महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक म्हणजे रिंगण. यंदाचा रिंगणाचा अकरावा विषेशांक हा संत परिसा भागवत यांच्यावर आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या संस्था चर्चा, संवादाचे कार्यक्रम आयोजित करतात. असाच एक सोहळा नुकताच परभणीत झाला. त्यात ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडलेले विचार, त्यांच्याच फेसबूक पोस्टमधून साभार.
रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं. पत्रकार सचिन परब हे वार्षिक संपादित करत असतात. यावर्षी या अंकाचा अकरावा विशेष अंक प्रकाशित झाला. नामा, चोखा, जना, निवृत्ती, विसोबा, गोरा, सावता, सोपानदेव, नरहरी, मुक्ता आणि यावर्षी परीसा असे संतांवरचे विशेष अंक रिंगणनं प्रकाशित केलेले आहेत.
अजून बहिणा, निळा, शेख महंमद, महिपती बुवा, कानोपात्रा, जगमित्र नागा, सेना बाकी आहेत. सचिन परबांची तर इच्छा तर तुकडोजी, गाडगेबाबांपर्यंत आणि साने गुरुजींवरही अंक प्रकाशित करण्याची आहे. पंढरपूरचे मंदिर अस्पृश्यांना खुलं करणारे साने गुरुजी हे संतपरंपरेतलीच होते असं सचिन परबांना वाटतं.
या वर्षीच्या अकराव्या परिसा भागवत विशेषांकाचं २३ जुलै २०२३ रोजी परभणीत विजय कान्हेकर यांच्या यशस्विनी सभागृहात प्रकाशन झालं. याआधी आठ वर्षांपूर्वी २०१५ ला रिंगणचा तिसरा अंक जनाबाईवर निघालेला होता. त्याचे परभणी आणि गंगाखेडला दोन शानदार प्रकाशन समारंभ झालेले होते. आठ वर्षानंतर पुन्हा एकदा परभणीत रिंगणचा प्रकाशन सोहळा पार पडला.
मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्र परभणीच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मुंबईचे दत्ता बाळसराफ आणि रिंगणचे संपादक सचिन परब या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले होते.
आम्हा परभणीकरांसाठी ही भाग्याची गोष्ट होती की रिंगणची सुरुवात परभणी परिसरातल्या संतांपासून झाली. त्यानंतर आतापर्यंत तीन अंक परभणी परिसरातील संतांवर निघालेले आहेत. पहिला नामदेवांवर, तिसरा जनाबाईंवर आणि नंतर एक विसोबा खेचर यांच्यावर देखील रिंगणनं अंक प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रकाशित झालेल्या अकरा अंकांपैकी तीन अंक परभणी परिसरातल्या संतांवर झालेले आहेत.
रिंगणची सुरुवात नामदेवांपासून म्हणजे परभणी परिसरातील संतांपासूनच झालेली आहे. यावर्षीच्या परिसा भागवत विशेषांकात लिहिणारे दोन लेखक परभणी परिसरातील आहेत. सोनपेठच्या महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. विठ्ठल जायभाय आणि पालम परिसरातील खेड्यातला विज्ञानाचा विद्यार्थी ओंकार पाटील यांनी या अंकात लेख लिहिलेले आहेत.
रिंगणचा पहिला अंक प्रकाशित झाला तो संत नामदेवांवर.अकरा वर्षांपूर्वी वृत्तपत्रात या अंकाविषयी वाचून तो अंक मागवून घेतला होता. वाचून झाल्यावर संपादकाशी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. तेव्हापासून सचिन परब जवळचे झाले.
हे जे अंक निघतात ते केवळ संतांचे गौरव करण्यासाठी निघत नाहीत. संत कॅश करण्यासाठीही निघत नाहीत. कारण तसं असतं तर त्यांनी ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यावर आधी अंक केले असते. पण तसं झालेलं नाही. एक भूमिका घेऊन उपेक्षित संतांना न्याय देण्याचं काम रिंगणमधून केलं जातं.
ही भूमिका संतांकडं सामाजिक अंगानं पाहण्याची तर असतेच असते पण त्यासोबतच ही सगळी मंडळी वैज्ञानिक दृष्टिकोन मांनणारी आहेत. वैज्ञानिक दृष्टी कोणावरही सगळे संत टिकून राहतात. नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? याची नजर देणारे हे अंक असतात.
हे अंक केवळ तर्क कठोर भाषेत सिद्धांत, समीक्षा, संशोधन मांडणारे नसतात. तर भूमिका, लालित्य आणि संशोधन याचा सुंदर मेळ इथं घातलेला असतो. भूमिका अगदी मुखपृष्ठापासून सुरु होते. या अंकाच्या मुखपृष्ठावर कधीच त्या त्या संतांचे सर्वत्र फ्रेममध्ये दिसणारे चकचकीत डेकोरेशन आणि मेकअप केलेले फोटो छापलेले नसतात.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे त्या संताच्या कालखंडांचा अभ्यास करून, त्याच्यावर खूप विचार करून, त्या संतांचे वय, त्या संतांची भूमिका, तेव्हाचे वेश या सगळ्यांचा अभ्यास करून ही मुखपृष्ठं तयार केलेली असतात. त्यामुळे ही मुखपृष्ठ फार कलात्मक असतात.
यावर्षी निवडलेले संत परिसा भागवत हे फारसे लोकांना माहीत नसताना आणि त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसताना सचिन परब यांनी हा अंक काढलेला आहे. या अंकात लेख लिहिणाऱ्या अनेकांनी घेतलेल्या मुलाखतीत कोण परिसा भागवत? असा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. पण हा अंक वाचल्यानंतर आता, कोण परिसा भागवत? असा प्रश्न लोक विचारणार नाहीत.
परीसा भागवत हे रुक्मिणी मातेचे पुजारी, उच्चकुलीन ब्राह्मण असूनही त्यांनी शिंपी नामदेवांना आपला गुरु केलं. त्यांचं हे स्वतःला असं डिक्लास, जातविहीन करणं हे परबांना क्रांतिकारक वाटलं. त्यामुळं त्यांनी या वर्षी संत परिसा भागवत यांची निवड केली.
दरवर्षी नव्या संताचा, त्या संताच्या नव्या कंगोऱ्यांचा, ते स्पष्ट करणाऱ्या नव्या लेखकांचा, शोध घेणं हे मोठं मुश्किल काम असतं. सचिन परब ते मोठ्या कौशल्यानं करतात. त्यांच्याकडची नेहमी लिहिणारी सदानंद मोरे, ओम दत्तोपासक, शिवाजीराव मोहिते, नंदन राहणे, नीलेश बने, भास्कर हांडे ही मंडळी तर आहेतच.
त्यापलिकडे जाऊन प्रत्येक अंकासाठी तितकेच नवे लेखक शोधून, त्यांच्यावर विशिष्ट जबाबदारी टाकून, त्या त्या संतांच्या गावाला, त्या संतांचा संबंध आलेल्या गावाला, संतांनी हाताळलेल्या विषयाला स्पर्श करणारे लेख लिहून घेणं हे मोठं अवघड काम सचिन परब करतात. त्यामुळं यावर्षीचा अंक निघाला की ते पुढच्या वर्षीच्या अंकाची तयारी सुरू करतात. पुढच्या वर्षासाठी त्यांनी संत चांगदेव यांची निवड केलेली आहे. त्याची तयारीही सुरू केलेली आहे.
प्रत्येक अंकाची निर्मिती श्रीमंत केलेली असते. भरपूर रंगीत फोटो, गुळगुळीत महागडा कागद, कसल्याही कंपन्यांच्या, दुकानांच्या व्यावसायिक जाहिराती न घेता हे अंक प्रकाशित केले जातात. किंमत अतिशय कमी ठेवली जाते. त्यासाठी वेगळ्या प्रकारे पैसा उभा केला जातो. एकेका अंकाचा निर्मिती खर्च आजच्या परिस्थितीत चारशे ते पाचशे रुपये इतका होऊ शकतो. पण अंक केवळ एकशे वीस रुपयात दिला जातो.
सामान्य वारकरी देखील तो घेऊ शकला पाहिजे हा त्यामागचा परब यांचा उद्देश असतो. या अंकाची काही पुस्तकंही आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्यावरची पुस्तक आलेली आहेत. ती पुस्तकही कमीत कमी किमतीत द्यावीत असा प्रयत्न सचिन परब करतात. संत जनाबाई यांच्यावरचं पुस्तक तर तिनशे पानांचं असूनही केवळ पन्नास रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं.
