संकटातल्या इंग्लंडला भारताचा जावई तारणार का?

२५ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे.

युरोप सध्या आर्थिक संकटातून जातोय. त्याच्या झळा इंग्लंडलाही बसतायत. मागच्या वर्षभरात इंग्लंडमधे खाद्यतेलाच्या किंमती ६५ टक्क्यांनी वाढल्यात. खाद्यपदार्थांच्या किंमतीतही १७ टक्क्यांची वाढ झाल्याचं तिथल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा रिपोर्ट सांगतोय. मागच्या वर्षभरातल्या महागाईच्या भडक्याने तर ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. आर्थिक आघाड्यांवरच्या या घडामोडींमुळे इंग्लंडच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना राजीनामा द्यावा लागलाय.

आशियायी देशांमधे याआधीच आर्थिक संकटांचे राजकीय पडसाद पहायला मिळालेत. युरोपमधेही तेच घडतंय. लिझ ट्रस यांच्यानंतर आता भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याकडे इंग्लंडचं पंतप्रधानपद आलंय. प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांनी थेट सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मार्ग सुकर झाला होता. येत्या २८ ऑक्टोबरला ४२ वर्षांचे ऋषी सुनक इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. जग आणि भारत त्यांचं कौतुक करत असला तरी त्यांचा हा प्रवास इतका सोप्पा नक्कीच नाहीय.

हेही वाचा: काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान

असंय भारताशी कनेक्शन

ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडच्या हॅम्पशायर इथल्या साउथहेम्पटनमधे १२ मे १९८० ला झाला. ऋषी यांचे आजी-आजोबा आताच्या पाकिस्तानमधल्या गुजरावाला इथले. जो पूर्वी भारताचा भाग होता. त्यांनी पूर्व आफ्रिकेत स्थलांतर केलं. ऋषी यांचे आई-वडिल पूर्व आफ्रिकेतून इंग्लंडमधे आले. तिथंच स्थायिक झाले. ऋषी सुनक यांच्या वडलांनी पुढं इंग्लंडमधेच शिक्षण घेऊन डॉक्टरकीच्या व्यवसायात आपला जम बसवला. तर त्यांची आई मेडिकल स्टोअर चालवायच्या.

ऋषी सुनक यांचंही सुरवातीचं शिक्षण इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा विंचेस्टर कॉलेजमधे झालं. त्यानंतर २००१ मधे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. २००६ मधे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या स्टॅंफर्ड युनिवर्सिटीतून त्यांनी एमबीए केलं. याच काळात त्यांना अमेरिकेतली प्रतिष्ठित अशी फुलब्राइट स्कॉलरशिपही मिळाली.

एमबीएचं शिक्षण घेत असतानाच त्यांची भेट अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. अक्षता या सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी. व्यवसायाने त्या फॅशन डिझायनर आहेत. २००९ला दोघांनीही लग्न केलं. आपल्या लेकीला लिहिलेल्या एका पत्रात नारायण मूर्तींनी आपल्या जावयाचं वर्णन 'हुशार, देखणा आणि प्रामाणिक' असं केलं होतं. तेव्हापासून माध्यमांनी नारायण मूर्तींचा जावई या कनेक्शनशी त्यांना जोडलंय. त्याचीच चर्चा होत राहिली. आताही इंग्लंडचा पंतप्रधान झाल्यावर याच कनेक्शनची सर्वाधिक चर्चा होतेय.

व्यावसायिक क्षेत्रात एण्ट्री

आपलं पदवीचं शिक्षण घेत असतानाच ऋषी सुनक यांनी अमेरिकन बहुराष्ट्रीय बँक असलेल्या 'गोल्डमन सॅक्स'मधे काही काळ काम केलं. पुढं स्वतःची गुंतवणूक कंपनीही काढली. ‘हेज फंड मॅनेजमेंट’ या नावाने काढलेल्या गुंतवणूक कंपनीचे ते सह-संस्थापक होते. आयटी हब असलेल्या अमेरिकेच्या सिलिकॉन वॅली आणि भारताच्या बंगळुरूमधे आपल्या कंपनीचा विस्तार केला. छोट्या छोट्या व्यवसायांमधे गुंतवणूक केली.

२००३ला स्थापन झालेल्या ‘चिल्ड्रन इन्वेसमेंट फंड मॅनेजमेंट’ या कंपनीत ते जॉईन झाले. ही संस्था जागतिक पातळीवरच्या प्रतिष्ठित कंपन्यांमधे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असते. त्यांच्याकडच्या भन्नाट आयडिया आणि व्यावसायिक कौशल्यामुळे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या  मालकीची गुंतवणूक कंपनी असलेल्या कॅटामरनचे संचालक बनले.

हेही वाचा: युरोपियन युनियनशी फारकतीनंतर ब्रिटनमधे होणारे हे बदल माहीत आहेत?

थेट इंग्लंडच्या राजकारणात

ऋषी सुनक २०१५ला इंग्लंडच्या रिचमंड भागातून कन्झर्वेटिव पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. हा भाग कन्झर्वेटिव पक्षाचा गढ म्हणून ओळखला जायचा. इथूनच त्यांचं राजकीय करिअर सुरु झालं. कन्झर्वेटिव पक्षाचे माजी नेते आणि माजी परराष्ट्र सचिव विल्यम हेग हे पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुनाक यांच्याविरोधात उभे राहिले. मात्र तेव्हाही ३६.२ टक्के मतं घेत सुनक यांनी हेग यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव केला.

२०१५ ते २०१७ या काळात ते इंग्लंडच्या पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहारविषयक संसदीय समितीचे सदस्य होते. तेव्हा इंग्लंडने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला सुनक यांनी पाठिंबा दिला होता. पुढे २०१७ मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते पुन्हा खासदार म्हणून निवडले गेले. यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीची शपथ ही भगवतगीतेवर हात ठेवून घेतल्याची महत्वाची नोंद 'द क्विंट' या वेबसाईटवर वाचायला मिळते.

२०१९ला झालेल्या निवडणुकीतही ते खासदार झाले. ही त्यांची तिसरी टर्म होती. तोपर्यंत ऋषी सुनक हा चर्चेतला चेहरा बनलेले होते. त्यामुळेच निष्ठेची पोचपावती म्हणून सुनाक यांची तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या ट्रेझरी अर्थात कोषागार विभागाच्या मुख्य सचिवपदी नेमणूक केली.

कोरोना काळात चर्चेत

२०२०मधे बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यावेळी ऋषी सुनक यांच्याकडे अर्थ खातं दिलं गेलं. या पदाला इंग्लंडमधे ‘यूके चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याकडचा अर्थमंत्री. अर्थमंत्री झाल्यावर कोरोनाचा काळ असतानाही त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचं काम केलं. त्याचं जगभर कौतुकही झालं.

यासोबतच त्यांनी हॉटेल उद्योगाला उभारी देण्यासाठी महत्वाचे निर्णयही घेतले. स्टॅम्प ड्युटी आणि वॅटच्या करात सवलती दिल्या. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर टॅक्स लावून तो पैसा इंग्लंडमधल्या सरकारी योजनांकडे वळवला गेला. त्यातून सार्वजनिक क्षेत्राला बळ दिलं गेलं. तसंच पर्यटनाच्या दृष्टीनेही काही निर्णय घेतले. दरम्यानच्या काळात इंग्लंडमधल्या बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या पार्टीगेट प्रकरणातही त्यांचं नाव आलं होतं. तसंच पत्नी अक्षता मूर्ती यांच्या टॅक्स चोरीच्या मुद्यामुळे विरोधकांनीही त्यांना घेरलं होतं.

आता पंतप्रधानपदासोबत अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवले गेलेत. इंग्लंडचा पहिला बिगर गौरवर्णीय पंतप्रधान बनण्याचा रेकॉर्ड त्यांनी केलाय. भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं येणं आपला जावई इंग्लंडचा पंतप्रधान होणं. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच किंग चार्ल्स हे कुण्या पंतप्रधानाला सरकार बनवण्याचं आमंत्रण देतील. त्याचा पहिला बहुमान हा ऋषी सुनक यांना मिळतोय.

हेही वाचा: डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

अंदाज खरा ठरला

अगदी ४५ दिवसांपूर्वी पंतप्रधान बनलेल्या लिझ ट्रस यांच्यासमोर इंग्लंडला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान होतं. ६ सप्टेंबरला त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २३ सप्टेंबरला त्यांच्या सहकारी म्हणून अर्थमंत्री क्वासी क्वाटेंग यांनी सरकारचं मिनी बजेट सादर केलं. त्यात टॅक्समधून सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. पण हे बजेट आर्थिक संकटाचं कारण ठरलं.

मिनी बजेट सादर करत असताना ४५ बिलियन पाउंड इतक्या कराच्या सवलतीच्या घोषणेला ऋषी सुनक यांचा विरोध केलेला. त्यामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती अधिकच बिघडेल अशी भीतीही व्यक्त केली होती. सरकारच्या निर्णयानंतर अगदी झालंही तसंच. कराच्या सवलतीच्या घोषणेनं इंग्लंडचा बाजार कोसळला. त्यामुळे सरकारने घेतलेला टॅक्स सवलतीचा निर्णयही ट्रस सरकारला मागे घ्यावा लागला होता.

मिनी बजेटवर टीका होऊ लागली. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत इंग्लंडचं चलन असलेला पाउंडही घसरू लागला. त्यामुळे क्वाटेंग यांनी घेतलेले सगळे निर्णय रद्द करण्याची वेळ लिझ ट्रस यांच्यावर आली. क्वाटेंग यांनी राजीनामा दिला. सोबतच गृह सचिव असलेल्या सएला ब्रेवर्मन यांनीही राजीनामा दिला. पुढे सरकारमधल्या मंत्री आणि खासदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरूच राहिलं. त्यामुळे २० ऑक्टोबरला लिझ ट्रस यांनाही आपला राजीनामा द्यावा लागला.

आर्थिक, राजकीय आव्हानं

युरोप सध्या आर्थिक संकटात आहे. त्याला इंग्लंडही अपवाद असायचं कारण नाही. इंग्लंडवरचं कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललंय. युक्रेनमधल्या युद्धाचा परिणामही इंधन, खाद्य-वस्तूंवर पहायला मिळतोय. महागाई वाढतेय. त्यामुळे चलनवाढ रोखणं, अनावश्यक खर्च कपात टाळणं आणि कर वाढीवर नियंत्रण असे काही महत्वाचे निर्णयही पुढच्या काळात सुनक यांना घ्यावे लागतील. आपल्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर केलेल्या निवेदनात त्यांनी या आर्थिक संकटाचा उल्लेख केला होता.

मागच्या चार वर्षांमधे इंग्लंड ऋषी सुनक यांच्या रूपाने तिसरा पंतप्रधान पाहतोय. तिथलं राजकीय संकट, सत्ताधारी कन्झर्वेटिव पक्षातले अंतर्गत संघर्ष, मतभेद काही टळता टळत नाहीत. त्यामुळे संसदेत बहुमत असलेल्या आपल्या पक्षावर नियंत्रण ठेवणं हेसुद्धा त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. त्यासोबत ब्रेग्झिट, स्थलांतर, आर्थिक नियोजन असे मुद्देही अधूनमधून डोकं वर काढत असतात. त्याला ऋषी सुनक पंतप्रधान म्हणून कसं हाताळतायत ते येत्या कळेलच!

कोरोना काळात जग ठप्प असताना त्यांनी इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला दिशा दिली होती. त्यामुळे भारताच्या या जावयाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना प्रीती पटेल, नादिम जहावी, जेम्स क्लेवरली अशा माजी मंत्र्यांचं समर्थनही मिळतंय. त्यामुळे त्यांच्याकडच्या अपेक्षा ते कितपत पूर्ण करतायत की, पुन्हा एकदा इंग्लंडमधे राजकीय संकट उभं राहून ऋषी सुनक यांची खुर्ची डळमळीत होतेय तेही येणाऱ्या काळात कळेल.

हेही वाचा: 

खरं तर ओबामा महाराष्ट्रात घडायला हवे होते

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत

माहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय?

जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?

परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?