दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.
शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याने मोठ्या प्रयत्नाने गोळा केलेल्या सैन्यावर ब्रिटिश सैन्यातल्या महार योद्ध्यांनी भीमा कोरेगावच्या लढाईत मोठा पराक्रम करून पराभव केला. १ जानेवारी २०१८ ला त्या घटनेला २०० वर्ष पूर्ण झाली. शनिवारवाड्यावरचं पेशव्यांचं भगवं निशाण उतरून तिथे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला त्यालाही गेल्या जूनमधे २०० वर्ष झाली. २०० वर्षांनंतरही एकविसाव्या शतकातल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही सरकारांना नवपेशवाईची उपमा देऊन ती संपवण्याचं आवाहन केलं जातंय.
दुसरीकडे, पेशव्यांचं उदात्तीकरण करून ती खरी हिंदूपतपादशाही असल्याचा दावे केले जातात. फक्त सोशल मीडियावरच नाही, तर रस्त्यावरही या पेशवाईवरून पेटवापेटवी सुरू आहे.
ही पेशवाई नक्की आहे तरी काय? एकाचवेळेस तिच्याविषयी टोकाचा तिरस्कार आणि टोकाचा आदर का आढळतो? या प्रश्नांची उत्तरं मतांच्या गलबल्यातून शोधणं सोपं नाही.
हेही वाचाः पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?
अनेकदा मराठेशाहीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होऊन पेशवाईच्या अस्तापर्यंत सांगितला जातो. त्यामुळे मराठेशाही आणि पेशवाई यात फसगत होते.
पेशवाईच्या इतिहासावर अधिकारवाणीने लिहिणारे तरुण लेखक संजय क्षीरसागर त्याविषयी सांगतात, ‘मराठेशाही आणि पेशवाई या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. संभाजीपुत्र शाहूंच्या नंतर नामधारी छत्रपती असले, तरी त्यांचं मराठा सरदारांचं मराठामंडळ किंवा राजमंडळ सातारा दरबारात कार्यरत होतंच. पण त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान नव्हतं. उदाहरणार्थ, थोरले बाजीराव पेशवे असताना खंडेराव दाभाडे सेनापती होते. त्यांच्या मृत्यूनंतर सेनापतीपदाचं महत्त्व संपलं. त्यानंतर पुण्यात पेशवाई आणि सातार्यात मराठेशाही समांतर सुरूच राहिली.’
अर्थात, पहिल्या शाहूंनंतर ही मराठेशाही केवळ नामधारी राहिली. औरंगजेबाच्या कैदेत राहिलेले शाहू महाराष्ट्रात परतल्यानंतर पेशव्यांचं महत्त्व वाढत गेलं आणि छत्रपतीपदाचं महत्त्व कमी झालं. त्याआधी पेशवा हे मराठेशाहीतल्या इतर मंत्र्यांपैकी एक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले पेशवे मोरोपंत पिंगळे यांनाच स्वराज्यातल्या पहिल्या पेशवेपदाचा मान आहे.
राजव्यवहारकोशात पेशवे या शब्दाला संस्कृतप्रचुर पंतप्रधान असा पर्याय देण्यात आलाय. कागदोपत्री सगळे पेशवे पंतप्रधान असले तरी पेशवे हीच त्यांची खरी ओळख बनली. पेश्वा हा मूळ फारसी शब्द असून त्याचा अर्थ पुढे किंवा समोर असा आहे.
शिवाजी महाराजांनंतर शाहूंपर्यंतच्या धामधुमीत चार पाच पेशवे झाले. त्यात रामचंद्रपंत अमात्य हे महत्त्वाचं नाव आहे. शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे आदेश आज्ञापत्रांतून एकत्र करून त्यांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलंय. महाराणी ताराबाईही काहीकाळ या पदावर असल्याचे उल्लेख सापडतात.
शाहूंचे पहिले पेशवे बहिरोबा पिंगळे यांना कान्होजी आंग्रे यांनी कैदेत टाकलं. त्यामुळे १७ नोव्हेंबर १७१३ ला पुण्याजवळच्या मांजरी या गावी बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना पेशवाईची वस्त्रं मिळाली. बाळाजींनी थेट दिल्लीला जाऊन छत्रपती शाहूंसाठी स्वराज्याच्या सनदा आणून त्याची परतफेड केली.
थोरला बाजीराव यांनी पेशवाईला खर्या अर्थाने बळ दिलं. ते पराक्रमी तर होतेच पण शक्यतो सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळेही त्यांना फायदा झाला. पण बाजीरावांचा मुलगा नानासाहेब या वृत्तीच्या बरोबर उलट होते. ते छत्रपती शाहूंनाच विचारेनासे झाले. त्यामुळे शाहूंनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढूनही टाकलं.
पेशव्यांची जागा घेण्यास इतर कुणीही तयार नव्हतं. शेवटी हतबल झाल्यामुळे शाहूंनी मृत्यूपूर्वी ऑक्टोबर १७४९ ला सत्तेचे सर्व अधिकार नानासाहेबांना वंशपरंपरागत दिले. त्यामुळे त्यानंतरचे सगळे छत्रपती आताच्या राष्ट्रपतींसारखे फक्त सह्यांपुरते उरले. बाळाजी विश्वनाथ पेशवा बनल्यानंतर सुरू झालेल्या पेशवाईवर अठराव्या शतकाच्या मध्याला शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर पुढची ६० वर्ष पेशवाईतल्या भयंकर चढउतारांची होती.
पेशवाईच्या राजकीय धोरणाची चिकित्सा करताना संजय क्षीरसागर सांगतात, ‘पेशव्यांनी स्वतंत्र राज्य उभं केलं नाही. ते कागदोपत्री सातारच्या गादीचे सेवकच राहिले. त्यांनी मराठा स्वराज्याला साम्राज्य बनवलं, असं म्हणतात. पण त्यांनी मराठेशाहीचे घटक असणार्या गुजरातचे दाभाडे आणि कान्होजी आंग्रेंच्या आरमाराला संपवलं. नागपूरच्या भोसलेंना आपल्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपतीपदावरील राजा नामधारी राहील याची काळजी घेतली. त्यांनी मराठेशाही नाही तर पेशव्यांचा प्रभाव वाढवला. पेशव्यांनी मुस्लिमांचा बीमोड केला, असंही म्हणता येत नाही. कारण हैदर अलीचा कर्नाटकात उदय होण्याजोगी परिस्थिती त्यांनीच तयार केली. त्यांनी वारंवार संधी असूनही निजामाला कायमस्वरूपी संपवलं नाही. मोगलाईलाही बुडवलं नाही. इंग्रजांना वेळीच रोखलं नाही. उलट, राजपूतांसह हिंदू राजांना दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचं निश्चित राजकीय धोरण दिसत नाही.’
संजय क्षीरसागर पेशव्यांच्या लष्करी धोरणाविषयी सांगतात, ‘थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव वगळता एकही पेशवा सेनापती नव्हता. त्यांनी लष्कराची स्थिती फारशी सुधारली नाही. ते भाडोत्री सैन्यावर अवलंबून राहिले. स्वतःचं कवायती सैन्य उभारलं नाही. तोफखाने नव्याने बनवून घेतले नाहीत. नाना फडणीसाच्या काळात तर बरचसं सैन्य बरखास्त केल्याचे संदर्भ सापडतात.’
हेही वाचाः भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?
निश्चित राजकीय आणि संरक्षणविषयक धोरण नसलं, तरी पेशव्यांनी थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंदेंपर्यंतच्या काळात अटकेपासून कटकेपर्यंत स्वतःचा दबदबा निश्चितपणे निर्माण केला होता. अटक आणि कटक हे तेव्हापासून महाराष्ट्राचे मानबिंदू बनले आहेत.
अटक आजच्या पाकिस्तानात सिंधू नदीच्या काठी आहे. १७५८ मध्ये झालेल्या अटकच्या युद्धात राघोबादादा आणि तुकोजी होळकर यांच्या सैन्याने अहमदशाह अब्दालीला हरवून अटक आणि पेशावरही जिंकलं. लाहोर, मुलतान आणि काश्मीर हे सुभेही जिंकले. पुढच्या अडीच वर्षातच अब्दालीने पानिपत येथे मराठ्यांना हरवलं.
कटक हे देशाच्या पूर्व टोकाला आजच्या ओडिशा राज्यात येतं. नागपूरच्या रघुजी भोसलेंनी अठराव्या शतकाच्या मध्यात चांदा, छत्तीसगढ, संबळपूर हे सुभे जिंकत कटकवरही ताबा मिळवला. ते जवळपास ५० वर्ष भोसलेंच्या ताब्यात होतं.
उत्तर भारतात प्रभाव वाढवण्याच्या या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष पेशव्यांच्या फौजांपेक्षाही ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर आणि नागपूरचे भोसले यांचं योगदान अधिक होतं. मात्र शिंदे आणि होळकर या दोघांचेही बॉस पेशवेच होते. ते सातारच्या छत्रपतींच्या वतीने नाही, तर पुण्याच्या पेशव्यांच्या वतीने आपापल्या संस्थानांमध्ये कारभार पाहत. नागपूरचे भोसले मात्र थेट सातारच्या गादीशी संबंधित होते. त्यांनीही पेशव्यांचं वर्चस्व मान्य केलं होतं.
या मराठा सरदारांनी देशभर आपापला अंमल चालवला, तरी बहुसंख्य प्रदेशात प्रत्यक्ष प्रशासन स्थानिक राजांचंच होतं. ते पेशव्यांचं वर्चस्व मान्य करून त्यांना उत्पन्नातला भाग म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी देत. त्या बदल्यात पेशवे त्यांचं इतर आक्रमकांकडून संरक्षण करत. नानासाहेब पेशव्यांच्या नंतर पेशव्यांचं काम प्रामुख्याने स्थानिक राजांकडून उत्पन्न वसूल करणं आणि त्यासाठीच्या मोहिमांसाठी सरदारांना पैसा पुरवणं, असं झालं होतं. त्यामुळेच त्यांना सेनाकर्ते या पेशव्यांच्या पहिल्या किताबापेक्षाही श्रीमंत हे विशेषण बाळगणं व्यावहारिक सोयीचं वाटत होतं.
दिल्लीचं तख्त सांभाळून कोट्यवधींचे व्यवहार करणारी पेशवाई कायम कर्जात बुडालेली होती. त्याचं कारण सुलतानांना लाजवेल अशी अय्याशी हे होतं. पहिल्या बाजीरावांनी मस्तानी या मुस्लीम प्रेयसीवर प्रेम केल्यामुळे पुण्याने त्यांना परकं ठरवून हाल हाल केले. पण त्यांनी नाटकशाळा म्हणजेच रखेल्या किंवा दासी ठेवल्याचे उल्लेख सापडत नाहीत.
मात्र मस्तानीला विरोध करणारे बाजीरावपुत्र नानासाहेब भलतेच रंगेल निघाले. ‘पुण्याचे पेशवे’ या पुस्तकात अ. रा. कुलकर्णी लिहितात, ‘पानिपतावर मराठी सैन्याची उपासमार चालली होती. तेव्हा सिद्धटेकला नानासाहेबाचा मुली पाहण्याचा सोहळा कित्येक महिने चालला. विशेष म्हणजे, त्याने वयाच्या ४० व्या वर्षी ९ वर्षांच्या राधाबाई नावाच्या एका मुलीशी लग्न केलं.’
नानासाहेबाने दामोदर हिंगणे या कारभाऱ्याला पत्र लिहून दहा सुंदर हिंदू मुली खरेदी करून पाठवव्यात, असे कडक शब्दांत आदेश पाठवले आहेत.
हेही वाचाः पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?
डॉ. वर्षा शिरगावकर यांच्या ‘पेशव्यांचे विलासी जीवन’ या पुस्तकात पेशव्यांच्या रंगेलपणाची लक्तरंच समोर आलीत. रघुनाथरावाच्या जनानखान्यात मैना, उमेदा, यमुनी, लाडू, केसरी, रत्ना, स्वरूपा, शामा नावाच्या रखेल्या होत्या. मनुबाई आणि सुंदराबाई या आवडत्या नाटकशाळांना त्यांनी पुण्यात घर बांधून दिलं होतं आणि त्यांचा सगळा खर्च सरकारी खजिन्यातून चाले.
प्रभाकर या प्रसिद्ध शाहिराने, अवघ्या २१ वर्षांचं आयुष्य असणार्या सवाई माधवरावांच्या ७०० नाटकशाळा असल्याचा उल्लेख एका लावणीत केलाय. तर होनाजी बाळाच्या लावणीत सवाई माधवरावांच्या रंगमहालाचं वर्णन असं आलंय.
रंगमहाली आनंदाखाली, भोगितो स्वामीस चित्तापासून
येकीचे हाती पीकपात्र, येक द्वारात पद्मिनीपरी
नाना नक्षीचे विडे घेऊनिया पुढे आपापले करी
मुखी घालावयासी सिद्ध होऊनिया प्रसिद्ध सदनांतरी
येक उभी करून शृंगार, येक घेऊनी फुलांचे हार
येक धरुनिया द्वार, हा इष्काचा परिवार
दुसर्या बाजीरावाच्या काळात तर बदफैलीपणाची परिसीमाच झाली. तेराव्या वर्षीच त्याला गुप्तरोग झाल्याची तक्रार त्याच्या आई आनंदीबाईंनी नोंदवलीय. त्याला अकरा बायका होत्या. शिवाय अनेक रखेल्या होत्या. त्यांच्यासाठी सरकारी हिशेबामध्ये विलास प्रकरण या शीर्षाखाली खर्चाच्या नोंदी आहेत.
वर्षा शिरगावकर लिहितात, ’त्यात अनेक कुलीन स्त्रियांना दिलेल्या रकमेच्या नोंदी आहेत. त्यावरून काही सरदारांच्या विवाहित स्त्रियाही बाजीरावाच्या खास मर्जीतल्या होत्या असं दिसतं. विवाहित स्त्रियांशी संबंध राखणं आणि नंतर त्यांच्या पतीची त्याबद्दल तरक्की करणं, ही बाजीरावाची खोड होती.’
महात्मा जोतीराव फुले या ग्रंथात प्रख्यात इतिहास अभ्यासक आणि चरित्रकार धनंजय कीर यापुढे जाऊन लिहितात, ’रावबाजीच्या (दुसर्या बाजीरावाच्या) अपेक्षित भेटीच्या भयामुळे वाईतल्या अनेक महिलांनी विहिरीत उड्या टाकून जीव दिला होता. तो सदान्कदा बदफैली स्त्रियांच्या घोळक्यात वावरे. त्याच्या राजवटीत एका ब्राह्मण बाईने बुधवारवाड्यापासून विश्रामबागवाड्यापर्यंत भर रस्त्यातून दिवसा विवस्त्र चालून दाखवून पैज जिंकली होती, असं म्हणतात.’
हेही वाचाः शनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट
विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल या नाटकात उत्तर पेशवाईत सत्तेमुळे आलेल्या विकृतीचं भयंकर वर्णन आलंय. शिवाय त्या काळात नग्नपूजेचं स्तोम माजलं होतं आणि घटकंचुकीसारखे अनैतिक खेळ खेळले जात होते, असे उल्लेख सापडतात
उत्तर पेशवाईत सत्ताधार्यांच्या संकुचित जातीय दृष्टिकोनानेही कळस गाठला होता. धनंजय कीर त्याचं वर्णन करताना लिहितात, ’तेव्हा ब्राह्मणांना, विशेषतः चित्पावन ब्राह्मणांना, शासनसंस्थेत आणि सामाजिक क्षेत्रात उच्चपदे देण्यात येत. इतर जातींतील पुरुष कितीही कर्तबगार, लायक आणि पराक्रमी असले, तरी त्यांना खालचा दर्जा देणं हीच त्या राज्याची प्रथा असे... आपल्या राजकीय आणि जातीय वर्चस्वामुळे ब्राह्मण इतर जातींना कमी लेखीत. त्यामुळे ग्रामण्ये गाजली. कलह वाढले. महारमांगांना तर गळ्यात मडकुले आणि कंबरेस झाडाची फांदी बांधून दिवसा माणसाची सावली मोठी पडत नसते, तेव्हा पुणे नगरीत फिरण्याची मोकळीक असे. फांदी त्या दीनांची पावले पुसून टाकी म्हणजे ब्राह्मणभूदेवांना त्यांचा विटाळ होत नसे. मडकुले त्यांच्या थुंकीचा विटाळ टाळी.’
