फुटीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान आंदोलनांनी अस्वस्थ

२८ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


पाकिस्तानातल्या प्रत्येक प्रदेशात स्वायत्तेच्या मुद्द्यावरुन आंदोलनं आणि चळवळी उभ्या राहतायत. इथल्या लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे अनुभव वाचल्यावर याचा अंदाज येतो. सध्या बलुची, पश्तुनी, मुहाजिर आणि सिंध अशा चळवळींना जोर आलाय. यातले अनेक जण भारताकडे आशेने बघतायत. भारताने मात्र काहीही भूमिका घेतलेली नाही.

काश्मीरमधल्या लोकांच्या मानवाधिकाराचं भारत दमन करत असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमी बोलत असतात. पाकमधली बहुतांश सरकारं ही काश्मीरच्या मुदद्यावरुन भावनिक राजकारण करुनच सत्तेत आल्याचं इतिहास सांगतो. सप्टेंबर २०१९ मधे इम्रान खान हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारत सरकारने काश्मीरमधे ३७० कलम हटवून तिथल्या सामान्य लोकांवर अन्याय करत त्यांचे मानवी अधिकार पायदळी तुडवल्याची गरळ ओकत होते.

त्याचवेळी न्यूयॉर्क शहरामधे पाकमधले बलूच आणि पश्तुनी लोक पाकिस्तानमधे सरकारकडून बलुच आणि पश्तून लोकांवर होणार्‍या मानवाधिकारांच्या दमनाबद्दल आंदोलन करत नारे देत होते. सार्‍या जगाचं लक्ष वेधून घेणार्‍या या घटनेने पाक सरकारची दुटप्पी भूमिका समोर आली. तशीच बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, गिलगिट बाल्टीस्तान आणि आता अलिकडच्या काळात सिंधमधल्या आंदोलनांकडे पुन्हा जगाचं लक्ष गेलं.

बिकट परिस्थितीचा अंदाज

पाकमधली बलूच चळवळ अनेक दशकांपासून धुमसत असतानाच पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशातून क्रांतीची हाक ऐकू यायला लागलीय. पश्तून तहफूज मुवमेंट अर्थात पीटीएम ही पश्तुनी लोकांच्या हक्कासाठी काम करणारी संघटना. पश्तुनी लोकांच्या मानवीधिकारांवर काम करणार्‍या या संघटनेच्या सदस्या गुलालाई इस्माईल यांच्या अनुभवावरून तिथल्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज येतो.

पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर देशद्रोह आणि राज्य संस्थांची बदनामी केल्याचा आरोप केलाय. सध्या त्या अमेरिकेच्या ब्रुकलीनमधे राहतात. त्या म्हणतात, ‘एक महिला म्हणून मला अनेक पातळ्यांवर लढावं लागतंय. हे अधिक आव्हानात्मक आहे. मी एकाच वेळी पुरुषप्रधानता, धार्मिक अतिरेकीपणा आणि सैनिकीकरणाच्या विरोधात लढा देतेय.’

२०१९ च्या सुरवातीला त्यांनी सोशल मीडियावरून पाकिस्तानी महिलांवर विशेषतः खैबर पख्तुनख्वामधील पश्तुनी महिलांवर होणार्‍या बलात्कारांच्या घटनांना वाचा फोडली. आणि सरकार त्यावर ठोस पावलं उचलत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हापासून पाक सरकारने आपल्याविरोधात भूमिका घेतल्याचं त्यांचं म्हणणंय. पुढे याला चळवळीचं स्वरूप देण्याच्या उद्देशाने त्यांनी पीटीएम चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 

आंदोलन सुरू असतानाच त्यांना सरकारविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून पाक पोलिस त्यांना अटक करणार असल्याचं कळलं. मग आवश्यक वस्तूसोबत घेऊन त्यांनी तिथुन तात्काळ पळ काढला. ‘द वीक’ मासिकाच्या बातमीनुसार, इस्माईल यांना २०१७ मधे मानवधिकारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. गुलालाने आपला लढा ब्रुकलिनहून सुरूच ठेवलाय. व्यक्ती पुरस्कारप्राप्त असो किंवा नसो जो सरकारच्या धोरणांवर, कामावर प्रश्‍न उपस्थित करेल त्याच्याबाबत पाक सरकार कुठली भूमिका घेते हे गुलालाच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

