वाडा जागा झाला: अनागर समूहाचं जगणं मांडणारा कथासंग्रह

०६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय.

जागतिकीकरणोत्तर काळाने अंकित केलेलं आपलं जगणं, चंगळवादात कृषिवल समूहाची होणारी परवड, भरडलं जाणारं चेहराविहीन माणसांचं आयुष्य या कथा दृग्गोचर करतात. आत्मकेंद्री जग अशी ओळख या नवभांडवली व्यवस्थेने आकाराला आणलीय. त्यात शोषणाच्या अनेकविध नव्या वाटा निर्माण झाल्यात. आणि त्यात अनागर, कृषिवल समूह अधिकच पिचला जातोय. भूमिहीन शेतमजूर, वंचित दुर्बल घटक यांचं अधिकच शोषण केलं जातंय. हे आपलं समाजवास्तव या कथांमधून मांडण्यात आलंय.

कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. जगण्याचा प्रश्न मरण स्वस्त वाटावं एवढा पराकोटीचा झालाय. एकीकडे देश महासत्ता बनेल हा भाबडा आशावाद आहे तर दुसरीकडे देशातले करोडो लोक उपाशी पोटी जगताहेत. हा विरोधाभास प्रचंड अस्वस्थ करणारा आहे. जगणंच नको वाटावं एवढा टोकाचा निर्णय घ्यावा लागणारी हतबलता का येत असेल माणसाच्या आयुष्यात?

'पण काळ जगू देत नाही' या कथेतला शेतकरी सुशिक्षित नायक अशाच हतबलतेचा बळी ठरतो आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली जीवनयात्रा संपवतो. त्यातली शेवटची ओळ ही वेदनेचे महाकाव्य आहे. ती काव्यओळ या काळाचं, व्यवस्थेचं अचूक भाष्य म्हणतात येईल अशी आहे. 'मरण प्रिय नाही, पण काळ जगू देत नाही!'

हेही वाचाः ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

समकाळाचे जे अनेकविध प्रश्न आहेत त्यात माणसाच्या वृद्धावस्थेचा प्रश्न मोठा गंभीर बनत चाललाय. शिक्षणाचं प्रमाण वाढलं तरी त्यामुळे कुटुंबवत्सलता उत्तरोत्तर कमी होत चाललीय. जन्म देणारे आईवडील ओझं वाटायला लागलेत. वृद्धाश्रमाची संख्या झपाट्याने वाढतेय. शारीरिक, मानसिक पातळीवर कुटुंबाची मोठी गरज असते तेव्हा आपल्याला एकलकोंड जीवन जगावं लागतंय. 'गुरुजी'मधल्या गुरुजींना अशाच अवस्थेत जगावं लागतं.

आयुष्यभर मुलांच्या गराड्यात राहणाऱ्या विद्यार्थिप्रिय गुरुजींना अखेरच्या दिवसात कमालीच्या विजनवासात दिवस काढावे लागतात. मुलासुनेने अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या गुरुजींना डॉक्टर झालेला त्यांचा विद्यार्थी सन्मानाची वागणूक देतो तेव्हा त्यांना खूप भरून येत. पण घरी ये रे माझ्या मागल्या सुरू होतं तेव्हा त्यांनाही जीवन नकोसं वाटतं आणि ते मरण जवळ करतात.

मानवी जगण्यातलं हे क्रौर्य आपल्याच रक्तामासाच्या माणसांमधे कुठून आणि कसं साचत जात असेल. ही शोकांतिका एकट्या गुरुजींची नाही वृद्धापकाळात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक वृद्धांची आहे. प्रमाण कमी अधिक असेल, पण वास्तव हेच आहे.

स्वातंत्र्याच्या सातव्या शतकातही अभावाचं जगणं जगणारा मोठा समूह आपल्या समाजात आहे. भूमिहीन, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न गंभीर बनताहेत. त्यांच्या जगण्याला वेठीस धरणारा समाजही मोठाच आहे. 'एका पायलीसाठी' या कथेतला नायक भुकेने हतबल होतो. रात्रीच्या जेवायला तरी काही मिळवायचं असेल तर त्यासाठी काम मिळणं आवश्यक आहे म्हणून जमीनदारकडे जातो. उपाशीपोटी दिवसभर शेतात राबतो. संध्याकाळी जेव्हा त्याची बायको श्रममूल्य म्हणून एक पायली ज्वारी मागायला जाते तेव्हा तिथे तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. परिस्थिती शरण माणसं असाच जगण्याशी लढा देत जीवन जगत असतात.

पाण्याचा प्रश्न हा आता कुठल्या प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही. जागतिक स्तरावर ही समस्या पोचलीय. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि इथे तर हंडाभर पाण्यासाठी वणवण करत मैलोनमैल बायकामुलांना फिरावं लागतं. 'हापसा' या कथेतून लेखकाने गावखेड्यातले ताणेबाणे, तिथं केलं जाणारं बीभत्स राजकारण त्यासाठी क्रूर होणारी माणसं यांचं चित्रण अत्यंत ताकतीने उभं केलंय.

हेही वाचाः आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

'व्यसनमुक्ती' ही कथाही ‘हापसा’च्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणारी आहे. एखादा निःस्वार्थ निर्भेळ माणूस गावासाठी, समाजासाठी काही चांगलं करू पाहतो. त्याचा स्वीकार करून समाज त्याच्यापाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं. काही काळ समाज तसं उभं असल्याचं भासवतोही. पण त्याच माणसाच्या चारित्र्यावर कुणी एखादा विघ्नसंतोषी माणूस काही चिखलफेक केली तर त्यावरही लगेच विश्वासही ठेवतो. त्याच्या चांगुलपणावर संशय घेतो. त्याला वाईट ठरवण्यासाठी लोक टपून बसलेलीच असतात. गुणवत्ता नाकारता येत नाही तेव्हा चारित्र्यहनन करणं हा इथला रूढ प्रघात आहे. हे या कथेतही प्रत्ययाला येतं.

प्रेमाचं आणि मैत्रीचं नाते हे घनाच्या घावानेही तुटत नाही. मात्र संशयाच्या सुईने ते उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, असं म्हणतात आणि ते अगदीच खरं आहे. नवरा, बायकोच्या नात्यात तरी परस्परविश्वास हा अत्यंत मूलभूत असतो. या नात्यात संशयाने शिरकाव केला तर संपूर्ण आयुष्य एकप्रकारे जीवघेणा संघर्ष ठरू शकतं. 

'बईलफासा' या कथेतल्या नायकाच्या मनात अशाच एका गैरसमजाने घर केलं आणि तो दारूच्या आहारी गेला. त्यात घराचा संपूर्ण गाडा त्याच्या बायकोला ओढावा लागतो. मुलाचं संगोपन, घराची, नवऱ्याची काळजी यात त्या बाईची झालेली त्रेधातिरपीट, तिची घुसमट ही अस्वस्थ करणारी आहे.

'वाडा जागा झाला' हा लघुकथासंग्रहात २९ कथा आहेत. त्यातील दोन-तीन कथा या एकसुरी झाल्यात. त्या कथांवर, कथन आशयावर लेखकाने पुर्नलेखन करणं आवश्यक होतं, असं वाटतं. 'काळा नाग' या कथेमधे रस्त्याला विरोध करणारा सूर आलाय, तो आजच्या काळात गैरलागू वाटतो.

'झुंज' सारखी कथा मात्र आजच्या काळाचं विदारक चित्र उभं करते. कथेतलं संवादी, नर्मविनोदी कथन एक चांगला वाचनांद मात्र नक्की देतो. शंकर पाटील यांच्या कथालेखनाची आठवण या कथा वाचताना येत राहते.
 
कथासंग्रह: वाडा जागा झाला
लेखक: विजय चव्हाण
प्रकाशक: शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
मुखपृष्ठ: प्रा. महेश महामुने
किंमत: १७५ रुपये    पानं: १२८

हेही वाचाः 

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं

तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

चला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया!

तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई