ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?

१७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?

क्रिकेटप्रेमींसाठी वर्ल्डकप म्हणजे जणू सण सोहळाच. बाराव्या वर्ल्डकपचे सामने ३० मेपासून इंग्लडमधे सुरु आहेत. क्रिकेटप्रेमी वाट बघत असलेल्या भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने मुंबईत १५ एप्रिलला केली. यातल्या काही जागा सोडल्या, तर भारताने आपली संघबांधणी केव्हाच पक्की केली होती.

या काही जागांमधे धोनीची बॅकअप विकेटकिपरची जागा प्रामुख्याने चर्चेत राहिली. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर करत दिनेश कार्तिकवर आपली मोहर उमटवली आणि पंतचं पहिलं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न तुर्तास तरी अधुरं राहिलंय. 

पंत वर्ल्ड कप खेळला असता पण

इंग्लंड दौऱ्यावर वृद्धिमान साहा जखमी झाला. त्यावेळी १९ वर्षांच्या ऋषभ पंतला लहान वयात मोठी संधी आणि जबाबदारी मिळाली. या कसोटी पदार्पणातच पंतने धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे तो विकेटकिपिंगमधे १७व्या नंबरवर पोहोचलाय. त्यामुळे सध्या तो भारतातला टॉप विकेटकिपर बनलाय.

फारुख इंजिनियरनंतर पंतच जगातल्या टॉप २० विकेटकिपरमधे आलाय. थोड्याच कालावधीत त्याने केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे सगळ्या क्रिकेट जगताचे लक्ष त्याच्याकडे वळलं.
 
पंतची फिअरलेस बॅटिंग पाहून आपण हाच धोनीचा वारसदार असा शिक्का मारुन मोकळे झालो. कसोटीत त्याने विकेटकिपिंगमधले विक्रम अनेक मोडले होते. पण गेल्या काही वनडे सामन्यांमधे आणि आयपीएलमधल्या काही सामन्यांमधे त्याने केलेली गचाळ विकेटकिपिंग हा संघासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. हाच मुद्दा त्याला वर्ल्डकपच तिकीट मिळवण्याच्या आड आला.

हेही वाचा: आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

गचाळ किपिंगमुळे पंतचा पत्ता कट 

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी पंतचं नाव नसल्यानं सगळ्यांना आश्चर्य वाटलेल. कारण पंतने मागच्या काही सामन्यांतली फलंदाजी पाहता त्याचं वर्ल्डकप तिकीट फिक्स मानलं जात होतं. मात्र निवड समितीने अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देत पंतच्या अरमानांवर पाणी फेरले.

तसं पाहिलं तर पंतने आपल्या हातानं आपला घात करुन घेतलाय. त्याच्या गचाळ विकेटकीपिंगने त्याचा पत्ता कट झालाय.

बीसीसीआयच्या प्रसाद यांनी पंत ऐवजी कार्तिकला संधी का देण्यात आली? असं विचारल्यावर ते म्हणाले, प्रेशरमधे खेळताना विकेटकिपिंग आणि फलंदाजी चांगला करणारा विकेट किपर हवा म्हणून कार्तिकला संधी दिली. तसंच पंतच्या कामगिरीमुळे तो वर्ल्डकपच्या टीममधे आला असता पण, विकेटकिपिंगमधे कर्तिक उजवा ठरला. त्यामुळे कार्तिकला संधी मिळाली.  

आणि धोनी फॉर्ममधे आला 

इंग्लंड ही विकेटकिपिंग करण्यासाठी अवघड टीम समजली जाते. तिथं पंतने धोनी आणि इतर भारतीय विकेट किपर्सचे रेकॉर्ड एकापाठोपाठ एक मोडण्यास सुरुवात केली. पंतच्या विकेटकीपिंग बरोबरच फलंदाजीचीही चर्चा होऊ लागली.

हेही वाचा: ऑस्ट्रेलिया विजय ऐतिहासिक, पण काहीतरी मिसिंग

या सगळ्यात धोनी आपल्या हरवलेल्या बॅटिंग फॉर्ममुळे टीकेचा धनी होतहोता. त्यातच पंत चमकला आणि धोनीचा वारसदार किंवा त्याला पर्याय असं म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळे पंतचे वर्ल्डकप तिकीट फिक्स झाल्याची चर्चा होऊ लागली. पण माहीने ऑस्ट्रेलियालात ग्रँड कमबॅक करत बाप बाप होता है हे सिद्ध केलं. फॉर्ममधे आलेल्या धोनीने पंतची झालेली हवा निवळली.

कार्तिकला पसंती का दिली?

वर्ल्डकपच्या टीमची घोषणा करण्याची वेळ जवळ येत असताना पंत अजून कच्चा असल्याचं दिसू लागलं. पंतकडे जरी मोठे शॉट खेळण्याची क्षमता आहे. पण मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावण्यासाठी त्याला अजून परिपक्व होण्य़ाची गरज असल्याची जाणीव झाली. त्यातच त्याने गचाळ विकेटकीपिंगचा धडाका लावल्यानं त्याचं इंग्लंडचं तिकीट कापून गेलं. 

हेही वाचा: सिक्सरवेड्यांनो आजचा दिवस तुमचाय, जाणून घ्या कारण

याउलट कार्तिकने आपल्या फलंदाजीत नवेपणा आणला. इम्प्रोवाईज शॉट खेळण्यात प्राविण्य मिळवलं त्याने भारताला असे काही सामने जिंकून दिले की हा मॅच फिनिशरच्या भूमिकेत चपखल बसतो असा विश्वास निर्माण झाला.

कार्तिक तळातील फलंदाजला हाताशी घेऊनसुद्धा सामना जिंकवू शकतो असा विश्वास बसला. त्यामुळे निवड समितीने कच्या खेळाडूपेक्षा मुरलेल्या खेळाडूला पसंती दिली.

हेही वाचा: मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

 

(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)