संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज.
महाराष्ट्रातल्या संतपरंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण वार्षिकांकाने २०१२ मधे संत नामदेव विशेषांक प्रसिद्ध केला. या विशेषांकात पत्रकार आणि सध्या ओआरएफ संस्थेत रिसर्च फेलो असलेल्या निलेश बने यांनी पंजाबमधील घुमान इथे जाऊन रिपोर्ताज केलाय. त्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.
महाराष्ट्र से आया हूँ, बाबा नामदेवजी पर पढाई कर रहा हूँ. अशी ओळख करून दिली की घुमानमधल्या अनेकांच्या चेहर्यावरचे भाव बदलायचे. कोणीतरी ‘आपला’ दूरून भेटायला आल्यानंतर जसं वाटतं, तशी भावना त्यांच्या बोलण्या वागण्यातून जाणवायची. उरलेल्या पंजाबमधेही अनेक ठिकाणी असाच अनुभव आला. ही सारी संत नामदेवांची पुण्याई होती.
आपल्या आयुष्याची शेवटची २० वर्ष ते पंजाबमधे होते. गुरू नानकदेवांनी शीख धर्माची स्थापना करण्याआधी सुमारे २०० वर्ष पंजाबी समाजात समतेचं, मानवतेचं अंकुर फुलवलं. म्हणूनच पवित्र गुरुग्रंथसाहेबात नामदेवांची ६१ पदं आहेत. शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणार्या १५ भगतांमधे नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखलं जातं.
गुरू अर्जुनदेवांनी तर ‘नामे नारायणे नाही भेद’ असं सांगत नामदेव आणि परमेश्वरामधलं अंतरच संपवलं. आज साडेसहाशे वर्षानंतरही पंजाबी मनात असलेलं त्यांचं स्थान फार मोठं आहे.
पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातलं घुमान हे तसं गावही नाही आणि शहरही नाही. पंजाबात त्याला `कसबा` म्हणतात. मराठीत आपण बाजारपेठेचं गाव म्हणतो तसं. गावात दुकानं, दुकानांच्या वर किंवा मागे राहती घरं. ज्यांची दुकानं नाहीत त्यांची नुसतीच घरं आणि गावाभोवती लांबचलांब पसरलेली शेतं, असं हे गाव. गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात एक दाढीवाल्या बाबांचा फोटो, डोक्यावर केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ घेतलेला.
ते म्हणतात हा बाबा नामदेवांचा फोटो. पण आपल्याला हे नामदेव वेगळेच भासतात. चकाचक दाढी करून बा विठ्ठलापुढे वीणा वाजवत कीर्तन करणार्या नामदेवांचा फोटो आपल्याला परिचयाचा. त्यामुळे त्यांचा हा पंजाबी अवतार पूर्णपणे अनोळखी वाटतो. पण संपूर्ण पंजाबमधे नामदेव याच रुपात भेटत राहतात. अगदी घुमानमधे जिथे बाबा नामदेवांची समाधी असल्याचं पंजाबी लोक मानतात, त्या अंतिम स्थानावरही याच रुपात त्यांची सोन्याची प्रतिमा घडवण्यात आलीय.
हेही वाचा: मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच
भगत शिरोमणी नामदेव, बाबा नामदेव किंवा नुसतंच बाबाजी. अशा नावांनी पंजाबी माणूस संत नामदेवांना हाक मारतो. पण आपल्या मराठी जीभेला ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ याप्रमाणे फक्त नामदेव अशी फक्त नावानं हाक मारण्याची सवय. त्यामुळे `नामदेव यहां पे आये तब.`, `यहां नामदेव पंजाबी सिख गये` अशी हिंदी भाषांतरीत वाक्ये तोंडातून यायची.
मग बोलताबोलताच लक्षात यायचं की, फक्त नामदेव असा उल्लेख इथे उद्धटपणा ठरू शकतो. मग प्रत्येक वेळी बोलताना नामदेव शब्द आला की पुढे `जी` जोडायचा आणि `नामदेवजी` करायचे. पण भाषेची ही अडचण शरीराप्रमाणे मनानेही हट्टेकट्टे असणार्या नामदेवांच्या पंजाबी भक्तांनी समजून घेतली आणि नामदेवांचा हा पंजाबमधला शोध सोपा झाला.
जालंधरहून बियास, बियासवरून मेहता आणि तिथून हरगोविंदपूरकडे जाणार्या रस्त्यावर असलेलं घुमान. घुमान नाक्यावर सायकल रिक्षावाल्याला सांगितलं बाबा नामदेवजी के गुरुद्वारा जाना है. त्याने `भगत नामदेव जी यादगारी गेट` असं लिहिलेल्या भव्य कमानीतून आत नेत अगदी गुरुद्वाराच्या दारावर रिक्षा उभी केली. आत शिरलो तर समोरच गुरुद्वाराचं ऑफिस दिसलं.
‘बाबा नामदेवजी का गुरुद्वारा’ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर तसा बराच मोठा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याआधी डावीकडे एक तलाव आहे. सरळ आत शिरणार्या माणसाला तो पटकन दिसत नाही, मुद्दाम पाहावा लागतो. आत आल्यानंतर उजवीकडे आंघोळ करण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहं आहेत. दर्शनाला जाण्याआधी प्रत्येकाने स्वच्छ होऊन आत जावं अशी अपेक्षा आहे. इथे गुरुद्वारा आणि मंदिर असा अनोखा संगम आहे. त्यामुळे आत उघड्या डोक्याने जाऊ नका असं सांगितलं जातं.
डोक्यावर किमान रुमाल बांधा, अशी विनंती केली जाते. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला शुभ्र रंगातली इस्लामी पद्धतीची घुमटी दिसते. बादशाह तुघलकच्या चुलतभावानं हे मंदिर बाधलं असल्यानं त्याची रचना अशा पद्धतीची आहे, असं इथल्या विश्वस्तांचं म्हणणं आहे. पायर्या उतरून मंदिरात शिरलो की, षटकोनी चौथर्यावर योगीरुपातील बाबा नामदेवांची सुवर्णप्रतिमा दिसते. त्यापुढे एक शीला असून त्यावर कायम रेशमी वस्त्र पांघरलेलं असतं. त्याखाली पंजाबी म्हणजे गुरुमुखी लिपीत लिहिलंय. अंतिम समाधी.
हेही वाचा: आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव
नामदेवांनी या इथे अखेरचा श्वास घेतला आणि आपली इहलोकीची यात्रा संपवली, असं पंजाबी लोकांचं म्हणणं आहे. पण महाराष्ट्रात मात्र पंढरपूरातल्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवांची समाधी असल्याचा विश्वास आहे. आयुष्याची अखेरची सुमारे वीस वर्ष नामदेव पंजाबात होते. तिथून फक्त समाधी घेण्यासाठी ते पंढरपूरला आले यावर त्यांच्या पंजाबी भक्तांचा विश्वास नाही.
ते म्हणतात, इथेच घुमानमधेच त्यांचं महानिर्वाण झालं. पण महाराष्ट्रातील श्रद्धेनुसार आणि रा. चि. ढेरे यांच्यासारख्या संशोधकांच्याही मतानुसार, नामदेव पंजाबमधील आपलं कार्य संपवून अखेरीस महाराष्ट्रात आले आणि त्यांनी पंढरपूरात समाधी घेतली.
ज्या भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन नामदेव पंजाबमधे गेले, त्या भागवतधर्माचं केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरचं दर्शन व्हावं, आपल्या आईची सेवा व्हावी ही नामदेवांची आस होती, असं ढेरे यांचं म्हणणं आहे. त्यासाठी ते ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती’ या नामदेवांच्याच अभंगासह, परिसा भागवत, गोंदा-विठा ही नामदेवांची मुलं, आदींच्या वचनांची साक्ष देतात. त्यामुळे पंजाबला निरोप देऊन नामदेव अखेर पंढरीला आले आणि समाधिस्थ झाले, हे ढेरे निसंदेहपणे मांडतात.
हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
नामदेवांच्या पुण्यतिथीच्या तारखाही पंजाब आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या आहेत. पंजाबमधे माघ शुद्ध द्वितीया ही पुण्यतिथी मानली जाते. घुमानमधे दरवर्षी या दिवशी मोठा उत्सवही होतो. गावात जत्रा भरते, समाधी मंदिरावर रोषणाई केली जाते. पण महाराष्ट्रात मात्र आषाढ वद्य त्रयोदशी हीच नामदेवांची पुण्यतिथी म्हणून ओळखली जाते. पंजाबमधल्या पुण्यतिथीचं नक्की वर्ष कोणतं, यावरही मतमतांतरं आहेत.
पण ढेरे यांच्या मते, नामदेवांनी पंजाब सोडलं तो दिवस पंजाबमधे त्यांचा अखेरचा दिवस म्हणून ओळखला जातो, तर महाराष्ट्रात त्यांनी समाधी घेतला तो दिवस पुण्यतिथी म्हणून पाळली जाते. असं असलं, तरी पंजाबला निरोप देणं हे नामदेवांसाठी अवघड गेलं असणार. त्यामुळे त्यांनी सर्वांना न सांगता पंजाब सोडलं असेल, अशीही एक शक्यता वर्तवली जाते.
दुसरीकडे, नामदेवांच्या अस्थी किंवा फुलं पंजाबमधून महाराष्ट्रात नेऊन ती पंढरपूरच्या पायरीवर ठेऊन त्यांची समाधी उभारली असेल, असं पंजाबी भक्तांचं म्हणणं आहे. त्यामुळे नामदेवांची नक्की समाधी कोणती यावर पंजाब आणि महाराष्ट्रातल्या भक्तांमधे मतभेद आहेत, पण वाद नाही. आणि या मतभेदामुळे त्यांच्या श्रद्धेला किंचितही बाधा पोचत नाही.
या समाधीच्या मुद्दयावर नामदेव मंदिराच्या पूजेची जबाबदारी सांभाळणार्या भाई काश्मीर सिंग यांना विचारले. त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे खर्या अर्थानं, या मतभेदावर उमटवलेला समन्वयाचा पूर्णविराम आहे.
ते म्हणाले, ‘बेटा, बाबाजी की एक कहानी सुनाता हूं. एक कुत्ता एक दिन रोटी लेके भागा. तो बाबाजी उसके पिछे घी की बाटी लेके भागे. बोले, सुखा रोटी कैसे खाओगे? बाबाजी को दुनिया के हर जीव में, हर जगह में भगवान दिखता था. अब जिसे हर जगह भगवान दिखते है, वो यहां भी हो सकते है और पंढरपूर में भी.’
हेही वाचाः
ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला