द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज

२५ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय.

काश्मीर, तिथलं निसर्गसौंदर्य बर्फाच्छादित हिमशिखरं. याला गालबोट लावणारा तिथला हिंसाचार, दहशतवाद. कश्मिरी जनता कायम संघर्षच करत आलीय. लष्कराला शिव्यांची लाखोली वाहणारे काश्मिरी तरुण, फुटीरतावाद्यांचं त्यांना असलेलं कधी छुपं तर कधी उघडं समर्थन. आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेलं पाकिस्तानचं खतपाणी. हे सर्वच्या सर्व आजवर या ना त्या कारणानं रुपेरी पडद्यावर येऊन गेलंय. मग आता नवीन काय दाखवायचं? आणि आमचं काय बघायचं राहिलंय?

नवीन काय हा प्रश्न प्रत्येक कॅमेराच्या मागे उभं राहून डिरेक्शन करणाऱ्यांना पडतो. याचं उत्तर सर्वजण आपापल्यापरीने शोधतात. आणि कलाकृती सादर करतात. कोणाची कलाकृती यशस्वी ठरते तर कोणाची अयशस्वी. पण म्हणून कोणी काही प्रयत्न सोडून देतं नाही. असाच प्रयत्न केलाय डिरेक्टर राज निदिमोरू आणि कृष्णा डी. के. या जोडगोळीने. ही सिरीज ऍमेझॉन प्राइमवर गेल्याच आठवड्यात सुरू झाली. नाव ‘द फॅमिली मॅन’ असं आहे.

गुप्तचर यंत्रणांनाच सल्ले

देशात एखादा दहशतवादी हल्ला झाला की आपण सामान्य लोक प्रसारमाध्यमं, माध्यमवीर ‘गुप्तचर यंत्रणांच्या हलगर्जीमुळे हा हल्ला झाला’ किंवा ‘गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का’ अशी डायलॉगबाजी करून अपयशाचं खापर गुप्तचर यंत्रणांवर फोडतो. त्यांना सरळसरळ आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करतो.

आपल्या सुरक्षा यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांनी कसं वेळीच सावध करायला हवं, हा हल्ला कसा टळला असता किंवा अमकं झालं असतं तर हा हल्ला टाळता आला असता वगैरेवर सल्ला देणाऱ्या चॅनेलीय चर्चां सुरू होतात. या सगळ्याला हल्ली मीडिया ट्रायल असं म्हणतात. पण घटना घडून गेल्यावर या चर्चांना फारसा अर्थच उरत नाही.

आपण काही वेळा वृत्तपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात ‘दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला’ किंवा ‘दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त’ अशा बातम्या वाचतो. साधारणतः एखाददोन कॉलममधे संपवण्यात आलेल्या या बातम्यांकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही. पण म्हणून त्यांचं महत्त्व कमी होतं नाही.

हेही वाचा: सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

गुप्तचर यंत्रणेची माहिती वेब सिरीजमधून

दहशतवादी हल्ल्याचा कट कसा उधळला जातो, मुळात असा काही दहशतवादी हल्ला होणार याचा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागतोच कसा, त्यांना कसं कळतं की अमक्या ठिकाणी दहशतवादी लपलेत, तमक्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा कट शिजतोय वगैरे. हे सर्व करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांना कसं काम करावं लागतं, किती माहिती गोळा करावी लागते, माहितीचे तुकडे जोडतजोडत माहितीच्या सोर्सपर्यंत कसं पोचता येतं इत्यादी प्रश्न आपल्याला पडतात.

मुख्य म्हणजे गुप्तचर म्हणून या प्रक्रियेत कोणती माणसं सहभागी होतात, त्यांचं वैयक्तिक आयुष्य असतं का, असलं तरी त्यांचं कुटुंब असतं का, की सतत देशाचाच विचार ते करत असतात, त्यांना चेहरा असतो का, गुप्तचर यंत्रणांमधे काम करणाऱ्यांची पद्धती कशी असते, इतर क्षेत्रात असतं तसं इथेही वरिष्ठांचं राजकारण असतं का इत्यादी सर्वच प्रश्नांची उत्तरं या वेब सिरीजमधून देण्याचा प्रयत्न डिरेक्टरने केलाय.

श्रीकांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल

एनआयए अर्थात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी. या तपास यंत्रणेच्या खास सेक्शनमधे अधिकारी पदावर काम करणाऱ्या श्रीकांत तिवारी म्हणजे मनोज वाजपेयी. त्याच्या चौकोनी कुटुंबात पत्नी सुचित्रा म्हणजे प्रियामणी, एक मुलगी आणि एक मुलगा आहेत.

मुंबईतल्या एका सरकारी कार्यालयात आपला नवरा फाइली या टेबलावरून त्या टेबलावर फिरवतो. कधी दिल्लीतून सिनियर मुंबईत येतात. तेव्हा मात्र दोन-चार दिवस ऑफिसच्या बैठकांमधे जातात. आणि घरी येत नाही. त्यामुळे वैतागलेली सुचित्रा त्याला ही सरकारी नोकरी सोडून दुसरीकडे नोकरी करण्याचा आग्रह धरते. पण कुटुंबाइतकंच आपल्या कामावरही प्रेम करणारा श्रीकांत ‘बघू नंतर’ असं म्हणून तिचं बोलणं मनावर घेत नाही.

कधी मुलांना शाळेत सोडणं, परत आणणं, मंडईतून भाज्या आणणं ही कामं श्रीकांत बायकोच्या आग्रहामुळे करतोह. पण त्याचं मन सतत फील्डवरच्या घडामोडींभोवती पिंगा घालत असतं. डेस्क जॉबला कंटाळलेल्या श्रीकांतवर त्याचे वरिष्ठ एक कामगिरी सोपवतात.

हेही वाचा: अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

गुजरात दंगलीचा बदला

लक्षद्वीपजवळच्या समुद्रात तटरक्षक दलाने पकडलेल्या ३ आयसिसच्या हस्तकांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचं काम येतं. आणि श्रीकांत, त्याचा सहकारी जेके तळपदे म्हणजे शरीब हाश्मी आणि ट्रेनी उमेदवार झोया म्हणजे श्रेया धन्वंतरी हे काम आनंदानं स्वीकारतात.

तटरक्षक दलाकडून हस्तांतरित झालेल्या आयसिसच्या ३ हस्तकांना मुंबई विमानतळावर एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवलं. तिघेही हस्तक एटीएसच्या जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांचा एक साथीदार मारला जातो. तर दुसरा दहशतवादी  गंभीर जखमी होतो. तिसरा दहशतवादी मूसा जीव वाचवण्यासाठी एका प्रार्थनास्थळाचा आश्रय घेतो.

श्रीकांत एटीएसकडून परवानगी घेऊन मूसाची सुटका करतो. मूसा आणि आसिफ या दोघांनाही हॉस्पिटलमधे दाखल करतो. आणि त्याची टीम त्या दोघांवर नजर ठेवते. गुजरात दंगलीत मूसाच्या कुटुंबाची वाताहत होते. त्याचा बदला घेण्यासाठी आयसिसमधे जातो. मूसा केरळमधे असलेल्या त्याच्या आईला भेटण्यासाठी कासावीस होतो. आपण दहशतवादी झाल्याचं आईला समजलं तर ती धक्क्यानेच मरेल, असं सांगून मूसा श्रीकांतची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा: शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण

आसिफ नाही मूसाचा खरा सूत्रधार

मूसाचा साथीदार आसिफ हा कोमात जातो. तो भारतात मोठा घातपात करण्यासाठी आला होता, अशी माहिती श्रीकांतला मिळते. त्यामुळे आसिफला शुद्धीवर आणून त्याच्याकडून कटाची सर्वच माहिती मिळवण्याचा त्याचा इरादा असतो. पण एका चकमकीत दहशतवादी म्हणून तीन निरपराध तरुणांना ठार मारल्याचा आळ श्रीकांत आणि त्याच्या सहकाऱ्यांवर येतो. श्रीकांत या सगळ्याची जबाबदारी घेऊन झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याची तयारी दाखवतो.

पूर्वीचे बॉस कुळकर्णी म्हणजे दलीप ताहील यांच्या मध्यस्थीमुळे श्रीकांतचं निलंबन टळतं. त्याची श्रीनगरला बदली होते. इकडे हॉस्पिटलात मूसा बरा होतो. नर्सची सहानुभूती मिळवून दुसऱ्या वॉर्डमधे आसिफ उपचार घेत असतो. पण मूसा त्याला औषध देऊन ठार मारतो. आणि हॉस्पिटलमधून फरार होतो. भारतात घातपात घडवण्याच्या कटाचा खरा सूत्रधार आसिफ नसून मूसा हाच आहे. ही गोष्ट लक्षात येताच चिडलेला श्रीकांत या कटाची पाळंमुळं खणून काढण्याचा निर्धार करतो.

मनोज वाजपेयीचा सहज अभिनय

भारतावर हल्ला करण्यासाठी आयसिस आणि आयएसआय यांनी ‘मिशन जुल्फिकार’ हा कट आखलेला असतो. याच हल्ल्याचा सुगावा श्रीकांतला लागतो. काय असतं मिशन, त्याचं स्वरूप, त्याचा सूत्रधार कोण आणि हे मिशन रोखण्यात श्रीकांत यशस्वी होतो, मूसाचा ठावठिकाणा कळतो, मूसा आपल्या आईला भेटतो, यात श्रीकांत आणि सुचित्रा यांच्या जीवनात वादळ येतं, काय असतं ते वादळ, श्रीकांत-सुचित्राचा संसार टिकतो का इत्यादी प्रश्न आपल्याला पडतील. त्याची उत्तरं मिळवण्यासाठी ४४० मिनिटांची दहा भागांची ही वेब वेब सारीज बघायलाच हवी.

स्त्री, शोर इन द सिटी, नाइन्टी नाइन यांसारखे वेगळे कथाबिजं असलेले सिनेमे. या सिनेमांचे डिरेक्टर राज निदिमोरू आणि कृष्णा डीके ही जोडगोळी. या वेब मालिकेवर त्यांनी आपला ठसा उमटवलाय. उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी, समर्पक बॅकग्राऊड म्युझिक, लोकेशन, शॉर्टची फ्रेमिंग या सगळ्यांत दोघांनीही कसलीच कसूर सोडली नाही.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर मनोज वाजपेयीने त्याच्या नेहमीच्या स्टाइलने श्रीकांतच्या व्यक्तिरेखेत जान आणलीय. खराखुरा तपास अधिकारी वाटतो तो. शिडशिडीत शरीरयष्टी, चेहऱ्यावर गंभीर भाव, हातात सतत सिगरेट, मुलांशी बोलनाही तोलूनमापून बोलणारा, सुचित्राशी बहुतेकदा मौनातून संवाद साधणारा, सुचित्राच्या आयुष्यात डोकावू पाहणारा. तसंच तिचा सहकारी अरविंदबद्दल म्हणजे शरद केळकर त्याच्याबद्दल मनात असलेली अढी, हे सर्व मनोजने सहज साकारलंय.

हेही वाचा: ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

मूसाच्या रोलनेच भाव खाल्लाय

एकीकडे आपला नवरा आणि मुलांवर जीवापलिकडे प्रेम करणारी. पण करिअरलाही तेवढंच महत्त्व देणाऱ्या सुचित्राच्या भूमिकेला दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीने पुरेपूर न्याय दिलाय. या सगळ्यात मात्र मूसाच्या रोलने भाव खाल्लाय. मल्याळी अभिनेता नीरज माधवने हा रोल अक्षरशः जगलाय असं वाटतं. थंड डोक्याचा पण तेवढाच क्रूर आणि आपल्या मिशनला ‘अंजाम’ देऊन गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी उतावीळ झालेला, आपल्या अम्मीला आपलं खरं रुप समजू नये यासाठी तळमळणारा.

नीरजने अगदी संयमाने मूसाला उभा केलंय. श्रीकांतचा ज्युनियर जेके तळपदे म्हणून वावरलेला शरीब हाश्मी खास लक्षात राहतो. झोया, पाशा म्हणजे किशोर कुमार जी, श्रीकांतचा ‘मेंटॉर’ कुळकर्णी म्हणजे दलीप ताहील, साजिद म्हणजे शहाब अली, सलोनी म्हणजे गुल पनाग, मेजर समीर म्हणजे दर्शन कुमार यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिलाय.

वेब वेब सारीज: द फॅमिली मॅन

दिग्दर्शक: राज निदिमोरू आणि कृष्णा डीके

सोर्स: ऍमेझॉन प्राइम व्हिडीओ

कलाकार: मनोज वाजपेयी, प्रियामणी, शरीब हाश्मी, नीरज माधव, गुल पनाग, दलीप ताहील

हेही वाचा: 

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक