गांधीजींना तुकोबा भेटले होते

१० फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : १३ मिनिटं


आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.

`लगे रहो मुन्नाभाई` पाहिलाच असेल. त्यात मुन्नाभाई बनलेला संजय दत्त रेडियोवरून गांधीगिरी करत असतो. त्याला फोन येतात. फोन करणारे समस्या सांगतात. त्यावर तो गांधीजींचं सोल्यूशन सांगतो. 

एका मुलीचा फोन येतो. आपल्या प्रिया बापटने तिचं काम केलंय. ती एका रेस्टॉरंटमधे बसलेली असते. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक मुलगा शोधलेला असतो. आता तो मुलगा लग्न करण्यासाठी योग्य आहे की नाही, हे एका मीटिंगमधे कसं ठरवायचं, असा तिच्यासमोर प्रश्न असतो. 

या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुन्ना बापूंकडे बघतो. बापू सांगतात, `आदमी को परखना हो, तो देखना चाहिएं, वो नीचे तबके के लोगों से कैसे बर्ताव करता हैं.`

मुन्नाभाई तिला सांगतो, `तो वेटरला शिटी वाजवून किंवा शुक शुक करून बोलवत असेल, तर उधर से वट लेनेका.`

प्रियाला भेटायला आलेला मुलगा वेटरला शुक शुक म्हणून बोलावतो. प्रिया हसत हसत बाहेर पडते. ती मुन्नाला फोन करून सांगते, `या शुक शुक बरोबर आयुष्यभर राहावं लागलं असतं तर संपलंच असतं.`

मुन्नाभाईत दाखवलंय इतके आयुष्यातले निर्णय सोपे नसतात. तरीही त्यातला मिनिटभराचाच हा सीन निव्वळ अद्भूत आहे. माणूस परखण्याची ही सोपी कसोटी जबरदस्त आहे. महात्मा गांधींनी ती अनेकदा सांगितलीय. त्यामुळे ती सिनेमात आलीय. आपल्याला आवडलीय.

आश्चर्य वाटेल, पण संत तुकारामांच्या एका अभंगातही माणूस ओळखण्याची ही कसोटी आहे. अभंग प्रसिद्धच आहे,`जे का रंजले गांजले`. पण आपण या सुपरहिट अभंगाच्या पहिल्या पदाच्या पुढे जात नाही. त्यामुळे ती कसोटी आपल्याला लक्षात येत नाही. पण गांधीजींना ती कसोटी नक्कीच माहीत असणार. कारण त्यांनी तुकोबारायांच्या या अभंगाचा इंग्रजीत अनुवादही केलाय. तो असाय,

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ।।
तो चि साधु ओळखावा । देव तेथे चि जाणावा ।।
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। 
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ।। 
दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। 
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। 

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

थोडंफार इंग्रजी येणाऱ्या कुणालाही कळेल असा हा अनुवाद आहे. साधी सोपी इंग्रजी. साधी सोपी भाषा. मराठी येत नसणाऱ्या प्रत्येकापर्यंत त्याच्या भावासह सरळसोट अर्थ पोचवणारा अनुवाद. भाषा साहेबाची आहे. त्याच्या शब्दांची निर्मिती विदेशात झालीय. त्या भाषेचा थाट वेगळा आहे. पण गांधीजी त्या भाषेत नेतानाही तुकोबारायांच्या शब्दांचं सत्त्व शंभर टक्के जपतात. लेखक आणि अनुवादकामधे असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं. 

गांधीजींनी या एकाच नाही तर तुकोबारायांच्या सोळा अभंगांचा अनुवाद केलाय. विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत तुकोबांच्या देहूच्या जवळ असताना हे काम केलंय. गांधीजींना जिवे मारण्याच्या यशस्वी अयशस्वी योजना जिथे आखल्या गेल्या, त्या पुण्यातल्याच येरवडा तुरुंगात बंदी असताना त्यांनी हे लिहिलंय. हा अनुवाद काही साहित्यिक उपक्रम नव्हता. तो त्यांच्या जगण्यावर सुरू असलेल्या जगण्याच्या प्रयोगांचा एक भाग होता. 

