दिलवाल्यांची दिल्ली चार दिवसांपासून दंगलीत जळतेय. प्रचंड जाळपोळ आणि हिंसा झाल्यानंतर आज दिल्ली जराशी शांत झाली. या दंगलीत पत्रकारांवरही जीवघेणे हल्ले झाले. या दंगलीचं कवरेज करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना आपला धर्मही सिद्ध करून दाखवावा लागला. वाचा एका पत्रकाराचा हा ‘आंखो देखा’ रिपोर्ट.
दिल्लीत चाललेल्या दंगलीचं लाईव कवरेज करायला गेलेल्या एनडीटीवीच्या दोन पत्रकारांना दंगलखोरांनी मारलं. या दोन पत्रकरांपैकी सौरभ शुक्ला यांनी लिहिलेला या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट एनडीटीवीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालाय. या रिपोर्टचा मराठी अनुवाद इथं देत आहोत.
बातम्या कवर करायचं माझं नेहमीचं काम. या कामानंच नेहमीप्रमाणे मंगळवारची सकाळ उजाडली. पण हाच मंगळवार संपता संपता माझ्या आयुष्यातला सगळ्यात भीतीदायक दिवस बनला.
रविवारपासूनच मी ईशान्य दिल्लीत चाललेल्या हिंसक आंदोलनांचं कवरेज करत होतो. मंगळवारी सकाळी ७ ला लाइव रिपोर्टिंग करण्यासाठी मी संसद भवनापासून जवळपास १५ किलोमीटर दूर मौजपूर या भागात गेलो. माझ्यासोबत कॅमेरामॅनही होता.
आम्ही तिथं जे पाहिलं ते अंगाचा थरकाप उडवणारं होतं. लोकांची एक आक्रमक टोळी नागरिकांना लूटत होती. दगडं मारत होती आणि दुकानांची तोडफोडही चालली होती. वातावरणात प्रचंड तणाव होता. बंदुकीतून गोळ्या मारण्याचा आवाज येत होता. रोजची दिल्ली आज वेगळीच वाटत होती. वेगळाच अनुभव येत होता.
हेही वाचा : दिल्ली दंगलीत काय काय झालं, हिंदू-मुस्लिम नसलेल्या पत्रकाराची आँखो देखी
मौजपुर भागाचं कवरेज झाल्यानंतर जवळपास दुपारी १२ ला मी आणि माझ्यासोबत काम करणारा अरविंद गुणशेखर हा साथीदार करावल नगर आणि गोकुळपुरीच्या दिशेनं निघालो. हे भाग अत्यंत संवेदनशील मानले जातात. दंगलखोर मीडियावर खूप चिडलेले होते. म्हणूनच एनडीटीवीचा माईक वापरायचा नाही, असं आम्ही ठरवलं. आता इथून पुढं हिंसा होताना दिसली तर त्याचं कवरेज मोबाईल फोनवरून करायचं ठरवलं.
फारच थोड्यावेळात हिंसा मोठ्या रस्त्यांपासून छोट्या छोट्या गल्ल्यांपर्यंत पोचली. आम्ही घरं जळताना पाहिली. धार्मिक स्थळांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड होताना पाहिलं. त्या दंगलखोरांचा राग हरेकक्षणी वाढतच होता. ‘शिकार करण्यासाठी’ बाहेर पडलेल्या या टोळीतले अनेक तरूण नशेत होते. पोलिसांचा कुठंही पत्ता नव्हता.
दुपारचा एक वाजत आला. सीलमपूरच्या जवळचं एक धार्मिक स्थळाला दंगलखोरांनी टार्गेट केलंय असं मी ऐकलं. आम्ही तिथे पोचले तेव्हा २०० लोकांची टोळी तिथं तोडफोड करत होती. उड्डाणपुलावर जाऊन त्याचं रेकॉर्डींग आम्ही सुरू केलं. सीएनएन न्यूज १८ ची पत्रकार रुनझुन शर्मा हीसुद्धा आमच्यासोबत होती. आसपास तुरळक पोलिस होते. ते काहीही करत नव्हते.
हेही वाचाः एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?
अरविंदपासून जवळपास ५० मीटर लांब मी उभा होतो. तेव्हाच एका दंगलखोरानं त्यांना पकडलं. काय होतंय हे समजायच्या आतच जवळपास ५०-६० दंगलखोरांनी त्यांना मारायला सुरवात केली. आमच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केलेलं सगळं फुटेज डिलिट करा अशी धमकी ते देत होते.
अरविंद जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यांचे तीन दात तुटून पडले होते. त्यांची मदत करण्यासाठी मी पळत तिथं पोचलो तर माझ्याही पाठीवर एक काठी बसली. खरंतर, अरविंद यांच्या डोक्यावर निशाणा साधून ती मारली होती. अरविंदला वाचवण्यासाठी मी त्यांना मिठी मारली. तेव्हा त्या टोळीनं माझ्या पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांचा मारा सुरू केला. माझ्या खांद्यावर काठ्या पडत होत्या.
कसाबसा मी उठलो आणि त्या टोळीला एका विदेशी बातमीदाराचं एक प्रेस क्लब कार्ड दाखवलं. आम्ही कोणत्याही भारतीय टेलिविजन चॅनलसाठी नाही तर एका विदेशी एजन्सीसाठी काम करतोय, असं मी त्यांना सांगितलं.
हेही वाचा : बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?
त्यातल्या एकानं माझं आडनाव वाचलं – ‘शुक्ला’ त्यातल्याच कुणीतरी एकानं बाकीच्यांना सांगितलं की मी ब्राम्हण आहे. मीही माझ्या गळ्यात घातलेला रूद्राक्ष त्यांना दाखवला. माझा धर्म सिद्ध करण्याचा तो प्रयत्न होता. पण हीच गोष्ट माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक होती. माझा जीव वाचवण्यासाठी मला माझा धर्म सिद्ध करावा लागत होता.
मी त्यांच्याच समाजाचा आहे तर त्यांचाच वीडियो का शूट करतोय, असं एका दंगलखोरानं मला विचारलं. हा वीडियो त्यांच्याविरोधात पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यांनी मला थोडे फटके मारले आणि पुन्हा मारायला सुरवात केली.
हात जोडून आम्ही त्यांना सोडून देण्याची विनंती करत होतो. अरविंद तमिळनाडूवरून आलेत आणि त्यांना हिंदी येत नाही, असं मी त्यांना सांगितलं. आमच्यासोबत असलेली रूनझुनसुद्धा आम्हाला सोडून देण्याची विनंती करत होती.
दंगेखोरांनी आमचे मोबाईल काढून घेतले. मोबाईलमधले फोटो आणि वीडियो डिलीट करू लागले. आयफोन कसा वापरतात हेही त्यांना माहीत होतं. ते गोत्यात येतील असं फुटेज मोबाईलमधे नाही ना याचा ते फोनमधल्या सगळ्या फोल्डरमधे शोध घेत होते. त्यानंतर धार्मिक घोषणाबाजी करण्याची बळजबरी ते करू लागले. पुन्हा दिसलात तर जीवे मारून टाकीन अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली.
त्यानंतर फर्स्ट एड करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमधे गेलो आणि मग ऑफिसमधे परत आलो. आम्ही परत येत होतो तेव्हा माझ्या मनात एकच विचार चालला होता. संपूर्ण देशाला लाज वाटावी अशी दिल्लीची परिस्थिती झालीय. मी २०११ मधे दिल्लीत आलो होतो. आता हे शहर तेव्हासारखं राहिलं नाही. दिल्लीच्या नावात ‘दिल’ येतं. पण आज ते हृदय कुठे दिसलंच नाही!
हेही वाचा :
दिल्लीच्या निकालावर कोण काय म्हणालं?
जेएनयूवर हल्ला ही देश ताब्यात घेण्याची तयारी!
खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?
मोदी-ट्रम्प दोस्तीच्या अमेरिकन मस्करीवर हॉटस्टारने बंदी का घातली?
होस्नी मुबारक: इजिप्तवर ३० वर्ष हुकूम राबवणारा शांतताप्रिय सत्ताधीश!
(सौरभ शुक्ला हे एनडीटीवी इंडियात पत्रकार आहेत. एनडीटीवी इंडियाच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या या हिंदी रिपोर्टचा सदानंद घायाळ यांनी हा अनुवाद केलाय.)