अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.
सन १९५७ ला ‘प्यासा’ प्रदर्शित झाला. तेव्हा गुरुदत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा या कलाकारांच्या फोटोंनी सजलेल्या सिनेमाच्या जाहिराती केल्या होत्या. त्याची गाणी इतकी प्रभावी ठरली की, पुढं सिनेमाच्या जाहिरातीवर कलाकारांचे फोटो न झळकता सिनेमातली ‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है’ आणि ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’, ही गाणी A Lyrical new high in film music, Sheer ecstasy you have never before experienced अशा मजकुरासोबत लोकांचं लक्ष वेधलं.
हिंदी सिनेसृष्टीत हे पहिल्यांदाच घडत होतं आणि पुन्हा असं कधी घडलं नाही. एखाद्या गीतकारासाठी हा सर्वोच्च असा सन्मानच होता. या सिनेमाच्या यश, मानसन्मानात सर्वाधिक वाटा होता तो गीतकार साहिर लुधियानवी यांचा. प्रत्येक रसिक मनाला या नावाची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. ८ मार्च १९२१ ला त्यांचा जन्म झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष.
साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही. त्यांचा मृत्यू २५ ऑक्टोबर १९८० चा. त्यांना जाऊन ४० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. पण त्यांच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश म्हणावं लागेल.
हेही वाचा: वो सुबह कभी तो आयेगी!
साहिर यांचं मूळ नाव अब्दुल हयी. लुधियानातल्या चौधरी फजल मोहम्मद या श्रीमंत जमीनदाराचा हा एकुलता मुलगा. चौधरी फजलच्या अकराव्या बायकोच्या पोटी अब्दुल जन्माला आला. आईचं नाव सरदार बेगम. नवर्याच्या वागण्यातला एकही गुण मुलामधे येऊ नये यासाठी ती प्रयत्नशील असायची.
चौधरी फजलच्या वागण्याला कंटाळून वारेमाप संपत्ती लाथाडून सरदार बेगम अब्दुलला घेऊन माहेरी आली. पुढे शाळेचं शिक्षण पूर्ण करून अब्दुल लुधियानाच्या गवर्मेंट कॉलेजमधे दाखल झाला. त्या काळात ब्रिटिश राजवटीविरोधात वातावरण तापलं होतं. पण अब्दुलला मात्र कविता आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचं वेड लागलं होतं.
मोहम्मद इकबाल, फैज अहमद फैज, जोश मलिहाबादी, मजाज लखनवी या कवींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तो प्रभाव त्यांच्या ‘तखल्लुस’ म्हणजे टोपण नावातही जाणवतो. तखल्लुस त्याने इकबाल यांनी दाग या कवीच्या आठवणीत लिहिलेल्या कवितेतून घेतलं.
इस चमन में होंगे पैदा बुलबुले शीराज भी,
सैंकडो साहिर भी होंगे, साहिबें एजाज भी।
या कवितेतला साहिर हा शब्द त्यांनी स्वतःच्या तखल्लुससाठी निवडला. साहिर अर्थात जादूगार. या शब्दाबरोबर लुधियाना हे जन्माचं गाव जोडलं आणि साहिर लुधियानवी हे नवं नाव अब्दुलला मिळालं. खरं तर अत्यंत असुरक्षित नैराश्यानं भरलेलं त्यांचं बालपण होतं. या काळापासून दूर होण्याची, जुनी ओळख पुसण्याची संधीच त्यांना या नावाने मिळाली. आपलं बालपण, भूतकाळ याविषयी त्यांनी कवितेत वर्णन केलंय की,
मेरे माजी को अंधेरे में दबा रहने दो,
मेरा माजी मेरी जिल्लत के सिवा कुछ भी नही।
तेव्हाच्या उर्दू कवीमधे टोपण नावानं लिहिण्याचा ट्रेंड होता. पण साहिर यांचं बदललेलं नाव दुःखी भूतकाळातून बाहेर पडण्याची धडपड वाटते. कॉलेजच्या काळात त्यांच्या कविता आणि नेतृत्वगुणांनाही धार चढायला लागली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. ते कॉलेजमधे लोकप्रिय होते. पण त्यांच्या कविता आणि भाषणं कॉलेजच्या मॅनेजमेंटला पटत नव्हतं.
याच काळात ते महिंदर नावाच्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडले. पण टीबीनं तिचा मृत्यू झाला. पुढं त्याच कॉलेजमधली इशर कौर नावाची आणखी एक मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. सुट्टीच्या काळात प्राचार्यांच्या बंगल्यात इशरला भेटण्याचा ठपका साहिर यांच्यावर ठेवून इशर आणि साहिर दोघांनाही कॉलेजमधून काढून टाकलं.
हेही वाचा: कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना
खरं तर साहिर यांचे कम्युनिस्ट विचार, त्यांनी कवितेतून व्यवस्थेवर ओढलेले कोरडे, त्यांची भाषणं हीच खरी कॉलेजची अडचण होती. पण पुढं चित्रपटसृष्टीत यशस्वी झाल्यावर याच कॉलेजनं एका ऑडिटोरियमला साहिर ऑडिटोरियम असं नाव देत सन्मानही केला. कॉलेज जीवनातल्या प्रेमभंगाचं दुःख, दुरावा यामुळं कवितेतही हीच निराशा यायला लागली.
लहानपणापासून अनुभवलेली श्रीमंतांची, जमीनदारांची मग्रुरी, अत्याचार त्यात भरडली जाणारी गरीब, लाचार माणसं हे सगळं बघून प्रेमभंगाच्या दुःखाचा, प्रेमाच्या हळूवार भावनांचा विसर पडून कवितेत समाजाचा, श्रीमंत-गरीब दरीचा, असंतोषाचा आणि अन्यायाचा उल्लेख वारंवार यायला लागला.
१९४४ ला २३ व्या वर्षी साहिर यांचा ‘तलखियाँ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्या कवितांतून साहिर यांनी तारुण्यसुलभ प्रेमाचा बुरखा उतरवला आणि त्यांच्या कवितेनं क्रांतिकारी लेणं पांघरलं.
अगदी रोखठोक शैलीत सामान्यजनांच्या व्यथा मांडल्या. प्रेमाच्या हळव्या, चंचल, उत्तेजित अवस्था दूर सारत रोजच्या जगण्यातले संघर्ष, कटू अनुभव याकडं समाजाचं लक्ष वेधलं आणि अल्पावधीतच त्यांची ओळख जनमानसात रुजली.
देश स्वातंत्र्याकडे वाटचाल तर करत होता; पण स्वातंत्र्य मिळाल्यावर देशातल्या समस्या संपणार नाहीत यावर ते ठाम होते. याकडं लक्ष वेधताना ते म्हणतात,
देस के अदबार की बातें करे,
अजनबी सरकार की बातें करे,
अगली दुनिया के फसाने छोडकर,
इस जहन्नुमजार की बातें कर
तलखियाँमधल्या कवितांनी त्यांना प्रसिद्धी दिली. साहिर यांच्या हयातीत तलखियाँच्या ३० पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पाकिस्तानमधे तर आजपर्यंत सर्वाधिक प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. तिथं तर असं म्हणतात की, ज्याला प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करायचाय, तो सुरवातीला तलखियाँ प्रकाशित करतो. यातल्या बर्याचशा कविता पुढं सिनेमातसुद्धा आल्या.
या कवितासंग्रहातली सगळ्यात प्रसिद्ध कविता म्हणजे ‘ताजमहल’. साहिर यांना पुरोगामी कवी म्हणून ओळख देणारी हीच ती कविता. ताजमहालच्या सौंदर्याबद्दल एक शब्दही न बोलता राजानं गरिबांच्या प्रेमाला कसं कमी लेखलं याकडं साहिर यांनी समाजाचं लक्ष वेधलं.
इक शहनशाहने दौलत का सहारा लेकर,
हम गरिबों की मोहोब्बत का उडाया है मजाक
साहिर जिथं मुशायर्याला जायचे तिथं त्यांच्या कवितेची फर्माईश येऊ लागली. या कवितेची प्रसिद्धी कॅश करण्यासाठी एका निर्मात्यानं ‘गजल’ या यथातथाच असणार्या सिनेमात ही कविता प्रकाशनानंतर तब्बल २० वर्षांनी घेतली. ‘मेरे मेहबुब कहीं और मिला कर मुझसे’ हे मोहम्मद रफींच्या आवाजातलं गाणं ‘ताजमहल’ कवितेचाच छोटासा तुकडा होता.
