पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

०५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच बुद्धिवंतांनी मान्यता दिली. पण आता गेल्या काही दशकांत इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल. ते पुस्तक आता मराठीत आलंय.

भारतात इस्लामी तत्वज्ञानाच्या आणि त्याच्या इतिहासाच्या तत्वज्ञानीय चर्चेची सुरवात सर सय्यद अहमद खान यांनी केली. इस्लाम जीवनाचं तत्वज्ञान आहे, हे समजून घेतल्यानंतर सर सय्यद यांनी त्याची मांडणी अनेक भौतिक तत्वज्ञानांप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पण सर सय्यद हे मुळचे कृतीशील समाजसुधारक होते. लेखन आणि संशोधन हे काही त्यांचं मुख्य ध्येय नव्हतं. त्यामुळे त्यांना मर्यादा आल्या.

इस्लामी तत्त्वज्ञान मांडणारे तीन विचारवंत

सर सय्यद यांच्यानंतर इस्लामी तत्वज्ञानाविषयी सामाजिक मुल्यभान जपणारे लेखन केले ते डॉ. मोहम्मद इक्बाल यांनी. त्यांच्या ‘रिकंस्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम’ या ग्रंथाने इस्लामी चिंतनाच्या नव्या चर्चेला सुरवात केली. सर सय्यद आणि इक्बाल यांच्यानंतर इस्लामी तत्वज्ञानाच्या श्रेष्ठ विचारवंतांमधे मौलाना आझाद यांचा समावेश होतो.

आझादांनी लिहिलेल्या ‘तर्जुमानुल कुरआन’ या ग्रंथाला जागतिक पातळीवरील इस्लामी अभ्यासकांत मान्यता मिळाली. मात्र या तीन विचारवंतांच्या नंतर इस्लामी तत्वज्ञानाची सामाजिक, आर्थिक, भौतिक, राजकीय भूमिका समजावून सांगण्याचा दखल घेण्याइतका प्रयत्न कुणी केल्याचं आढळत नाही. फाळणीच्यानंतर इस्लामी तत्वज्ञानाचे अनेक अभ्यासक पाकिस्तानात गेले. त्यानंतर या क्षेत्रातील अभ्यासाला प्रचंड मर्यादा आल्या.

फाळणीच्या दोन दशकांनंतर शेख सफिउर रहमान मुबारकपुरी यांनी या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’ या इस्लामी इतिहासावरील ग्रंथाला प्रेषित चरित्रावरील जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला. त्यांच्या या ग्रंथामुळे मर्दाना इथल्या इस्लामी विद्यापीठाने त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.

हेही वाचाः इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

इस्लामी इतिहास समजण्यासाठीचं वस्तुनिष्ठ साधन

‘अर्ररहिकुल मक्तुम’ची अनेक भाषांमधे भाषांतरं झाली. अलिकडे प्रा. मिर इसहाक शेख यांनी त्याचं `कुपीबंद अमृत` या नावाने मराठीत भाषांतर केलं. प्रा. शेख मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘उर्दू – मराठी राष्ट्रीय कविता’ या विषयावर कोल्हापूर विद्यापीठातून पी.एचडी. केलीय. त्या विषयावरील काही पुस्तकंही त्यांनी लिहिलीत. प्रा. शेख यांनी अत्यंत उद्बोधक अशा मराठीत या ग्रंथाचं भाषांतर करुन मराठीतून इस्लाम समजून घेण्यासाठी इस्लामी इतिहासाचं एक वस्तुनिष्ठ साधन उपलब्ध करुन दिलंय.

इस्लामचा अभ्यास धर्म म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अभावानेच केली. मक्का शहरातील उत्पादन व्यवस्थेत इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय अभावानेच धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करु शकला. त्यामुळे इस्लामच्या आधीही प्रेषितांनी ‘हिल्फुल फुदुल’ कराराच्या माध्यमातून आर्थिक शोषणाच्या विरोधात दिलेला लढा हा इस्लामी इतिहासातून दुर्लक्षित राहिला.

मक्का शहरात प्रेषितांच्या जन्मापूर्वी आर्थिक विषमतेने सामाजव्यवस्थेला पोखरुन काढलं होतं. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे अज्ञानाचा काळ संबोधून पुढे सरकतात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रद्धा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. शहरातील आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसते.

इस्लाममधलं मोहम्मदी परिवर्तन

फिलीप के हित्ती यांच्यासारख्या आधुनिक इतिहासकारांनी मक्का शहराचा प्रेषितपूर्व इतिहास मांडण्यासाठी मोठे परिश्रम घेतलेत. त्यांचा ‘हिस्ट्री ऑफ अरब’ हा ग्रंथ सामाजिक कारणांचा शोध घेऊन तिथे घडलेल्या ‘मोहम्मदी परिवर्तनाची’ व्याख्या करतो. मॅक्झिम रॅडिन्सन ‘कॅपिटलिझम अँड इस्लाम’मधे इस्लामी अर्थक्रांतीच्या मुळाशी असणारी परिस्थिती कथन करतानादेखील हित्ती यांच्यासारखी सुरवात करतात. मात्र त्यांच्या मांडणीचा हेतू, आशय आणि सुत्रं वेगळी असल्याने ते लिखाण इस्लामी इकॉनॉमिक सोशिओ रिवोल्युशनला अधोरेखित करत नाही.

शेख सफिउर रहमान मुबारकपुरी यांनी इस्लामचा जन्म ज्या सामाजिक परिस्थितीतून झाला, त्याचा आढावा घेतलाय. अरब भुप्रदेशाचे भौगोलिक स्थान, त्याचा सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहास मुबारकपुरी यांनी अत्यंत सखोल परिश्रम घेऊन मांडलाय. इस्लामपूर्व अरब समाजातील चालीरिती आणि त्यातून होणारे मानवी समाजाचे शोषण याचे अनेक संदर्भ या ग्रंथातून समोर येतात.

इस्लामपूर्व विवाहाच्या पद्धती, सामाजिक जीवनातल्या रिती, परंपरा, अंधश्रद्धेतून होणारे आर्थिक शोषण, हत्या, लूट यातून आकाराला आलेली भयावय अवस्था, समाजातल्या निम्नवर्गीयांची होणारी मानखंडना, त्यांचं समाजातलं सन्मानाचं स्थान हिरावण्याची शोषणप्रक्रिया याची माहिती देण्यासाठी मुबारकपुरी यांनी तत्कालीन अरबी जीवनाच्या अनेक मध्ययुगीन अभ्यासकांचे दाखले दिलेत.

हेही वाचाः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह

प्रेषितांच्या आधीचा अरब इतिहास

सामान्य लोकांमधे प्रेषित मोहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक असल्याचा एक भ्रम शतकानुशतके रूढ आहे. कुरआनने हा समज खोडून काढलाय. इस्लामची सुरवात प्रेषित हजरत आदम यांच्यापासून मानली जाते. त्यामुळे इस्लामचे अनेक इतिहासकार इस्लामचा इतिहास मांडताना जगाच्या निर्मिती क्षणापासून सुरवात करतात.

मुबारकपुरी यांनी त्यापेक्षा वेगळी पध्दत वापरलीय. त्यांनी अरबी समाजाचा इतिहास सांगताना प्रेषित इब्राहिम यांच्यापासून मांडणी केलीय. मक्का शहर कशापध्दतीने वसले त्याची वस्तुनिष्ठ माहिती या ग्रंथातून मुबारकपुरी यांनी दिलीय. या ग्रंथात एका ॲकेडमिक अभ्यासकांप्रमाणे मुबारकपुरी संदर्भ साधने हाताळतात. इब्ने हिशामपासून इब्ने खल्दुनपर्यंतच्या अनेक इतिहासकारांच्या ग्रंथांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत. 

प्रेषित इब्राहिम यांच्या अंधश्रद्धाविरोधी चळवळीच्यानंतर अरब समाजात पुन्हा अंधश्रध्दा कशी वाढीस लागली त्याचा घटनाक्रम त्यांनी मांडलाय. या काळातल्या प्रेषित इस्लामईल यांच्यापासून अनेक प्रेषितांच्या इतिहासाचा त्यांनी आढावा घेतला. हा इतिहास मांडताना अनेक अरब द्विपकल्पातील अनेक प्रदेशांचा सामाजिक, राजकीय इतिहास येतो. अनेक लढायांचा उल्लेख होतो. अनेक राजवंशांच्या सत्ता, त्यात झालेला बदल वगैरे उल्लेख येतात.

अरब इतिहासाचा इतिहासाच्या ज्ञानकोषाप्रमाणे या ग्रंथाने प्राचीन, मध्ययुगीन अरब जीवनाची प्रतिमा उभी केलीय. इस्लामी इतिहासकार नेहमी हिजरी सनावळ्यांचा उल्लेख करुन पुढे जातात. पण मुबारकपुरी यांनी इसवी सनानुसार तारखा दिल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमेतर वाचकांची गैरसोय होत नाही.

इस्लामचा जन्म आणि विकास

इस्लाम, ज्ञानाच्या आग्रहासह अज्ञानाच्या विरोधात जन्माला आलेले तत्त्वज्ञान आहे. प्रेषितांच्या प्रथम बोधप्राप्तीचा प्रसंग शिक्षणाच्या आग्रहाला प्रतिपादित करतो. प्रेषितांची निरक्षरता, हिरा नावाची गुहा, सामाजिक अज्ञानाचा अंधकार, त्यावरील प्रेषितांचे चिंतन, त्यातून सामाजिक अज्ञानाची गुहा भेदणारी प्रेषितत्वाची बोधप्राप्ती. या सर्व घटना ज्ञानाच्या अभिजात तत्वाला अधोरेखित करत, अज्ञान संपवणाऱ्या नवक्रांतीच्या जन्माची साक्ष देतात.

या स्थित्यंतरात इस्लामी धर्मजागरणाच्या चळवळीचा उदय झाला. इस्लाम म्हणजे नवा धर्म तर मुळीच नव्हता. मानवकल्याणाची मुल्यं ही सामाजात खोलवर रुजलेली असतात. तीच मानवी समूहाला जोडून ठेवतात. पण कालांतराने या मुल्यांवर मळभ दाटतं. ती धुसर होत जातात. मग त्याच्या पुनर्जागरणाची गरज निर्माण होते. तेव्हा चिंतनशील समाजक्रांतीच्या माध्यमातून धर्ममुल्यांवरील कीड बाजूला सारुन, त्याचे मूळ स्वरुप समोर आणण्याचे प्रयत्न सुरु होतात.

क्रांतीची पार्श्वभूमी तयार होते. क्रांती विचारांच्या सर्जनातून परिवर्तनाचं बी समाजमनात पेरते. इस्लामी समाजक्रांतीचा जन्मदेखील या नैसर्गिक प्रक्रियेतून झालाय. प्रेषितांना हिरा गुहेत झालेला पहिला साक्षात्कार ते त्यांच्या अखेरच्या हजयात्रेतील भाषणापर्यंत इस्लामच्या विकासाचा पहिला टप्पा आहे.

हेही वाचाः चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!

पॉलिटिकल इस्लामची समाजक्रांती

प्रेषितप्रणित या समाजक्रांतीत अनेक स्थित्यंतरं आली. नित्याने उद्भवत चाललेल्या आव्हानांशी झालेल्या संघर्षातून ही समाजक्रांती पूर्णत्वापर्यंत आली. समाजातील शोषणाला भांडवलप्रणित अर्थव्यवस्थेची रचना कारणीभूत असते. त्याला आव्हान दिलं की, आव्हान देणाऱ्यांशी ही व्यवस्था विशिष्ट वर्गाचे हित साधणारी यंत्रणा अबाधित ठेवण्यासाठी प्राणपणाने लढते. हा संघर्ष समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात होतो.

धर्मस्थळांपासून बाजारापर्यंत, न्यायालयापासून रणांगणापर्यंत, कुटुंबापासून समाजापर्यंत जीवनाच्या सर्व विभागात रण पेटवला जातो. इस्लामी समाजक्रांती उद्दिष्टापर्यंत पोचली ती या प्रत्येक रणक्षेत्रातील संघर्ष पचवून. इस्लामचा इतिहास हा या संघर्षाची गाथा आहे. दुर्दैवाने जगात अनेक देशात पसरलेल्या मुस्लिम सत्तेची जागा इंग्रजी राजवटीने घेतल्यानंतर हा इतिहास वेगळ्या अर्थाने आकलनाला घेतला गेला.

राज्यवस्था स्वतःच्या अधिष्ठानाला मजबूत करणाऱ्या आणि विरोधकांना उद्ध्वस्त करणाऱ्या चिंतनप्रवाहाला जन्मास घालते. इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीच्या इतिहासाला विकृत करण्यात आले. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच समाजातील वेगवेगळ्या ज्ञानशाखा मानणाऱ्या बुद्धिवंतांनी मान्यता दिली.

गेल्या काही दशकात आता इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. त्यामुळे युरोपप्रणित इस्लामच्या आकलनपरंपरेला यामुळे हादरे बसत आहेत. आणि युरोपप्रणित आकलन नाकारणाऱ्या याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल.

वर्तमान काळात इस्लामला समजून घेणं गरजेचं बनलंय. राजकीय संघर्षात इस्लाम हा महत्त्वाचा विषय म्हणून पुढं येतोय. भारतात अभुतपुर्व अशी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झालीय. अशा परिस्थितीत इस्लामचा अभ्यास करण्यासाठीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे.

हेही वाचाः 

कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो

हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास

आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत

(लेखक हे सोलापूर इथल्या गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत. ९५०३४२९०७६ हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे.)