पेशवेकाळात मराठा सरदारांचं खच्चीकरण करण्याबरोबर ब्राह्मणांमधल्या पोटजातींमधली भांडणंही समोर आली. थोरल्या बाजीरावांच्या आई गोपिकाबाई या पेशवा दरबारातल्या कोकणस्थांचं, तर सखारामबापू बोकील हे देशस्थांचं नेतृत्व करत. कायस्थ, सारस्वत, सोनार या बहुजनांच्या तुलनेने शिक्षित समाजांचे अधिकार हिरावून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रायश्चित्ताच्या (ग्रामण्याच्या) शिक्षा सुनावण्यात आल्या.
असे हे पेशवे कृष्णाचा आणि परशुरामाचा अवतार असल्याची खुशामत समकालीन कवी, ग्रंथकारांनी केलीय. परशुराम आणि गणपती या प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांच्या दैवतांचं पेशव्यांनी महाराष्ट्रभर स्तोम माजवलं. त्याचवेळेस विठ्ठल, जोतिबा, खंडोबा, अंबाबाई, रेणुका या लोकदैवतांचं वैदिकीकरण करण्याची मोहीम चालवली. सवाई माधवरावांनी आदेश काढून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात अस्पृश्यांना फिरण्याची मनाई केली. तर संत तुकाराम महाराज या ’शूद्रा’चा अभंग कीर्तनात सांगितला म्हणून श्रीवर्धनच्या एका कीर्तनकाराला दुसर्या बाजीरावाने शिक्षा केली.
सर्वच बाबतीत मागास असल्यामुळे पेशवे ब्रिटिशांसमोर टिकू शकले नाहीत. त्यांच्यातली तीन युद्ध मराठे- इंग्रज युद्ध म्हणून ओळखली जातात. एकेका सरदारांपाठोपाठ दुसर्या बाजीरावाचाही पराभव झाल्यानंतर पेशवाई बुडाली. तेव्हा पुण्यात आनंद साजरा झाला, असं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी नोंदवलंय. त्यांनाच समकालीन असणारे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीही पेशवाईची काळी बाजू स्पष्टपणे मांडलीय.
‘राजकीयदृष्ट्या पेशवाई संपली तरी ती वृत्ती संपली नाही,’ असं मत नोंदवताना देश-विदेश इतिहास व साहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक डॉ. आनंद पाटील सांगतात, ‘ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातच ब्राह्मणांचं इंग्रजीकरण आणि इंग्रजांचं ब्राह्मणीकरण झालं. त्यामुळे पेशवाईतील ब्राह्मणांच्या हितसंबंधांना धक्का लागेल, असं त्यांनी फारसं काही केलं नाही. त्यामुळे १९४६ सालीही पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये फक्त दोनच प्राध्यापक ब्राह्मण नव्हते. त्यांच्यापैकी एक पारशी आणि दुसरा ब्रिटिश होता. अलीकडे घडलेल्या मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणामुळे पेशवाईतली मानसिकता फार बदलली नसल्याचं दिसून आलंच आहे. राजकीय गुलामगिरीपेक्षा सांस्कृतिक गुलामगिरी अधिक घातक असते. पेशवाईने ती गुलामगिरी निर्माण केली. त्यातून आपण आजही बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे खर्या अर्थाने पेशवाई आजही संपलेली नाही.’
ब्राह्मणी इतिहासाच्या विरोधात पहिलं बंड करणारे इतिहासकार प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा खरा इतिहास आजवर लिहिलाच गेलेला नाही. कारण आजवर जातीच्या पूर्वग्रहांनुसारच इतिहास लिहिला गेला. आता बहुजन समाज शिकल्यामुळे तो त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिताना जुना इतिहास नाकारतो आहे. अर्थातच त्यावरही पूर्वग्रहांचा प्रभाव आहेच. भीमा-कोरेगावसारख्या वादांमुळे इतिहासलेखनातील हा नव्या-जुन्याचा संघर्ष उफाळून येतो. यातून निर्माण झालेल्या घुसळणीमुळे जातीय अहंकार बाजूला जाऊन महाराष्ट्र खर्या इतिहासाच्या जवळ पोहोचण्यासाठी वाटचाल करण्याची शक्यता मात्र वाढली आहे. त्यात पेशवाईचा इतिहास हा केंद्रस्थानी राहणार आहे.
हेही वाचाः
इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार
शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
(साभारः चित्रलेखा)