पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट

२९ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे दाखवण्यात आलेल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या सिनेमात एका तरूणीची गोष्ट सांगितलीय. आपल्या जाडेपणामुळे शरमेनं मान खाली घालणारी पेट्रूनिया अचानक व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारते आणि पुरूषसत्तेला आव्हान देते. या सगळ्या प्रवासात लाखमोलाचा आत्मविश्वास घेऊन पेट्रूनिया जिंकते.

गोव्यात पार पडलेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फी चांगलाच रंगला. २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे आठ दिवस भरपूर सिनेमे घेऊन हा महोत्सव प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांची, चित्रपट प्रेमींची प्रचंड गर्दी गोव्यात फिल्म फेस्टिवल चालू झाला की दिसू लागते. या फिल्म फेस्टिवलमधे वल्ड पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय सिनेमे वगैरे असे वेगवेगळे भाग असतात.

प्रेक्षकांच्या आयुष्यभर लक्षात राहतील असे छप्परतोड सिनेमे इफ्फीमधे दरवर्षी  दाखवले जातात. काही सिनेमांचं प्रदर्शनच इफ्फीमधे होतं. यंदा वल्ड पॅनोरमा या विभागात मॅसिडोनिया देशातल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ हा चित्रपट कलाअकादमी इथं प्रदर्शित झाला. देव आहे, तिचं नाव पेट्रूनिया, असं या सिनेमाच्या नावाचं भाषांतर करता येईल.

पॅनोरमा म्हणजे व्यापक दृष्टिकोन. एखाद्या गोष्टीचा व्यापक दृष्टिकोन शिकवणारा सिनेमा असा याचा अर्थ होऊ शकतो. गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ हा सिनेमा खरोखर व्यापक दृष्टिकोन देतो. कशाबद्दलच्या तर स्त्री सौंदर्याच्या व्याख्येचा व्यापक आणि प्रगल्भ दृष्टिकोन! 

क्रॉस शोधेल त्याला सन्मान मिळेल

पेट्रूनिया या तरुणीच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. पेट्रूनिया तब्बेतीनं फार जाड असते. तिची अवाढव्य शरीरयष्टी पाहून तिच्याशी लग्न करायला कोणीही तयार नसतं. ३२ वर्षाची झाली तरी पेट्रूनियाचं लग्न ठरत नाही. तिनं इतिहास विषयात पदवी मिळवलेली असते. पण ती आकर्षक दिसत नसल्यानं तिला नोकरीही मिळत नसते.

पेट्रूनियानाला काहीतरी काम मिळावं, नोकरी मिळावी म्हणून तिची आई सतत प्रयत्न करत असते. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना 'तिथं तुझं वय २५ वर्षे आहे' असं तिची आई तिला सांगायला लावते. या सगळ्याचा अगदी पेट्रूनियाला वीट आलेला असतो.

पेट्रूनियाच्या घराजवळ एकदा कसलासा धार्मिक कार्यक्रम चालू असतो. या प्रथेनुसार चर्चचे फादर एका पुलावरून छोटा लाकडी क्रॉस वाहत्या नदीत टाकतात आणि खाली उभे असलेले पुरुष तो क्रॉस शोधतात. क्रॉस शोधून आणेल त्याला त्याचा आदरसत्कार केला जातो. पेट्रूनिया लहानपणापासून ही प्रथा पाहत असते.

हेही वाचा : इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं

आणि पेट्रूनिया आत्मविश्वासाचं पाऊल टाकते

प्रथा सुरू होते, तेव्हा ती पुलाखाली जाऊन थांबते. फादर क्रॉस नदीत फेकतात आणि पेट्रूनिया क्रॉस शोधण्यासाठी नदीत उडी मारते. क्रॉस शोधणाऱ्या सगळ्या पुरुषांच्या नाकावर टिच्चून पेट्रूनिया क्रॉस मिळवते. पण एका मुलीने क्रॉस मिळवावा, हे तिथं जमलेल्या पुरुषसत्ताक प्रथा नसानसात भिनलेल्या लोकांना आवडत नाही. ते सगळेच पेट्रूनियाला विरोध करतात. पेट्रूनिया तिथून क्रॉस घेऊन घरी पळून जाते.