तलखियाँत ‘चकले’ ही एक कविता होती. या कवितेवर आधारित ‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहां है’ हे गाणं ‘प्यासा’ या सिनेमात घेतलं गेलं. ही कविता गुरुदत्त यांना आवडली होती. ती थोडी सोप्या भाषेत साहिर यांच्याकडून गुरुदत्तनी लिहून घेतली आणि खास या कवितेसाठी एक प्रसंग तयार केला. आई जग सोडून गेल्यावर नायक विजय नशा करायला जातो आणि वेश्या वस्तीत एक स्त्री नाचत असते आणि मागे तिचं मूल रडत असतं. हे दृश्य बघून विजय उद्विग्न होऊन हे गाणं गातो.
तलखियाँमधली आणखी एक कविता होती ‘खुबसुरत मोड’. साहिर यांनी गुमराह या सिनेमासाठी ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनों’ या गाण्यात ही कविता अंशतः घेतली. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. महेंद्र कपूर यांचं हे सगळ्यात लोकप्रिय गीतसुद्धा ठरलं. कटुता आलेल्या नात्यात पुन्हा अनोळखी होऊन जाणं ही कल्पनाच किती वेगळी होती.
एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा न करता, कुठलाही आपलेपणा न दाखवता एखाद्या त्रयस्थासारखं वागणं खरंच जमेल का कुणाला? पण नियतीनंच जर वाटा वेगळ्या केल्या असतील तर नातं एखाद्या सुंदर वळणावर सोडलेलंच बरं, असा नवा विचार त्यांनी मांडला. आजही अनेक पिढ्यांचं जुन्या नात्यातून बाहेर पडून नवी वाट धरणार्यांचं हे हक्काचं गाणं आहे.
हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता
तलखियाँच्या यशानंतर ते मुंबईला आले. सुरवातीच्या स्ट्रगलनंतर ‘नौजवान’ सिनेमासाठी संगीतकार एसडी बर्मन यांच्याबरोबर साहिर यांनी गाणी लिहिली. या सिनेमातलं ‘थंडी हवाये’ हे गाणं लोकप्रिय ठरलं. पाठोपाठ ‘बाजी’ सिनेमातल्या ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ हे गाणं गाजलं.
साहिर आणि बर्मन जोडीने देवदास, फंटुश, हाऊस नं. ४४, जाल, मुनिमजी हे सिनेमा केले. ‘प्यासा’ या सिनेमासाठी गुरुदत्तनं याच जोडीला घेतलं. या सिनेमातल्या गीतांचं श्रेय संगीतकाराचं की, गीतकाराचं, यावरून वाद झाला आणि साहिर-बर्मन जोडी तुटली. पण आपण बघितलं तर गाण्यातल्या काव्याला, शब्दांना न्याय मिळावा अशीच संगीत योजना होती.
सगळ्या गाण्यांमधे आशयाला केंद्र मानून कमीत कमी संगीताचा वापर केला गेला. पण या जोडीत दुरावा आला आणि या सिनेमानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. १९५० ते १९७० या सिनेमा संगीताच्या सुवर्णकाळात या जोडीचं योगदान मोठं आहे.
‘नया दौर’साठीही साहिर यांनी गाणी लिहिली. ओपी नय्यर यांच्या कारकिर्दीतलं एकमेव फिल्मफेअर अॅवॉर्ड त्यांना याच सिनेमासाठी मिळालं. यानंतर मात्र साहिर प्रमुख यशस्वी गीतकार म्हणून नावारूपाला आले. फिर सुबह होगी, साधना, चांदी की दीवार, सोने कि चिडिया, धूल का फूल, बाबर, बरसात की रात, ताजमहल, गुमराह, हमराज, दिल ही तो है अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली.
