साईबाबाः लोकसेवकाचा लोकदेव होतो तेव्हा

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत.

शिर्डीचे साईबाबा आपल्यातून गेले त्याला आता शंभर वर्ष झाली. त्यानिमित्ताने २०१७ १८ला साईभक्तांनी बाबांचं स्मृतिशताब्दी वर्ष साजरं केलं. १५ ऑक्टोबर १९१८ला शिर्डीत साईबाबा निवर्तले. तो दसरा होता. त्यामुळे आज त्यांची शंभरावी पुण्यतिथी साजरी होतेय. या शंभर वर्षातच साईबाबा लोकदेव बनले. आज देश विदेशात त्यांचे भक्त आहेत. सर्वधर्मीय, जाती, पंथातले लोक त्यांना मानतात. म्हणजेच साईबाबा हा सेक्युलर देव आहे. गेल्या शंभर वर्षात लोकसेवक साईबाबांचा लोकदेव कसा घडत गेला. त्याची कहाणी अभ्यासण्याजोगी आहे.

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

मुस्लिम मशिदीचं हिंदू नाव

सोळाव्या वर्षी एक पोरगा शिर्डीत आला. १८५८च्या आसपासचा हा काळ होता. १८५७ला इंग्रजाविरुद्धचं बंड घडून गेलं होतं. त्या बंडातून होरपळलेले शिपाई, बंडखोर देशभर मजल दरमजल करत लपत हिंडत होते. काहींनी वेषांतर करुन गुप्त जीवन जगणं सुरू केलं होतं. खेड्यापाड्यापर्यंत इंग्रजांची दहशत पसरत चालली होती. तो हा काळ.

१६ वर्षांचा हा पोरगा वेगळाच होता. तो निंबाच्या झाडाखाली राहू लागला. कफनी घातलेला. लुंगी लावलेला. डोकं पांढऱ्या कापड्यानं बांधलेला. त्याच्या वेषातली फकीरी वागण्यात झळके. हा पोरगा जसा वाढत गेला, तसं त्याच्या ध्यानधारणेनं गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तो मशिदीत राही. त्या मशिदीच नाव त्यानं द्वारकामाई ठेवलं. मुस्लिम मशिदीचं हिंदू नाव कुणाला खटकलं नाही. 

म्हाळसापती हे शिर्डीतल्या खंडोबाचे पुजारी. त्यांनी या पोराला साई म्हटलं. मग सर्वजण त्याला साई म्हणू लागले. साई लोकांना धूपाचा, धुनीचा जाळलेला अंगारा देई. आजारी लोकांना जडीबुटीची औषधं देई. त्यातून लोकांना गुण येई. आराम पडे. आजार बरे होत. गुण देणारा हकीम म्हणून साईचं पंचक्रोशीत नाव झालं. आणि आता साईचा साईबाबा झाला. सुरुवातीला शिर्डीत या पोराची हेटाळणी, टिंगल करणारे आता साईबाबांना मानू लागले. त्यांचं एकू लागले. साईबाबा लोकांना सकाळ संध्याकाळ रामायण, भगवद्गीता आणि कुराणातील ज्ञान सांगत.

सबका मालिका एक है. श्रद्धा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण लोकांना भावली. आता म्हाळसापाती, आप्पा जोगळे आणि काशिनाथ असा साईबाबांचा गोतावळा जमा झाला. कफनी घातलेल्या या फकीर हकीमाला लोक साईबाबा म्हणता म्हणता संत म्हणू लागले. उपासनी महाराज, बिडकर महाराज, गंगागीर महाराज अशा पंचक्रोशीतल्या इतर साधूंनी साईबाबांना सद्गुरू मानलं. स्वत: साईबाबा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना भाऊ मानत. असा शिर्डी आणि परिसराबाहेर साईबाबांचा नावलौकीक वाढत गेला.

हेही वाचाः धम्मचक्र प्रवर्तन दिन : तिथीनुसार की तारखेनुसार?

लोकसेवकाच्या आठवणी 

साईबाबांच्या हयातीतच त्यांचा नावलौकीक शिर्डीबाहेर वाढत कसा होता याचं उदाहरण नुकतचं वाचायला मिळालं. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या मातोश्री सुशिला रामकृष्ण महाराव यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मचरित्रपर पुस्तकात साईबाबांचा उल्लेख आहे. सुशिला महाराव यांचे वडील आबाजी मालोजी चव्हाण हे साईबाबांचे मित्र होते. आबाजी हे साईबाबांच्या भेटीसाठी शिर्डीला जात असतं. ते पेटी सुंदर वाजवत. गातही छान. ‘साई रहम नजर करना, बच्चोका पालन करना’ हे त्यांच आवडतं भजन होतं.

सुशिला महाराव लिहितात `साईबाबा लोकसेवक होते. रुग्णांवर ते स्वत: उपचार करत. जो कुणी चांगला वैद्य, डॉक्टर असे, त्याच्याकडे रुग्णाला पाठवत. भुकेला असेल त्याला अन्न मिळवून देत. त्यासाठी भिक्षा मागीत. जीवावरची संकटं टळावीत यासाठी रात्री-अपरात्री प्रवास करु नका, व्यसनं करु नका, आजाराकडे दुर्लक्ष करु नका,` असं सांगत. त्यांच्या या सूचनांच पालन केल्यामुळं संकट टळत. त्यातून साईबाबांची महती वाढली. साईबाबा १९१८ला निवर्तल्यानंतर त्यांच्या नावावर चमत्कारांच्या आख्यायिका रचल्या गेल्या. त्यांच्या नावाच्या मंदिराची दुकानं उभी राहिली.

साईबाबांचा १९१० सालापासूनचा इतिहास त्यांच्या साईसत्चरित्र या पुस्तकात लिह्लेला आहे. साईबाबा या गावात आले तेव्हापासून आजतायागत बाबांचं मूळ गाव, नाव, जात, धर्म याबद्दल संदिग्धता आहे. बाबा सांगत, आपण सारे देवाची लेकरं, अल्लाची लेकरं. सगळे धर्म सारखे आहेत. सगळेच धर्म मानवमुक्तीचा मार्ग सांगतात, अशी शिकवण बाबा देत असत. जात, धर्मभेद मानू नका. स्त्री-पुरुष भेद करू नका हे बाबा सांगत. बाबांच्या भक्तात शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्रहारी भक्त आहेत. अमुक एक आहाराच करा, असा बाबांचा आग्रह नसायचा.

हेही वाचाः वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

शिर्डीः समृद्धीचा पाया

साईबाबा शिर्डीत आले तेव्हा हे एक छोटं खेडं होतं. मालेगाव-अहमदनगर महामार्गावर हे गाव वसलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालूक्यातलं शिर्डी हे आता एक प्रमुख शहर आहे. अहमदनगर पासून ८३ किलोमीटर तर कोपरगावपासून १५ किलोमीटरवर शिर्डी आहे. अगोदर शेती आणि बलुतेदारीवर अवलंबून असलेलं, अठरा पगड जातींची वस्ती असलेलं हे गाव साईबाबांचा नावलौकिक वाढला तस तसं बदलत गेलं. भाषा अभ्यासक विश्वनाथ खैरे यांच्या मते शिर्डी हा तामिळ भाषेतील शब्द आहे. या शब्दाची उत्पती अशी

तामिळ seeradi =  seerdi + adi
देवनागरी=  सीर +अडी = सीरडी
तामिळ भाषेत सीरडि म्हणजे म्हणजे The foot of prosperity = समृद्धीचा पाया.

साईबाबा आणि शिर्डी विसाव्या शतकात घडले, वाढले. बाबांचे भक्त शिर्डीला दररोज हजारोंनी येऊ लागले. आणि शिर्डीची, तिथल्या लोकांची भरभराट झाली. शिर्डीत हॉटेल, लॉज वाढले. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढला. खानावळी वाढल्या. साईमंदिराभोवती प्रसाद, पूजा अर्चेचं साहित्य यांची दुकानं वाढली. शिर्डीत जमीनीचे भाव वाढले. कच्च्या घरांची पक्की घरे झाली. एकूणच लोकांचं जीवनमान सुधारलं. गावात पैसा येऊ लागला. व्यवसाय धंदे वाढले.

१९५५ ला ‘शिर्डीचे साईबाबा’ हा बाबांच्या जीवनावर पहिला मराठी चित्रपट आला. दत्तोपंत आंग्रे या अभिनेत्यांनं बाबांची भूमिका केली. नंतर १९७७ला बाबांवर ‘शिर्डी के साईबाबा’ हा पहिला हिंदी सिनेमा आला. मराठी आणि हिंदी सिनेमामुळे साईबाबा देशभर पोचले. आणि मग साईंच्या भेटीसाठी भक्तांचा शिर्डीकडे ओघ वाढला. तो इतका वाढला गेला की आज घडीला दररोज २५ हजार भक्त शिर्डीत जात येत असतात. रविवार, गुरुवार, दत्तजयंती, दसरा, रामनवमी या दिवशी तर बाबांच्या भक्तांची संख्या लाखभरावर जाते.

भक्त वाढू लागले. साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा या गावात 450 कुटुंब राहायची आता शिर्डीची लोकसंख्या 50 हजाराहून जास्त आहे. या गावच्या ग्रामपंचातीच रुपांतर नगरपंचायतीत झालंय. शिर्डी मंदिराचा कारभार हाकण्यासाठी शिर्डी मंदिर आणि संस्थान ही प्रचंड मोठी संस्था उभी राहिली. भक्तांच्या देणग्यांनी ही संस्था देशातील दोन नंबरची श्रीमंत संस्था संस्था बनलीय. एक नंबर आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी देवस्थानचा आहे. बालाजी हा व्यापारी धनिकांचा देव, तर साईबाबा हा रंजल्या गांजल्या मध्यमवर्गीय आणि वंचित कष्टकऱ्यांचा देव आहे.

साईबाबा दत्तांचा अवतार आहे, असंही नाथपंथी लोक सांगतात. सुफी संप्रदायाचे लोकही साईबाबांना मानतात. रामभक्त आणि कृष्णभक्तही साईंना भजतात. आता एक सर्वधर्मीय संत म्हणून साईबाबा नावारुपास आले आहेत. साईबाबा हे सर्वांचे आहेत. शिवाय त्यांचा भक्तगण दिवसेंदिवस वाढतोय.

हेही वाचाः धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

भक्तांचा बोलवणारा देव

विसाव्या शतकातलां हा लोकांनी घडवलेला देव आहे. साईबाबांची महती सांगणार एक गाणं प्रसिद्ध आहे. ते असं,

शिर्डीस ज्याचे लागतील पाय
टळती अपाय सर्व त्याचे
माझ्या समाधीची पायरी चढेल
दु:ख हे हरेल सर्व त्याचे
जरी हे शरीर गेलो मी टाकून
तरी मी धावेन भक्तासाठी
माझा जो जाहला काया वाचा मनी
त्याचा मी ऋणी सर्वकाल

हे गाणं मोठं अप्रतिम आहे. देव (साईबाबा) भक्तांना विनंती करतो कि शिर्डीस या, माझे व्हा. माझ्या समाधीची पायरी चढा. तुमचं दु:ख दूर होईल. इतर देवांना भक्त साकडं घालतात. शिवाय त्या देवाच्या दारात दलाल असतात. त्यांना पहिल्यांदा खूश करून मग देवाकडे जावं लागत. शिर्डीचा साईबाबा मात्र देव भक्त नातं विसरून, स्वत: देवपण विसरून भक्तांना विनंती करतोय की माझे व्हा, मी तुमच्यासाठी धावेन. असा भक्तांचा धावा करणारा हा लोकदेव आहे.

अशा या अफलातून असलेल्या लोकदेवाचे देव पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला आणि काही शंकरचार्यांना खटकू लागलंय. वैदिक विचारधारा माननारे साईबाबांना मानत नाहीत. साईबाबा हा बोगस देव आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते शिर्डीस जाऊ नका, असं आवाहन लोकांना करताना दिसतात. हिंदू धर्माचे ठेकेदार असं साईबाबांना नाकरतात तर दुसरीकडे इस्लाम धर्माचे काही कट्टरपंथीही साईबाबांना मुस्लिमांनी मानू नये, शिर्डीस जाऊ नये असे सांगतात. एकूणच हा सर्वधर्मांचा देव कट्टर कडव्यांना खुपू लागलाय. पण भारतीय लोक खूप चतूर आहेत. त्यांनी त्यांना हवा असलेला देव निवडलाय आणि घडवलाय. त्याचा लौकिकही वाढवलाय. हे लोक कुणालाही न जुमानता गातात, चलो बुलावा आया हैं, साई ने बुलाया हैं.

हेही वाचाः धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)