स्मिताने नव्या नवरीसारखं नटून घेतला जगाचा निरोप

१३ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


१३ डिसेंबर १९८६.  स्मिताने रुपेरी पडद्यावरून कायमची एक्झिट घेतली. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच स्मिताने जगाचा निरोप घेतला. तिने मागे ठेवल्या सशक्त अभिनयाने आणि वैचारिक भूमिकेतून एका उंचीवर नेलेल्या भूमिका. आणि अनेक आठवणी. आज तिच्या स्मृतिदिनी तिची आठवण येणारच. करोगे याद तो, हर बात याद आयेगी. 

 

सूर्यास्त झालाय
चंद्रही दडून गेलाय
रात्रही दाटून आलीय
ती शांत निजलीय...

 

शांतता भंगवू नका
निद्रेला जागवू नका
न्याहळा हे सौंदर्य
अशीच असते निरवता...

 

भास आभासाचं चित्र
सारंच नश्वर अंतिम
एक छबी अनाकलनीय
नि:शब्द वाटेची गर्दी...

 

शब्दांचा खेळ सारा
खोटाच भावनांचा पसारा
निरवतीचा चंद्रच खरा
शांततेचा बोचरा वारा.
..

 

तू याद येतेस तेव्हा

आज दिवसभर खरंतर काल रात्रीपासूनच तुझी खूप याद येतेय. आज दिवसभरही तुझाच चेहरा नजरे समोर होता. ठाऊक आहे तू कुठेच गेलेली नाहीस. तरीही मन शोधत रहातं. आज तर मनाने हद्दच केली. त्याला राहून राहून बाजार मधला तो एकच संवाद आठवत होता. ज्यात नासीरभाई विचारतात...

नसीरुद्दीन शाह : कई बार मिलने के लिए इक बार मिलना जरूरी है.
तू : जो बात नही हो सकती उसकी जिद क्यूं?
नसीरुद्दीन शाह : गर कही मिलोगी तो पहचान दिखाओगी?
तू : सलाम जरूर करुंगी.

आज हा संवाद सतत आठवत होता. कुणी तरी सोडून जात असल्याची वेदना. खूप वाईट चाललाय आजचा दिवस. तू आणि तुझी साठवण आज सोबतीला नसता तर? खरंच का गं माणूस आठवणींच्या साठवणीत जगत असतो?
बघ काही सांगता येतंय का?

शेवटची इच्छा सुवासिनीसारखं सजण्याची

दीपकदादा सांगत होते. दीपक सावंत हे स्मिताचे मेकअपमन. सुरवातीपासून शेवटपर्यंत तेच तिचा मेकअप करायचे. त्यांनी स्मिताची अखेरची इच्छा सांगितली. आतून हलवून सोडणारी. 

स्मिताची अखेरची इच्छा होती,  तिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवाला सुवासिनीसारखं सजवावं. लग्न झालेल्या नव्या नवरीसारखं सजवावं. स्मिताची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. मात्र ही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी स्मिताला निधनानंतर तीन दिवस वाट बघावी लागली. 

स्मिताचं निधन झालं, तेंव्हा तिच्या मोठी बहीण डॉ. अनिता पाटील - देशमुख या अमेरिकेत होत्य.  त्या भारतात परतल्यानंतर स्मिताला एखाद्या नव्या नवरीसारखा मेकअप करण्यात आला. आणि तिची अखेरची इच्छा पूर्ण करण्यात आली.

आज रपट जाये तो 

आज रपट जाये तो हमें ना ऊठईयो, या गाण्याचं चित्रीकरण संपवून स्मिता घरी आली. पण त्यांचं कशातच लक्ष लागेना. एक अस्वस्थता त्यांना छळत होती. ती खूप रडतही होती म्हणे. तेव्हा अचानक अमिताभ बच्चनचा फोन आला. त्यानंतर कुठे स्मिताला बरं वाटलं.

त्याचं असं झालं होतं. या गाण्यात स्मिताला नाचावं लागणार होतं म्हणून ती आधीच नर्व्हस होती. त्यात हे गाणं पावसातलं आणि सोबत अमिताभ. प्रचंड दडपण. हे दडपण अमिताभला जाणवत होतं. म्हणून त्यानेच स्मिताला धीर दिला आणि उत्तम नाचवलंही. गाणं छान झालं. आजही ते आपल्याला आवडतंय. मात्र स्मिता खूप अपसेट होती. अशाच अवस्थेत ती घरी परतल्या.

केलेलं गाणं प्रचंड बोल्ड साँग आहे, असं स्मिताला वाटत होतं. आपण असं गाणं करायला नको होतं. कदाचित बाईला बिनडोक ठरवून तिचं अंगप्रदर्शन करणं तिला पटत नव्हतं. पण ती खूप अशांत होती. 

एका सच्चा मित्रासारखं अमिताभना हे कळलं. त्याने फोन केला. म्हटलं, आपण सिनेमात करतो, तो आपल्या कामाचा भाग असतो. त्याला वैयक्तिक आयुष्यात स्थान द्यायचं नाही. रिळावरचं लाइफ आणि रिअल लाइफ यात कायम अंतर ठेवायला शिक. आजपर्यंत समरसून भूमिका करणाऱ्या स्मितासाठी तो जिंदगीच्या शाळेत मिळालेला धडाच होता. 

स्मिता पाटील म्हणजे वादळ. स्मिता म्हणजे बिनधास्तपणाचं जिवंत उदाहरण. बोल्ड हा शब्दच जणू तिच्यामुळे जन्माला आला असावा. अशी अनेक बिरुदं तिला आजही चिकटवली जातात. पण तीच या गाण्यामुळे अस्वस्थ झाली असावी, हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. आणि म्हणूनच कदाचित या किश्श्याला आख्यायिका म्हटलं गेलं असावं.

तिचा सिनेमा तिचं जगणं होता

दूरदर्शनवर बातमीपत्र वाचण्यापासून स्मिताने कॅमेरा फेस करण्यास सुरुवात केली. बघता बघता स्मिता चंदेरी दुनियेची अस्मिता बनली.

स्मिताने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांना तिच्या चाहत्यांनी कायमच उत्तम दाद दिली. मग ती चरणदास चोरमधली राणी असो, किंवा मिर्चमसालामधली सोनबाई असो. स्मिताने प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. स्मिता केवळ २२ वर्षांची होती, जेव्हा तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भूमिका या सिनेमासाठी स्मिताला हा पहिलावाहिला पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. हंसाबाईंचं संपूर्ण आयुष्य प्रचंड वादळी होतं. त्यांचं ते वादळी जगणं विशीत स्मिताने पडद्यावर साकारलं होतं. तिचं आयुष्य तरी कमी वादळी होतं?

स्मिताने साकारलेल्या अनेक भूमिका या तिच्या रिअल लाईफ मधीलच आहेत की काय असंच वाटतं. दिग्दर्शक महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला अर्थ हा सिनेमा. या सिनेमात स्मिताने कविता नावाची भूमिका साकारलीय. कविताचं एका विवाहित पुरुषावर प्रेम जडतं आणि तिला त्याच्या सोबत लग्न करायचं असतं.

असंच काहीसं स्मिताच्या खऱ्या आयुष्यातही घडलं. स्मिताचं अभिनेता राज बब्बर याच्यावर प्रेम बसलं. पुढे त्या दोघांनी लग्नही केलं. हा स्मिताचा पहिला आणि शेवटचा विवाह होता. पण राज बब्बरचा दुसरा विवाह होता. राजचं नादिरा झहीर याच्यासोबत लग्न झालं होतं. त्यांना आर्या आणि जुही या दोन मुलीही होत्या. 

याचंच आणखीही एक उदाहरण सांगता येईल. डॉ. जब्बार पटेल यांच्या उंबरठामधील सुलभा महाजन म्हणजे आपली आईच आहे, असंच स्मिताला सतत वाटायचं खरोखरच स्मिताने सुलभा साकारताना स्वतःच्या आईलाच डोळ्यांसमोर ठेवलं होतं. 

स्मिता, तुझ्या किती आठवणी सांगायच्या! करोगे याद तो, हर बात याद आयेगी.