७० वर्षांपूर्वीच्या दंगलीवेळी सरदार पटेलांनाही फेकन्यूजशी लढावं लागलं

०६ मार्च २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.

फाळणीनंतर दिल्लीत दंगली उसळल्या होत्या. तेव्हा तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापुढं अफवा रोखून दिल्ली पोलिसांना कामाला लावण्याचं मोठं आव्हान होतं. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री पटेल यांना दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पातळ्यांवर काम करावं लागलं.

दुसरीकडे फेकन्यूजचा बाजारही खूप तेजीत होता. खुद्द तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाही या फेकन्यूजचा फटका बसला होता. त्यामुळे सरदार पटेलांना फॅक्ट चेकर म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागली होती. सध्या दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याची पुन्हा एकदा आठवण काढायची वेळ आलीय.

फेकन्यूजनं दिल्लीला दंगलीत जाळलं. सोशल मीडियाच्या काळातली पहिली दंगल दिल्लीत घडली. दंगलीत आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा जीव गेल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. तसंच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. रोज एक वेगवेगळा दावा नवा वीडिओ अफवांच्या बाजारात येतोय. १९४७ ला फाळणीनंतरही दिल्ली अशीच दंगलीत जळून निघाली. तेव्हाही दिल्लीला फेकन्यूजच्या विकृतीचा फटका बसला होता. फाळणीवेळच्या दंगलीत फेकन्यूज पसरवणाऱ्या मीडियाशी सरदार पटेलांनीही दोन हात करावे लागले.

याविषयी द प्रिंट या वेबपोर्टलवर स्तंभकार उर्विश कोठारी यांचा एक लेख आलाय. या लेखाच्या अनुषंगाने मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी एक लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा सदानंद घायाळ यांनी केलेल्या अनुवादाचा हा संपादित अंश.

दंगलग्रस्त मुसलमानांना पैसे देण्याची फेक न्यूज

सरदार पटेलांनाही फेक न्यूजशी दोन हात करावे लागलेत. स्वतः पटेलांनीही एका अशाच फेक न्यूजची पोलखोल केली होती. दिल्लीला लागून असलेल्या मेवात भागात दंगल झाली होती. दंगलग्रस्त मेव मुसलमानांना सरकार पाच लाख रुपये देईल, असं एका पेपरमधे छापून आलं होतं. पण खुद्द सरदार पटेल यांनीच सरकारनं अशी कुठलीच घोषणा केली नसल्याचं सांगत या बातमीचं खंडन केलं होतं.

सरदार पटेलांनी फेकन्यूजशी कसा सामना केला याविषयी अहमदाबाद इथले ज्येष्ठ स्तंभकार उर्विश कोठारी यांनी द प्रिंट या वेबपोर्टलवर एक लेख लिहिलाय. उर्विश यांनी यांनी ज्या हिंसाचाराबद्दल लिहिलंय त्याची पुढची कहाणी सांगायला हवी.

मेवातमधे ३० हजार मेव मुसलमानांना ठार मारण्यात आलं होतं. या घटनेविषयी इतिहासकार यास्मीन खान लिहितात, ‘जवळपासच्या दोन संस्थानांकडे त्यांची एक छोटीशी तुकडी होती. भरतपूर आणि अलवर संस्थान. या दोघांनी आपल्या सैन्यदलाला आदेश दिला आणि सर्व बाजूंनी वेढा टाकत गोरगरीब मेव मुस्लिमांना मारून टाकलं. तीस हजार जणांना मारून टाकणं ही काही साधीसुधी किरकोळ घटना नाही. एक तर राजकुमार जीपमधून बाहेर पडायचा आणि गोरगरीबांना पळवू पळवून ठार मारायचा. आणि मोठ्या अभिमानानं सांगायचाही.’

हेही वाचा : सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

अफवांमुळे लाखो लोक मारले गेले

आपल्या पुस्तकात यास्मिन शेख लिहितात, ‘भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली तसं ब्रिटिश प्रशासनाने आपला बोऱ्याबिस्तरा गुंडाळायला सुरवात केली. गोऱ्यांचं सैन्य माघारी परतू लागलं. ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याने हिंसाचार रोखण्याचा काहीएक प्रयत्न केला नाही. नवा भारत आणि नव्या पाकिस्तानकडे स्वतःचं सैन्यदल किंवा पोलिस यंत्रणा नव्हती. अशा परिस्थितीत फाळणी झाली. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कमतरता निर्माण झाली. सरदार पटेलांना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं.’

‘याचा दंगलखोर लोक हिंसाचार करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी फायदा घेत होते. त्यावेळच्या मीडियाचं चरित्रही हिंदू मीडिया आणि मुस्लिम मीडिया असं झालं होतं. दोन्हींकडून एकमेकांविषयी अफवा पसरवणं सुरू होतं. अशी घटना कुठं घडलीच नाही. पण नंतर अफवेमुळे तशाच घटना घडायच्या. लोक मारले जात होते.’

आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की १९४७ मधे २० लाख लोक मारले गेले होते. हिंदू, मुसलमान आणि शीख. तिन्ही समुदायाच्या कित्येक हजार लोकांची हत्या झाली होती. हजारो बायकांवर बलात्कार झाले. दिल्लीपासून ते पंजाबपर्यंत सगळीकडे प्रेतांचा सडा पडला होता.

आत्ताचा मीडियाही काही वेगळा नाही

आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की खोटारडेपणा आणि अफवाबाजीच्या जोरावर २० लाख हिंदू, मुसलमान आणि शीख मारले गेले होते. मारणारे लोकही याच समाजांतले होते. ते हत्यारे नव्हते. पण अफवांनी त्यांना हत्या करणारा आणि लुटारू बनवलं होतं. 

त्यावेळी नवा भारत आणि नव्या पाकिस्तानकडे कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रणासाठीचं तंत्र असतं तर एवढी वाईट स्थिती झाली नसती. दुसरीकडे मीडियानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

सरदार पटेल यांना हिंदू मीडियाच नाही तर मुस्लिम मीडियावर लगाम लावायचा होता. त्यावेळच्या पेपरांचं चरित्र सांप्रदायिक झालं होतं. १९४७ चा मीडिया आणि २०२० चा मीडिया यांच्यात कुठलाच फरक नाही.

हेही वाचा : तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम

दंगलीतून भारत धडा कधी घेणार?

आजच्या काळात सोशल मीडियावर हिंसा आणि अफवा पसरवणाऱ्या काही लोकांनी डीपीवर सरदार पटेलांचा फोटो लावल्याचं आपल्याला दिसतं. त्या लोकांनी उर्विश कोठारी यांची ही स्टोरी नक्की वाचायला हवी.

धार्मिक, जातीय हिंसाचाराबद्दलच्या आपल्या आठवणी चुकीच्या तथ्यांच्या आधारावर तयार होतात. त्या एकतर्फी असतात. अशा आठवणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा पिढ्यानपिढ्यांचा प्रवास करतात. हिंसेचे घाव पिढ्यानपिढ्या राहतात. दुसरीकडे हिंसाचार करणाऱ्यांच्या मनात गर्वाच्या आठवणी घर करून राहतात. या आठवणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दंगलींच्या निमित्ताने बाहेर येतात. आठवणींचं हे चक्र फिरत राहतं. कुठल्याचं दंगलीतून कोणताच धडा घेतला जात नाही. भारतातही अजूनपर्यंत असा कोणताच धडा घेतला गेला नाही.

हेही वाचा : 

गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल

नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त

सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?