येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

२४ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?

लोकसभेची निवडणूक जिंकणं भाजपसाठी तितकं सोपं नाही, असं म्हटलं जात होतं. मोदीविरोधी आणि भाजपची निगेटीव इमेज बनल्याचं सोशल मीडियावरुन दिसत होतं. मात्र २३ मेच्या सकाळपासूनच येणारा ट्रेंड बघता फिर एक बार मोदी सरकार असं चित्र क्लिअर झालं. त्यामुळे सेन्सेक्सने नवा विक्रमच रचला. आणि चक्क गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ४० हजारांवर पोचला. पण दिवसाच्या शेवटी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स मायनस २९८.८२ वर येऊन कोसळला.

एक्झिट पोलचा मार्केटवर झालेला परिणाम

लोकसभेसाठी १९ मेला शेवटच्या फेरीचं मतदान झालं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधे पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असा कल दिसला. मोदींना २५० पेक्षा जास्त मतं मिळणार अशा बातम्या आल्या. त्यानंतर सेन्सेक्सने ३९ हजारांपर्यंत उंची गाठली. एक्झिट पोलनंतर अशाप्रकारे शेअर बाजारात आलेली तेजी म्हणजे गेल्या १० वर्षात कधीही न झालेली गोष्ट.

यावेळी लोकांनी आपला पक्ष, आपले पंतप्रधान येणार म्हणून गुंतवणूक केली किंवा वाढवली. तसंच पोलमधल्या आकडेवारीनुसार घडलं तर आधीच्या सरकारच्या योजना, आर्थिक स्ट्रक्चर पुढील वर्षातही कॅरिफॉरवर्ड होतील. ज्यामुळे बाजारात स्थैर येईल असा विचार करून लोकांनी गुंतवणूक केली. पण जसजशा पोलवर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि पोलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले त्यावेळी पुन्हा त्याचा मार्केटवर परिणाम होऊन सेन्सेक्स घसरलं.

हेही वाचा: सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

भाजप आघाडीवर आणि सेन्सेक्सही

मात्र आज २३ मेला प्रत्यक्षात निकाल यायला सुरवात झाली त्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने १४२२ पॉईंटची आघाडी घेत ९०० अंकांची वाढ नोंदवली. आणि सेन्सेक्सने पुन्हा उसळी घेत ४० हजार १२४ वर आकडा पोचला. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने २६५ अंकांची वाढ होत, सेन्सेक्सने १२ हजार ३ एवढी उंची गाठली. त्यातच रुपयांचा भावही १४ पैशांनी वाढला. त्यामुळे भारतीय रुपयाची किंमत १ युएस डॉलरच्या तुलनेत ६९.५१ रुपये झाली.

दरवेळी जगभरात निवडणुकीचा परिणाम हा तिथल्या शेअर मार्केटवर पडत असतो. आणि परिणाम लाँग टर्म नसून तात्पुरता असतो. तेव्हाच्या देशाच्या परिस्थितीवरची ती जणू प्रतिक्रियाच असते. म्हणूनच आता मोदींची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु असतानाही बीएसईच्या सेन्सेक्सचा दर -२९८.८२ वर येऊन थांबला.

हेही वाचा: नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

निवडणुकांचा सेन्सेक्सवर झालेला परिणाम

एकतर ४० हजार हा विक्रमी आकडा होता. हा आकडा १३ वर्षांनंतर वाढला. म्हणूनच या स्थितीचा फायदा घेत खूप साऱ्या परदेशी आणि काही देशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर जास्त किंमतींना विकले. पूर्वी कमी किंमतीत घेतलेल्या शेअरचा आज भाव वाढला, मग लोकांनी लगेच शेअर विकून टाकले. त्यामुळे आपोआपच दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स मायनसमधे गेला, असं शेअर मार्केट तज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी सांगितलं.

सेन्सेक्सचा दर हा काही पहिल्यांदा खाली वर झालेला नाही. २००४ मधे एनडीएचा पराभव झाल्यानंतर शेअर मार्केट ७.४ टक्क्यांनी खाली आलेलं. तर २००९ ला युपीएने अनपेक्षित असं मोठं यश मिळवलं. पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंहचं सरकार आल्यावर सेन्सेक्सचा दर १७.४ टक्क्यांनी वधारला. त्यानंतर २०१४ च्या भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर सेन्सेक्स १८.५ टक्क्यांनी वाढला. तर आता इलेक्शनचा निकाल आणि सेन्सेक्स दोघांनीही विक्रम केला, अशी माहिती अर्थविश्लेषक प्रियांका मोहटा यांनी दिली.

हेही वाचा: विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

निवडणुकांचा सेन्सेक्सवर परिणाम का होतो?

२००४ आणि २०१४ मधल्या इलेक्शन कॅम्पेनमुळे सगळ्यांना विश्वास होता की एनडीए सरकार येणार. पण इंडिया शायनिंगचा २००४ ला काही फायदा झाला नाही. मात्र २०१४ च्यावेळी संपूर्ण देशात मोदी लाटेसह कॉंग्रेसविरोधी लाट तयार झाली होती. त्यात मोदी हे बिझनेस ओरिएंटेड असल्यामुळे सेन्सेक्स आणि मतांवर त्याचा परिणाम दिसला, असं मोहटा म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने बनवलेल्या अर्थ धोरणामुळे लघु उद्योगांपासून बड्या उद्योगांपर्यंतचं संपूर्ण रचनेत बदल झाला. तसंच मोदी सरकारच्या काळात गंगा शुद्धीकरण, मेट्रो, स्मार्ट सिटी आणि देशभरात चाललेले इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी मोठे प्रोजेक्ट सुरु केले होते. कॉंग्रेस सरकार आलं असतं तर कदाचित या प्रकल्पांना खीळ बसली असती किंवा पुन्हा अर्थ रचनेत बदल झाला असता. 

देशातल्या या मोठ्या प्रोजेक्टमधे लहान ते मोठ्या सगळ्याच कंपन्यांनी आपापली गुंतवणूक केलीय. काही शेअर घेतलेत. त्यांचं नुकसान झालं असतं. त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज आणि निकाल यायला सुरवात झाल्यावर मोदी सरकार येणार हे समजलं. आणि आपलं नुकसान होणार नाही, तर फायदा होईल असा लॉंग टर्मचा विचार करून लोकांनी शेअर घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सेन्सेक्सने एवढी मोठी उंची गाठली. पण फायदा करून घेणाऱ्या शेअर होल्डर्सनी चान्स मिळताच शेअर विकून त्यातून पैसे कमवले. त्यामुळे सेन्सेक्स खाली उतरला, असं वाळिंबे म्हणाले.

हेही वाचा: काय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट?