सरयू रायः दोन मुख्यमंत्र्यांना जेलमधे घातलं, तिसऱ्याला हरवलं

२४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.

झारखंडमधे ‘अब की बार ६५ पार’चा नारा देणाऱ्या भाजपच्या पदरात यंदा २५ जागाच पडल्या. गेल्यावेळी ३७ जागा मिळवणाऱ्या भाजपचा दारूण पराभव झालाय. अनेक मंत्री, प्रदेशाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष यांनाही पराभवाचं तोंड बघावं लागलं. पण या सगळ्यांमधे चर्चा होतेय ती फक्त मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या पराभवाची आणि सरयू राय यांची.

काही दिवस आधीपर्यंत भाजपमधेच होते

भाजपने सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या रघुवर दास यांना पुन्हा एकदा आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं. गेल्यावेळी ७० हजार मतांनी जिंकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सरयू राय यांनी १६ हजार मतांनी हरवलंय. तेही कोणत्याही प्रस्थापित चिन्हाशिवाय अपक्ष म्हणून लढत, सिलेंडर चिन्हावर.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची हिसकावून घेणारे सरयू राय काही दिवस आधीपर्यंत भाजपचाच भाग होते. पण पक्षाने त्यांना तिकीट देण्यासाठी शेवटपर्यंत लटकवून ठेवलं. मध्य प्रदेशात तत्कालीन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना लटकवलं अगदी तसंच. महाजन, खडसेंनी पक्षाला आव्हान दिलं नाही. मात्र सरयू राय यांनी आपला अवमान समजून थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच शड्डू ठोकला.

याविषयी ते सांगतात, ‘यंदा तुम्हाला तिकीट देणार नाही, असं पक्षाने अगोदर सांगितलं असतं तर मी हा आदेश स्वीकार केला असता. आणि मी निवडणूकही लढली नसती. मी शेवटपर्यंत पक्षातल्या लोकांना माझ्या तिकीटाबद्दल लवकर निर्णय घ्या, असं सांगत राहिलो. पण एकापाठोपाठ चार लिस्ट आल्या तरी त्यामधे पक्षाने माझ्या जागेबद्दल कुठलाच निर्णय घेतला नाही. ही माझ्यासाठी अपमानास्पद स्थिती होती. त्यामुळे मी स्वतःहूनच मला तिकीट नको असं जाहीर केलं.’

हेही वाचा : झारखंड ट्रेंडः भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटतंय

तिकीट नाकारून मुख्यमंत्र्यांना आव्हान

तिकीट नको असं जाहीर केल्यावर ६८ वर्षांच्या सरयू राय यांनी थेट मुख्यमंत्री रघुवर दास यांनाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला. २०१४ मधे जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून निवडून आल्यावर रघुवर दास यांच्या मंत्रीमंडळातच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. आता त्याच मुख्यमंत्र्यांना हरवण्यासाठी सरयू राय यांनी जमशेदपूर पूर्वमधून उमेदवारी भरली.

भाजपने पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत सरयू राय यांना पक्षातून काढून टाकलं. भाजपमधून काढून टाकण्याचा हा निर्णय त्यांच्यासाठी एक मोठा झटका होता. कारण आठवीत शिकत असताना १९६२ पासून त्यांची भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उठबस होती. जनसंघाच्या संघटन बांधणीसाठी काम केलं. आणि त्याच पक्षातून आपल्याला काढून टाकल्याची सलही ते आजही बोलून दाखवतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजपर्यंत भाजपमधला कुठलाही मोठा नेता सरयू राय यांच्याविरोधात बोलला नाही. जे कुणी बोललेत ते दुय्यम पातळीवरचे नेते आहेत. काल निकालानंतर प्रतिक्रिया देताना जवळपास सगळेच भाजप नेते सरयू राय यांच्याबद्दल मी कुठलीच टीका करणार नाही. लहानपणापासून त्यांना बघूनच मी राजकारण शिकलोय, असं म्हणाले. आणि हीच सरयू राय यांची सगळ्यात मोठी ताकद आहे.

लालूप्रसाद यादवांचं करायचं काय?

भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरयू राय यांच्या शब्दाला झारखंडमधे मोठी किंमत आहे. ते बोलतात तेव्हा लोक त्याचा अतिशय गांभीर्याने विचार करतात. कारण त्यामागे खूप मोठा अभ्यास, पुरावे असतात, हे सगळ्यांना ठावूक असतं. आणि हा विश्वास काही पाचेक वर्षांतला नाही. याला झारखंड हा बिहारचा भाग असल्यापासूनचा इतिहास आहे. आपल्या अटींवर आणि तत्वांवर राजकारण करणारा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरयू राय यांचा निव्वळ झारखंडमधेच नाही तर बिहारमधेही चाहता वर्ग आहे.

चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला जातो. ९० च्या दशकात दलित, ओबीसी, मुस्लिम बिहारी माणसांच्या गळ्यातला ताईत झालेल्या लालूप्रसाद यादव या माणसाचं करायचं काय, हा प्रश्न साऱ्या राजकारण्यांना सतावत होता. या दस नंबरी प्रश्नाचं उत्तर चारा घोटाळ्याने दिलं. आणि लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाची हवा खावी लागली. हा घोटाळा झाला तेव्हा झारखंड हा बिहारचाच भाग होता. देशभरात कुप्रसिद्ध असलेला हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या माणसाचं नाव म्हणजे सरयू राय. या घोटाळ्यावर त्यांनी ‘चारा चोर खजाना चोर’ नावाचं पुस्तकही लिहिलंय.

छोट्याशा झारखंडला आपल्या १९ वर्षांच्या राजकीय इतिहासात १० मुख्यमंत्री मिळालेत. इथलं राजकारण मोठं चंचल आहे. आज एकासोबत तर उद्या दुसऱ्यासोबत अशी इथल्या पक्षांची स्थिती असते. अशा राजकारणातच २००६ मधे मधू कोडा या अपक्ष आमदाराला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती. पण खाण वाटपात अधिकाराचा गैरवापर केल्यावरून त्यांना तुरुंगात जावं लागलं. आठ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण सरयू राय यांनी पुराव्यानिशी बाहेर काढलं. भ्रष्टाचाराच्या या मुद्यांवर रान पेटवूनच भाजपने राज्यात आपला प्रभाव तयार केला.

रघुवर दास प्रत्येक निवडणुकीत जमशेदपूरमधल्या ८६ कॉलन्यांच्या नियमित करण्याचा मुद्दा मांडायचे. हा जमशेदपूरकरांच्या आस्थेचा विषय आहे. पण मुख्यमंत्री झाल्यावर रघुवर दास यांनी यावर काहीच केलं नाही. आताच्या निवडणुकीत सरयू राय यांनी प्रचारात हाच मुद्दा प्रचारात आणून रघुवर दास यांचा आणि सरकारची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणली.

हेही वाचा : शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

झामुमोचा मौके पे चौका

सरयू राय यांनी प्रचाराच्या काळात 'पक्षातले काही नेते आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात बोलू देत नाहीत,' असा खळबळजनक दावा केला होता. आजपर्यंत विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपवर हा खूप मोठा आरोप होता. भाजपला त्यांच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळाला. विरोधी पक्षांनी सरयू राय यांचा हा आरोप निव्वळ जमशेदपूरच नाही तर राज्यभर पसरवला.

जमशेदपूरमधे काँग्रेसने आपले राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना ट्रिलियनमधे किती शून्य असतात, असा प्रश्न विचारून गौरव वल्लभ सोशल मीडियावर वायरल झाले. पण निवडणुकीच्या राजकारणात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. इथे झारखंड मुक्ती मोर्चाने मित्रपक्षाचा धर्म बाजूला सारत सरयू राय यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे सरयू राय यांनीही झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांच्यासाठी दुमका मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या.

भाजपच्या जनाधाराला स्पेस तयार केली

दुमका इथले ज्येष्ठ पत्रकार अशोक कुमार कोलाजशी बोलताना सांगतात, ‘पाटण्यातल्या सायन्स कॉलेजमधे शिकलेले सरयू राय हे १९७४ मधल्या जेपी आंदोलनातले एक महत्त्वाचे नेते होते. कधीकाळी पत्रकारही होते. २००० मधे झारखंड हे वेगळं राज्य झालं. तेव्हा भाजपकडे झारखंडमधे मोठ्या नेत्यांची वानवा होती. भाजप नेत्यांनी सरयू राय यांना बिहारमधून झारखंडला शिफ्ट व्हायला सांगितलं. सरयू राय यांनी अनेक घोटाळे उघड करून भाजपसाठी स्पेस तयार केली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हाच भाजपचा महत्त्वाचा अजेंडा बनला.’

आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी तयार झालेल्या झारखंडमधे गैर आदिवासींचं राजकारण करणं तसं सोप्पं नाही. पण सरयू राय यांनी उभ्या केलेल्या मुद्द्यांवर आधारित राजकारणाच्या जोरावरच भाजपने गैर आदिवासींचं राजकारण करून दाखवलं. आज भाजपला गैर आदिवासींमधे मोठा जनाधार आहे. एवढंच नाही तर भाजप हा गैर आदिवासींचाच पक्ष आहे. या जनाधारावरच भाजपला गेल्यावेळी बहुमताजवळ जाता आलं.

२०१४ मधे भाजपला सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी सरयू राय यांचं नाव सगळ्यांत आघाडीवर होतं. पण पक्षाने जातीचं समीकरण फिट्ट करण्यासाठी राय यांना बाजूला सारत बिनचेहऱ्याच्या रघुवर दास यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, हे झारखंडमधलं ओपन सिक्रेट आहे.

रघुवर दास यांना मुख्यमंत्री केलं तेव्हाच सरयू राय यांच्या बंडाची ठिणगी पडली. गेली पाच वर्ष मंत्री असतानाही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरच बोट ठेवलं. त्यामुळे मंत्री असूनही हा माणूस आपल्याच सरकारविरोधात बोलायलाही मागंपुढं बघत नाही, असा मेसेज लोकांमधे गेला. आत्ता निवडणुकीच्या काळात लोक ही भावना बोलूनही दाखवत होते.

हेही वाचा : काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

मोदी डिटर्जंट, अमित शाह लाँड्रीही फेल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी सरयू राय यांची जवळीक आहे. या जवळीकीमुळेच तिकीट कापण्यात आल्याचंही बोललं जातं. ते सांगतात, '२०१७ मधे नितीश कुमार यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यावर पक्षात नाराजी आहे. उमेदवारांची निवड करणाऱ्या भाजप संसदीय बोर्डात काम करणाऱ्या कमीत कमी तीन सदस्यांनीच मला ही गोष्ट सांगितलीय. मला तिकीट न देण्यामागचं हे एक कारण आहे.'

मुख्यमंत्री रघुवर दास झारखंडची निर्मिती होण्याआधीपासून जमशेदपूर पूर्व सीटवरून जिंकत आहेत. १९९५ पासून सलग पाचवेळा त्यांनी विजय मिळवलाय. आता ते डबल हॅट्ट्रीक करण्याच्या तयारीत होते. पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या रघुवर दास यांच्या प्रचारासाठीच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री भाजपाध्यक्ष अमित शाह या महास्टार प्रचारकांनीही सभा घेतल्या.

यावर सरयू राय यांनी दिलेली प्रतिक्रिया भाजपला आरसा दाखवणारी आहे. आजवर भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून सत्तेत आलेल्या भाजपने आता डागाळलेल्या माणसासाठी सारी शक्ती पणाला लावलीय. ते म्हणतात, ‘रघुवर दास हे रघुवर डाग आहेत. आता तर हा डाग मोदी डिटर्जंट किंवा अमित शाह यांच्या लाँड्रीतही धुतला जाऊ शकत नाही.’

हेही वाचा : 

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

झारखंडमधल्या एक्झिट पोलच्या आकड्यांचा अर्थ काय?

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन