विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या निमित्ताने आज महत्त्वाचा दिवस आहे. आपण आजच्या दिवसाला निर्णायक दिवसही म्हणू शकतो. कारण इतके दिवस निव्वळ मुंबईभोवती फिरणार सत्तास्थापनेचं राजकारण आज दिल्लीतून हलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
या सगळ्या भेटीगाठींमधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून चालवण्यात येणाऱ्या नागपूर तरुण भारतने लिहिलेला अग्रलेख आज चर्चेत आलाय. उद्धव आणि ‘बेताल’ असं शीर्षक या अग्रलेखाला देण्यात आलंय. शीर्षकानुसार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हा अग्रलेख आहे. या अग्रलेखाचे दोन भाग होतात.
पहिल्या भागात सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका करण्यात आलीय. रोज भाजपवर वेगवेगळे शब्दास्त्र सोडणाऱ्या राऊतांसाठी ‘बेताल’ असा शब्द वापरण्यात आलाय. विक्रम आणि वेताळमधल्या गोष्टीतला हा बेताल असल्याचं अग्रलेखातून सांगण्यात आलंय. दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना गोंजारण्यासोबतच सल्ला देण्यात आलाय.
हेही वाचाः स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका
अग्रलेखाच्या सुरवातीलाच म्हटलंय, की ‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचं भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही.’
‘पण राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे. सत्ता नको, मला माझा शेतकरी महत्त्वाचा आहे, हे वाक्य आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कित्येकदा ऐकलंय. पण आज सत्तेच्या सारीपाटावर या उक्तीवरची कृती हरवून जाणं खरंच दुर्दैवी आहे.’
उक्तीवरची कृती हरवून जात असल्याची खंत व्यक्त करतानाच अग्रलेखात उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणार्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचं चित्र अनेकांसाठी वेदनादायी असल्याचा दावा करण्यात आलाय.
तरुण भारतने अग्रलेखात म्हटलं, ‘शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालवली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्यामागे लागलाय. या एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल?’
राज्यातल्या सत्तापेचावर अग्रलेखात लिहिलंय, ‘भाजप आज सरकार स्थापन करू शकत नाही, असं अजिबात नाही. सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधीसुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल. पण भाजपने तसे अजून केलेले नाही. याला एक विशिष्ट अर्थ आहे. भाजपला जनादेशाची पूर्ण जाण आहे. मिळालेलं बहुमत हे महायुतीला आहे आणि त्यातला मोठा भाऊ कोण हेही जनतेनेच त्या-त्या पक्षांच्या पारड्यात टाकलेल्या जागांनी सांगून टाकलंय.’
हे ‘बेताल’ रोखठोकपणे ठोकून देतात की, भाजपला १०५ जागा मिळाल्या. कारण शिवसेना सोबत होती. अन्यथा भाजपला ७० जागा तेवढ्या मिळाल्या असत्या. उद्या भाजपने असं म्हटलं की, सेनेला ५६ जागा मिळाल्या. कारण भाजप सोबत होती. अन्यथा २० सुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय? छातीठोकपणे बोलणं आणि रोखठोकपणे लिहिण्याचं समर्थन केलं तरी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ याचं समर्थन करायचं तरी कसं?
हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?
महाराष्ट्रात राजकीय पक्षांना जो काही जनादेश मिळाला, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. हा जनादेश भाजप आणि शिवसेना यांना एकत्र बसून राज्यकारभार करता यावा, यासाठीचा आहे. खरं तर भाजपला बाजूला ठेवून कोणताही पक्ष सरकार स्थापन करूच शकत नाही, हे स्पष्टच आहे. अपक्षांनासुद्धा कायद्यानं पक्षांतर करता येत नाही, तर मग निवडणूकपूर्व युतीतील पक्ष निवडणुकीनंतर वेगळे कसं होऊ शकतात?
आणि मुख्यमंत्रिपदासाठीचा जो आटापिटा चाललाय, तो कधीतरी शिवसेनेनं भाजपच्या जागा कमी असताना देऊ केला काय? आता थोडं मागे वळून पाहू या. १९९० मधे भाजप ४२, शिवसेना ५२, १९९५ मधे भाजप ६५, सेना ७२, १९९९ मधे भाजप ५६, सेना ६९, २००४ मधे भाजप ५४, सेना ६२, २००९ मधे भाजप ४६, सेना ४५ असे संख्याबळ होते. या ५ पैकी एका निवडणुकीत युतीची सत्ता आली. पण सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचं असल्याने मुख्यमंत्रिपद सेनेकडेच होतं.
४ निवडणुकांमधे विरोधी पक्षात बसण्याचा कौल युतीला मिळाला. त्यापैकी ३ वेळा विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होतं. पहिल्यांदा २००९ मधे भाजपचा एक सदस्य अधिक असल्याने विरोधी पक्षनेते पद भाजपकडे आलं. ज्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठीसुद्धा संख्याबळ पाहिलं, ते आज मुख्यमंत्रिपदाबाबत कसा दावा करू शकतात?
अग्रलेखाच्या शेवटच्या भागात शिवसेनेला काही खडे बोल सुनावण्यात आलेत. आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनीही असं काही बोलण्याचं टाळलंय. असं असताना भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी सांगणाऱ्या तरुण भारतने काहीशी कठोर भूमिका घेतलीय.
तरुण भारतने म्हटलं, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली हयात ज्या राममंदिर निर्मिती आंदोलनात घालवली, तो निर्णय अगदी कुठल्याही क्षणी अपेक्षित आहे. हा निकाल काय असेल, हे जरी कुणी सांगू शकत नसलं तरी तो येत असताना राज्यात स्थिर सरकार असणं ही काळाची गरज आहे.’
‘आता ‘पहले मंदिर, फिर सरकार’ हेही आम्ही उद्धवजींच्या तोंडून अनेकदा ऐकलंय. हा निकाल येत असताना हा सत्तासंघर्ष कितपत उचित आहे? कलियुगात राजा हरिश्चंद्र आठवताना सुदामापण आपल्याला आठवला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करताना भरतसुद्धा आपल्याला आठवला पाहिजे.’
‘शेतकर्यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठीसुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्नांमधे आणखी एक प्रश्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा. आता याच ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो.’
हेही वाचाः कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!
अग्रलेखाचा समारोप करताना ‘बेताल’ नेत्याला वेसण घालण्याची अपेक्षा तरुण भारतने व्यक्त केलीय. ते लिहितात, ‘रविवारी उद्धव ठाकरे शेतकर्यांना भेटण्यासाठी बांधावर गेले, तेव्हा पत्रकारांशीही बोलले. सत्तास्थापनेबाबत त्यांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले, शेतकरी संकटात असताना सरकारचा प्रश्न विचारणं, हे निर्गुण असल्यासारखे आहे. त्यांनी पत्रकारांना दिलेला सल्ला हा या ‘बेताल’ नेत्यालासुद्धा लागू होतो, असं आम्ही गृहित धरतो.’
‘शेतकर्यांना मदत देताना केवळ कागदी घोडे नाचवू नका, ही उद्धवजींनी केलेली अपेक्षासुद्धा रास्त आहे. पण शेतकर्यांना मदत देण्यासाठी ज्या स्थिर सरकारची अपेक्षा महाराष्ट्र करतोय, त्याच्या निर्मितीत अडसर असलेल्या ‘कागदी घोड्या’चं वेसणसुद्धा घट्ट आवळण्याची गरज उद्धवजींनी लक्षात घेतली पाहिजे. संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण संजयच धृतराष्ट्र होणार असेल, तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रानं चिंतीत होणं स्वाभाविक आहे.’
‘बेताल जर खांद्यावरून उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात, ज्या फांदीवर बसलो आहोत, ती कापणार्याला लाकुडतोड्या नाही तर ‘शेखचिल्ली’ म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच,’ असं म्हणत तरुण भारतने आपली भूमिका मांडलीय.
हेही वाचाः
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!
सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण