अवकाशातल्या कचऱ्यातून रॉकेट इंधन बनवायची गोष्ट

०९ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची  कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय.

मागच्या वर्षी १५ नोव्हेंबरला रशियानं आपल्या अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राची चाचणी केली. अशा चाचण्या अधूनमधून होत असतातच. पण रशियाच्या या क्षेपणास्त्रानं त्यांचाच जुना उपग्रह असलेल्या कॉसमॉस १४०८चा लक्ष्यभेद केला. पण हे सॅटेलाईट तुटल्यामुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या उपग्रहांना धोका निर्माण झाल्याचा ठपका रशियावर ठेवण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

अंतराळयान, रॉकेट, सॅटेलाईट पृथीच्या वेगवेगळ्या कक्षेत सोडण्यासाठी अवकाश मोहिमा राबवल्या जातात. कधी या मोहिमा यशस्वी होतात तर कधी त्यात अपयश येतं. असे कार्यक्रम अधूनमधून चालूच असतात. पण या जुन्या म्हणजेच टाकाऊ अंतराळयान, रॉकेट, सॅटेलाईटमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कचऱ्याचा ढीग तयार होतो. पण त्यातून इतर उपग्रहांना धोका निर्माण होतोय.

अँटीसॅटेलाईटमुळे अवकाशाची कचरापेटी

अँटीसॅटेलाईट या तंत्रज्ञानाचा उपयोग पृथ्वीच्या कक्षेतले वेगवेगळे खराब उपग्रह पाडण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी केला जातो. रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून पाडला होता. असे उपग्रह तीन प्रकारे पाडले जातात. एक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून, दुसरं पृथ्वीच्या कक्षेत लॉंच करून नंतर उपग्रहाची दिशा बदलून आणि तिसरं जमीन किंवा विमानातून लॉंच करून थेट उपग्रहाला लक्ष्य करणं.

अवकाश संशोधन संस्थांनी १९६०मधे अँटीसॅटेलाईट हे तंत्रज्ञान शोधून काढलं. सध्याच्या घडीला जगातल्या अमेरिका, चीन, रशिया आणि भारत या ४ देशांकडे अँटीसॅटेलाईटच्या चाचणीची क्षमता असल्याचं 'द क्विंट'नं आपल्या एका रिपोर्टमधे म्हटलंय. अमेरिकेनं १९८५ला 'सॉलविंड' नावाने तर भारताने २०१९ला मिशन शक्ती या नावाने अँटीसॅटेलाईटची चाचणी घेत एक उपग्रह पाडला होता. या उपग्रहाचे तुकडे सगळीकडे पसरले. त्यामुळेच अँटीसॅटेलाईट तंत्रज्ञान अवकाश प्रदूषणाचं कारण ठरतंय.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा

अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राच्या चाचण्या धोकादायक ठरतायत. त्यामुळे इतर उपग्रहांनाही धोका निर्माण होतोय. उपग्रह नष्ट करत असताना त्याचे १० सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराचे तुकडे शोधणं हे शास्त्रज्ञांसमोरचं मोठं आव्हान असल्याचं रॉयटर या न्यूज एजन्सीनं म्हटलंय. त्यामुळे या तयार होणाऱ्या कचऱ्याचा अगदी लहानात लहान तुकडाही धोकादायक ठरू शकतो.

अमेरिकेत प्राध्यापक असलेले वेंडी विटमन कॉब हे अवकाश तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत. ते अँटीसॅटेलाईट तंत्रज्ञानासंदर्भात लिहिताना काही धोक्याचे इशारेही देतायत. अवकाशातला हा कचरा पृथ्वीच्या चहूबाजूला १७ हजार किमी ताशी वेगाने फिरत असल्याचं कॉब यांनी 'द कन्वर्सेशन' या वेबसाईटवरच्या लेखात म्हटलंय. हे तुकडे अंतराळयान किंवा उपग्रहांना धडकतील असंही त्यांना वाटतंय.

१९८०मधे रशियाचं एक उपग्रह अशाच प्रकारामुळे तुटल्याची आठवण कॉब यांनी करून दिलीय. तर जुलै २०२१लाही अशीच घटना घडलीय. त्यामुळे हा कचरा भविष्यातल्या अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. सध्याच्या घडीला उपग्रह हे दूरसंचार क्षेत्र, हवामानविषयक आकडेवारी, जीपीएस यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावतात. त्यांना धोका निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही होईल.

कचऱ्याचं इंधन बनवायची योजना

घर असो की आपली सार्वजनिक ठिकाणं ती कायम स्वच्छ असायला हवीत असा आपला अट्टाहास असतो. मग अवकाशाचाही तसाच विचार करायला हरकत काय? अवकाशात तयार होत असलेल्या कचऱ्यामुळे भविष्यात जे संकट उभं राहणार आहे त्यावर आताच विचार करायला हवा. दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीने त्यासाठी एक तंत्रज्ञान शोधून काढलंय.

'न्यूमन स्पेस' ही दक्षिण ऑस्ट्रेलियातली एक कंपनी आहे. अवकाश मोहिमांचा विस्तार करणं, पृथ्वीच्या कक्षेतून उपग्रह इतरत्र हलवणं किंवा बाहेर काढण्यासाठी त्यांनी 'इन स्पेस इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टम' या नावाचं तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाशातल्या कचऱ्याचं रूपांतर रॉकेट इंधनमधे करण्याची त्यांची योजना आहे. त्याचे एकूण चार टप्पे असतील असंही कंपनीने जाहीर केलंय. त्यासाठी इतर ३ कंपन्यांना सोबत घेतलंय.

यात काम करत असलेल्या इतर तीन कंपन्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील. यातली जपानची ऍस्ट्रोस्केल कंपनी अवकाशातल्या कचऱ्याचे तुकडे पकडण्यासाठी उपग्रहाचा वापर करेल. अमेरिकेची 'नॅनोरॉक्स' कंपनी अवकाशातल्या कचऱ्याचा ढिगारा एकत्र करणं आणि त्याला छोट्या तुकड्यांमधे वेगळं करता येईल यावर काम करेल. तर अमेरिकेचीच सिस्लूनर ही कंपनी या कचऱ्याचं धातूच्या रॉडमधे रूपांतर करेल. तर 'न्यूमन स्पेस' त्याचं इंधन बनवेल.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