त्यांची प्रयोगशाळा असलेल्या आश्रमाच्या दिनचर्येसाठी त्यांनी 'आश्रम भजनावली' तयार केलीय. यात देशभरातल्या विविध संतांच्या निवडक रचना त्यांनी घेतल्यात. त्या वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना कळाव्यात म्हणून सोप्या इंग्रजीत त्याचं भाषांतर केलंय. त्यातले तुकोबांचे अभंग आणि त्याचे अनुवाद उठून दिसातत. 

हेही वाचाः गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

गांधीजींच्या साहित्यात `आश्रम भजनावली`कडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. टिपिकल गांधीवाद्यांनी त्याचं कर्मकांड केल्यामुळे अभ्यासकांनी त्याकडे पाहिलंही नाही. पण देशभरातल्या आपल्या पूर्वसुरींच्या विचारांचे कवडसे निवडत गांधीजी त्यातून जणू गांधीवादच उभा केलाय. संतांनी सांगितलेल्या सोप्या शब्दांच्या निमित्ताने ते जगण्याकडे बघण्याची `गांधीनजर` देतात. मी काहीच नवीन सांगत नाही. मी सांगतो ती तत्त्व पहाडांइतकीच जुनी आहेत, इतका पारदर्शक प्रांजळपणा गांधीजींकडे होता. आपल्या विचारांकडे पाहण्याची तुकोबारायांचीही दृष्टी अशीच होती. फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल, भारवाही. 

हे अनुवाद वाचताना जवळपास अडीच शतकांचा काळ भेदून तुकाराम आणि गांधी हे दोन वैष्णव एकजीव होताना दिसतात. विशेषतः यातल्या अभंगांच्या निवडीतून ते जाणवतं. तुकोबांचे काही हजार अभंग उपलब्ध आहेत. त्यातले फक्त सोळा अभंग निवडणं हे कठीण काम होतं. पण कुणीही सांगेल, गांधीजींची निवड अफलातून आहे. विचारांच्या, जगण्याच्या अद्वैतातून हे शक्य आहे. शब्देविण संवादू, दुजेविण अनुवादू याचा अनुभव इथे घेता येतो.

असं अद्वैत भाषेचे सगळे बांध तोडून टाकतं. पण मुळात त्यांना मराठी येत होतं का, हा प्रॅक्टिकल प्रश्न येतोच. डॉ. इंदुभूषण भिंगारे आणि पुढे खासदार झालेले कृष्णराव देशमुख यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. गांधीजींनी त्याला दोन तीन पॅरेग्राफची छोटी प्रस्तावना लिहिलीय. ' मला फारसं मराठी येत नाही, तरी तुकाराम मला खूप प्रिय आहेत', असं त्यांनी त्यात आवर्जून लिहिलंय. 

पण गांधीजींना मराठी कळत असावंच. गोपाळकृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेत गेले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने इंग्रजीत भाषण सुरू केलं. तेव्हा गांधीजींनी त्यांना थांबवलं. हिंदीत भाषण करायला सांगितलं. पण गोखलेंना हिंदी येत नव्हतं. त्यामुळे गांधीजींनी त्यांना मराठीत भाषण करायला लावलं. गांधीजींनी गोखलेंच्या मराठी भाषणाचं हिंदी भाषांतर करून लोकांना सांगितलं. 

हेही वाचाः गांधीजी पुन्हा वायरल झालेत

महाराष्ट्रात दीर्घकाळ राहिलेल्या आणि फिरलेल्या गांधीजींना मराठी समजत असावंच. पण अभंगांचे अर्थ समजून घेताना त्यांना अनेकांची मदत झाली असावी. महादेवभाई देसाई, काका कालेलकर, विनोबा भावे, किशोरलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सावल्यांना मराठी उत्तम येत होते. मश्रूवालांनी तर पुढे तुकोबांच्या १२० अभंगांचा अनुवादही केला. ते बहुधा अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यात गांधीजींच्या सोबतही होते. या सगळ्यांनी त्यांना शब्दांचे अर्थ सांगितले असतीलही. पण या हृदयीचे त्या हृदयी पोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी एकमय व्हावं लागतं. ते एकमयपण या दोन महात्म्यांमधे निश्चितच होतं. 

महाराष्ट्र आणि गुजरातेतली सांस्कृतिक देवाणघेवाण अनेक शतकांची आहे. गांधीजींपर्यंत तुकोबा पोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी भागवत विचारांची ध्वजा आजच्या पाकिस्तानापर्यंत पोचवली होती. त्यांनी गुजरातमधे अनेकदा प्रवास केलाय. त्यांनी गुजरातीच्या जवळ जाणाऱ्या भाषेमधे अभंगरचनाही केलीय. त्याचा प्रभाव नरसी मेहतांसहित गुजरातमधल्या सर्व संतांवर स्पष्ट दिसून येतो. आणि नरसींचा प्रभाव पारंपरिक वैष्णव संस्कारांत वाढलेल्या गांधीजींवर होता. म्हणूनच तर नरसींच्या ' वैष्णव जन तो' याच्याशी अपार साम्य असलेल्या ' जे का रंजले गांजले' चा अनुवाद गांधीजी आवर्जून करतात. 

गांधीजींच्या सोळा अनुवादांमधे या अभंगांचा नंबर दुसरा आहे. पहिला अभंग ' पापांची वासना नको दांवू डोळा' आहे. गांधीजींना या अभंगात त्यांची तीन माकडे दिसली असतीलच, याची खात्री वाटावी, इतकं या अभंगातलं वर्णन लख्ख आहे. `सी नो इविल, स्पीक नो इविल, हिअर नो इविल`, हा विचारांचा तुकडा सतराव्या शतकात जपानमधे लोकप्रिय झाल्याचं सर्वसामान्यपणे मानलं जातं. (जपानच्या तोशोगु मंदिराच्या चौकटीवर स्थान मिळवलेल्या थ्री वाईज मंकींचं शिल्प वरच्या फोटोत.) त्यातूनच प्रेरणा घेऊन गांधीजींनी त्याचं विज्युअल एक्प्रेशन तीन माकडांमधून रूढ केल्याचाही दावा आहे. पण सतराव्या शतकातच तुकोबांनी हे मांडलं होतंच. ते गांधीजींना माहीत होतंच. त्यातूनही ही तीन माकडं आली असतील. 

गांधीजींच्या अजेंड्यावर वरचं स्थान असणाऱ्या अस्पृश्यता निवारणाशी थेट भिडणारा 'महाराच्या सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे' हा अभंगही अनुवादात महत्त्वाचं स्थान मिळवतो. स्वतःला यातिहीन म्हणवून घेणारे तुकोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळचे वाटत होते. त्याचवेळेस गांधींजींवरही त्यांचा प्रभाव स्पष्ट होता. वरवर विरोधक वाटणाऱ्या या महामानवांना जोडण्याचा तुकोबा हे एक सेतू होते. 

तुकारामांनी वारकरी संप्रदायातील सर्व जातींच्या संतमेळ्याचं वर्णन केलंय. त्याच पॅटर्नमधली समाजातल्या सर्व घटकांमधील जागृती स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींना अपेक्षित होती का, असं त्याचा अनुवाद वाचताना वाटतं. मुळातून वाचावा असा हा अभंग आणि त्याचा अनुवाद. 

पवित्र तें कुळ पावन तो देश। जेथें हरिचे दास घेती जन्म।।
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक।।
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं।।
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं।।
वैश्य तुळाधार गोरा कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ।।
कबीर मोमीन लतिब मुसलमान। शेणा न्हावी जाण विष्णूदास।।
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु। भजनीं अभेदू हरिचे पायीं।।
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ।।
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ।।
मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ।।
यातायातीधर्म नाहीं विष्णूदासा । निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं ।।
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणों किती।।


Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.

'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' आणि ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' हे प्रसिद्ध अभंग यात आहेतच. पण मोक्षालाही नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या तुकोबांच्या रोकड्या तत्त्वज्ञानालाही इथे जागा आहे. तसंच भगवद्भक्ती आणि नाममहात्म्याचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांनाही.' हेचि दान देगा देवा' आणि 'शेवटची विनवणी' या चटका लावणाऱ्या अभंगांनाही मानाचं स्थान मिळालंय. 

फक्त हे अभंगच नाहीत, तर गांधीजींवरचा संत तुकोबांचा प्रभाव सिद्ध करणारे इतरही अनेक दाखले आहेत. त्यांच्या लिखाणात, भाषणांत तुकारामांचा उल्लेख अनेकदा आलाय. गांधीजींचं समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात 'तुका' असा इंग्रजी सर्च दिला की अनेक संदर्भ समोर येतात. 

एका ठिकाणी महाराष्ट्राचं वर्णन करताना ते म्हणतात, ' जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला, आधुनिक युगाचे नायक असलेल्या शिवाजी महाराजांची जी भूमी आहे, जिथे तुकारामांनी आपलं कार्य केलं, ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे.'

आणखी एक महत्त्वाचा संदर्भ वाईच्या एका भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना गांधीजींनी तुकारामांच्या 'मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे' या तत्त्वज्ञानाचा दाखला दिलाय. 

हेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

यात दलितांच्या सभेतील एका भाषणाचा संदर्भ येतो. त्यात हिंदू धर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर, तुकारामांचा धर्म चिरकाल टिकणार असल्याचं सांगितलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेकडे ओढल्या जाणाऱ्या दलितांनी हिंदू धर्म सोडू नये, अशी गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचा संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात तामिळ संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते, असं अधोरेखित केलंय. 

बंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम, ज्ञानेश्वर, नानक, कबीर हे दैवी अवतार नव्हते का, असा सवाल त्यांनी त्यात विचारलाय. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामांसारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असा सल्लाही त्यांनी या पत्रात दिलाय. 

तसंच गोपुरी आश्रमातल्या एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही गांधीजींनी एका प्रार्थनासभेत सांगितलीय. आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा 'पापाची वासना नको दावूं डोळा' हा आवडता अभंग उद्धृत केलाय.

गांधीजींनी मगनलाल गांधींना लिहिलेलं एक पत्रही महत्त्वाचं आहे. त्यात त्यांनी गुजरातमधल्या स्वामीनारायण आणि वल्लभाचार्य यांच्या वैष्णव संप्रदायाची तुलना तुकाराम आणि रामदास यांच्या महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदायाशी केली. त्यातून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचं वेगळेपण आणि सकारात्मकता दाखवून दिली होती. 

गांधीजींचे सुहृद गुरुदेव रवींदनाथ टागोरांनाही तुकारामांनी मोहिनी घातली होती. त्यांचे वडीलबंधू सत्येंद्रनाथ टागोर आणि बंगाली लेखक योगेंद्रनाथ बोस यांच्यामुळे तुकोबा आधीच बंगालीत पोचले होते. हे तिघेही ब्राह्मोसमाजाशी संबंधित होते. ब्राह्मो समाजाचं मराठी रूप मानाव्या अशा प्रार्थना समाजाने तुकारामांच्या तत्त्वज्ञानालाच आधार बनवलं होतं. त्यामुळे तुकोबा एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीलाच देशभर पोचले होते. इतकंच नाही, तर भारताविषयी आकर्षण असलेल्या जगभरातल्या अभ्यासकांपर्यंतही तुकोबा पोचले होते. या प्रभावातून रवींद्रनाथांनीही तुकोबांचे बारा अभंग बंगालीत अनुवादित केलेत. (वरच्या फोटो गांधीजींच्या शांतिनिकेतन भेटीचा आहे. त्यात गांधीजींच्या मागे काळ्या जाकिटात नंदलाल बोस उभे आहेत.)

गांधीजींनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनातल्या कलाभवनचे प्रमुख नंदलाल बोस यांच्याकडून तुकोबांचं चित्रकाढून घेतलं होतं. ही चित्रं आज तुकाराम आणि गांधी यांच्यातल्या अनुबंधाचं प्रतीक बनलीत. 
बोस यांनी काढलेली चित्रं खरं तर फार देखणी नाहीत. पण त्यांच्या निर्मितीची गोष्ट फारच छान आहे. नागपूरचे इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख यांनी १९४८ साली तुकाराम गाथा `तुकाराम की राष्ट्रगाथा`या नावाने हिंदीत संपादित केली. हे दोघेही सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते. त्यामुळे त्यांच्यावरचा तुकोबांचा प्रभाव स्वाभाविक होता. जगाचं भान आल्यानंतर त्यांनी तुकोबांचे अभंग हिंदीत नेण्याचं ठरवलं. मनोगतात ते लिहितात, `भक्ती, राजकारण आणि समाजकारण या तिघांची सांगड घालून तुकोबांनी आदर्श राष्ट्रधर्म लोकांसमोर ठेवण्याचे धाडस केलं.` असाच राष्ट्रधर्म तेव्हा गांधीजीही मांडत होते. त्यामुळे भिंगारे प्रस्तावनेसाठी गांधीजींकडे गेले. 

गांधीजींना हिंदी तुकाराम गाथेचा हा प्रकल्प आवडला. त्यांनी कुंदर दिवाण यांच्याकडून त्यातली निवड समजून घेतली. मात्र त्यांना त्यातली चित्रं आवडलं नाहीत. त्यांच्या मते ते बाजारू चित्र होती. आपण संतांची पारंपरिक चित्रं अगदी सहजपणे स्वीकारत असतो. पण गांधीजी त्याला अपवाद होते. त्यांची तुकोबांकडे बघण्याची दृष्टी स्वतंत्र आणि नवी होती. त्यामुळे त्यांनी नव्याने तुकोबांचं चित्र काढून घेतलं. त्यातून नंदलाल बोस या महान कलाकारापर्यंत तुकोबा पोचले. ते जागतिक कीर्तीचे चित्रकार. त्या काळात जगभर त्यांची प्रदर्शनं भरली होती. त्यांनी तीस वर्ष शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भूषवलं. गांधीजींनी त्यांना तुकोबांची चित्रं काढण्याची विनंती केली. 

नंदलाल बोसांच्या चित्रांतले तुकोबा महाराष्ट्रापेक्षाही सौराष्ट्रातलेच जास्त वाटतात. त्यांचे कपडे काठियावाडी वळणाचे आहेत. तो गांधीजींचा प्रभाव असावा. नंदलाल बोस तुकोबांमधे गांधीजी शोधत असावेत. वी. शांताराम यांनी `धर्मात्मा` या बालगंधर्व अभिनीत सिनेमात संत एकनाथांच्या निमित्ताने गांधीजी मांडले होते. तसंच बोसांचंही असावं. त्यामुळे आपल्याला बोसांचे तुकोबा पटत नाहीत. पण गांधीजी, रवींद्रनाथ, नंदलाल बोस अशा दिग्गजांचा त्याला असलेला स्पर्श जाणवला की ते तुकोबा वेगळेच वाटू लागतात. 

तुकोबा आणि गांधीजी यांच्यातला अनुबंध शोधताना गांधीजींचा काळ समजून घ्यावा लागतो. लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी असं युगांतर महाराष्ट्रात घडत होतं. त्याने महाराष्ट्र ढवळला होता. त्या काळात गांधीजींचा शोध घेताना महाराष्ट्राने तुकोबांचा संदर्भ घेतलाय. डॉ. सदानंद मोरे यांनी `लोकमान्य ते महात्मा` आणि `तुकाराम दर्शन` या महाग्रंथांमधे या काळाचा पट मांडताना तुकाराम आणि गांधीजी हा अनुबंध उलगडून सांगितलाय. तो समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राशी गांधीजींचं असलेलं नातं कळणं अशक्य आहे. 

लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अनेक अनुयायांनी गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. पण अनेकांना ब्राह्मण नसलेल्या गांधीजींचं नेतृत्व काही केल्या पचत नव्हतं. त्यात आपलीच ब्राह्मण जात श्रेष्ठ मानणाऱ्या अनुयायांचा भरणा होता. त्यातून रामदास स्वामींना राष्ट्रवादी विचारांचे संत ठरवण्यात आलं. तर तुकाराम हे टाळकुटे, असंस्कृत, पळपुटे ठरवले गेलं. त्यात गांधीजींबरोबरच तुकोबांवर भयंकर टीका झाली. टिळकवाद्यांचे अग्रणी म्हणावेत अशा `भाला`कार भोपटकरांनी टिळक रामदास आणि `गांधी हा टाळपिट्या तुकारामच` असं ठरवून टाकलं. त्या सगळ्यात टिळकांवर असणारा तुकारामांचा प्रभावही दुर्लक्षित केला गेला.  

मात्र त्याचवेळेस गांधीजींचं व्यक्तिमत्त्व पाहून तुकारामांची आठवण होत असल्याच्याही नोंदी उपलब्ध आहेत. आश्चर्य म्हणजे त्यातही टिळकवादीच आघाडीवर आहेत. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या गांधीजींच्या अहमदाबाद भेटीच्या आठवणींमधे त्यांनी लिहिलंय, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असताना निम्म्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चाललेले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘. 

खुद्द लोकमान्य टिळकांचे नातू ग. वि. केतकर यांनी डिसेंबर १९२१ मधे लिहिलेल्या `दोन महात्म्यांची अकल्पित भेट` या कथावजा लेखात तुकाराम आणि गांधीजी यांचा संवाद घडवलाय. त्यातून या दोघांमधलं साम्य अधोरेखित केलंय. तुकोबांचंच काम गांधीजी असहकाराच्या आंदोलनातून पुढे नेत असल्याची त्यांची मांडणी आहे. केतकर गांधीवादी नव्हते आणि ते पुढेही गांधीवादी झाले नाहीत. म्हणून त्यांनी घडवलेली ही भेट महत्त्वाची ठरते. त्या काळातल्या वैचारिक स्थित्यंतरातले पदरही उलगडून दाखवते. 

दुसरीकडे सत्यशोधक चळवळीतही गांधीजींबद्दल आकर्षण वाढत होतं. तुकोबांना सत्यशोधक मानणारे गांधीजींनाही सत्यशोधक मानत होते. त्यात हरिश्चंद्र नवलकरांचं पुस्तक `सत्यशोधक महासाधू तुकाराम` ते दिनकरराव जवळकरांचा लेख `सत्यशोधक महात्मा गांधी` हा प्रवास महत्त्वाचा होता. या सगळ्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे साकल्याने तुकाराम आणि गांधीजी यांच्यातलं नातं समजवण्याचा प्रयत्न करत होते. गांधीजी छत्रपती शिवरायांचाच मार्ग कसा जोपासत आहेत, हे सांगताना त्यांना या दोघांना जोडणाऱ्या तुकारामांचा दुवा उपयोगी पडत होता. (वरची तुकोबांची चित्रं आंतरराष्ट्रीय कीर्तिचे चित्रकार आणि संत परंपरेचे अभ्यासक स्कर हांडे यांनी काढलेली आहेत.)

