महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.

सलग ६४ वर्ष राज्य करणारे परतंत्र भारतातील सयाजीराव गायकवाड हे एकमेव संस्थानिक राजे होते. त्यांचा कार्यकाळ जितका दीर्घ होता तितकाच महत्त्वाचाही होता. त्यामुळे देशाच्या जडणघडणीतील अनेक क्षेत्रांत ते देशात पहिले आणि एकमेव ठरले. 

शिक्षणक्षेत्रातले बदल

राज्यकारभार हाती आल्यावर दुसर्‍याच वर्षी १८८२ ला अस्पृश्य आणि आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण आणि वसतिगृह देण्याचा आदेश काढला. तोपर्यंत जगात शोषितांसाठी असा कायदा कुठेच नव्हता. १८८५ ला त्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरवात केली. महिलांसाठी व्यायामशाळा काढल्या. त्याआधी पत्नीला शिक्षण देऊन घरापासून याची सुरवात केली. 

१८८७ साली मैलाबक्ष खान यांच्या मदतीने भारतातलं पहिलं संगीत कॉलेज सुरू केलं. औद्योगिक कौशल्यांचा शिक्षणात अंतर्भाव करण्यासाठी १८९० साली कलाभवनची स्थापन केली. त्याला पुढे त्याला आधुनिक इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची जोड दिली. १८९२ ला भारतात पहिल्यांदाच सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करण्यात आला. १९०६ मधे महाराजा सयाजीराव गायकवाड आयुर्वेदिक विद्यापीठाची स्थापना केली.

१९०७ ला गाव तिथे ग्रंथालय असा भारतातला पहिला प्रयोग सुरू केला. वाड्या, तांड्यांवर पत्र्यांच्या पेटीतून फिरतं वाचनालय सुरू करण्यात आलं. १९१० ला सेंट्रल लायब्ररी हे तेव्हा आशियातील सर्वात मोठं ग्रंथालय सुरू केलं. मुलामुलींना शाळांतून शारीरिक शिक्षण सक्तीचं केलं. १९१५ साली संस्कृत कॉलेज सुरू केलं. १९३८ ला निरक्षरांसाठी प्रौढशिक्षणाची सुरवात केली. शिक्षण विभागात स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू केला. तो भारतातला पहिला प्रयत्न होता. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्यं प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम शाळांत राबवला. दहा हजार पानांच्या मराठी क्रीडाकोशाचंही प्रकाशन केलं.

धार्मिकदृष्ट्या समान पातळीवर 

१८८६ मधेच राजवाड्यातला पंगत भेद दूर करून सहभोजनाला सुरुवात केली. स्वतः अस्पृश्यांसोबत बसून जेवू लागले. १८९४ मधेच दानधर्माचे नियम करून सरकारकडून होणार्‍या धार्मिक उधळपट्टी आणि ऐतखाऊपणाला आळा घातला. १९०४ साली कायद्याने बालविवाह बंदी करून लग्नासाठी मुलाचं वय १६ वर्ष आणि मुलीचं वय १२ वर्ष केलं. विधवा पुनर्विवाहासाठीही कायदा केला. 

अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश खुला करण्यासाठी आदेश काढण्यात आला. त्याआधी महाराजांनी स्वतःचा राजवाडा, मालकीचं खंडोबाचं मंदिर ही ठिकाणं अस्पृश्यांसाठी खुली केली होती. १९०५ ला पुरोहितांसाठी कायदा केला. पूजा किंवा धार्मिक कार्य यासाठी पुरोहिताकडे सरकारी लायसन्स सक्तीचं करण्यात आलं. ब्राह्मणेतर मुलांसाठी वैदिक पाठशाळा सुरू केली. सोबत विधवा आणि मुलींना माहेरच्या उत्पन्नात कायद्याने वाटा दिला. १९३२ मधेच जातपात पाळू नये असा सयाजीरावांनी कायदा केला.

महत्त्वाचे राजकीय निर्णय

१८९१ ला ग्रामपंचायतीचा कायदा करून ग्रामपंचायतींना अधिकार दिले तसंच सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. ग्रामपंचायतीचा सदस्य किमान साक्षर असावा, असा कायदा केला. १९०७ साली बडोद्यात धारासभा म्हणजेच राज्य विधिमंडळाची स्थापना केली. या सभेचा एक सदस्य मागासवर्गाचा प्रतिनिधी सक्तीचा केला. त्याजागी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करून नवा आदर्श निर्माण केला. ही भारतातील लोकशाहीची एका अर्थाने सुरवात होती. डॉ. आंबेडकरांनीनी लिहून ठेवलंय, महाराजा सयाजीराव यांनी केलेले कायदे हे युरोप-अमेरिकेतल्या सुधारलेल्या देशांहून पुढारलेले होते.

हुकूम अर्थात सरकारी आदेश लोकांपर्यंत पोचून त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी एक यंत्रणा विकसित केली. त्यानुसार हे हुकूम सरकारी पत्रिकेत प्रकाशित होत आणि गावातील चावडीवर चिकटवले जायचे. कारभार स्थानिक भाषेत चालावा यासाठी राजव्यवहारकोशाचं चार भाषांमधे प्रकाशन केलं. 

शेतीविषयक धोरण

सयाजीराव गायकवाडांनी १८८५ ला आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना गणदेवी इथं काढला. तो आजही देशातला एक उत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. १९०४ ला शेतकर्‍यांची बँक आणि सहकारी पतपेढ्यांची सुरवात हा आशिया खंडातील पहिला प्रयोग ठरलाय. अजवा इथं सयाजी सरोवराचं काम १८८५ ला सुरू करून १८९० ला पूर्ण केलं. ते बहुधा देशातलं पहिलं धरण असावं. दुष्काळ निवारणासाठी १९०१ साली फॅमिन कोड ही मार्गदर्शक संहिता तयार करून त्याची अंमलबजावणी केली. 

संस्था आणि परिषदांचे प्रमुख लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत १९११ ला झालेल्या पहिल्या जागतिक मानववंश परिषदेचे अध्यक्ष होते. १९१८ मधे मुंबईत झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते.

संस्थांच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान

जागतिक प्राच्यविद्या संमेलनाचं त्यांनी बडोद्यात आयोजन केलं. बनारस हिंदू युनिवर्सिटीचे तहहयात चॅन्सेलर अर्थात कुलपती म्हणूनही  त्यांनी काम पाहिलं. शिवाय अलीगढ मुस्लिम कॉलेज, अंजुमन इस्लाम या शिक्षणसंस्थांच्याही उभारणीत मदत केली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आधीच १८८५ साली पाटण येथे गायकवाड ओरिएंटल इन्स्टिट्यूटची स्थापन करून भारतविद्येच्या अभ्यासाला सुरवात केली. 

१९३३ मधे अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान लाभला. लंडन येथील पहिल्या जागतित शांतता परिषदेचंही अध्यक्षपद भूषवलं. ब्रिटिश लायब्ररी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. ग्रंथप्रेमाबद्दल लंडनच्या प्रसिद्ध द लायब्ररी रिव्यू अँड फ्रेंड्स सोसायटीने मानपत्र देऊन सन्मान केला. मराठीबरोबरच हिंदी, संस्कृत साहित्य संमेलनांनाही मार्गदर्शन केलं.