आता सचिन परब यांनी 'अभंगदर्शन' नावाची दिनदर्शिकाही सुरू केलेली आहे. त्यामुळं नव्या पिढीला वारी, वारकरी आणि वारकरी संत यांच्याकडं पाहण्याची दृष्टी देणारं एक वार्षिक आणि एक दिनदर्शिका या अत्यावश्यक गोष्टी सचिन परब यांनी तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं नव्या पिढीचे लोक या परंपरेकडं डोळसपणे पाहतात. डोळसपणे ही परंपरा पुढं नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अगदी विशीबावीशीचे तरुण वाचक आणि लेखक रिंगणशी जोडले जातात.
खरं तर परंपरेनं रिंगण अशुभ समजलेलं होतं. शुभ ठिकाणी रिंगण घालत नाहीत. कारण रिंगणामुळं माणूस फेऱ्यात पडतो, अशी अंधश्रद्धा आहे. पण वारकरी परंपरा कुठल्याच अंधश्रद्धा मानत नाही. आणि पाळतही नाही. 'तुका म्हणे हरीच्या दासा, शुभकाळ अवघ्या दिशा' हे तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे. कुठलीही दिशा अशुभ नाही आणि कुठलाही क्षण अशुभ नाही.
हरीच्या दास जिकडं चालेल ती दिशा शुभ असते आणि तो ज्या क्षणी चालायला सुरुवात करेल तो क्षणही शुभ असतो, हे तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं वारकरी परंपरेनं रिंगणाचा निषेध न करता त्याला संस्कृतीचा भाग करून घेतलेलं आहे. वारकऱ्यांच्या दिंडीत होणारं रिंगण हे आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यावरून परबांनी अंकाला रिंगण असं नाव दिलेलं आहे.
यंदचा अक हा परिसा भागवत विशेषांक आहे. परिसा भागवत हे रुक्मिणीचे पुजारी होते. ते भागवताची कथा सांगत म्हणून भागवत आणि रुक्मिणी मातेनं प्रसन्न होऊन त्यांना परिस दिला होता म्हणून परिसा. परिसा भागवत यांच्या पत्नी आणि नामदेव यांच्या पत्नी दोघी मैत्रिणी.
परिस मिळाल्यामुळं भागवतांच्या घरी समृद्धी होती आणि नामदेवांच्या घरी सततच चणचण असायची. एकदा आपल्या मैत्रिणीच्याही घरी समृद्धी यावी म्हणून परिसा भागवत यांच्या पत्नीनं नामदेवांच्या पत्नीला परिस दिला. नामदेव तेव्हा बाहेर गेलेले होते. परत आल्यावर मोठ्या कौतुकानं नामदेवाच्या बायकोनं त्यांना परिश दाखवला आणि आता आपण श्रीमंत होणार असं सांगितलं.
नामदेवांनी मोठ्या कौतुकानं तो परिस मागून घेतला आणि आपल्या घराच्या दारातून चंद्रभागेच्या डोहात भिरकावून दिला. ही गोष्ट कळल्यावर परिसा भागवत आरडाओरडा करत नामदेवाकडं आले आणि माझा परिस मला परत कर, म्हणू लागले. तेव्हा नामदेवांनी इंद्रायणीच्या डोहात उडी मारली आणि ओंजळभर गोटे वर आणले. 'घे हे सगळे परिसच आहेत.' असं म्हणून त्याला खात्री करून घ्यायला सांगितलं.
ही कथा या अंकात वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की परीसा भागवताचा खराखुरा परीस जो इंद्रायणीच्या डोहात आठशे वर्षांपूर्वी नामदेवांनी फेकून दिला तो बारा वर्षांपूर्वी सचिन परब यांना सापडला असावा. त्याचं नाव रिंगण असावं. हे रिंगण ज्या ज्या उपेक्षित संतांना स्पर्श करतं त्या त्या संताचं खरंच सोनं करून दाखवतं. त्यामुळं आतापर्यंत फारसे दखलपात्र न ठरलेले सगळे संत घेऊन सचिन परब यांनी ते लोकांच्या मनी उतरवण्याचं मोठं काम केलेलं आहे.
दिवाळीत चांगले दिवाळी अंक वाचल्याशिवाय सुसंस्कृत मराठी माणसाला जसं दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत नाही तसंच आता रिंगणचा अंक वाचल्याशिवाय आषाढी एकादशी साजरी झाली असं वाटत नाही. हा नवा संस्कृतिक पायंडा निर्माण करणाऱ्या सचिन परब यांना युगप्रवर्तनाचं श्रेय द्यायला मला अजिबातच संकोच वाटणार नाही.