भारताचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या डोक्यावरचं कुंकू आणि आता महात्मा गांधी अशा विषयावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभीजी भिडेंना आपण काय बोलतो, याचं भान नाही असं असूच शकत नाही. आपल्या विधानांमुळे उद्या काय होणार, याची त्यांना पूर्ण कल्पना असूनही ते असं बिनधास्तपणे का बोलताहेत? या अनुषंगाने आज विविध माध्यमात बरीच चर्चा झाली. या चर्चेतील काही कोन समजून घ्यायला हवेत.
'कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो’, असं एका महिला पत्रकाराला बोलून उठवून दिलेली राळ असो किंवा '१५ ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिन नाही’, असं म्हणून पेटवलेला वाद असो… आणि आता 'करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत.’ हे गांधीबद्दल केेलेलं अपमानास्पद विधान असो… संभाजी भिडे हे सगळं बिनदिक्कतपणे बोलताहेत.
त्यांच्या या विधानानंतर राजकारण, समाजकारण सगळीकडे नुसता प्रतिक्रियांची आग लागते. जो तो आपापल्या परीनं संभाजी भिडेंच्या विरोधात आणि काहीतर त्यांच्या बाजूनंही तावातावानं बोलताना दिसतात. यावेळी गांधींच्या विधानावरून तर विधानसभेतही राडा झालाय. अटकेची मागणी होतेय. गुन्हा दाखल झालाय. पण तरीही अद्याप सत्ताधारी आघाडीकडून याची चौकशी करू, कारवाई होईल अशी आश्वासनच सुरू आहेत.
ही सगळी वादग्रस्त विधानं आज जाहीरपणे होत असली, तरी कुजबुज आघाडीमधे ही विधानं काही नवी नाहीत. आजवर गांधीजींच्या बदनामीचा सर्वतोपरी प्रयत्न झालाय. पण आता तो भर सभेमधून होऊ लागलाय. यामागे निश्चितपणे नियोजन आहे. हे सगळं काही आपोपाप, स्वाभाविकपणे होत नाही. संभाजी भिडे यांच्या प्रत्येक विधानानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्यात, त्यावरून समाजाचं ध्रुवीकरण करायचंय एवढं तर निश्चितपणे स्पष्ट दिसतंय.
समाजात जेवढी फोडाफोडी करता येईल तेवढी ती करायची, प्रसंगी दंगली पेटल्या तरी चालतील पण लोकांमधे दुही माजली पाहिजे, याची पुरती काळजी घेतली जातेय. गांधींबद्दल संभाजी भिडे यांनी केलेलं विधान हे किती अपमानास्पद आणि गलिच्छ आहे हे तपासायला काय कायदेशीर चौकशी करण्याची गरज आहे का?
तरीही सत्ताधारी आघाडीतील एकाही नेत्याकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध झालेला नाही. गुळमुळीत विधानं करून, चौकशी करू, कारवाई होईल अशा भाषेत सारवासारव केली जाते आहे. हे सगळं पाठीशी घालणं नाही, असं सत्ताधाऱ्यांना वाटत असलं तरीही लोकांना ते कळत नाही, असं नाही. कोल्हापूरातील दंगल असो किंवा मणिपूरमधे चाललेला हिंसाचार असो सर्वत्र दुहीचं राजकारण पेटवायचं, हेच या सगळ्यामागचं मुख्य कारण वाटतं.
भिडेंच्या या विधानाबद्दल गांधीजींची पणतू तुषार गांधी यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. ते म्हणतात की, संभाजी भिडे जे बोलले, ते घृणास्पद होतंच, पण त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचं समर्थन करणं अधिक घृणास्पद होतं. हे ऐकणाऱ्या एकाही महिलेला त्यात स्वत:चा अपमान वाटला नाही? आपली मानसिकता किती विकृती झालीय, याचं हे उदाहरण आहे.
आपल्याला त्याची चिंता असायला हवी की, आपला समाज इतका विकृत कसा झाला? विचारांची लढाई विचारांनी न करता, त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता?महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती. पण तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की, एका आईचा इतका मोठा अपमान केला जात असताना, महाराष्ट्रात महिला आवाज का उठवत नाहीत? ही सगळी स्वतःचीच चिंता करावी अशी गोष्ट आहे.
गांधींची हत्या झाली पण त्यांचे विचार प्रखर झाले, तेव्हापासून आरएसएसच्या इशाऱ्यावर गांधीद्वेषाची एक मोहीम चालवली जात आहे. यात वेळोवेळी अशी माणसं समोर येतात. संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या असून त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते सादर करताहेत. या स्क्रिप्ट्सवर ते लोक आपली भूमिका फक्त निभावून जातात. हे विकृत आणि अश्लील विचारधारेचं उत्पादन आहे, असं तुषार गांधी यांनी लोकशाही वाहिनीवर सांगितलं.
संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर, त्यांच्या विरोधी गटातून भिडे कसे मुस्लिम घरात जन्मले आहेत असं विडंबन करणारे मीम्स सोशल मीडियावर शेअर केले. भिडे यांच्या विधानाबद्दल आणि त्यांच्या विरोधात आलेल्या मीम्सबद्दलही गाजीउद्दिन रिसर्च सेंटरचे सचिव सर्फराज अहमद यांची फेसबूक पोस्ट विचार करायला लावणारी आहे.
ते म्हणतात की, एकूण काय तर दोन्ही बाजूला मुसलमान असणं वाईट आहे. चुकीची किंवा समाजविघातक माणसं मुसलमानांच्या पोटीच जन्मतात असा समज विकसित करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने जोरदार सुरू आहे. मागे जितेंद्र आव्हाड यांना कुणीतरी टोपी घातली आणि त्यांचा जितुद्दीन असा उल्लेख केला त्यानंतर शरद पवारांच्या बाबतीतही शरदुद्दीन असा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी हे दोन्ही नेते आणि त्यांची भक्तमंडळी त्यांचा असा उल्लेख म्हणजे अपमान समजत होती.
त्यांची ही समज कोणत्या मूल्यांवर आधारित आहे अथवा कोणत्या जाणीवांवर पोसलेली आहे, हे निराळे सांगायची गरज नाही. त्यांनाही वाटत असणार की मुसलमानांमध्ये चांगली माणसं जन्मतच नाहीत किंवा मुसलमान असणं वाईट आहे. आपण बहुसंख्यांक आहोत त्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत ही वर्चस्वाची भावना भल्या भल्या मानवतावाद्यांनाही सोडता आलेली नाही.
मुसलमान असणं हे वाईट आहे असं जोपर्यंत तुम्ही समजत राहाल, तोपर्यंत आम्ही आमचं मुसलमान असणं जाणीवपूर्वक अधोरेखित करत राहू. ज्या दिवशी तुमची समज गळून पडेल त्यादिवशी आम्ही देखील मानवी समाजाचा भाग म्हणून आणि माणूस म्हणून जगायला सज्ज होऊ, असं सांगत सर्फराज आपलं मत संपवतात. पण यावरून भिडे यांनी मुस्लिमांमधेही आपल्या विधानानं कशी काडी घातलीय त्याचा अंदाज येऊ शकतो.
फेसबुकवर लोकप्रिय असलेले आणखी एक मुस्लीम सुधारणावादी कार्यकर्ते म्हणजे पैगंबर शेख. आपल्या विविध उपक्रमांनी सर्वधर्मसमभाव जगणरे पैगंबर शेख आपल्या पोस्टमधे म्हणतात की, ''मुसलमान असण्यात काहीही वाईट नाही. महात्मा गांधी मुस्लिम नसले, तरीही ते जर खरेच मुस्लिम असते तर आम्हाला त्यांचा अभिमानच वाटला असता.
मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तिने कुठल्याही धर्मात जन्म घेतला तरीही त्या व्यक्तीचा कमी आणि त्या धर्माचा जास्त सन्मान होत असतो. केंद्र सरकारने जाहीर करावे की महात्मा गांधी मुस्लीम होते. जगभरात संदेश पोहोचू द्या की, जगाला आंदोलन आणि सत्याग्रह देणारी व्यक्ती मुसलमान होती म्हणून.
आम्ही महात्मा गांधींचे त्यांच्या मृत्यू नंतर देखील स्वागत करतो. त्यांचे मनापासून इस्लामचा सन्मान वाढवल्या बद्दल आभार मानतो. बरं, पण काही लोक कुठल्याही धर्मात जन्मले तरीही त्यांच्या आत कायम मानव जातीला नुकसान करणारे 'किडे' असतात. उदाहरणार्थ ओसामा बिन लादेन पाहा. कसा धर्माला 'कलंक' आहे तो.’’ असं लिहून झाल्यावर समजलंतरठीक असा हॅशटॅग टाकून ते आपली पोस्ट संपवतात.
गांधींनी कसं मुस्लिमांना झुकतं माप दिलं, अशी चुकीची माहिती पसरवणं किंवा गांधींजींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगावरून त्यांची टिंगलटवाळी करणं हे काही नवं नाही. हे सगळं कोणते गट करतात, हेही सगळ्यांना नीटपणे माहीत आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह, गुन्हेगारी स्वरूपाचं असलं तरी कुजबुज आघाडीवाल्यांसाठी नवं नाही.
गांधीजींच्या विचाराला विरोध म्हणून, गांधीच्या बदनामीची सुरुवात त्यांच्या हयातीतच झाली होती. एवढंच नव्हे, तर त्यांना जीवे मारण्याचेही अनेक प्रयत्न फाळणीचा उल्लेखही झाला नव्हता तेव्हापासून सुरू आहेत. या सगळ्याबद्दल आजवर अनेकदा जाहीरपणे युक्तिवाद झालेत. तरीही गांधींना बदनाम करण्याची ही खोडी जात नाही. कारण जिवे मारल्यानंतरही त्यांना गांधी आडवा येतोय.
पंतप्रधान जगभरात कुठेही गेले तरी त्यांना गांधीजींच्या पुतळ्याला नमस्कार करावा लागतो. जगभरात भारताची ओळख ही गांधींचा देश अशीच आहे. जगभरातील सर्व भाषणात गांधीजींचा उल्लेख केल्याशिवाय भारताची ओळखच पूर्ण होत नाही. एवढंच काय, तर भिडे डोक्यावर जी टोपी घालतात तिलाही गांधीटोपी म्हणतात. त्यामुळे या असल्या फुटकळ विधानांनी गांधी संपत नाही. फक्त काळ सोकावतो, हे विसरून चालणार नाही.