मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या ३५ वर्षीय सानियाने ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमधल्या महिलांच्या दुहेरीत तीनदा, तर मिश्र दुहेरीत तीनदा अजिंक्यपद पटकावलंय. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत १३ एप्रिल २०१५ला तिनं अव्वल स्थानावर झेप घेतली होती. ९१ आठवडे तिनं हे स्थान राखलं होतं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकं, फ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, महिलांच्या जागतिक मालिकेतल्या दुहेरीच्या अंतिम स्पर्धेत दोनवेळा विजेतेपद अशी तिची भरीव कामगिरी झालीय. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरचे राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मश्री असे अनेक सन्मान तिने मिळवलेत.
एवढी दैदीप्यमान कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या शोएब मलिकबरोबर तिने थाटलेला संसार, तिची वादग्रस्त वेशभूषा, अखिल भारतीय टेनिस संघटनेवर तिने केलेली टीका अशा अनेक कारणांमुळे ती सतत वादाच्या भोवर्यात सापडलीय.
सानियाचे वडील इम्रान मिर्झा हे स्वतः टेनिसपटू आणि पत्रकार आहेत. ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या सामन्यांमधली रंगत पाहून त्यांनी सानियाला टेनिसमधेच करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सहाव्या वर्षीच सानियाने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं.
आशियाई, राष्ट्रकुल आणि फ्रो-आशियाई या तीन क्रीडा स्पर्धांमधे तिने सहा सुवर्ण पदकांसह १४ पदकांची कमाई केलीय. महिलांच्या टेनिस संघटनेकडून आयोजित केल्या जाणार्या वेगवेगळ्या स्पर्धांमधे दुहेरीत चाळीसहून जास्तवेळा तिने विजेतेपद मिळवलंय. या स्पर्धांमधे तिने मार्टिना हिंगीसबरोबर दुहेरीचे सलग ४४ सामने जिंकण्याचा आगळा वेगळा पराक्रमही केलाय.
हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
लिएंडर पेसने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत मिळवलेलं कांस्यपदक सोडलं तर भारतीय टेनिसपटूंना ग्रँड स्लॅम आणि ऑलिंपिक स्पर्धेतल्या एकेरीत विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. सानियाबद्दल हेच पाहायला मिळालंय.
खरं तर जमिनीलगत आणि क्रॉस कोर्ट परतीचे फटके, प्रतिस्पर्धी खेळाडूच्या सर्विस आणि परतीच्या फटाक्यांना बिनतोड परतीचे फटके मारण्याची तिची क्षमता आणि शैली या खेळात तिची तुलना श्रेष्ठ टेनिसपटू इली नास्तासे यांच्यासह अनेक मातब्बर खेळाडूंशी केली जाते.
तिने कारकिर्दीत व्हिक्टोरिया अझारेन्का, वेरा झ्वोनारेवा, मरियन बार्टोली, मार्टिना हिंगीस, दिनारा सफिना, स्वेटलाना कुझ्नेत्सोवा अशा अव्वल दर्जाच्या खेळाडूंवर तिने एकेरीत विजय मिळवलाय. पण ग्रँड स्लॅमच्या एकेरीत किंवा ऑलिंपिक स्पर्धेत अपेक्षेइतकी श्रेष्ठ कामगिरी तिला करता आलेली नाही.
शहार पीर या इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध सामना खेळायला तिने नकार दिल्याची बातमी २००६मधे आली होती. बीजिंग येथे २००८मधे झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात तिने भारतीय पथकासाठी जी वेशभूषा ठरवली होती ती न करता वेगळाच पोशाख घातला. त्यामुळे तिच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती.
सततच्या टीकेमुळे भारतात एकाही स्पर्धेमधे भाग घ्यायचा नाही असं तिने २००८मधे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांनंतर जाहीर केलं होतं. बरेच महिने ती या निर्णयाशी ठाम राहिली होती. पण २०१०ला नवी दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती सहभागी झाली. पाकिस्तान हा भारताचा राजकीय शत्रू मानला जातो. तरीही तिनं शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटपटूबरोबर प्रेमविवाह केला. त्यावेळीही ती टीकेच्या लक्ष्यस्थानी होती.
टेनिस खेळताना ती मिनी स्कर्ट आणि बिनबाह्यांचा जर्सी घालत असते. त्यावरूनही काही धार्मिक नेत्यांनी तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर टीका केली होती. पण अशा अनेक टीकांना तिने बिनतोड सर्विस किंवा परतीचे खणखणीत फटके मारावेत अशाच पद्धतीने सडेतोड उत्तर दिलंय.
हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?
व्यावसायिक टेनिस स्पर्धांमधे खेळाडूंना लागोपाठ अनेक स्पर्धांमधे खेळावं लागतं. सानियासारख्या खेळाडूला एकेरी आणि दुहेरी या दोन्ही सामन्यांमधे सतत भाग घ्यावा लागायचा. अशावेळी टेनिसपटूंना गुडघे, मनगट, खांदे, पायाचे घोटे, पाठीतले स्नायू अशा अनेक स्वरूपाच्या दुखापतींना सामोरं जावं लागतं.
सानियाही त्याला अपवाद नाही. मुलगा झाल्यावर टेनिसमधे तिनं पुनरागमन केलं खरं, पण म्हणावं तसं यशस्वी पुनरागमन तिला करता आलेलं नाही. किम क्लायस्टर्ससारख्या मोजक्याच खेळाडूंना मूल झाल्यानंतरही ग्रँड स्लॅमचं विजेतेपद मिळवता आलंय. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजेतेपद मिळवायचं स्वप्न सानियाने पाहिलं.
पण कोरोनामुळे सरावावर असलेल्या मर्यादा आणि लहान मुलाचं संगोपन यामुळे यशस्वी पुनरागमनाचं स्वप्न साकारता येणार नाही हे सानियाच्या लक्षात आलं. म्हणूनच तिने स्पर्धात्मक टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतला. व्यावसायिक स्पर्धांमधली चढाओढ, युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ, पस्तिशी ओलांडल्यानंतर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी असलेल्या मर्यादा याचा विचार केला तर सानियाचा निर्णय अतिशय योग्यच आहे.
यंदा आशियाई आणि राष्ट्रकुल या दोन महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. कदाचित देशासाठी ती या दोन स्पर्धांमधे सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती खर्या अर्थाने खेळाडूच्या भूमिकेतून रिटायर होईल आणि प्रशिक्षकाच्या नव्या कारकिर्दीला सुरवात करेल.
तिनं हैदराबादमधे आधीच टेनिस प्रशिक्षण अकादमी सुरू केलीय. तिथल्या प्रशिक्षणाच्या जोरावर भारताचे काही युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकही दाखवू लागलेत. यशस्वी खेळाडूप्रमाणेच प्रशिक्षक म्हणूनही तिची ही दुसरी कारकिर्द नक्कीच यशस्वी होईल.
हेही वाचा:
हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं