साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
फिनलँड. जवळपास ५३ लाख इतकी लोकसंख्या असलेला युरोपच्या उत्तरेकडचा एक छोटासा देश. युनायटेड नेशन्सच्या 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट'नुसार जगातल्या सगळ्यात आनंदी देशांमधे याचा नंबर लागतो. गेल्यावर्षी या देशाचं नेतृत्व वयाने लहान असलेल्या साना मारिन यांच्याकडे आलं. ३४ व्या वर्षी फिनलँड देशाची धुरा सांभाळणाऱ्या त्या जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान आहेत. इतिहासातली ही एकमेव घटना आहे.
या देशाचं नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला नाहीत. फिनलँड महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश आहे. अमेरिकेतल्या महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळवायला १९२० पर्यंत संघर्ष करावा लागला होता. तिथे फिनलँड मधल्या महिला १९०६ पासूनच मतदान करतायत. त्यामुळेच फिनलँडच्या राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग राहिलाय. २००० मधे फिनलँडला टारया हलोनेन या आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या. त्यानंतर २००३ ला अनेली यतेनमकी यांची पंतप्रधानपदी निवड झाली. आणि २०१९ मधे साना मारीन यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची पटकवली.
साना यांचं कॅबिनेट महिलांनी खच्चून भरलंय. त्यांच्या कॅबिनेटमधे १८ सदस्यांपैकी १२ सदस्य महिला आहेत. या डिसेंबर महिन्यातच त्यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. त्यांचा राजकीय प्रवास कमी वयात बराच मोठा पल्ला गाठणारा वाटतो. असं असलं तरी त्यांचं आयुष्य मात्र तितकं साधं सोपं नाहीय. वरवर ते तसं वाटेलही पण ते तितकंच खाचखळग्यांनी भरलेलं आहे. त्यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे.
हेही वाचा: लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट
साना मारिन यांचा जन्म फिनलँडच्या राजधानीत हेलसिंकी इथं १६ नोव्हेंबर १९८५ला झाला. लहान असताना त्यांचे आईवडील वेगळे झाले. वेगळं झाल्यानंतर त्यांच्या आईनं आपला वेगळा जोडीदार निवडला. तोही समलैंगिक. साना यांनीही आपल्या आईच्या पार्टनरचा स्वीकार केलाय. पालक म्हणून अनेक अर्थिक संकटांना तोंड देत या दोघींनी साना यांचा सांभाळ केला. दोन आयांच्या प्रेमात साना वाढल्या. त्यांच्या सगळ्या निर्णयांमधे पालक म्हणून या दोघींनीही साथ दिली.
मारिन यांनी २००४ ला वयाच्या १९ व्या वर्षी पिरकला हायस्कुलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण घेत असताना त्यांना एका बेकरीत कॅशियर म्हणून काम करावं लागलं. टॅम्पेयर युनिवर्सिटीमधून त्यांनी 'प्रशासकीय विज्ञान' या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इतकं शिक्षण घेणाऱ्या त्या कुटुंबातल्या पहिल्याच व्यक्ती आहेत.
वयाच्या २१ व्या वर्षी साना मारिन यांनी सोशल डेमोक्रॅटिक युथ या देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं सदस्यत्व घेत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली. वयाच्या २३ व्या वर्षी त्या पहिली निवडणूक लढल्या. त्यात त्यांचा पराभव झाला. पण नंतर २०१२ मधे झालेल्या टॅम्पेयर नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र त्या निवडून आल्या. नगर परिषदेच्या अध्यक्ष बनल्या. २०१५ मधे पहिल्यांदाच पिरकनामा या मतदारसंघातुन फिनलँडच्या संसदेत पोचल्या. ६ जून २०१९ ते १० डिसेंबर २०१९ मधे फिनलँडच्या परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.
तेव्हा फिनलँडचे पंतप्रधान होते मार्टिन अँटी रन्ने. सोशल डेमॉक्रॅटिक युथ या पक्षाचेही ते अध्यक्ष होते. ३ डिसेंबर २०१९ ला मार्टिन अँटी रन्ने यांनी फिनलँडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाकडून दोन उमेदवारांना संधी देण्यात आली. साना मारिन आणि अँटी लिंडमन. साना मारिन यांनी लिंडमन यांचा पराभव केला. त्यामुळे फिनलँडचीही सूत्र आपसूक साना यांच्या हाती आली. २३ ऑगस्ट २०२० ला या पक्षाची सूत्रही साना यांच्याकडे आली.
हेही वाचा: जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा
गेल्या एक वर्षापासून फिनलँडमधे पाच पक्षांचं आघाडी सरकार साना चालवतायत. आघाडी सरकार चालवणं सोपं नाही. सगळ्या पक्षांचे मान अपमान पचवत त्यातून एक मध्य गाठायचा प्रयत्न करायचा असतो. नेतृत्वाचा कस लावणारी ही भूमिका साना व्यवस्थित पार पाडतायत. आपण महिला म्हणून तितक्या सक्षम असल्याचं त्या दाखवून देतायत.
कोरोना काळात जगाची अर्थव्यवस्था गडगडत असताना अनेकांनी योग्य वेळी आश्वासक निर्णय घेत आपल्या देशाला सावरलं. साना यांचं नाव अशा पंतप्रधानांच्या यादीत येतं. त्यांनी कोरोना काळात शांतपणे घेतलेले निर्णय त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाची चुणूक दाखवणारे आहेत. कोरोनाचा अंदाज यायला लागताच त्यांनी त्या संबंधीच्या उपाययोजना करायला सुरवात केली होती. त्यामुळे बीबीसीच्या जगभरातल्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचं नाव आहे.
साना यांचा समानतेवर भर आहे. व्यक्तीला आठवड्यातून फक्त २४ तास काम करण्याची परवानगी असायला हवी असं त्या आवर्जून सांगतात. उर्वरित वेळ कुटूंबासाठी किंवा स्वतःसाठी द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. तसा प्रस्ताव त्यांनी ऑगस्टमधे मांडला होता. पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. एकीकडे आपण पंतप्रधान म्हणून अठरा अठरा तास काम करतो असा दावा करणाऱ्यांमधे साना मारिन म्हणून वेगळ्या ठरतात. तो वेगळेपणा फिनलँडच्या लोकांनी सहज स्वीकारलाय.
आपल्याकडे समलैंगिकता या विषयावर बोलणं मुद्दामहून टाळलं जातं. आता आता कुठं आपल्याकडे समलैंगिक संबंधाला कायदेशीर मान्यता मिळालीय. वेगळी लैंगिक ओळख असलेलेही समाजाचा एक भागच आहेत याकडे समाज म्हणून आपलं दुर्लक्ष झालंय. त्यांची कायम हेटाळणी करण्यात आली. मुख्य प्रवाहापासून त्यांना लांब ठेवण्यात आलं. साना मारिन यांचे पालक समलैंगिक आहेत. त्यांच्या आईनं एका महिलेशी लग्न केलंय. साना यांनी त्यांच्या पालकांचं समलैंगिक असणं सहज स्वीकारलंय.
ऑस्ट्रेलियाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणून लिवो वराडकर यांचं नाव आपण ऐकलं असेल. पण थेट एका देशाच्या प्रमुखाचे पालक समलैंगिक असणं हे जगातलं वेगळं आणि एकमेव उदाहरण असावं. आईवडलांच्या भूमिकेत असलेले पालक समलैंगिक असतील तर त्यांच्या मुलांना नेमकं कसं वाढवलं जाईल? त्यांच्यावर तथाकथित संस्कार कसे होतील वैगरे असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे मुलांनाही टीकेचं लक्ष केलं जातं. एका देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेत अशा तथाकथित संस्कारी समाजाला साना यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
आपल्या इथपर्यंतच्या प्रवासचं श्रेय साना आपल्या पालकांना देतात. त्यांच्या माणूस असण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. वय किंवा महिला म्हणून एका जेंडरचं असणं ही आपल्यासाठी तितकी महत्त्वाची गोष्ट नसल्याचं साना म्हणतात. निवडणुकीच्या राजकारणात लोकांनी माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला असल्याचं त्या अभिमानाने सांगतात.
हेही वाचा: चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
साना यांना २०१८ मधे एक मुलगी झाली. मार्क्स रिकेनन यांच्यासोबत त्या १६ वर्षांपासून लिव इन रिलेशनशिपमधे होत्या. रिकेनन फुटबॉल खेळाडू होते. ऑगस्ट २०२० मधे साना आणि रिकेनन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या केसरॉटा इथं लग्न केलं. साना यांना समलिंगी पालकांनी वाढवल्यामुळे त्या स्वतःला 'सप्तरंगी कुटुंबाचा' भाग म्हणवून घेतात. त्यात त्यांना कुठंच कमीपणा वाटत नाही.
त्यांनी एक व्यक्ती म्हणून अनेक गोष्टींना फाटा दिलाय. प्रवाहाच्या विरुद्ध जात अनेक निर्णय घेतले. इतरांनी ते सहज स्वीकारणं शक्य नव्हतं. ऑक्टोबर २०२० ला त्यांनी ट्रेण्डी या मासिकासाठी एक फोटो शूट केलं होतं. त्यात त्यांनी ब्लेजर घातल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.
आपल्या मुलीला अंगावरचं दूध पाजण्याचा फोटो त्या अगदी सहजतेनं सोशल मीडियावर शेअर करतात. राजकारणासाठी म्हणून त्यांनी स्वत:च्या आयुष्यात काही बदल केला नाही. त्या जशा होत्या तशाच त्यांचं आयुष्यही जगतायत. म्हणून त्या आजच्या जनरेशनच्या नेत्या वाटतात.
२१ ऑगस्ट २०१९ ला साना फिनलँडच्या पंतप्रधान झाल्या. त्याआधी फिनलँडमधल्या सेंटर पार्टीचे नेते इस्को अहवो १९९१ मधे देशाचे पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांचं वय ३६ वर्ष होतं. त्यांच्यापेक्षा साना दोन वर्षांनी लहान आहेत. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात न्यूझीलंडच्या जेसिंडा अर्डेन यांची कामगिरी बरीच गाजली होती. मीडियालाही त्यांची दखल घ्यावी लागली. त्या जेसिंडा ३९ व्या वर्षी न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या. त्यांची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी केली जाते.
ओलेस्की हॉचारूक हे वयाच्या ३५ व्या वर्षी पूर्व युरोपातल्या युक्रेन देशाचे पंतप्रधान झाले. जगभर दहशत असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यानंही ३६ वर्षांचा असताना उत्तर कोरियाची सूत्र हाती घेतली. कतारच्या तामिम बिन हमाद अल थानी, भूतानच्या जिग्मे वांगचुक यांनीही आपल्या चाळीशीच्या आतमधेच देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय. त्यामुळे जगातले सगळ्यात कमी वयाचे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख होते. पण या सगळ्यांमधे साना मारिन यांचा प्रवास मात्र वेगळा ठरतो आणि तितकाच महत्त्वाचाही.
हेही वाचा:
अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय