यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. नरेंद्रसिंग कपानी यांचं नाव आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या कृपाणी यांनी फायबर ऑप्टिक्स सारखी महत्वाची संकल्पना जगाला दिली. वैज्ञानिक असण्यासोबतच ते यशस्वी उद्योजक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारी रुचिरा सावंत यांची ही फेसबुक पोस्ट.
आपल्या अवतीभवती आपण अनेक मोठे लोक पाहत असतो. त्यांचं दैदिप्यमान यश, प्रतिष्ठा, त्यांच्या जवळ असणाऱ्या अनेक कला, विविध क्षेत्रातली त्यांची उल्लेखनीय गती कळत नकळत आपल्याला भुरळ घालते. हे सारं पाहून काही वेळा आपल्या खुजेपणाची जाणीव होते. आपल्या स्वप्नांवर आणि स्वतःवर शंका सुद्धा येते.
काही जणांना पाहून मात्र मिळते ती अविरत प्रेरणा आणि खूप सकारात्मकता. त्यांना आणि त्यांच्या मोठेपणाला पाहून न्यूनगंड निर्माण होत नाही तर त्यांच्यासारखंच होण्यासाठी आणि स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ‘The Man Who bent light ‘ अशी ओळख असणारे डॉ नरेंद्रसिंग कपानी म्हणजे यापैकी दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व.
हेही वाचा: कशी चालेल फाइव जीची जादू?
पाहताच क्षणी नजरेत भरेल अशी पंजाबी माणसाला शोभणारी उंची आणि भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले डॉ. कपानी म्हणजे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि फायबर ऑप्टिक्सचे जनक. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या देहराडून या निसर्गरम्य ठिकाणचं बालपण. तिथल्याच शाळेत शिकत असताना एकदा शिक्षकांनी केलेलं ‘प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो.’ हे विधान काही त्यांना पटलं नाही.
नदीतून वाहणाऱ्या पाण्यातून परावर्तित होणारा प्रकाश त्यांना जणू काहीतरी सांगत असतो आणि त्याच क्षणी सरांचं हे विधान चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा विडा हा मुलगा उचलतो. पुढे आग्रा युनिवर्सिटीतून पदवी संपादन केल्यानंतर तोे लंडनच्या इंपेरिकल कॉलेजला पुढील शिक्षणासाठी दाखल होतो. तिथं जाण्यापूर्वी शिक्षण घेऊन भारतात परत येणं आणि स्वतःची कंपनी सुरु करणं अशी महत्वाकांक्षा घेऊन हा मुलगा तिथं जातो. पण त्याच्या हातून मात्र काहीतरी वेगळंच घडणार असतं.
‘रॉयल सोसायटी’ ची स्कॉलरशिप मिळाल्यानंतर साधारण दीड वर्ष ते ऑप्टिकल फायबरवर काम करतात. हे ऑप्टिकल फायबर बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. अपेक्षित परिणामासाठी तिथल्या प्रसिद्ध पिल्किंगटन ग्लास कंपनीमधे जाऊन स्वतः मटेरियल निवडून देतात. पण कंपनी त्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष करते आणि बीयर बॉटल बनवण्यासाठी वापरतात ते ग्रीन ग्लास वापरून ऑप्टिकल फायबर बनवते.
परिणामी दुसरं ऑप्टिकल फायबर बनवावं लागतं. अनेक अडथळे पार करत अखेर १९५४ मधे प्रकाश वक्र ग्लास फायबरमधून प्रवास करू शकतो, हे दाखवून देण्यात जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ते यश मिळवतात. त्यानंतर मात्र आपल्या इंपेरिकल कॉलेज मधल्या प्रोफेसरना आपला भारतात परतण्याचा विचार ते बोलून दाखवतात.
प्रोफेसर त्यांच्याकडून आणखी दोन महिन्याची मुदत मागतात आणि दोन महिन्यांनंतर थेट लंडन सिनेटकडून त्यांच्यासाठी पीएचडी थिसीस लिहिण्याची परवानगी आणतात. पण कपानींना पीएचडीपेक्षा ऑप्टिकल फायबरच्या व्यवहारी उपयोगात जास्त रस असल्यानं तसंच पीएचडी केल्यानं माणूस पुस्तकी किडा होतो असा त्यांचा पूर्वग्रह असल्याने त्यांना हे पसंत पडलं नाही.
हेही वाचा: गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’
त्यांना प्रॅक्टिकल व्यक्ती व्हायचं असतं. नाईलाजाने आणि नापसंतीने ते ती संधी स्वीकारतात. पण नाईलाजाने स्वीकारलेली हीच संधी त्यांचं आयुष्य बदलणार असते. पुढचे ६ महिने तेे त्यावर काम करतात. ‘A Flexible Fibrescope using Static Scanning’ नावाचा रिसर्च पेपर ‘द नेचर' नावाच्या सुप्रसिद्ध जर्नलमधे प्रसिद्धही करतात.
त्यानंतर मात्र भारतात परत येण्याचा त्यांचा विचार बळावतो आणि पंडित नेहरूंची भेट त्या विचाराला आणखी दृढ करते. सायंटिफिक ऍडवायजर ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या पदासाठी नेहरू त्यांना नियुक्तीबाबत विचारतात. डॉ कपानींनाही यात रस वाटतो. पण त्यांच्या पीएचडी नंतरचं पहिलंच पब्लिकेशन इटलीतल्या फ्लोरेन्समधल्या एका परिषदेत सादर झाल्यावर रॉचेस्टर युनिवर्सिटीचे एक वैज्ञानिक त्यांना भेटतात.
ते डॉ. कपानींना भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या युनिवर्सिटीत येण्याचा सल्ला देतात आणि अशाप्रकारे त्यांच्या अमेरिकेतल्या आयुष्याची सुरवात होते. रॉचेस्टर युनिवर्सिटीनंतर ते इलिनॉईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे संशोधक आणि प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यानंतर शेवटी मग युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधे शिकवायला सुरवात करतात.
पुढच्या काळाचं आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीचं चक्र वेगानं फिरतं. अनेक शोध या काळात लागतात. १९६० ला लागलेला लेझरचा शोध हा त्या पैकीच एक. हा शोध लागला आणि ऑप्टिकल फायबरच्या क्षेत्रात कमालीचं संशोधन झालं. १९५५ ते १९६० या काळात कपानींनी मुख्य लेखक म्हणून अनेक तांत्रिक आणि प्रसिद्ध रिसर्च लिहिले. या क्षेत्रातला पाया घातला. १९६० मधे त्यांनी ‘सायंटिफिक अमेरिकन’मधे ‘फायबर ऑप्टिक्स’ नावाचा प्रचंड प्रसिद्ध लेख लिहिला.
फायबर ऑप्टिक्स ही संज्ञासुद्धा त्यांचीच देण आणि ती या लेखाच्या निमित्तानेच मिळाली. तेच या शब्दाचे निर्माते. आजही हा लेख या क्षेत्रातला महत्त्वाचा संदर्भ लेख आहे. आजघडीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले इंटरनेट, लेझर सर्जरी, हाय स्पीड कम्युनिकेशन हे सर्व तंत्रज्ञान कपानी यांच्या कामावरच उभारलंय. या कामाशिवाय या सगळ्या तंत्रज्ञानाचं अस्तित्व अशक्य होतं.
१९६० मधे त्यांनी आपली पहिली कंपनी कॅलिफोर्नियातल्या पोलो अल्टो या शहरात काढली. आपलं उद्योजक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. एका वैज्ञानिकाच्या जोडीने ते एक प्रसिद्ध उद्योजक, शीख कलेचे संग्राहक आणि लेखकही बनले. १९६७ मधे शीख परंपरा आणि कलेच्या जतनासाठी त्यांनी शीख फाउंडेशनची स्थापना केली. २०० हून अधिक परितोषिकांनी गौरवलेल्या कपानींनी १९९९ साली फॉर्च्युन मॅगझिनच्या '२० व्या शतकातलं जग बदलणारी ७ अकथित व्यक्तिमत्वं' या यादीमधे मानाचं स्थानही मिळवलं.
हेही वाचा: इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?
२००९ मधे मात्र ऑप्टिकल फायबर साठीचं नोबल पारितोषिक केवळ चार्ल्स काओ यांना मिळालं. वैज्ञानिक जगात नाराजीचे सूर उमटले. याबरोबर भारताला पुन्हा एकदा नोबल पारितोषिकावर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. चार्ल्स यांचं या क्षेत्रातलं कर्तृत्व वादातीत असलं तरी ते डॉ. कपानी यांनी या क्षेत्रात घालून दिलेल्या पायावरच आधारित होतं.
शिवानंद कानावी यांनी आपल्या 'सॅण्ड टू सिलिकॉन' या पुस्तकात यावर भाष्यही केलं. या दरम्यान झालेल्या मुलाखतीवेळी 'The important thing is to be a man of the world, that’s what I have tried to be, and to a small extent succeeded, but I like to do things for people.' असं म्हणणारे डॉ. कपानी पुन्हा एकदा हिरो ठरले.
वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा सौर ऊर्जेच्या क्षेत्रात पेटंट फाईल करणारे ते अखंड मेहनतीचं चालतंबोलतं उदाहरण होते. १०० हून अधिक रिसर्च आणि ४ पुस्तकं या व्यतिरिक्त इम्पेरिकल कॉलेज ऑफ सायन्स, ब्रिटिश रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅण्डफर्ड युनिवर्सिटी यांसारख्या प्रसिद्ध युनिवर्सिटीमधे प्राध्यापक असा एकूणच लेखाजोखा त्यांच्या नावावर जमा आहे.
'तुमच्या प्रत्येक उत्कर्षागणिक तुम्ही समाजाला जास्त देणं द्यायला हवं,' असा विचार मांडणारा हा आधुनिक युगातला निगर्वी आणि समाधानी वैज्ञानिक खूप शिकवून जातो. लहानशा कामांचंही क्रेडिट मागणाऱ्या आजच्या युगात इतके निगर्वी आणि मानव हितासाठी झटणाऱ्या डॉ. कपानी यांनी न बोलता बरंच काही शिकवलंय. आत्मपरीक्षण करायला भाग पाडलंय.
हेही वाचा:
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
डॉ. मानवेंद्र काचोळे : मातीशी जोडलेला कार्यकर्ता संशोधक
(पूर्वप्रसिद्धी - मित्रांगण, फेब्रुवारी - २०१८ )