'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक

१८ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.

माणसाला मेंदू आहे म्हणून तो जगात कुठेही असला तरी स्वतःच्या अस्तित्वासाठी काहीही करू शकतो. त्यातून तो स्वतःच्या खुणा आपण गेल्यावरही टिकून राहाव्यात म्हणून आपल्या सारख्याच माणसांना जन्माला घालतो. स्त्री, पुरुषाच्या निसर्गसुलभ नात्यापासून ते माय, बाप होण्याच्या प्रवासातली माणूस म्हणून त्याची जडणघडण पालक म्हणून कशी असायला पाहिजे हे जाणून घ्यायला हवं. 

त्यासाठी 'अक्षरनामा' आणि 'डायमंड पब्लिकेशन्स'चं 'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. राम जगताप आणि भाग्यश्री भागवत यांनी हे पुस्तक  संपादित केलंय. 

लेकींच्या आया आणि सुजाण पालकही

एक आई म्हणून बाईच्या भूमिका या वैश्विक दृष्टिकोनातून जशा असतात, तशा भूमिका पुस्तकातल्या आयांनी अतिशय प्रामाणिकपणे यात मांडल्यात. या बायका मुळात हळव्या, संवेदनशील, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या आहेत. सिनेमा, पत्रकारिता, पोलीस यांसारख्या विविध क्षेत्रात अनुभव घेणाऱ्या आहेत. तसंच स्वतःचं एक माणूस म्हणून असलेलं आत्मभान सतत जागृत ठेवणाऱ्या आहेत. हे या पुस्तकाचं वेगळेपण आहे.

महत्वाचं म्हणजे या स्त्रिया फक्त त्यांच्या लाडक्या लेकींच्या आयाच नाहीत तर त्या एक सुजाण पालक आहेत. आपल्या लेकींना काय देतोय याचं भान बाळगणाऱ्याही. आपल्या मुलींनी पुढे जाऊन काय करायला हवं याहीपेक्षा त्यांची समज, आणि जाण कशी वाढेल, त्या भविष्यात माणूस म्हणून कशा फुलतील याकडे आवर्जून लक्ष देणाऱ्या आहेत. म्हणून या पुस्तकातला 'मायलेकी' हा भाग खूप काही सांगून जातो. 

यातल्या सगळ्या बायका या स्वतःच्या पालकत्वाकडे जबाबदारीने पाहणाऱ्या आहेत. नोकरी, व्यवसाय आणि संसाराच्या इतर जबाबदाऱ्यांकडे ओझं म्हणून न पाहता त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या आहेत. वाचकांसाठी हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे हे प्रामुख्याने नोंदवावं लागेल.

हेही वाचा : मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’

वेगळा, धाडसी आणि वाचनीय भाग

जन्माला येणारं मूल मग ते मुलगा, मुलगी. या एका गोष्टीने प्रचंड फरक पडणाऱ्या आपल्या भारतीय समाजात अशी काही उदाहरणं आहेत हे वाचून खरोखर अंतर्मुख व्हायला होतं. सुजाण घरात वाढणाऱ्या मुलांमधे 'मुलगा आहे' म्हणून त्याला वेगळी वागणूक, आणि 'मुलगी आहे' म्हणून तिला वेगळी वागणूक द्यायची असा ठोकताळा कधीच केला जात नाही. पण मुलींची दिवसेंदिवस घटत चाललेली संख्या, त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक यांची असंख्य उदाहरणं आजूबाजूला आहेत. 

आजच्या काळात हे पुस्तक प्रकाशित व्हावं आणि पालकत्वाचे अनेक पैलू त्यातून हाती लागावेत हा उत्तम योग वाटतो. पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दुसरा. तो म्हणजे 'बापलेकी'. पुरुषप्रधान संस्कृतीत बाप होणं म्हणजे फक्त स्वतःचं कर्तव्य बजावणं. एक कडक, दक्ष, अबोल, आणि मुक्या पुरुषात 'बाप' नावाची कोमल, तरल, प्रेमळ, मैत्रीपूर्ण भावना जिवंत असते हे 'बापलेकी' हा भाग वाचून नक्कीच जाणवतं. म्हणून हा भाग अतिशय वेगळा, धाडसी आणि तितकाच वाचनीय आहे. 

बापपणाच्या अनेक छटा असलेला 'पुरुष'

पारंपारिक चौकटींना न जुमानता, स्वतःच्या अंतर्मनातला हळवा पुरुष आपल्या लेकीबद्दल चार शब्द लिहितो, तेव्हा तो पुरुष खऱ्या अर्थानं माणूस म्हणून पुढे येतो. याचा साक्षात्कार या भागातल्या एकूण आठ पुरुषांनी अतिशय साधेपणाने आणि बोलक्या भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय. एक 'बाप' म्हणून त्यांच्या वाट्याला आलेला अनुभव तसा एकाचवेळी सार्वत्रिक आहे. त्याच बरोबर तो तितकाच वैयक्तिक आहे असं वाटतं. 

लेकींसाठी 'बाप' हा एक असा पुरुष माणूस असतो ज्यात बापपणाच्या अनेक छटा असतात. बापाचा स्पर्श, त्याची माया, त्याची ओढ, त्याला समजून घेणं आणि दोघांमधलं असलेलं नातं जाणून घेणं, या गोष्टी वरवर सोप्या वाटतात. मनाच्या तळाशी गेलेल्या बाप पुरुषांसाठी त्या नक्कीच अनाकलनीय आहेत हे वाचताना जाणवतं. यातले बापपणाचे काही अनुभव वाचकाच्या मनात नक्कीच घोळत राहतात.   

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना वायरसच्या वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

पुस्तक समाजातल्या सर्वांसाठीच

या पुस्तकातले दोन्ही भाग हे आईबापाच्या मातृत्व आणि पितृत्वाचे वेगवेगळे, अनेकांगी कंगोरे आहेत. रूढ अर्थाने मातृत्व हा शब्द फक्त बाईच्या मालकीचाच नाही. तर पुरुषाचे पितृत्व हे त्याच्यातल्या हळूवार भावना, माया, करूणा जागृत करणाऱ्या आहेत. पिढी ही प्रत्येकवेळी घडते ती त्याच्या त्याच्या स्वभावाने. पण तो स्वभाव त्या पिढीने घेतलेला असतो त्याच्या रक्ताच्या आई, वडिलांकडून. काहीवेळा तो घेतलेला असतो समाजातल्या आजूबाजूच्या घटकांमधून. 

हाच स्वभाव एक स्वतंत्र माणूस म्हणून समाजात मिसळतो. त्यातून अनेक पिढ्यांच्या फळ्या तयार होत जातात. याच पिढ्या पुन्हा नव्याने समाज घडवतात आणि त्यातून काहीजण पुढे जाऊन लग्न करतात, कुटुंब वाढवतात. काहीजण तसेच राहतात, मग स्वतःचं एक कुटुंब बनून जातात. 

तुम्ही आई असा, बाप असा, अगदी कुणीही असा 'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक केवळ जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई-वडिलांसाठीच नाही, तर हे पुस्तक समाजातल्या सर्वांसाठीच आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे, कारण हे वाचून आपण एकदातरी एक सुजाण 'मायबाप' व्हावं आणि आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्या व्यापक नजरेनं बघावं असा विचार वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.

'मायलेकी बापलेकी'
संपादक : राम जगताप, भाग्यश्री भागवत 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 
एकूण पानं : २४०

हेही वाचा : 

पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने

कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?

सत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते?

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?