अनुवाद: जगण्याच्या संघर्षरत क्षणांचा

०१ मे २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.

ओळख आयुष्य नावाची गोष्ट भुईसपाट करणारे वारे 
ठेव पावलात बळ मरणालाही मिठी मारताना स्थिरावणारे
बघ हातावरचे उडून गेलेले रंग, उरलेल्या सरळसोट रेषा
तुला जायचे आहे ज्या वाटेवरून तिच्या धुकाळलेल्या दिशा
सांग तुझी कहाणी जी कुणालाच ऐकावीशी नाही वाटत
मी ऐकेन, एकेक काळीजमणी काळजाशी गुंफत
उठायचे आहेच तुलामला ही रात्र संपण्याआधी
पहाटेलाही असेल काळा रंग आणि काळीजव्याधी
होईलच कशी गुंतागुंत, कशा सुटणार नाहीत गाठी? 
माझ्याच जन्म-मरणाचा हा अनुवाद तुझ्यासाठी

'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' या कवितासंग्रहातल्या 'अनुवाद' नावाची ही पहिलीच कविता शरयू आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे शरयू आसोलकरांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. निसर्गातल्या अनेक प्रतिमा त्यांच्या भावनांशी एकरूप होतात.

हेही वाचा: कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

जीवनातले अनेक भावनांचे चढ-उतार कवितेत सहजपणे अवतरतात. खरंतर कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, याची प्रचिती त्यांच्या कवितांमधे दिसते. एका कवितेत त्यांनी लिहिलंय, 'मीच उभी माझ्यासमोर एक भिंत होऊन' म्हणजे स्वतः जी जगरहाटी म्हणून स्वीकारलेली परंपरा असते, तीच स्वतःच्या विकसनाला प्रतिबंध करते. म्हणून स्वतःच्या प्रगतीतील मोठा अडथळा स्वतःच असल्याची लख्ख जाणीव असोलकरांच्या कवितेत विखुरलेली आढळते.

'अनुवाद' या कवितेत कवयित्रीने स्वतःशीच साधलेला संवाद आहे. स्वभान जागी झालेली, भोवतालच्या वास्तवाचा अंदाज आलेली कवयित्री स्वतःच्या परंपरानिष्ठ गतानुगतिक व्यक्तित्वाला सावध करत आहे, जागं करत आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, की आत्मभान आलेली कवयित्री भाबडेपणाने परंपरेत गुंतलेल्या इतर स्त्रियांशी संवाद साधते.

कवयित्री काय म्हणते? तर ती सावध करते. वास्तवाचं स्पष्ट भान आणून देण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणते, आयुष्य नावाची गोष्ट भुईसपाट करणारे वारे ओळख. मरणालाही मिठी मारताना स्थिरावणारे बळ पावलात ठेव. याचा अर्थ इतकाच की अचानक आयुष्यात वादळ वारं घोंगावू शकतं आणि आयुष्य उध्वस्त करू शकते. ते कोणत्या रूपात येईल, सांगता येत नाही. पण त्याला ओळखता आलं पाहिजे आणि संकटाच्या काळात अगदी मृत्यूशी झुंज देतानाही पावलात बळ ठेवलं पाहिजे.

पुढे ती म्हणते, 'स्वतःच्या हातावरचे उडून गेलेले रंग बघ. तिथं आता सरळसोट रेषा उरल्यात.' बहुतांश लोक स्वतःच्या तळहातावरच्या रेषांमधे आपलं भविष्य लपलंय, असं मानतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध गोष्टी, सुखद क्षण वाट्याला येतील असं गृहीत धरतात. पण कवितागत स्त्रीच्या वाट्याला तसं आलेलं नाही. 

इथं अत्यंत सूचकपणे कवयित्री सांगते, की तुझ्या जीवनातले अनेक रंग उडून गेलेत. कदाचित असंही असू शकतं की जे रंग तिच्या वाट्याला यायला हवेत, ते येऊ दिले गेले नाहीत. आणि आता तळहातावर काही अस्पष्ट रेषा बाकी आहेत. म्हणजे भविष्यकाळ अस्पष्ट, धूसर आहे. कवयित्री असंही म्हणते, की इथून पुढे तुला जायचंय. ज्या वाटेवरून त्या दिशा धुकाळलेल्या आहेत. म्हणजेच जीवनाचा पुढचा प्रवासही अस्पष्ट आहे, अनिश्चित आहे. त्यातूनच तुला मार्ग काढावा लागेल.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

ही जीवनाची वाटचाल करताना आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांनी तिची कहाणी कंटाळवाणी बनलेली असू शकते. दुःखाने, वेदनेने, पराभवाने, अपेक्षाभंगाने भरलेली असू शकते. आणि ती ऐकण्यात कदाचित कुणालाच रस असणार नाही. म्हणूनच कवयित्री म्हणते, 'सांग तुझी कहाणी जी कुणालाच ऐकावीशी नाही वाटत नाही वाटत. ती मी ऐकेन. कारण ती काळीज कहाणी तिचीही आहे. एका अर्थी कवयित्री सहोदरा सारखी ती कहाणी अनुभवू इच्छिते.

असं असलं तरी फक्त दुःखाच्या कहाण्या सांगत एकत्र रहावं, असं तिला वाटत नाही. उलट ही रात्र संपण्या आधी तुला-मला उठायचं आहे, असा निर्धार ती व्यक्त करते. इथं रात्र म्हणजे अंधकारमय जीवन. पण संपूर्ण जीवन म्हणजे अंधारी रात्र नाही, दुःख वेदनेची कहानी नाही. म्हणजे तसं असू नये ही कवयित्रीची इच्छा. या अंधारगर्भ रात्रीलाही एक पहाट असेल. कदाचित त्या पहाटेलाही व्यापून राहणारा काळा रंग आणि काळीजव्याधी असू शकेल. पण पहाट आहे आणि त्यानंतर स्वच्छ निरामय प्रकाशाचं आमंत्रणही आहे.

हे अंधारातून पहाटेकडे, प्रकाशाकडे वाटचाल करणं परंपरानिष्ठ तिला थोडं गुंतागुंतीचं वाटत असेल. रुढी परंपरेच्या गाठी कशा सुटायच्या, असंही वाटत असेल. पण कवयित्रीला तसं वाटत नाही. भूतकाळाशी बांधलेल्या गाठी कधीतरी सुटायच्या आहेत. वेदनांकित जगण्याशी असणारी गुंतागुंत कधीतरी बाजूला सारायची आहे. हे शक्य असल्याचा आत्मविश्वास कवयित्रीला आहे. म्हणूनच ती म्हणते, माझ्याच जन्ममरणाचा हा अनुवाद तुझ्यासाठी!

कवितेची ही शेवटची ओळ म्हणजे शेवटचा मास्टर स्ट्रोक आहे. ही ओळ काव्यनिर्मितीची भूमिकाही स्पष्ट करते. कारण कोणत्याही चांगल्या कवीची काव्यनिर्मिती म्हणजे त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचा अनुवाद असतो. पण इथं काव्यनिर्मिती, हा जीवनानुवाद स्वतःसाठी नाही, तर कवयित्री या व्यक्तिमत्त्वाने दुसऱ्या व्यक्तीसाठी निर्माण केलेली ती विशेष अनुभुती आहे.

प्रचंड प्रभाव क्षमता असलेल्या साहित्याचं वैशिष्ट्य असं की एकदा का वाचक त्या अनुभवाला सजगतेने सामोरा गेला, की तो मुळचा उरत नाही. तो बदलतो. विचाराने, दृष्टिकोनाने, भावनेने. कळत, नकळत. इथं कवयित्रीला ते साधायचं आहे.

हेही वाचा: जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

अनुवाद या शब्दाचा एक अर्थ मागोमाग जाणं, असा आहे. स्त्रीचा प्रवास हा अंधारातून नव्या आभेकडे होणं कवयित्रीला अपेक्षित आहे. अर्थात स्वातंत्र्याची, स्वतंत्रतेची किंमत चुकवावी लागते. अनेक ओरखडे काळजावर घेऊन स्वतःची वाट शोधावी लागते. तशी हिम्मत, तसं धाडस आणि तसा आत्मविश्वास कवयित्री जवळ आहे. आणि ती स्वतःच्याच परंपरानिष्ठ रूपात तो आत्मविश्वास भरू पाहते. परंपरानिष्ठ सखीला सावध करून पहाटेच्या दिशेने घेऊन जाऊ पाहते.

ही कविता अत्यंत सूचक, अर्थबहुल आहे. अनेक प्रतिमांनी कवितेचा अवकाश समृद्ध केलाय. आयुष्य नावाची गोष्ट भुईसपाट करणारे वारे, तळहातावरचे उडून गेलेले रंग, धुकाळलेल्या दिशा, काळीजमणी, काळीजव्याधी अशा प्रतिमांमधून अर्थांची अनेक वलय निर्माण होतात. ओळख या आज्ञार्थी क्रियादर्शक शब्दाने कवितेची सुरवात होते. त्या नंतर 'ठेव, बघ, सांग' हे इतरही आज्ञार्थक क्रियादर्शक शब्द काही ओळींच्या सुरवातीला येतात.

इथं व्याकरणिक नियमोल्लंघन तर घडतंच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या आज्ञा जागृत करणाऱ्या, विचार प्रवृत्त करणाऱ्या ठरतात. सामान्यतः परंपरा स्त्रीला विचार करू देत नाही. विचार करण्याची, योग्य-अयोग्य ठरवण्याची, निर्णय घेण्याची संधी देत नाही.

या पार्श्वभूमीवर कवयित्रीचं स्वतःला, सखीला जागं करणं, त्यासाठी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. हा संवाद स्वतःचा स्वतःशी आणि स्वतःचा समभाव जगणाऱ्या सखीशी आहे. कवितेच्या अर्थसंपृक्त सौंदर्यामुळे आणि आश्वासक स्वरामुळे मला ही कविता महत्त्वाची वाटते.

हेही वाचा: 

बाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?