विसाव्या शतकातील महाराष्ट्रात संत तुकाराम आणि गांधीजी या दोघांचाही स्पष्ट वैचारिक प्रभाव असणाऱ्या विचारवंतांची एक मांदियाळी उभी राहिली. त्यात विनोबा भावे, तुकडोजीबाबा, गाडगेबाबा, आचार्य जावडेकर, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, रा. ना. चव्हाण ही महत्त्वाची नावं मानायला हवीत. त्यातल्या साने गुरुजींनी वेगळाच इतिहास घडवला. गांधीजींच्या विचारांतून त्यांनी थेट तुकोबारायांच्या विठ्ठलाला जातिभेदाच्या बंदीवासातून मुक्त केलं.  

दुसरीकडे गाडगेबाबांनी महाराष्ट्रात सेवेला अध्यात्माच्या मेनस्ट्रीममधे आणलं. ते वारकरी संतांनी फार पूर्वीच केलेलं होतं. आधुनिक काळात राष्ट्रीय पातळीवर ते श्रेय स्वामी विवेकानंदांना द्यायला हवं. गांधीजींनी सेवेच्या तत्त्वज्ञानाचं खऱ्या अर्थाने सार्वत्रिकीकरण केलं. सेवा फक्त अध्यात्मच नाही तर समाजकारण आणि राजकारणाचाही गाभा बनू शकते, हे दाखवून दिलं. 

सेवेचं हे सारं तत्त्वज्ञान सांगणारी परंपरा मान्यताप्राप्त धर्म अध्यात्मापेक्षा वेगळं होतं. परंपरेचा भर ब्राह्मतेज आणि क्षात्रवृत्ती उभी करण्यावरच होता. पण संतांनी सेवेला महत्त्व दिलं. सेवा हे वर्णव्यवस्थेत शूद्रांना दिलेलं काम होतं. तुकोबांनी थेट स्वतःला शूद्रच म्हणवून घेतलं होतं. प्रतिष्ठा नसलेल्या सेवावृत्तीला संतांनी फार मोठी मान्यता मिळवून दिली. गांधीजींनी आधुनिक काळात तोच वसा पुढे नेला. संडास साफ करण्यापासून मेलेल्या गुरांची चामडी कमावण्यापर्यंत सगळ्या कामांमधून देशउभारणी घडू शकते हे पटवून दिलं. 

गांधीजींच्या या सेवाधर्मामुळे धर्माच्या नावाने चालणारी कर्मकांडांची आणि राजकारणाचीही दुकानं बंद पडू लागली होती. त्यामुळेच गांधीजींचं साधं अस्तित्वही या दुकानदारांना नकोसं होतं. त्यांनी गांधीजींना संपवण्याचे वारंवार प्रयत्न केले. त्यांनीच त्यांचा खून केला. तुकोबारायांची गाथाही याच सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवली होती. त्यांचा आयुष्यभर छळ केला होता. दोघांचीही जात काढून त्यांना अधिकार नाकारण्यात आले. पण दोघांनीही त्याची पर्वा केली नाही. त्यांच्यावर उग्र प्रहार केले. तुकोबाराय आणि गांधीजी या दोघांनीही बुरसटलेल्या विचारांशी संघर्ष करण्यासाठी सेवेचा रस्ता दाखवला. हेच त्या दोघांमधलं खरं साम्य होतं. तेच त्यांच्यातलं खरं अद्वैत होतं. 

हे अद्वैत सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पण परस्परविरोधी विचारांचा गोंधळ उडवून सूर्य झाकोळण्याचे प्रयत्न सुरू होते आणि आहेत. या दोघांच्या विचारांना विरोध करणाऱ्या सनातन्यांचे एकविसाव्या शतकातले अवतार तुकोबा आणि गांधीबाबांच्या नावाने जयघोष करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोघांमधलं घट्ट नातं वारंवार सांगायची वेळ आलीय. 

हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

(गांधीजींच्या १५० व्या जन्मदिनानिमित्त त्यांचा महाराष्ट्राशी असलेला संबंध उलगडून दाखवणारं पुस्तक महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं. त्यासाठी लिहिलेल्या लेखाचा संपादित भाग. )