हेही वाचा : अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान

पाकिस्तान, अफगाणिस्तानमधे झालं सँडविच

पाकिस्तानात साधारण दोन-तीन दशकांपासून पश्तुनी स्वातंत्र्य चळवळ सुरू आहे. स्वतंत्र पश्तूनिस्तान देशाची मागणी तिथले नागरिक करतायत. पश्तुनी लोकांच्या म्हणण्यानुसार पश्तून लोकांचा प्रदेश सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात विभागला गेलाय. हा दोन देशांमधला प्रदेश स्वतंत्र व्हावा यासाठी पश्तुनी लोक आंदोलन करतायत.

पाकिस्तानातल्या संस्थांनी आपला दहशतवादाविरूद्ध संशयास्पद कारवाईत युद्ध रसद म्हणून वापर केला, असा पश्तूनींचा आरोप आहे. पाक आणि अफगाणिस्तानला विभागणारी सीमारेषा म्हणजे डुरँड लाईन. २०१४ मधे पाक सैन्याने ऑपरेशन झुर-ए-अज़ब सुरू केल्यावर या डूरँड लाईनजवळ सैन्य आणि दहशतवादी यांच्यात पश्तूनी लोकांचं सँडविच झालंय.

पंजाबबहूल सैन्य दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोपही पश्तुनी लोक करताहेत. या दहशतवाद्यांनी नंतर पश्तूनांना त्यांच्याच भूमीतून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. पश्तूनांनी त्याला तीव्र विरोध केला असता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. यात अनेक पश्तुनी लोकांचा मृत्यु झाला.

लक्ष हटवण्यासाठी काश्मीरचा आधार

पश्तून स्टुडंट फेडरेशनचे माजी अध्यक्ष इम्तियाज वजीर यांनी ‘द वीक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपलं म्हणणं मांडलंय. ‘जगाचं आणि पाकच्या अस्वस्थ प्रदेशातल्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केलाय.

पाकिस्तानमधल्या काही छोट्या वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांनी काश्मीरवरचं पाकिस्तानी कथन नाकारलंय. ते भारत सरकार आणि काश्मीरमधील शांतताप्रीय लोकांच्या बाजूने उभे आहेत. याचा अर्थ असा होतो की पाकमधल्या मोठ्या गटाला पाकची काश्मीरबद्दल भूमिका योग्य वाटत नाही.’

इम्तियाज वजीर यांना काही महिन्यांआधी सक्तीने अफगाणिस्तानमधे निर्वासित केलं होतं. त्यांनी भारताकडे आश्रयासाठी अर्ज केला होता. पाकमधले आंदोलन करणाऱ्या गटांना भारताकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.

१० हजारांपेक्षा जास्त पश्तुनींचा खून

पश्तून, बलूच, सिंधी, मुहाजिर म्हणून हिणवलं गेलेल्यांना, विद्यार्थ्यांना तसंच काश्मीर समर्थकांना पश्तून स्टुडंट फेडरेशन आणि पश्तून राष्ट्रवादी अवामी नॅशनल पार्टीची विद्यार्थी संघटना एकत्र आणू इच्छितात. याला पाक सरकार आणि गुप्तचर संस्थांचा प्रचंड विरोध आहे.

इम्तियाज वजीर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १ ते २ वर्षात पाकिस्तान सैन्याने कमीतकमी १० हजाराहून अधिक पश्तुनी लोकांचा खात्मा केलाय. आणि असंख्य लोकांना गायब केलंय. पश्तून राष्ट्रवादी अवामी नॅशनल पार्टीच्या म्हणण्यानुसार असा एक दिवस नसेल ज्या दिवशी पश्तुनी चळवळीसंबंधातल्या कुणा व्यक्तीवर जीवे मारण्याची किंवा कुणी अचानक गायब झाल्याची घटना घडली नाही.

बलूच आणि खैबर पख्तुनख्वाची जमीन तालिबान दहशतवादी तळ उभा करण्यासाठी वापरण्यात आलीय. त्याचा आपल्या स्वार्थासाठी पाक लष्कर वापर करतं. आणि यात पश्तुनी तरूणांचं भविष्य भरडलं जातंय.

हेही वाचा : यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

भारताकडे आश्रयाची मागणी करतायत मुहाजिर

बलूच, पश्तूनप्रमाणे सिंध, आणि मुहाजिरसुद्धा आपल्या भवितव्यासाठी फार चिंतेत आहेत. फाळणीनंतर भारतातल्या विविध भागातून जे मुस्लिम लोक पाकिस्तानात गेले त्यांना मुहाजिर म्हटलं जातं. आपल्या बांधवांचा, आपल्या धर्माच्या लोकांचा देश म्हणून भारतातून लाखो मुस्लिम पाकिस्तानात गेले. पण तिथल्या अपमानाने त्यांना मुहाजिर म्हणजेच शरणार्थी म्हणून कायम दुय्यम वागणूक दिली.

आज २१ व्या शतकातदेखील हा फरक कायम आहे. पाकने आपल्यासोबत कायम भेदभाव होत आल्याचा ते दावा करतात. आणि आता त्यांनी ग्रेटर कराचीच्या स्वायत्त प्रदेशाच्या मागणीसाठी आवाज उठवण्यास सुरवात केलीय.

कराचीमधे असलेली पूर्वीची मुहाजिर कौमी चळवळ, आत्ताची मुत्तहिदा कौमी मुवमेंट मुहाजिरांसाठी लढणारी प्रमुख आणि सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेली चळवळ. या चळवळीचे संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी अलीकडेच एक विडियो रिलिज केलाय. हुसैन हे १९९२ पासून इंग्लंडमधे एकप्रकारे वनवास भोगतायत. आपल्या विडियोतून त्यांनी भारताकडे आश्रय देण्यासाठी आवाहन केलंय.

ते म्हणतात ‘भारताने आणि पंतप्रधान मोदी यांनी परवानगी दिली तर मी आणि माझे सहकारी भारतात येण्यास तयार आहोत. आमचे पूर्वज आणि वाडवडलांना त्याच भूमीत पुरलेलंय. ती आमचीच भूमी आहे. आम्ही तिथे म्हणजेच भारतात धर्मनिरपेक्ष राहून आपल्या मुहाजिर बांधवांसाठी संघर्ष सुरू ठेवू.’

भारताने बलूच आणि सिंध प्रांतीयांना शांततापूर्वक आपला लढा सुरू ठेवता यावा यासाठी सहकार्य द्यावं, अशीही विनंती त्यांनी केलीय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने त्यांचे समर्थन करण्याचं आवाहन ते करतात. भारताने यावर अत्यंत सावध भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसतं. कारण अजून भारताने हुसैन यांची कोणतीही मागणी मान्य केलेली नाही.

पाकला कशाची भीती वाटतेय?

लंडनमधे हुसैन यांनी ‘द वीक’ मासिकालाही मुलाखत दिली होती. ‘फाळणीपूर्वी पाकमधले मुहाजिर मुस्लिम हे भारताचा भाग होते, हे भारताने विसरू नये. आमचे पूर्वज चुकीच्या मार्गाने गेले आणि धर्माच्या नावाखाली अडकून भारत-पाक विभाजनाच्या चळवळीत सहभागी झाले. ही फार मोठी चूक होती आणि आम्ही त्याची किंमत मोजतो आहे,’ असं ते या मुलाखतीत म्हणतात.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हुसैन यांनी भारतात आश्रयासाठी औपचारिक विनंती केलेली नाही. म्हणूनच भारताने त्यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. १९९२ पासून पाक सरकारच्या क्रूर कारभाराचा सामना करत असलेल्या आपल्या सहकार्यांसाठी आपण भारत सरकारकडे अपिल करतोय असं हुसैन याचं म्हणणंय.

सोशल मीडीयाद्वारे वायरल झालेली हुसैन यांची ही विनंती फक्त दिल्लीच नाही तर इस्लामाबादपर्यंत पोचलीय. हुसैन यांचं अपील पाकमधल्या इतर असंतुष्ट गटांकडून अशाच प्रकारच्या विनंत्यांना चालना देऊ शकतं. आता पाकिस्तान सरकारला याचीच भीती वाटतेय.

हेही वाचा : डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात निदर्शने होणार

मुहाजिर, बलूच, पश्तून आणि सिंध यांच्यासाठी संघर्ष करणार्‍या चळवळी एकत्र येऊन चारही गट पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा पुढे आणणार आहेत. मुंबईच्या २६/११ च्या हल्लाच्या येत्या वर्धापनदिनाला जगाच्या विविध भागात निदर्शने करून हा मुद्दा उपस्थित करण्याचा त्यांचा विचार आहे.

करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनानंतर इम्रान खान यांनी बंदी घातलेल्या खलिस्तानी नेत्यांना जाहीर समर्थनाची भाषा केली. त्यानंतर भारताला आता काश्मीर प्रश्‍नांव्यतिरिक्त बोलण्यासाठी अनेक काऊंटर मिळालेत. भारत आता काय पावलं उचलणार हे काळच ठरवेल.

इम्रान खान आणि आयएसआयचा अजेंडा

पाकमधल्या सिंध प्रांतातल्या सिंध्यानीही मानवाधिकारांच्या दडपशाहीचा आणि आपण धार्मिक कट्टरतावादाचा बळी असल्याची ओरड सुरू केलीय. २०१३ मधे दहशतवादी गट म्हणून घोषित झालेली ‘जय सिंध मुताहिदा महाज' ही संघटना वेगळ्या सिंधू देशाची कल्पना मांडतीय. फाळणीवेळी सगळ्यात जास्त धृवीकरण सिंध प्रांताचं झालं होतं.

सिंध मुताहिदा या संघटनेचे अध्यक्ष शफी बर्फाट म्हणतात, ‘भारताच्या फाळणीमुळे सिंधी, पश्तून, बलूच आणि काश्मिरी हे सारे ऐतिहासिकदृष्ट्या स्वतंत्र नागरी प्रदेश नोकरशाही आणि भाडोत्री पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात गेले. जेव्हा या प्रदेशांना त्यांची बहुलतावादी संस्कृती आणि राजकीय आर्थिक अधिकार सोडण्यास भाग पाडण्यात आलं तेव्हापासून खर्‍या आयडेंटीटीचा संघर्ष सुरू झाला.‘

पाकमधल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात इम्रान खान यांनी प्रचार करताना लष्कर, पूर्व सरकार आणि आयएसआयवर निर्दोष पश्तुनांचा आणि बलुचांचा खून, अपहरण केल्याचा आरोप केला होता. आज इम्रान खान त्याच लष्कराचा आणि आयएसआयचा अजेंडा पुढे नेताना दिसत आहे.   

पाकिस्तानात जवळजवळ सर्व प्रदेशात हे आंदोलन आणि स्वायत्ततेच्या मुद्दयावर चळवळी उभ्या राहतायत. पाकिस्तान अंतर्गत फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. ही आंदोलनं काय रूप घेतात आणि त्याचा परिणाम पाकिस्तानचे विभाजन होण्यात होतो का हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्‍चित. पाकमधे लोकसंख्याशास्त्रीय रेषा पुन्हा तयार कराव्या लागल्या तर ती प्रक्रिया पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक रक्तरंजित असेल.

हेही वाचा : 

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

गोताबाया श्रीलंकेचे अध्यक्ष बनलेत, याची चिंता भारताने करावी?

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी

सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?