‘हम दोनो’ या सिनेमात साहिर यांच्या गीतांनी काय बहार आणलीय. जयदेव यांनी प्रत्येक गाणं अगदी मास्टरपिसच बनवलं. देव आनंदच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं पण साहिर यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारं एक गाणं म्हणजे ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’
किती सोप्या शब्दांत जीवनाचं सार, बेफिकिरीत जगण्याची मजा यात वर्णन केलीय. याच सिनेमात आजवरचं सगळ्यात रोमँटिक, आल्हाददायक ड्युएट साँग आहे ते म्हणजे ‘अभी ना जाओ छोडकर’ याच सिनेमात ‘अल्लाह तेरो नाम’ ही प्रार्थनासुद्धा आहे. अल्लाह तेरो नाम, आन मिलो, शाम सावरे, ही गाणी तर अमर झाली आणि बर्निंग ट्रेन मधलं ‘तेरी है जमी, तेरा आसमाँ’ या गाण्याशिवाय आजकाल एकाही प्रायमरी स्कूलचं गॅदरिंग पार पडत नाही.
हेही वाचा: जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय
‘दिल ही तो है’ या सिनेमातलं ‘लागा चुनरी में दाग’ हे असंच एक छान गाणं. अतिशय टुकार प्रसंगावर घेतलेलं हे गाणं कान देऊन नीट ऐकायचं. मन्ना डे च्या आवाजात, ‘कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल’
अशी शब्दरचना करत प्रापंचिक मोहात अडकलेल्या मनाची मोक्षाकडं जायची धडपड साहिर स्पष्ट करतात. ‘वक्त’ सिनेमातलं ‘आगे भी जाने ना तू’ हे असंच एक लयबद्ध गाणं. यातलं बलराज साहनींवर चित्रीत झालेल्या ‘ओ मेरी जोहराजबी’ गाण्यातून आजही कित्येक कार्यक्रमात मध्यमवयीन जोडपी आपलं प्रेम व्यक्त करतात.
या सिनेमानंतर यश चोप्रा आणि साहिर यांचं सख्य जमलं. यानंतर साहिर जिवंत असेपर्यंत त्यांनी यश चोप्रांसाठी गाणी लिहिली. दाग, कभी कभी, काला पत्थर, दीवार, त्रिशूल या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं.
साहिर अविवाहित राहिले. त्यांच्या अविवाहित राहण्यात सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रितम यांचा वाटा असावा. दोन प्रतिभावंत साहित्यिकांचं हे जगावेगळं आणि अत्यंत प्रगल्भ असं नातं होतं. लाहोरजवळ प्रीतनगर शहरात मुशायर्यात त्यांची भेट झाली होती. साहिर मुंबईला आल्यावर दोघांमधे दुरावा आला खरा; पण अमृता आपल्या कादंबरीच्या नायकाच्या रूपात तर साहिर आपल्या गीतांमधून अमृताला भेटतच राहिले.
ज्यांना साहिर अमृताची कहाणी माहीत नाही, ते साहिर यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेने दिपून जातात आणि ज्यांना माहिती आहे ते साहिर यांच्या प्रत्येक रचनेत अमृताला शोधत राहतात. प्रसिद्ध चित्रकार इमरोज यांनी अमृताला तिच्यातल्या साहिरसकट स्वीकारलं. लग्न न करता अखेरपर्यंत ते एकत्रच राहिले. पण साहिर मात्र अविवाहितच राहिले.
एकदा साहिर आणि अमृता ‘एशियन रायटर्स कॉन्फरन्स’साठी दिल्लीला गेले होते. तिथं प्रत्येकाला आपल्या नावाचा ‘बॅज’ दिला होता. तिथं साहिर यांनी अमृताचा तर अमृतांनी साहिर यांचा ‘बॅज’ कोटावर लावला होता. कुणी ही चूक लक्षात आणून दिली तर दोघेही हसायचे फक्त. संपूर्ण कॉन्फरन्समधे एकमेकांच्या नावाची ओळख ते छातीवर लावून अभिमानानं मिरवत होते.
साहिर यांच्या निधनाची बातमी रात्री २ वाजता अमृता यांना कळली. त्यांनी तो प्रसंग ‘रसिदी टिकट’मधे सांगितलाय. ‘खरं तर मृत्यू मलाच न्यायला आला होता. पण माझ्या नावाचा बॅज त्याच्या कोटावर होता. त्यामुळं मृत्यू त्याच्या दरवाजाला गेला’.
हेही वाचा:
बाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस
स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?
(सायली चौधरी यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )