परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य.

स्वातंत्र्यपूर्वकाळात धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाहीचा पाठपुरावा करणारा राजा अशी महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ओळख आहे. तरीही सयाजीरावांनी माणसांच्या जीवनातील धर्माचे स्थान याकडे सामिलकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं.

धर्माच्या नावाखाली गोरगरिबांना आणि सर्वांना ताडणाऱ्यांना पायबंद घालणारे कायदे करून, अंधश्रद्धा - बुवाबाजी, व्यसनापासून दूर रहा असं प्रबोधन करणाऱ्या पगारी प्रवचनकार-कीर्तनकारांच्या सयाजीरावांनी नेमणुका केल्या. हिंदुस्थानात धर्मविषयक सामाजिक सुधारणासाठीचे कायदे अन् पगारी प्रवचनकारांची मदत हा अनोखा प्रयोग होता.

राज्यकारभार हाती येताच काही वर्षांत सयाजीराव यांच्या लक्षात आलं, या देशात धर्मसत्ता फार महत्त्वाची आहे. धर्मसत्तेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फरपट, नाडवणूक आणि पिळवणूक वर्षानुवर्षे होत आली आहे. 

खरा धर्म अभागी आणि दु:खी लोकांची काळजी घ्यायला आणि त्यांना सुखी करायला सांगतो, सर्व लोकांबद्दल आदर बाळगायला शिकवितो. आधुनिक धर्माची मुख्य तत्त्वे माणुसकी, सारखेपण, समतोलपण, सेवा आणि नीती यातच आहेत; पण धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा, बुवाबाजी अन् कर्मकांडाच्या नावाखाली जनसामान्यांची पिळवणूक करणं धर्माच्या मूळ उद्दिष्टांविरुद्ध आहे. सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करून त्या त्या धर्माच्या अभ्यासकांच्या मदतीने धर्मखात्याची सुरवात केली. हा महाराजांचा निर्णय म्हणजे परिवर्तनशील जगातील सामाजिक सुधारणांचा श्रीगणेशा होता.

याचा प्रत्यक्ष कार्यभाग म्हणूनच विठ्ठल रामजी शिंदे या बहुजनवर्गातील अभ्यासकास धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी दोन वर्षांची लंडनची शिष्यवृत्ती दिली. तो अभ्यास पूर्ण करून परत आलेले वि. रा. शिंदे हे पुढं कर्मवीर आणि महर्षी या त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राला लाभले. एवढेच नाही, तर महर्षी शिंदे यांनी हिंदुस्थानात अस्पृश्योधाराचे महात्मा गांधी आणि भीमराव आंबेडकरांच्या अगोदर काम सुरू करून या कार्याची पायाभरणी केली. महर्षी शिंदे यांच्या या कार्यात महाराजा सयाजीरावांनी शेवटपर्यंत सढळ हाताने मदतही केली.

जनसेवेतच ईश्वराची उपासना

सयाजीराव यांनी स्वत: सर्व धर्मग्रंथांचे वाचन, श्रवण आणि मननातून धर्म आणि परमेश्वराबद्दलची आपली मते बनवली. त्यांनी ओळखलं धर्म माणसाकरिता आहे, मनुष्य धर्माकरिता नाही. सर्वधर्म हे अखिल मानवजातीचे धन आहे. जे स्वत: प्रयत्न करतात, त्यांनाच परमेश्वर पावतो आणि प्रत्येक माणसाच्या ठायी परमेश्वराचे ठाण आहे. जगाचा मोक्ष विश्वबंधुत्वाच्या कल्पनेत आहे. प्रजेचे कल्याण हेच राजप्रमुखाचे अन् वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कारभाऱ्याचे कर्तव्य आहे आणि त्यातच त्यांचा मोक्षही असतो. खरा धर्म मानव कल्याणाचाच विचार करतो. याकरिता धर्मजागृती करावी लागेल. यासाठी आपलं स्वत:चं आचरण आपण डोळसपणे बघावं. 

शिकागो जागतिक सर्वधर्म परिषदेचे सयाजीराव अध्यक्ष

जागतिक विचारवंत मॅकियावलीचा ‘द प्रिन्स’ या राजकीय गीता असलेल्या ग्रंथाचा सयाजीरावांचा चांगला अभ्यास होता. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी आपापली लक्ष्मणरेषा ओळखली पाहिजे, असे सयाजीराव म्हणत. धर्ममूल्ये आणि नागरी मूल्यांची सांगड घालण्याचे कौशल्य विवेकी प्रशासकात असलं पाहिजे. ईश्वराची नेमकी व्याख्या काय करावी आणि परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान काय, ह्याबद्दल सयाजीराव वेळोवेळी स्पष्ट विचार मांडत असत.

जागतिक सर्वधर्म परिषद (World Parliament of Religions) शिकागो येथून महाराजा सयाजीराव गायकवाड यांना पत्र आलं. दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं, अशी महाराजांना विनंती करण्यात आली होती. चाळीस वर्षांपूर्वी १८९३ मधे शिकागो इथं पहिली जागतिक सर्व धर्म परिषद भरली होती. या परिषदेत स्वामी विवेकानंद या भारतमातेच्या सुपुत्राने एक वक्ता म्हणून आपल्या वक्तृत्वाने हिंदू धर्माची पताका साता समुद्रापलीकडे फडकावली होती.

Second World Parliament of Religions चे अध्यक्षस्थान मिळतेय हा सन्मान या देशाचा अन् हिंदू धर्माचा आहे, या कर्तव्य अन् जबाबदारीच्या भावनेने त्यांनी आमंत्रण स्वीकारलं.

सयाजीरावांना आणखी एका कारणाने समाधान झालं. २७ ऑगस्ट हा जागतिक शांतता दिन म्हणून पाळला जाणार होता, त्याच दिवशी उपस्थित राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी शांतता रक्षणाच्या करारावर सह्या करायाच्या होत्या. हे स्वप्न साकारण्यासाठी जगभरातील सगळ्यांनी युद्ध कल्पनेचा त्याग केला पाहिजे. यासाठी जगातील सर्व धर्मच चालना देऊ शकतील असा सयाजीराव महाराजांचा ठाम विश्वास होता. त्यांनी World Fellowship of Faith चं निमंत्रणही स्वीकारलं.

Second World Parliament of Religions साठी २६ ऑगस्ट, १९३३ ला महाराज शिकागोला पोचले. परिषदेच्या उद्घाटनाआधी अध्यक्षांचे अमेरिकन सरकारतर्फे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आलं. दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष होते अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट मिस्टर हूव्हर.

२७ ऑगस्ट, १९३३ हा जागतिक शांतता दिवस आणि सर्वधर्म परिषदेचे अधिवेशन असा दुहेरी शर्करायोग जुळून आला. जगभरातील बौद्ध, ख्रिस्ती, शीख, टाओ, कॉन्फयूशियन, हिंदू, जैन, यहुदी, महंमदी, शिंतो, जरथुष्ट्री या अकरा धर्मांचे आणि पन्नासहून अधिक देशातून धर्म प्रतिनिधी हजर होते. धर्म अन् त्यासंबंधी आस्था असलेल्या 26 हजार श्रोत्यांनी सभागृह फुलून गेलं होते.

महाराजा सयाजीरावांनी संयोजकांचे आभार मानून बोलायला सुरवात केली, ‘‘सर्व धर्माचीच साक्षात माता हिंदमातेचा हा सन्मान आहे. हल्लीचे युग अंत:क्षोभाचे आणि अंदाधुंदीचे आहे; पण ते स्थित्यंतराचे आणि जागृतीचे आहे. सांप्रतकाळी आपल्या सर्वांच्या अंत:करणाला परिवर्तन होण्याची गरज आहे. स्फूर्ती आणि ज्ञानप्राप्तीसाठी धर्माची जरुरी आहे; धर्मामुळे अडचण न होता त्या धर्माची पुनर्घटना झाली पाहिजे.’’

परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान

हिंदू धर्माची प्राचीन मूलतत्त्वे, परमेश्वराचे सच्चिदानंद स्वरूप, नीती धर्मशास्त्राची थोरवी सोबत बदलत्या काळात विज्ञानासोबत सर्व शास्त्र नव्या सृष्टीने निर्माते आहेत. चार्वाक, गौतमबुद्ध, श्रीकृष्ण, येशू या  महात्म्यांनी आणि सर्व साधुसंतांनी धर्माच्या बाबतीत जी व्यवहारबुद्धी दाखवली ती आजची सर्वांची गरज आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि समान वाटप होण्यासाठी विश्वबंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी जो धर्म मानवाच्या उपयोगी पडेल, तोच खरा धर्म आहे. 

खऱ्या धर्मामुळेच धर्मातील पोकळ अवंडबर दूर होऊन तो सामान्य माणसाला दोन वेळेच्या भाकरीप्रमाणे ओळखता यावा असं सहज धर्मच जनसामान्याला जगण्याची खरी दिशा दाखवेल, असा विश्वबंधुत्वाचा संदेश देत आणि परिवर्तनशील जगात धर्माचं स्थान कसं असावं, हे नेटकेपणाने सांगत महाराजांनी भाषण संपविले.

आजच्या काळातील महत्व

सयाजीराव गायकवाड यांचे सर्व धर्म परिषदेतील भाषण आजच्या सामाजिक अस्थिरतेवर मार्ग शोधण्याचे साधन होऊ शकेल. यासोबत हिंदू धर्माची उत्क्रांती, आपणास हवा असलेला धर्म, धार्मिक भ्रातृभाव आणि विश्वबंधुत्वाचे एकीकरण ही आजची गरज, तत्त्वज्ञान म्हणजे निसर्ग, ईश्वर आणि मनुष्यसंबंधाची ज्ञानशाखा, दानधर्म हा अनुकंपा अथवा आस्थेच्या पायावर उभा आणि धर्मशिक्षणाची जरूर या भाषणातून महाराजांनी मांडली आहे.

८५ वर्षांपूर्वी जागतिक सर्वधर्म परिषदेच्या अध्यक्षपदी मानवकल्याणाचा आणि विश्वबंधुत्वाचा त्यांचा संदेश, ही पुन्हा आजची गरज आहे.