महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या.
वारी. आळंदी, देहू किंवा अशाच गावांहून पंढरपूरच्या दिशेने जाणारी लाखो लोकांची ही निव्वळ पदयात्रा नाही. हा विठुनामात तल्लीन झालेला जनांच्या प्रवाहाचा निव्वळ भक्तीसोहळाही नाही. वारी ही उभ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे. आज आपल्या महाराष्ट्रात जे काही चांगलं आहे, त्याचं बहुतांश श्रेय या वारीलाच आहे. संतांच्या विचारांना गावागावापर्यंत आणि घराघरापर्यंत नेण्याचं आणि फक्त नेण्याचंच नाही तर विचारांचं शिपंण करण्याचं काम ही वारी गेली शेकडो वर्षं करतेय.
वारी बहुरंगी, बहुढंगी आहे. तेच तिचं वैशिष्ट्य आहे. वारकरी तसा एकजिनसी संप्रदायही नाही. तो हिंदुधर्मासारखाच मोकळाढाकळा आहे. इथे जाती, धर्म, भाषा, प्रांत याचं प्रचंड मोठं वैविध्य आहे. खरं तर मराठी संस्कृतीच्या मातीत राहणारा प्रत्येकजण वारकरी असतोच. त्यामुळे ज्येष्ठ कीर्तनकार जैतुनबी यांच्यासारखे चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत घडतात. होय जैतुनबींचं आयुष्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. आज त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर अनेक लेख लिहून येत आहेत. आज त्यांच्या कामाचं मोठेपण लोकांपर्यंत पोहोचतंय. पण ना सरकारनं ना महाराष्ट्रातल्या कोणा मोठ्या संस्थेनं जैतुनबींचा सत्कार कधी केला. जैतुनबींना ना कधी पद्मश्री मिळालं, ना महाराष्ट्ररत्न. ना कधी कुणी अशा पुरस्कारांसाठी त्यांचा विचार केला. पण असे पुरस्कार मिळवणाऱ्यांपेक्षा महाराष्ट्राच्या मातीची अधिक मशागत जैतुनबींनी केली होती.
बारामतीच्या माळेगावच्या मकबूल गवंड्याची ही मुलगी. त्याच्या सोबतचा गण्या गवंडी हा वारकरी बुवा. भिंत बांधतानही रामकृष्णहरीचा जयघोष करणारा. नेहमी विठ्ठलाच्या प्रेमात दंग राहणारा, नम्र, कुणाला न दुखावणारा, प्रेमळ. त्याची साधना एवढी मोठी की तोच गण्या हनुमानदास महाराज बनतो. लहानगी जैतुनही गण्याकाकाच्या भक्तीने भारावते. ती हनुमानदास महाराजांची शिष्याच बनते. विठ्ठलभक्तीत, संतविचारांत तल्लीन होते. शुद्ध वाणी, स्पष्ट विचार आणि गोड गळा कमावते. गावोगाव कीर्तन करते. सद्विचारांचं सिंचन महाराष्ट्रभर करते. देशाची सेवा म्हणजेच देवाची सेवा, असं म्हणत बेचाळीसच्या लढ्यातही उतरते. कधी भाई माधवराव बागलांच्यासोबत कधी क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत पोवाडे गात पत्रिसरकारचा बाणा गावोगाव पोहोचवते. गांधीजीही तिच्या पाठीवर शाबासकी देतात. ती वारीत यायची ती गांधीबाबाचा फोटो खांद्यावर लटकावूनच.
हेही वाचा: वारकरी संप्रदायाने गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच हा संप्रदाय सगळीकडे पोचला
जैतुन हरिनामात रंगली म्हणून मुसलमान तिला त्रास द्यायचे. पण तिचे पाच वेळचा नमाज आणि रोजे काही सुटले नाहीत. कीर्तन आणि नमाज, रोजे आणि एकादशी हे तिच्यासाठी अद्वैतच होतं. गावोगाव कीर्तन करताना ती वारकऱ्यांची लाडकी आक्का बनते. जैतुनची मग जैतुनबी बनते. पाचवी शिकलेल्या जैतुनबींची तत्त्वज्ञानावरची पकड इतकी जोरदार होती की रोजच्या जगण्यातली ‘अप्लाइड फिलॉसॉफी’ त्या खूप सुंदर समजावून सांगू शकत होत्या. म्हणूनच तर वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात एक दिंडी बनली.
न चुकता बासष्ट वर्षं वारी केली. पण त्या कुणी सेलिब्रेटी बनल्या नाहीत. आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठीही त्या धडपडत असत. शेवटपर्यंत एका संतांचं आयुष्य त्या जगल्या. वारी सुरू असताना देवासाठी चालत असताना मृत्यू येण्याचं खऱ्या वैष्णवाचं स्वप्न त्यांच्याबाबतीत पूर्ण झालं. त्यांना हवं होतं तसं मरण आलं, यातच त्यांचा अध्यात्मिक अधिकार दिसून येतो.
हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्ऩ
जैतुनबी वारकरी परंपरेच्या व्यापक, सर्वसमावेशक प्रतीक बनल्या होत्या. हे वारकरी संप्रदायाचं सर्वसमावेशक रुप ही त्याची ताकद आहे. इस्लाम धर्मालाही त्याने आपलं म्हटलं. आजही अनेक दिंड्यांमधे मुस्लिम वारकरी आपल्याला भेटू शकतात. त्यांचं प्रमाण वेगाने कमी होतंय, हेही खरंय. पण आजही धर्माने मुस्लिम असूनही पिढ्यानपिढ्या वारी करणारी अनेक कुटुंब महाराष्ट्रात आहेत. यामागे संतांच्या विचारांची पुण्याईच. त्यात अनेक मुस्लिम मराठी संतकवींचंही योगदान आहे. शेख महंमद श्रीगोंदेकरांना तर वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्यासारखं पहिल्या फळीतलं मानलंय. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या नावावर असलेल्या अभंगातही शेख महंमदांचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांनीही त्यांची आरती लिहिलीय.
शेख महंमदांचे गुरू चांद बोधले हे तर एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामींचे गुरू. ते संस्कारांनी हिंदू तर गुरुपरंपरेने सुफी होते. चातुर्मासात आवर्जून वाचला जाणाऱ्या सिद्धांतबोध हा शहा मुनी नावाच्या मुस्लिम संतकवीने लिहिलाय हे फार कमीजणांना ठाऊक असेल. तर बहमनी बादशाही सोडून संत झालेले शहा मुंतोजी ब्रह्मणी म्हणजेच कल्याणीचे मृत्युंजयस्वामी, गीतेवर सोप्या मराठीत अप्रतिम टीका लिहिणारे अंबर हुसेनी, वडवाळसिद्ध नागनाथांचे शिष्य अलमखान, दासपंचायतनातले केशवस्वामींचे शिष्य बाजीद पठाण, शहाबेग आणि शकरगंज, तसंच जंगली फकीर सय्यद हुसेन, मंगळवेढ्याचे लतीफ शाह असे अनेक मुस्लिम संतकवी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी मराठीत काव्यरचना केलीय. ती रचना हिंदू संतकवींच्याच तोडीची आहे.
हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरात येत होती
जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राची व्यापक परंपरा आपण देशपातळीवर घेऊन गेलो असतो तर महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचवण्याचं काम घडू शकलं असतं. महाराष्ट्राविषयीचे गैरसमज दूर झाले असते. पण महाराष्ट्रातले कुपमंडूक बुद्धिजीवी त्यात कमी पडले, प्रसारमाध्यमंही कमी पडली. पण शरद पवारांसारखे ‘जाणते’ नेतेही कमी पडले, हे अधिक दुःख देणारं आहे. त्याच्याच गावची एवढ्या वकुबाची कीर्तनाकर इतकी उपेक्षित राहते, हे आश्चर्यच. ऑलिम्पिकमधे पहिलं वैयक्तिक मेडल मिळवणारे कुस्तिगीर खाशाबा जाधव यशवंतराव चव्हाणांच्या जवळच्या गावातले असूनही दुर्लक्षित राहिले, तसंच हे होतं.
हे का घडतं, याचं वेगळं विश्लेषण व्हायला हवं. राजकीय नेत्यांनी वारकऱ्यांबरोबर चार पावलं चालून महाराष्ट्राची माती जाणून घेण्याची जास्त गरज आहे. पण राजकारण्यांना हे सांगणार कोण?
हेही वाचा:
वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?