महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेकांना घडवलं. सढळहस्ते मदत करुन महत्त्वाच्या नेत्यांना उभं केलं. त्यांच कार्यकर्तृत्व ओळखून त्यांच्या मागे आर्थिक पाठबळही उभारलं. चांगल्या कामाच्या मागे मदत उभी करुन त्यांनी खऱ्याअर्थाने भारताच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराजा सयाजीराव हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होते. स्वतःवर आणि कुटुंबावर कमीत कमी खर्च करून देशभरातल्या संस्थांना आणि व्यक्तींना मदत करून त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला.

पितामह दादाभाई नौरोजी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, योगी अरविंद घोष, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम भिकाजी कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. मदनमोहन मालवीय अशा अनेक मान्यवरांना महाराजांनी मदत केली.

सत्यशोधक चळवळीतील जोतिबा फुलेंचे एक सहकारी रामचंद्र धामणस्कर यांना सयाजीरावांनी दिवाण म्हणून नेमलं. त्या काळात सयाजीरावांनी जोतिबांना बडोद्याला बोलावून त्यांचा दरबारात सत्कार केला. त्यांच्याकडून शेतकर्‍यांच्या आसूडचं हस्तलिखित वाचून घेतलं. शिवाय त्याच्या छपाईसाठी पैशांची मदत केली. जोतिबांवर अर्धांगवायूचा पहिला आघात झाला तेव्हा त्यांना मदत केली.

जोतिबांच्या शेवटच्या आजाराच्या काळात सयाजीरावही आजारी असल्याने त्यांची मदत पोचण्यास उशीर झाला. पण जोतिबांनंतर सयाजीरावांनी सावित्रीबाई आणि जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंतराव यांना दरमहा वीस रुपये पेंशन दिली. जोतिबांचं स्मारक बांधण्यासाठी त्यांनी फंड देऊ केला. पण तेव्हा कुणी स्मारक बांधण्यासाठी पुढे आलं नाही.

उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली. एका विद्यार्थ्याला एकदाच मदत करण्याचा नियम बाजूला ठेवून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चार वर्ष पदवी शिक्षण, दोन वर्षं अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, एक वर्ष पुन्हा शिष्यवृत्ती आणि चौथ्यांदा पुन्हा एका वर्षाची शिष्यवृत्ती दिली. ते बाबासाहेबांना बडोद्याचे अर्थमंत्री बनवू इच्छित होते. पण अस्पृश्यतेमुळे होणार्‍या त्रासामुळे बाबासाहेब मुंबईला परतले.

विविध क्षेत्रांमधल्या देश-विदेशातल्या विद्वान तज्ज्ञांना बडोद्यात मानाने नोकरी देऊन सयाजीरावांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. त्यामुळेच बडोद्यात अर्थतज्ज्ञ आर. सी. दत्त, बालगंधर्व, राजा रविवर्मा, रियासतकार गो. स. सरदेसाई, दादासाहेब फाळके, चिंतामणराव वैद्य, कवी चंद्रशेखर, संगीतक्षेत्रातील दिग्गज भातखंडे, मौलाबक्ष, फैय्याज खान, पळूसकर या कलावंतांना बडोद्यात राजाश्रय मिळाला.

सयाजीरावांच्या आश्रयामुळेच किर्लोस्कर नाटक कंपनीला मराठीतलं पहिलं नाटक करता आलं. बालगंधर्वांच्या नाटक कंपनीला स्वखर्चाने ऑर्गन आणून देऊन महाराष्ट्रात नवं वाद्य रूढ केलं. सयाजीरावांमुळे देशभरातले उत्तम प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, गायक, नाटककार, भाषातज्ज्ञ बडोद्यात जमा झाले होते. सयाजीरावांनीच कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षणप्रसाराची प्रेरणा दिली. शिवाय त्यांना मदतही केली. राजर्षी शाहूंच्या मुलाशी स्वतःच्या नातीचं लग्न लावून त्यांनी नातेसंबंध जोडले होते.

क्रांतिकारकांना मदत करणारे देशातील एकमेव संस्थानिक म्हणून सयाजीरावांचा नवा पैलू उलगडणारे पुरावे बाबा भांड यांनी समोर आणलेत. स्वातंत्र्यासाठीच्या क्रांतिकार्यात आघाडीवर असणारे महर्षी अरविंद घोष, खासेराव जाधव, प्रो. माणिकराव, बॅ. केशवराव देशपांडे, शंकर वाघ हे महाराजांकडे नोकरीलाच होते. राष्ट्रीय विचारांचं साहित्य बडोद्यात छापलं जाई आणि त्याचं देशभर वितरण होत असे.

तसंच ते काँग्रेसच्या अधिवेशनातही हजेरी लावत. त्यांनी महात्मा गांधींना दांडीयात्रेदरम्यान अटक होऊ नये, म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाला वाढत्या पाठिंब्याची कुणकुण इंग्रजांनाही लागली होती. सीआयडीने त्यांच्यावर अहवालही बनवला होता. पण पहिल्या महायुद्धाच्या काळात सयाजीरावांनी हे प्रकरण मुत्सद्दीपणाने हाताळत कोणतीही कारवाई होऊ दिली नाही.