माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद

२९ मार्च २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.

नाताळ. जगाला शांततेची शिकवण देणार्‍या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. करुणा आणि प्रेम या उदात्त मानवी मूल्यांचा येशू हा प्रणेता. पण गेल्या वर्षीचा नाताळ आला तो एका भयानक घटनेच्या पार्श्वभूमीवर. कोवाड या कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातल्या गावात प्रार्थनेसाठी जमलेल्या समूहावर सशस्त्र हल्ला झाला. हातात नंग्या तलवारी नाचवत २०-२५ तरुणांचं टोळकं एका निःशस्त्र समूहावर चाल करून गेलं.

धार्मिक एकोप्याला गालबोट

प्रार्थना बंद पाडली. लाठ्याकठ्या, तलवारी, बाटल्यांनी शांततेत प्रार्थना करणार्‍यांना बेदम मारहाण झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. ही केवळ एकच घटना नाही. अशा अनेक घटना देशभरात घडताहेत. धर्मांध आणि जात्यांध शक्तींचा नंगानाच सुरू आहे. जात धर्माच्या अस्मिता टोकदार बनताहेत. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज इथे गेल्या आठवड्यात पहिली सर्व जात धर्मीयांची सलोखा परिषद पार पडली.

हजारो वर्षे इथल्या अनेक धर्म जातीच्या लोकांना जोडणार्‍या समृद्ध भारतीय परंपरेकडे पाहिलं की याचं उत्तर निश्चितच नकारात्मक येतं. भारतीय परंपरा इतकी निश्चितच कमकुवत नाही. धर्म जातीपलीकडे जाणारी तिची मूळं खूप खोल आणि मजबूत आहेत. प्रेम हा त्याचा पाया आहे. याच सलोख्याच्या मजबूत धाग्यांनी भारतीय समाज बांधला गेलाय. म्हणूनच तो आजही टिकून आहे.

वाढती धार्मिक असहिष्णुता आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड इथे येशू उपासकांवर झालेला हिंसक हल्ला, या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरात पहिली सलोखा परिषद झाली. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातली संवेदनशील मंडळी आणि पुण्याच्या सलोखा ग्रुपने ही परिषद घेतली.

सलोख्याच्या मजबुतीसाठी सर्वधर्मीयांची एकजूट

इथल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्याला सलाम करण्यासाठी आणि परंपरेने विकसित झालेला सलोखा मजबूत करण्यासाठी ही सलोखा परिषद घेण्यात आली. ही परिषद केवळ एकाच धर्मातल्या लोकांनी एकत्र येवून न घेता सर्वधर्मियांनी एकत्र येवून घ्यावी यावर भर दिला गेला. सर्वच धर्मातली मानवतावादी मूल्यं आणि इतर धर्माविषयी आदरभाव व्यक्त करणारी तत्वं समाजापुढे ठेवणं हे आज महत्वाचं आहे. आणि याबरोबरच इतर धर्माबद्दल असलेला आकस आणि गैरसमज दूर होणंही महत्वाचं आहे. म्हणून या परिषदेत सर्वधर्मीय धर्मगुरूंना निमंत्रित केलं गेलं.

गेल्या वीस पंचवीस वर्षात भारतात धार्मिक आणि जातीय अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. विशेषतः दलित, मुस्लिम, ख्रिचन अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जातंय. हा समूह आज भीतीच्या अदृश्य छायेखाली जगत आहे. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनांनी अनेक कुटुंबं, समूहं उद्ध्वस्त झालेत. अशा सार्‍या समूहांना, कुटुंबांना भेटणं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देणं ही काळाची गरज आहे.

महात्मा बसवेश्वरांची शिकवण

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अशा अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबांना भेटणारी एक प्रेमाची वारी भारतात निघाली. पीडितांना विश्वास आणि प्रेम देणारा हा ‘मोहब्बत का कारवां’ भारतभर हिंडला. त्याच्या वृतांत सादरीकरणाने या सलोखा परिषदेची सुरवात झाली. हृदय पिळवटून टाकणारा आणि सुन्न करणारा हा सारा प्रवास कृतार्थ शेगावकर, प्रमोद मुजूमदार, राही मुजुमदार आणि रणजीत मोहिते यांनी मांडला.

जगातल्या पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना करणार्‍या बसवण्णाची समता आणि मानवतावाद सांगताना भालकी मठाचे अवघ्या २० वर्षाच्या बसवलिंग स्वामी यांनी बाराव्या शतकातल्या कळ्याक्रांतीचा इतिहास उलगडून सांगितला. सर्वच शूद्र जातींसह महिलांचाही सन्मान केला. आपल्या अनुभव मंटपात महिलांना प्रतिनिधित्व दिलं. आंतरजातीय विवाह घडवून जाती व्यवस्था मोडण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचललं. माणूस हाच सर्वश्रेष्ठ मानून आपलं आचरण करावं ही महान शिकवण लिंगायत धर्माने दिल्याचं त्यांनी सांगितलं.

पंढरपूरहून आलेले ज्ञानेश्वर महाराज बंडगर या तरुण महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या सहिष्णू तत्वज्ञानाची थोरवी सांगताना आजच्या अस्मितेच्या राजकरणावर कडाडून टीका केली. भाषा, संस्कृती, जात, धर्म या अस्मिता टोकदार बनत असताना समाज जोडण्याची शक्ती वारकरी परंपरेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

वारकरी जडणघडणीतला फादर

फादर ज्यो मन्तेरो यांनी आपली जडणघडण इथल्या वारकरी आणि विशेषतः तुकोबाच्या अभंगांनी झाल्याचं नमूद केलं. परस्परांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून हा समाज बांधला गेला असल्याचं ते म्हणाले. आजही माझ्या मूळ गावी, जे पूर्ण गाव वारकरी आहे, तिथे लोक वारीला जात तेव्हा त्यांच्या घरादराची रखवाली गावात एकमेव असणारं ख्रिश्चन कुटुंब करतं. इतकी आमच्या नात्यांची वीण घट्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

प्रभू येशू असो किंवा संत ज्ञानेश्वर ते विश्वाची आणि अखंड मानव जातीच्या कल्याणाची चिंता वाहतात. आपला आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवास हा वारकरी परंपरेच्या सहिष्णू तत्वज्ञानातून घडला असल्याचं त्यांनी नम्रपणे नमूद केलं.

‘अडीच अक्षरांची गोष्ट’ लिहणाऱ्या डॉ. प्रदीप आवटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रेम कथा सांगितल्या. धर्म, जात, प्रदेश, भाषा, संस्कृती याच्या पलीकडे जात ज्यांनी माणूस म्हणून स्वतःचे जीवनसाथी निवडले अशा जगभरात गाजलेल्या प्रेमकथा सादर केल्या. गडहिंग्लज परिसरातले शिक्षण तपस्वी प्राचार्य जे. बी. बार्देस्कर यांनी समारोप केला.

सुभाष कोरे यांनी आभार मानले. या सलोखा परिषदेला गडहिंग्लज, आजरा, चंदगड, संकेश्वर आणि पुण्याहून सलोखा ग्रुपचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने आले होते. लिंगायत, जैन, वारकरी, बौद्ध, मुस्लिम, हिंदू अशा सर्व धर्मातल्या लोकांमुळे परिषद खर्‍या अर्थाने सलोखा सांधणारी झाली. वाढत्या जातीय आणि धार्मिक तणावाच्या पार्श्भूमीवर ही परिषद सलोख्याचा संदेश देण्यात यशस्वी ठरली.

(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)