भारताच्या जावयाकडे थेट इंग्लंडच्या तिजोरीची चावी

१५ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताचे जावयी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात आणखी एका भारतीयाला संधी मिळालीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदावर वर्णी लागलीय. सुनाक यांच्यासोबतच इंग्लंडच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल आणि आलोक शर्मा अशा भारतीय वंशाच्या चेहऱ्यांनाही संधी मिळालीय.

ब्रिटिशांनी भारतातली संपत्ती लूटून आपल्या देशात नेली असं आपण अनेकदा ऐकलंय, वाचलंय. पण आता त्या ब्रिटिशांच्या तिजोरीची चावी एका भारतीय माणसाच्या हातात आलीय. सध्या ब्रिटिश नागरिक असलेले अनिवासी भारतीय ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदी निवड करण्यात आलीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यामुळे भारताच्या जावयांच्या हातात इंग्लंडचा कारभार गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

इंग्लंडमधे डिसेंबर २०१९ मधे सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमधे कॉन्झर्वेटीव पक्षाचे बोरिस जॉन्सन हे सत्तेवर आले. बोरिस जॉन्सन यांची बायको मरिनाही भारतीय वंशाची आहे. २०१९ मधे झालेल्या निवडणुकीनंतरचा आताचा हा सगळ्यात मोठा फेरबदल म्हणायला हवा.

ऋषी सुनाक यांच्यासोबतच प्रीती पटेल आणि आलोक शर्मा यांचीही इंग्लंडच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. प्रीती पटेल यांना गृहमंत्री तर आलोक शर्मा यांना परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. हे तिघेही भारतीय वंशाचे आहेत. सुनाक यांच्यावर तर थेट इंग्लंडची अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे.

ऋषी सुनाक आहेत कोण?

ऋषी सुनाक यांचा जन्म इंग्लंडच्या हॅम्पशायर इथल्या साउथहेम्पटनमधे १२ मे १९८० ला झाला. त्यांचं सुरवातीचं शिक्षण इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा विंचेस्टर कॉलेजमधे झालं. त्यानंतर २००१ मधे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. २००६ मधे अमेरिकेच्या स्टॅंफर्ड युनिवर्सिटीतून एमबीएची डिग्रि घेतली.

२००९ मधे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी ऋषी यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलंही आहेत. सुनाक यांचे वडील यश्वीर सुनाक पेशानं डॉक्टर होते. इंग्लंडमधे ते प्रॅक्टिसही करायचे. तर त्यांची आई उषा या फार्मासिस्ट होत्या. ऋषी यांचे आजी आजोबा १९६० च्या दरम्यान भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले. नंतर त्यांनी इंग्लंडमधे आपलं बस्तान हलवलं. त्यानंतर ते तिथंच स्थायिक झाले. ते मूळचे पंजाबचे आहेत.

हेही वाचा: बेन्थॅमनं मांडलेल्या पॅनेप्टीकोनकडे नेमकं कसं बघायचं?

राजकारणात येण्याआधी बिजनेसमधे

२००१ ते २००४ या चार वर्षात ऋषी सुनाक यांनी इंग्लंडमधल्या ‘गोल्डमन सॅक्स’ या इन्वेस्टमेंट बॅंकेमधे बँकर म्हणून काम केलं. त्यानंतर एक गुंतवणूक कंपनीही सुरू केली. इंग्लंडमधल्या 'हेज फंड मॅनेजमेंट' फर्ममधे ते काम करत होते. गुंतवणूकदार आणि त्यांच्याकडचं भांडवल मिळवणं किंवा इतर मालमत्तांमधे गुंतवणूक करणं असं या फर्मच्या कामाचं स्वरुप होतं.

२००३ मधे स्थापन झालेल्या ‘चिल्ड्रन्स इन्वेसमेंट फंड मॅनेजमेंट’ या ब्रिटिश मॅनेजमेंट कंपनीत ते जॉईन झाले. ही संस्था चिल्ड्रेन्स इन्वेसमेंट फंड सांभाळते. तर दुसरीकडे जागतिक पातळीवरच्या कंपन्यांमधे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असते. ऑक्टोबर २०१० मधे पुन्हा एका नव्या हेज फंड कंपनीत जॉईन झाले. सुनाक हे एन. आर. नारायण मूर्ती यांच्या मालकीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या कॅटामरन वेंचर्सचेही संचालक होते.

थेट इंग्लंडच्या राजकारणात प्रवेश

ऋषी सुनाक ऑक्टोबर २०१४ मधे इंग्लंडच्या रिचमंड भागातून कॉन्झर्वेटिव पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. खऱ्याअर्थानं तिथून त्यांचं राजकीय करिअर सुरु झालं. कॉन्झर्वेटिवचे माजी नेते आणि परराष्ट्र सचिव विल्यम हेग हे पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुनाक यांच्याविरोधात उभे राहिले. मात्र तेव्हाही १९,५५० मतं म्हणजेच ३६.२ टक्के मतं मिळवत सुनाक यांनी हेग यांचा पराभव केला.

२०१५ ते २०१७ या काळात ते इंग्लंडच्या पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहारविषयक संसदीय समितीचे सदस्य होते. इंग्लंडने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतला तेव्हा त्याला सुनाक यांनी पाठिंबा दिला होता. २०१७ मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते पुन्हा खासदार म्हणून निवडले आले.

हेही वाचा: समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

बोरिस जॉन्सन यांचे खंदे समर्थक

जानेवारी २०१८ ते जुलै २०१९ यादरम्यान सुनाक यांची इंग्लंडच्या स्थानिक सरकारमधे निवड झाली होती. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत यासंबंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं. सुरवातीपासूनच ते विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे एक खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१९ मधे झालेल्या निवडणुकीतही ते खासदार झाले. निष्ठेची पोचपावती म्हणून सुनाक यांची पंतप्रधान जॉन्सन यांनी २४ जुलै २०१९ ला इंग्लंडच्या कोषागार विभागाच्या मुख्य सचिवपदी निवड केली.

पुढच्या काळात त्यांना इंग्लंडच्या प्रिवी काउन्सिलमधे एक सदस्य म्हणूनही संधी मिळाली. याआधी पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद हे जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे सुनाक यांची त्या पदावर वर्णी लागलीय. अर्थात या पदाला ब्रिटनमधे 'यूके चान्सलर ऑफ द एक्सचेकर' असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याकडचा अर्थमंत्री.

जॉन्सन यांच्या कॅबिनेटमधले भारतीय चेहरे

पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात सध्या भारतीय वंशाचे तीन चेहरे महत्त्वाच्या पदांवर दिसताहेत. भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. ४७ वर्षीय प्रीती पटेल या ब्रेक्झिटच्या खंद्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. १९७२ मधे इंग्लंडमधेच त्यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब मूळचं गुजरातमधलं. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधे कॉन्झर्वेटिव पक्षाच्या ऑफिसमधे काही काळ नोकरी केली.

१९९५ ते १९९७ या दरम्यान जेम्स गोल्डस्मिथ यांच्या नेतृत्वातल्या रेफरेंडम पार्टीच्या त्या प्रवक्त्या होत्या. १९९७ मधे त्यांनी कॉन्झर्वेटीव पक्षाचं काम सुरु केलं. पक्षाचा एक चेहरा म्हणून पुढे आल्या. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढू लागली. इंग्लंडमधल्या विटहॅम मतदारसंघातून २०१० मधे त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या. २०१५ आणि २०१७ मधेही त्यांना इथून यश मिळालं.

उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथं जन्मलेल्या ५१ वर्षांच्या आलोक शर्मा यांचीही बोरिस जॉन्सन यांच्या कॅबिनेटमधे वर्णी लागलीय. शर्मा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी आलीय. ७० च्या दशकामधेच त्याचं कुटुंब इंग्लंडमधे स्थायिक झालं. त्यांचं शिक्षणही साल्फोर्ड युनिवर्सिटीमधून झालं. इलेक्ट्रॉनिकसोबतच फिजिक्समधे त्यांनी बीएसस्सी केलं. लंडनमधल्या अनेक अर्थविषयक कंपन्यांमधे महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

२०१० पर्यंत त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही काम केलं. नंतर थेट राजकारणात एन्ट्री केली आणि २०१० मधे खासदारही झाले. २०१७ मधे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. आताही थेट मोठी जबाबदारी मिळाली. मूळ भारतीय वंशाच्या या चेहऱ्यांचा इंग्लंडच्या राजकारणात महत्त्वाचा रोल असेल हे नक्की.

हेही वाचा: 

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

दिल्ली विधानसभा निकालाचे सरळ सोपे पाच अर्थ

आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

युरोपियन युनियनशी फारकतीनंतर ब्रिटनमधे होणारे हे बदल माहीत आहेत?