युक्रेनचं मारियुपोल शहर जिंकण्यासाठी पुतीन इतके उतावीळ का झालेत?

२३ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत.

रशियन सैन्याने युक्रेनला मारियुपोल शहर रिकामं करा नाहीतर ते बेचिराख करू अशी धमकी दिली होती. युक्रेन सरकारने यावर माघार न घेता हे आव्हान स्वीकारलं. त्यामुळे चवताळलेलं यूक्रेनियन सैन्य प्राणांची बाजी लावत ताकदीनिशी तिथं उभं राहिलं. मारियुपोलवरच्या ताब्यासाठी रशिया आणि युक्रेनमधे सध्या चढाओढ सुरू आहे. त्यासाठी रशियानं बॉम्ब हल्ले सुरू केलेत.

'द गार्डियन'च्या एका बातमीनुसार, 'या हल्ल्यांमधे शहराचा ८० टक्के भाग बेचिराख झालाय. शहरात सुमारे १ ते २ लाख नागरिक अडकले असून शहराचा अन्न पुरवठा, पाणी पुरवठा आणि इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात आलीय. आणि मृतांची संख्या तर मोजता सुद्धा येत नाहीय.'

युक्रेन सरकार आपले सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतील असं म्हणत रशियाशी दोन हार करतंय. त्यामुळे रशियाने मारियुपोल भोवतीचा वेढा आणखी आवळलाय. पण या एका छोट्या बंदरासाठी पुतीन इतका आटापिटा का करतायत?

हेही वाचा: वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

मारियुपोलमधून क्रिमियात एण्ट्री

२०१४ला रशियाने युक्रेनच्या दक्षिणेला असणारा क्रिमिया भाग ताब्यात घेतला. अझोव समुद्र आणि काळ्या समुद्राच्यामधे असलेला क्रिमिया युक्रेनच्या दक्षिणेकडचा भाग आहे. मारियुपोल जिंकल्यानंतर रशियन सरकार आणि सैन्याला क्रिमियापर्यंत जाण्यासाठी भूमार्ग मिळेल. त्यामुळे त्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केलेल्या लुहांस्क आणि डोनेस्तकपर्यंतही आरामात जाता येईल.

मारियुपोल पूर्णपणे ताब्यात घेतलं तर युक्रेन हे दक्षिणेकडच्या जगापासून तुटून जाईल असं रशियाला वाटतंय. तसंच क्रिमियाच्या सैन्यासोबत जोडलं गेल्यामुळे रशियन सैन्याची ताकदही दुपटीने वाढेल. त्यामुळे रशियाला अधिकच बळ मिळावं म्हणून मारियुपोल मिळवण्यासाठी रशियन सैन्य प्राणांची शर्थ करतायत.

पुतीनचा बंदरावर डोळा

मारियुपोल शहर हे अझोव समुद्राच्या उत्तरेला आहे. हे युक्रेनचं अतिशय महत्त्वाचं आणि सर्वात जास्त वाहतूक आणि व्यावसायिक बंदर आहे. या एकट्या बंदरावर १३ मिलियन टन कार्गो जमा आहे. याच बंदरातूनच युक्रेन लोह, स्टील, धान्य आणि जड मशीनरीही निर्यात करते.

मारियुपोल औद्योगिक केंद्रही आहे. इथंच युक्रेन सैन्याला उपकरण पुरवणारी इलीच आयर्न आणि स्टील वर्क, यूक्रेनची सर्वात मोठी स्टील कंपनी अर्जोवस्टल आहे. रशियन बॉम्बवर्षावामुळे या कंपन्यांचं बरचसं नुकसान झालंय.

त्यामुळे हे शहर रशियाच्या ताब्यात गेलं तर युक्रेनची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. तिला पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल. म्हणूनच मारियुपोल रिकामं करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला असताना सुद्धा युक्रेनियन सैन्य तिथं हातात शस्त्र घेऊन उभंय.

हेही वाचा: उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

आर्थिक दबाव तंत्राचा खेळ

मारीयुपोलच्या उत्तर-पश्चिम दिशेला असणारा झापरजिया हा न्युक्लिअर पॉवर प्लांट आहे. यातून युक्रेनला लागणाऱ्या एकूण विजेच्या २० टक्के वीजनिर्मिती होत असते. रशियन सैन्याने या प्रकल्पावर हल्ला करून यातले काही रिॲक्टर्स बंद पाडले आणि बरंच नुकसानही केलंय.

या प्लांटवर हल्ला केल्यामुळे युक्रेनच्या बाकी शहरांचा वीजपुरवठा बंद पडलाय. रशियन सैन्याने आधीच मारीयुपोल शहराचा पाणीपुरवठा, अन्न पुरवठा बंद केला होता. वीज पुरवठा बंद करून रशियानं युक्रेनवर आणखी आर्थिक दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

पुतीनचं विक्टिम कार्ड

पुतीन यांच्यासाठी हे युद्ध अतिशय वैयक्तिक आहे. त्यांचं म्हणणंय की, युक्रेनचा हा भाग १८ व्या शतकापासून असणाऱ्या नोवोरोशियाचा भाग होता. आता युक्रेनच्या या दक्षिणी भागात किवच्या प्रो वेस्टर्न सरकारची जुलुमशाही सुरू आहे.

मारीयुपोलमधे अजोव ब्रिगेड नावाची युक्रेनियन मिलिटरी युनिट आहे. यात अतिउजवे क्रांतिकारी आणि निओ नाझीज आहेत. हे रशियन संस्कृती जपणाऱ्या लोकांवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे मारियुपोल जिंकलं तर रशियाला पूर्ण जगासमोर 'आपण आपल्या लोकांच्या मदतीला धावून गेलो' अशी बतावणी करत पुतीन यांना विक्टिम कार्ड खेळता येईल.

हा भाग परत रशियाला जोडला तर रशियन जनता पुतीनचा अखंड रशिया, अतिभव्य ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी उदो उदो करेल. त्यामुळे पुतीनसाठी मारियुपोलची लढाई महत्वाची ठरणार आहे. महत्त्वाचे ठरणार आहे. या अटीतटीच्या लढाईमुळे युद्धाचा रंग पालटू शकतो. मारियुपोलमधे होणाऱ्या निर्णायक घडामोडींमुळे जगाच्या भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडींवरही मोठा परिणाम होईल.

हेही वाचा: 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?