क्षेत्रावर मुकेश अंबानींच्या रिलायन्सनं ताबा मिळवला.

आता याच रिलायन्स इंडस्ट्रीच्या 'जिओमार्ट' ऍपनं बाजारात धुमाकूळ घातलाय. मुकेश अंबानींच्या महत्वाकांक्षा दडून राहिलेल्या नाहीत. संपर्क क्षेत्रानंतर आता त्यांना उद्योग-व्यापार क्षेत्रामधे आपले पाय पसरायचे आहेत. जिओमार्टनं बिग बास्केट, अमेझॉन, ग्रोफर्स या कंपन्यांना टक्कर द्यायला सुरवातही केलीय. पण ही सुरवात भारतातल्या छोट्या व्यापार-विक्रेत्यांचा धंदा आणि रोजीरोटी बुडवणारी ठरतेय.

असं असेल रिलायन्सचं जिओमार्ट

रिलायन्सनं जिओमार्टला पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉंच केलं होतं. २०१८मधे त्याची घोषणा झाली होती. गेल्यावर्षी नवी मुंबई, ठाणे, कल्याण या भागांमधून त्याची सुरवात झाली. त्यासाठी जिओच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करण्यात आला. जिओमार्ट हे ग्राहक आणि छोटे व्यापारी यांना जोडणारा दुवा असेल असं रिलायन्सनं हा प्रोजेक्ट लॉंच करताना म्हटलं होतं.

'देश की नई दुकान' अशी टॅगलाईन घेऊन रिलायन्सनं जिओमार्टला बाजारात आणलंय. ५० हजारपेक्षा अधिक घरगुती वस्तू आपल्या या जिओमार्टमधून मागवता येणं शक्य होईल. त्यासाठी दुकानदारांना या ऍपशी जोडलं जाईल. फ्री होम डिलिवरी, जलदगतीने वस्तू पोचवणं, कमीतकमी ऑर्डरचंही लक्ष्य ही या जिओमार्टची खासियत असेल.

त्यासाठी आधी दुकानदार किंवा ग्राहकांना हे जिओमार्ट ऍप डाऊनलोड करावं लागेल. नोंदणी करावी लागेल. मोबाइल नंबर, मेल आयडी टाकावा लागेल. खाद्यपदार्थ, स्वच्छतेचं सामान, सौंदर्य प्रसाधनं अशा कॅटेगरीही यात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

सोशल प्लॅटफॉर्मची मदत

आधीच्या फेसबुक आणि आता नाव बदलेल्या मेटा कंपनीच्या व्हाट्सएपनं भारतात डिजिटल पेमेंटची सेवा सुरू केली होती. भारतात व्हाट्सएपचे ४० कोटी युजर्स आहेत. पण त्यांना डिजिटल पेमेंटमधे ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. हीच गोष्ट हेरून त्यांना झालेला तोटा आपल्या फायद्याचा ठरेल का याची चाचपणी रिलायन्सनं सुरू केली.

फेसबुकसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे त्यांनी रिलायन्ससोबत करार केला. या करारामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्सला एक जबरदस्त सोशल प्लॅटफॉर्म मिळालाय. जिओमार्टसोबत फेसबुक, व्हाट्सएपचे ग्राहक जोडले जातील. तसंच व्हाट्सएपमुळे ऑर्डर घेणं शक्य होईल. फेसबुकने रिलायन्स जिओचे ९.९९ टक्के शेअर विकत घेतलेत. तर एकूण ४३ हजार ५७४ कोटींची ही गुंतवणूक आहे.

जिओमार्टला ग्राहक असलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे जास्तीत जास्त दुकानदार आणि ग्राहकांशी जोडणं शक्य होईल. त्याशिवाय डिजिटल व्यवहारांसोबत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून छोट्या दुकानदारांना त्यांचा उद्योग वाढवणं शक्य होईल, रोजगार निर्माण होतील असं फेसबुक आणि रिलायन्सनं म्हटलं होतं.

जिओमार्टच्या एण्ट्रीचं खरं कारण

रिलायन्सला आपल्या जिओ इन्फोकॉम या दूरसंचार कंपनीचा विस्तार करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. कर्ज झालं. ते भरून काढण्यासाठी मुकेश अंबानी नवे मार्ग शोधतायत. जिओमार्टमधून ऑनलाईन व्यापार क्षेत्रात एण्ट्री घेणं हा त्या सगळ्याचा एक भाग असल्याचं म्हटलं जातंय. त्यासाठी भारतातून सुरवात करणं हे अधिक सोयीचं होतं.

खाद्यपदार्थ, ऑनलाईन शॉपिंग हा भारतीयांचा फारच हळवा कोपरा आहे. झोमॅटो, स्वीगी, अमेझॉनवरून आपल्याला हवं ते आपण मागवतो. हवं तेव्हा आपल्यापर्यंत या वस्तू पोचल्यामुळे हा ऑनलाईन पर्याय आपल्याला बेस्ट वाटतोय. भारताची हीच गरज ओळखून ऑनलाईन व्यापार कंपन्यांनी इथं जम बसवायला सुरवात केली.

भारतातल्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांचा व्यापार हा ३७५ बिलियन डॉलर इतका आहे. त्यामुळेच फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांनीही आपलं बस्तान बसवलंय. त्यांच्या जोडीने आता जिओमार्टही या ऑनलाईन व्यापाराच्या स्पर्धेत उतरलीय. जिओमार्ट सध्या बाकीच्या बड्या कंपन्यांना टक्कर देतेय.

हेही वाचा: यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

छोटे व्यापारी-विक्रेत्यांना धडकी?

भारतात एकूण ६ लाख गावं आहेत. या ग्रामीण भागांमधे वस्तूंचा पुरवठा हा साडेचार लाख घाऊक विक्रेत्यांच्या मार्फत केला जात असल्याचं रॉयटर या न्यूज एजन्सीच्या एका रिपोर्टमधे म्हटलंय. हे विक्रेते ३ ते ५ टक्क्यांच्या फरकाने व्यापाऱ्यांना माल विकतात. अशावेळी इतर कंपन्यांचं संकट असताना त्यात जिओमार्टच्या एण्ट्रीनं या विक्रेत्यांचं टेंशन अधिक वाढलंय.

आतापर्यंत हे घाऊक विक्रेते या दुकानदारांपर्यंत किराणा माल पोचवत होते. किंवा दुकानदार स्वतः माल घेऊन जायचे. जिओमार्ट ऍपमुळे ही पूर्ण व्यवस्था मोडीत निघालीय. त्याचं कारण या ऍपच्या माध्यमातून थेट दुकानदार माल ऑर्डर करू लागलेत. त्यांना २४ तासांमधे तो पोचूही लागलाय. शिवाय त्यांना खरेदी करायचं ट्रेनिंगही दिलं जातंय. माल उधार देणं किंवा सॅम्पलही पोचतं केलं जातं.

या सगळ्याचा परिणाम रॅकेट, कोलगेटसारख्या कंपन्यांच्या घाऊक विक्रेत्यांवर होतोय. त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. महाराष्ट्रातल्या सांगलीचे विप्रेश शहा हे इंग्लंडच्या एका कंपनीचे भारतातले विक्रेते आहेत. 'एकेकाळी राजा माणूस असलेला मी जिओमार्टमुळे कंगाल झालो. ५० वर्षांपासून सुरू असलेला हा व्यापार मागचे ६ महिने बंद आहे.' असं डीडब्ल्यूला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय.

बाजारपेठेची साखळी विस्कटली

छोटे छोटे दुकानदार आता जिओमार्ट किंवा इतर पर्यायाकडे वळतायत. या दुकानदारांचा भारतातल्या व्यापार क्षेत्रात ९०० बिलियन डॉलर इतका हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या सवलती देऊन आपल्याकडे खेचायला प्रयत्न या बड्या कंपन्या करतात. जिओमार्टनं तर अनेक वस्तूंवर ५० टक्के इतकी सवलत दिलीय.

या सगळ्या प्रकारामुळे घाऊक विक्रेत्यांवर मात्र संकट आलंय. बाजारपेठेची साखळी विस्कटलीय. थेट माल दुकानात पोचत असल्यामुळे कामगारांना कामावरून कमी केलं जातंय. झालेला तोटा भरून काढण्यासाठी अनेक घाऊक विक्रेते टेंशनमधे आहेत. प्रसंगी त्यांना कर्ज काढून उदरनिर्वाह करावा लागेल असं हे सगळं संकट आहे.

या विक्रेत्यांची 'अखिल भारतीय ग्राहक उत्पादन विक्रेते संघटना' आहे. या संघटनेचे देशभरात साडे चार लाख विक्रेते असल्याचं रॉयटर या न्यूज एजन्सीची आकडेवारी सांगते. या विक्रेत्यांचं हित जोपासण्यासाठी ही संघटना देशभर काम करते. धैर्यशील पाटील हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जिओमार्टला दिलेल्या परवानगीविरोधात ऑगस्टमधे भारतातल्या विक्रेत्यांच्यावतीने बंद पुकारला होता.

हेही वाचा:

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

`होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं?

उत्तर प्रदेश प्रकरणानंतर काँग्रेसला फुटेल का नवी पालवी