प्रथा बघण्यासाठी जमलेल्या काही जणांनी या घटनेचा वीडिओ काढलेला असतो. तो सोशल मीडियावर वायरल होतो. त्या वीडिओवरून माग काढून पोलिस पेट्रूनियाला अटक करतात. तो क्रॉस पेट्रूनियाने चर्चला परत देऊन टाकावा यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो. पण एकूणच पुरुषसत्ताक प्रथेच्या विरोधात पेटून उठलेली पेट्रूनिया त्यांना अजिबात जुमानत नाही.

पेट्रूनियाला अटक होते त्या रात्री एक वेगळाच ड्रामा तिथे चालतो. शेवटी विजय पेट्रूनियाचा होतो, हे काही वेगळं सांगायला नको. या प्रवासात तिची काळजी घेणारा असा भविष्यातला जोडीदारही तिला पोलिस स्टेशनमधे भेटतो. अगदी शेवटी पोलिस स्टेशनच्या बाहेर आल्यावर पेट्रूनिया तो क्रॉस परत देऊन टाकते. आणि जबरदस्त आत्मविश्वासाने पावलं टाकत तिच्या घरी जाते.

पुरूषसत्ता जगभर सारखीच असते

तर अशी ही गोष्ट. जगभरातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमधे २० पेक्षा जास्त बक्षिसं या चित्रपटाला मिळाली आहेत. ही सर्व बक्षिसं हा चित्रपट नक्कीच डिझर्व करतो.

तरुण वयातल्या मुलींना भेडसावणारा जाडेपणाची समस्या हा विषय तसा संपूर्ण जगभर वेगवेगळ्या पध्द्तीने आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडे या प्रश्नावर भाष्य करणारा `वजनदार` नावाचा चित्रपट मराठीत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी केला. त्या चित्रपटात सुद्धा प्रिया बापट या अभिनेत्रीने केलेल्या मुलीची भूमिका अशाच तब्येत जास्त असणाऱ्या मुलीची आहे.

पुरुषसत्ताक प्रथांमुळे मुली आजही समाजात वावरताना दबकून, घाबरून वावरतात. पुरूषसत्तेनं घालून दिलेल्या सौंदर्यांच्या व्याख्येत न बसणाऱ्या मुली जास्त त्रास सहन करतात. हे चित्र संपूर्ण जगभरात पाहायला मिळतं. दक्षिण युरोपमधील मॅसिडोनिया या देशातसुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीय. तिथल्या आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी पेट्रूनिया खूप बोल्ड आहे. क्रॉस मिळवल्यानंतर ती अजिबात न घाबरता सर्व परिस्थितीला सामोरी जाते.

हेही वाचा : महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

जगभरातल्या पेट्रूनियाला आपण सपोर्ट केला पाहिजे

आपल्या जाडेपणामुळे कधी शरमेनं मान खाली घालणाऱ्या पेट्रूनियाला पोलिस प्रमुख काही खाजगी प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांना तोंड वर करून उलट प्रश्न करण्याची हिम्मत पेट्रूनिया दाखवते. कुणी समलैंगिक संबंध ठेवत असेल तर तो माणूस लगेच ‘गे’ होतो का? तिच्या या प्रश्नानंतर तो पोलिस निरुत्तर होतो. पण थियेटरमधे प्रेक्षकांनी दिलेली टाळ्यांची दाद खूप काही सांगून जाते.

या शिवाय चित्रपटात दाखवलेल्या इतर स्त्री पात्रांमधून एका न्यूज चॅनलसाठी वृत्तांकन करणारी पत्रकार तरुणी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहते.  चित्रपट संपल्यानंतरही पेट्रूनिया आपल्या डोक्यातून जात नाही. आपल्याकडच्या मुलीसुद्धा  पेट्रूनिया सारखंच पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात पेटून उठत आहेत. त्याला आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नक्कीच सपोर्ट करायला हवा.

हेही वाचा : 

संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक

गंभीर सत्यघटनेचा विनोदी सिनेमा आपल्या चांगलाच लक्षात राहील

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच