ऐसी कैसी जाहली साध्वी!

२० एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.

‘हेमंत करकरेंनी देशद्रोह, धर्मद्रोह केला होता. ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारलं, त्यादिवशी सुतक संपलं.’ हे विधान आहे तथाकथित साध्वी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातली आरोपी आणि भाजपची भोपाळमधून लोकसभा उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरचं.

भाजपची फारकत, पण मोदींचा इशारा

पाकिस्तान पुरस्कृत २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांचा अपमान या कथित साध्वीने केला. साध्वीविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलीय. मात्र तरीही अनेकजण सोशल मीडियामधे तिच्या समर्थनात उतरलेत. भाजपने मात्र तिच्या या संतापजनक वक्तव्यापासून स्वतःला दूर केलंय. त्याचवेळी तुरुंगात मिळालेल्या वागणुकीला त्रस्त होऊन साध्वीने असं विधान केल्याचं म्हटलंय.

हेही वाचाः साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

सगळीकडून टीकेची झोड उठल्यावर भाजपने एक प्रेस नोट काढत आपलं स्पष्टीकरण दिलंय. पण भाजपचं हे स्पष्टीकरणही गुळमुळीत आहे. साध्वीच्या भुमिकेपासून फारकत घेणाऱ्या भाजपने मात्र तिची भोपाळमधून उमेदवारी कायम ठेवलीय. यावरून भाजपची निवडणुकीच्या राजकारणातली अपरिहार्यता दिसतेय.

एकीकडे भाजपने पत्रक काढून तिचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलंय. पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काल १९ एप्रिलला 'टाइम्स नाऊ' या इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधे तिच्या उमेदवारीचं समर्थन केलंय. सोबतच मोदींनी 'साध्वीच्या उमेदवारीवरून काँग्रेस राजकारण करत असेल, तर ते त्यांना महागात पडेल' असा इशारा दिलाय. एका अर्थाने मोदींनी साधू, साध्वीचं भाजपमधलं 'स्टेटस'च स्पष्ट केलंय.

विकासाची लाईन आता धर्मावर

मात्र या निमित्ताने काही महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत. २०१४ मधे विकासाच्या अजेंड्यावर बोलणाऱ्या भाजपने यावेळी ऐन निवडणुकीत पुन्हा हिंदुत्वाची लाईन पकडलीय. भाजप अशा रीतीने आपल्या 'डिफॉल्ट मोड'वर परतलीय. अशावेळी हिंदुत्वाच्या राजकारणाकडे हिंदू समाज कसा पाहतो?

मूठभर हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू काय? त्यांचं म्हणणं म्हणजेच हिंदूंचं मत आहे का? की हिंदू आणि हिंदुत्ववादी वेगळे आहेत?

हेही वाचाः हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

सर्व हिंदुत्ववादी हिंदू असले तरी सर्व हिंदू हिंदुत्ववादी नाहीत, हे आतापर्यंत भाजपच्या राजकारणाला देशात किती पाठिंबा मिळाला, यावरून लक्षात येतं. स्वातंत्र्यानंतर सेक्युलर विचार मांडणारे, मानणारे लोक सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेत. पाच वर्षाआधी भाजपने सेक्युलर अजेंडा बाजूला सारत स्वतःचा नवा विकासाचा अजेंडा समोर आणला. विकासाच्या या स्वप्नाला लोकांनीही भरभरून पाठिंबा दिला.

विकास, रोजगार, भ्रष्टाचार निर्मुलन या मुद्द्यांवर निवडणूक लढवणारी भाजप पुन्हा प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळलीय. त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्व यांचा निवडणुकीच्या निकालावर होणारा परिणाम याविषयी चर्चा होणं स्वाभाविक आहे.

हिंदू आणि हिंदुत्ववादी एकच?

खरंतर प्रज्ञासिंहने हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असूच शकत नाहीत हे सिद्ध केलंय. तिने वापरलेली भाषा ही कोणत्याच हिंदूला पटणारी नाहीय. हिंदुत्ववाद्यांना ती नक्कीच पटेल. बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कृत्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने अशोकचक्रप्राप्त शहीद पोलीस अधिकाऱ्याविषयी असं बोलणं हे कोणत्या हिंदू संस्कृतीमधे बसतं, हे सर्व हिंदूंनी आता एकदा नीट तपासलं पाहिजे.

स्वतःला साध्वी म्हणून घेणारी व्यक्ती इतकी दूषित विचारांची कशी असू शकते, हा प्रश्न भगव्या कफणीत वावरणाऱ्या साधू समाजानेही विचारला पाहिजे. पण साधूचं नाव घेत संधीसाधूपणा करणारे असं काही करणार नाहीत, हीच शक्यता अधिक आहे.

हेही वाचाः धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज

हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असू शकतो का? याचं उत्तर शोधताना शेतकरी चळवळीतले नेते, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांचं मत एकदा वाचायला हवं. चंद्रकांत वानखडे म्हणतात, 'हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांचं नातं गाय आणि गोचिडाचं आहे. गायीच्या अंगातल्या रक्तावर गोचीड जगतो. म्हणजे गोचिडाच्या अंगात गायीचंच रक्त असतं. पण त्यामुळे गोचीड गाय होत नाही. हिंदुत्ववाद्यामधे हिंदूचंच रक्त आहे. पण ते हिंदू होऊ शकत नाहीत. हिंदुत्ववादी हे हिंदूंच्या रक्तावर वाढलेलं गोचीड आहेत.'

नव्या युगातला तुकाराम प्रश्न विचारेल

थोडक्यात कोणत्याही धर्माचा वादी हा त्या धर्माचा क्रमांक एकचा शत्रू असतो. असंच वागणं धर्माधिष्टीत व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांचं राहिलीय. याला कोणताही धर्म अपवाद नाही, हे पुन्हापुन्हा सिद्ध झालंय. धर्माच्या वाटेवर चालताना पाय घसरला की माणूस धर्मांध होतो.

धर्माने सांगितलेली तात्विक मूल्यं आणि प्रत्यक्ष व्यवहार यात तोल सांभाळता आला पाहिजे. नाहीतर तत्वाचं नाव घेऊन साधूसाध्वी होताही येईल, पण हा तोल सांभाळला नाही तर दहशतवादीदेखील निर्माण होतात. हे वारंवार खरं ठरत जाणं, कोणत्याच धर्माच्या हिताचं नाही.

प्रत्येक युगात येणारा एखादा तुकाराम पुन्हा प्रश्न विचारेल; 'ऐसें कैसे जाहले भोंदु, कर्म करुनी म्हणती साधू.'

हेही वाचाः 

एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)