सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


तसं कुठलाही राजा हा उत्तम व्यवस्थापक असायलाच हवा. तरच तो प्रभावी राजा होऊ शकतो. पण सगळेच राजे काही तसे नसतात. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज केवळ उत्तम व्यवस्थापकच नव्हते तर ते व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ होते. तेव्हाही आणि आताही. केवळ राजांसाठीच नाही तर आजही सर्वच प्रकारच्या संस्था, कंपन्यांसाठी ते एक सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आहेत. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.

कुणी म्हणेल एकोणिसाव्या शतकातला, पारतंत्र्यातला एका छोट्याशा राज्याचा राजा कसा काय मॅनेजमेंट गुरू होऊ शकतो? असा प्रश्न मनात आला असेल. पण आपल्याला मॅनेजमेंट गुरू म्हणजे काय हे माहीत होईल, तेव्हा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या बाबतीतलं सत्य कळेल. 

मॅनेजमेंट गुरू म्हणजे काय?

सर्व जगासाठी एक रोल मॉडेल. जगासाठी एक आदर्श. जगन्मान्यता मिळालेला. अतुलनीय दृष्टेपण असलेला. काळाच्या फार पुढे असलेला. प्रेरक नेतृत्वक्षमता असलेला. आर्थिक व्यवहार कुशलच नाही तर आपली अर्थव्यवस्था भरभक्कम करणारा. आपत्तीची आधीच चाहूल घेऊन त्याचा पुर्वनियोजित, सुयोग्य बंदोबस्त करु शकणारा. संवादशिरोमणी. नि:संशय विश्वसनीयता असलेला. आपल्या मानवी क्षमतांचा अनेकांगी, पुरेपूर वापर करणारा. अचूक निर्णयक्षमता असणारा. यासारखी गुणवैशिष्ट्य अंगी असलेला माणूस आजकाल मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखला जातो.

मॅनेजमेंट गुरू अशी ख्याती असलेल्या लोकांमधे आणखीही काही लक्षणीय गोष्टी असतात. अतिशय विपरीत परिस्थितीतही शांतपणे काम करणारा. नवीन कल्पनांचा सतत शोध घेणारा, स्वागत करणारा. बदलांना सहज सामोरा जाणाराच एवढंच नाही तर अनेक मुलग्राही बदल जाणीवपूर्वक घडवून आणणारा. विलक्षण विश्लेषणात्मक शक्ती असणारा. धोरणधुरंदर. चांगलं संघटन कौशल्य असलेला. नियोजनात निपूण. सभोवतालचे कलह अगदी सहज सोडवण्याचं चातुर्य असणारा. सदैव सहानुभूतीसह काम करणारा. सतत चांगली, सक्षम माणसं हेरुन त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर संस्थेसाठी करुन घेणाराच नाही तर त्यांच्या गुणांची सुयोग्य कदर करणारा.

सयाजीराव महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं तर वरचे सर्व गुणविशेष त्यांच्यामधे अगदी शिगोशिग भरलेले दिसतात. तसं महाराज अगदी अपघातानेच राजे झालेले. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्यावर ही जबाबदारी आली. तोवर शेतकरी असलेल्या कुटुंबात केवळ खेळणंबागडणं सुरू होतं. महाराष्ट्रातल्या कवळाणे या आडवळणाच्या गावात महाराजांचा जन्म झाला.

शेतकऱ्याचं पोरं राजघराण्यात दत्तकपुत्र

खंडेराव गायकवाड महाराज अकाली वारल्यानंतर त्यांच्याजागी मल्हाराव महाराज यांची नियुक्ती झाली. ते काही राज्य चालवण्यास सक्षम नव्हते. तशातही इंग्रज रेसिडेंटवर विषप्रयोग करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. नंतर पदच्युती झाली. त्यामुळे गायकवाड घराण्यातूनच दत्तक घेण्याची कल्पना समोर आली. पण बडोद्यात कुणी योग्य उमेदवार मिळाला नाही. 

मग शोधाशोध करताना महाराष्ट्रातल्या कवळाणे गावतलं गोपाळ नावाचं चुणचुणीत पोरगं मिळालं. कुणाच्या काही ध्यानीमनी नसताना १८७५ मधे त्या पोराला राजगादीवर बसवलं. तोवर शाळेचा गंध नाही. गुजरात आणि गुजराती भाषा माहीत नाही. राज्यकारभार वगैरे कधी बघितला नव्हता. अगदी स्वप्नातही नाही. पण तोच पोरगा पुढे आपले लाडके सयाजीराव गायकवाड महाराज म्हणून जगविख्यात झाला.

सयाजीरावांनी खंडेराव राजांच्या तरुण विधवा जमनाबाईंचा दत्तकपूत्र म्हणून राज्यकारभार सुरु केला. त्यांच्या कारभारावर इंग्रजसुद्धा खूश असायचे. तोपर्यंत बडोद्याचा सर्व कारभार सयाजीरावांच्या हातात आला होता. अजाण, अज्ञानी राजा ही ओळख केवळ नावापुरतीच राहिली.

संस्थानातली अनागोंदी आणि सयाजीरावांचा कारभार

राज्यावर ७० लाख रुपयांचं कर्ज होतं. संस्थानात कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. परकीय राज्यकर्ते इंग्रज, मानकरी, कारभारी, दरबारी, अधिकारी, व्यापारी हे सगळेच जण मनमानी करत होते. या सगळ्यात जनतेला कुणी वालीच राहिला नाही. जनतेचं मात्र असहाय्य, हतबल होऊन मुकाट्याने रोजचे अन्याय, अत्याचार सोसणं सुरुच होतं. जनतेसाठी न्याय मागायचीही कुठं सोय नव्हती.

अशातच सयाजीरावांच्या औपचारिक शिक्षणाला सुरवात झाली. उच्चविद्याविभूषीत इंग्रज अधिकारी एफ. एच. इलियट हे गुरु म्हणून लाभले. टी. माधवराव यांच्यासारखे कर्तबगार दिवाण साथीला होते. सहा वर्षात सर्व शिक्षण संपवून १८८१ मधे सयाजीरावांनी सगळा राज्यकारभार आपल्या हाती घेतला. तिथूनच एका नव्या, कर्तृत्वसंपन्न, आदर्श युगाचीही सुरवात झाली.

स्वतःची बुद्धी आणि नवनवीन कल्पनांचा वापर करत स्वतंत्र राज्यकारभार सुरु केला. अतिशय सावधपणे इंग्रज राज्यकर्ते, गायकवाड घराण्यातले मानकरी, जुने अधिकारी या सगळ्यांचा तोल सावरत संस्थानाचा गाडा हाकणं सुरू झालं. राज्याचा कारभार हाती घेतातच सयाजीरावांनी पहिलं काम केलं ते म्हणजे धुळीतून, घोड्यावर, बैलगाडीतून प्रवास करून आपल्या प्रजेचं जगणं समजून घेतलं.

सगळ्यांना सोबत घेण्याची दूरदृष्टी

१८८१ ला डांग या आदिवासीबहुल प्रांतातली आदिवासी आणि अस्पृश्यांची दयनीय स्थिती बघितली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी १८८२ मधे आदिवासी आणि अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. कडी प्रांतात दौरा केला. हा सगळा ‘कालीप्रजा’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या आदिवासी समाजाचा बहुसंख्या असलेला भाग. तिथल्या आदिवासींचं शोषण बघून सयाजीरावांनी वेठबिगारी कायद्याने बंद केली,

ही संवेदनशीलता, सहानुभूती आणि एवढंच नाही तर सर्व स्टेक होल्डर्सबद्दलची विकासाची दुरदृष्टी सयाजीरावांमधे वयाच्या १८-१९ व्या वर्षी बघायला मिळते. पुढे याच कालीप्रजेच्या लोकांना काहींनी भडकलं. त्यामुळेया लोकांनी संस्थानाविरोधात बंडाचा झेंडा उगारला. पण सयारीजावांनी हे बंडही अतिशय शांतपणे थंड केलं.

राज्यात पहिल्यांदाच प्रत्येक हुकूम लेखी, तेही दफ्तरी व्यवस्थित नोंदवून घेतले जाऊ लागले. असे ५०-६० हजार लेखी आदेश आजही नीट सांभाळून ठेवलेले सापडतात. हे सर्व निर्णय, सामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी इंग्रजी गॅझेटसारखंच साप्ताहिक ‘आज्ञापत्रिका’च्या माध्यमातून प्रसिद्ध केले जायचे. कुठलं काम कुणी बघायचं, किती वेळेत करायचं याची नीट घडी लावली. त्यामुळे दरबारी विस्कळीतपणाला कुठला थाराच राहिला नाही.

लोककल्याणासोबतच उत्पन्नवाढीसाठीही प्रयत्न

लोक कल्याणकारी निर्णय घेतानाच महाराजांनी आर्थिक व्यवहारात शिस्त आणण्याचं कामही सुरू केलं. अगदी खुद्द राजघराण्याचा खर्चसुद्धा नियंत्रणात आणला. पूर्व परवानगीशिवाय खर्च करण्यावर बंदी आणली. प्रत्येक विभागाचं अंदाजपत्रक, खर्चाचं ऑडिट केलं जाऊ लागलं. शंका असेल तिथे महाराज स्वतः जातीने तपासणी करायचे. अगदी स्वतःच्या लग्नाच्या खर्चाचासुद्धा नीट आढावा घेतला. महाराजांच्या मुलांचीही यातून सुटका झाली नाही. अशी ही कठोर फिस्कल डिसिपलीन अर्थात आर्थिक शिस्त महाराजांच्या कारभारात होती.

संस्थानाचं उत्पन्न वाढवण्यासाठीही महाराजांनी पद्धतशीर प्रयत्न केले. त्यासाठी जमिनीचे मोजमाप, प्रतवारी, नीट दस्ताऐवजीकरण केलं जाऊ लागलं. वर्षानुवर्षे सारा चुकवणारे मोठे जमीनदार, देवस्थानं आणि खाशा मंडळींकडून व्यवस्थित वसुली सुरू झाली. अशा वसुलीविरुद्ध बंड करणाऱ्या ठाकोरांचा सशस्त्र उठाव अगदी कमीतकमी नुकसान करुन मोडून काढण्यात आला.

साधारणतः राज्याच्या चार वर्षांच्या उत्पन्नाएवढी रक्कम कायमची गंगाजळी म्हणून ठेवण्याची व्यवस्था केली. दुष्काळी परिस्थितीत जातीने गावांची पाहणी करत मदत आणि भविष्यातील आपत्ती निवारण नियोजन केलं. महाराजांचं हे धोरण आजकाल मॅनेजमेंटमधे शिकवल्या जाणाऱ्या वित्तीय आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत धोरणाची ब्ल्यू प्रिंटच म्हणावी लागले.

कर्जबाजारी राज्य ठरलं जगात अव्वल

संस्थानाचं उत्पन्न वाढताच रयतेसाठी रस्ते, रेल्वे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी, झाकरी, छत्राल, साबरमती, सरस्वती इत्यादी नद्यांवर, नाल्यांवर बांधबंधारे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण, शेतीशाळा, व्यायामशाळा, न्यायालयं, दवाखाने, आरोग्य शिक्षण, वाचनालयं, जंगलतोड थांबवून बांधावर झाडे लावण्याची सक्ती, शेतीची आधुनिक अवजारं, बी बियाणं, प्रदर्शनं, शेती प्रयोगशाळा, नोकरदारांचे नियमित पगार, पेन्शन इत्यादी सुविधा द्यायला सुरवात झाली.

कर्जबाजारी असलेलं राज्य महाराजांनी जगात आठव्या क्रमांकावर आणलं. हे फिस्कल टर्नअराऊंड केवळ महाराजांसारखा व्यवस्थापन गुरुच करु जाणे.

देशाचं उज्ज्वल भविष्य, रयतेचं सुख, राज्याची उत्पन्न वाढ या सगळ्यांसाठी शेतीसंबंधी अद्यावत शिक्षण आवश्यक आहे, असा विचार मांडणारे सयाजीराव महाराजा हे त्या काळातले पहिलेच राजे म्हणावे लागलीत. त्यासाठी खास शिष्यवृत्ती देऊन अनेकांना इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवलं. १८९० मधे अॅग्रीकल्चर विभाग सुरु करणारं बडोदा हे पहिलं संस्थान ठरलं.

राज्य कारभार हाती घेतल्यावर महाराज १८८७ मधे पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर गेले. त्यांच्या दौऱ्याला सनातनी, कडव्या विचारांच्या लोकांनी खूप विरोध केला. पण महाराजांनी या कोल्हेकुईला पद्धतशीरपणे बगल दिली. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रिया आदी देशांच्या दौऱ्यातून महाराजांनी आपल्या संस्थानासाठी अनेक कल्पना आणल्या. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातली तज्ञ, हुशार माणसं जोडली.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान

तत्कालीन इंग्रज सत्तेला कुठलीही खबर न लागू देता महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या अनेक जहाल लोकांना मदत केली. महाराजांच्या परदेश दौऱ्यात तर इंग्रजांचं गुप्तहेर खातेसुद्धा जेरीस यायचं.

सगळी सत्ता एकहाती असतानाही महाराजांनी सतत सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार अमलात आणला. स्थानिक पातळीवर अधिकार असणाऱ्या ग्रामपंचायतींची स्थापना केली. सत्ता आणि संपत्तीपिपासू इंग्रजी अधिकाऱ्याच्या अगदी महाराजांच्या बडतर्फीसाठीची कारस्थानं अगदी चतुराईनं हाणून पाडली. राज्याच्या हितासाठी संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली. पण वेळप्रसंगी व्हॉईसरॉय कर्झन, रेसिडेंट मीडसारख्या अधिकाऱ्यांना ‘परदेश प्रवासासाठी वारंवार परवानगी मागायला मी काही इंग्रजांचा नोकर नाही’ असं बाणेदारपणे सुनवायलापण महाराजांनी कुठला मुलाहिजा बाळगला नाही.

राणी आणि पूत्र वियोगांसारख्या दु:खद प्रसंगातूनही ते सहजपणे बाहेर आले. अशा कठीण प्रसंगी आपल्या भावभावना नियंत्रित ठेऊन राज्य कारभार अगदी सुरळीत सुरु ठेवला. यात महाराजांच्या प्रखर भावनिक बुद्धिमत्तेचा परिचय होतो.

महाराजांनी आपल्या राज्यकारभारात आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा अवलंब केला. महत्त्वाचं म्हणजे हे शास्त्र त्यावेळी अगदी बाल्यावस्थेत होतं. आजही हे जगातल्या सर्व राज्यकर्त्यांना, ज्येष्ठ व्यवस्थापकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. यात कुणालाही शंका असण्याचं कारण नाही. अद्वितीय राजा सयाजीराव गायकवाड महाराजांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.