भारतातल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट तयार केल्यामुळे वाद निर्माण झाला. २१ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला अटक करण्यात आली. मुळात टूलकिट हे साधं गुगल डॉक्युमेंट असतं. कोणत्याही आंदोलनाचं स्वरूप जगभर पोचवायचा हा एक मार्ग आहे. पण दिल्ली पोलिसांनी या टूलकिटचा संबंध थेट खलिस्तानी संघटनेशी जोडत दिशा रवीवर देशद्रोहाचा खटला दाखल केलाय.
टूलकिट हा शब्द सध्या बराच चर्चेत आहे. आपली भूमिका हजारो, लाखो लोकांपर्यंत पोचावी म्हणून आजच्या डिजिटल जगाचा हा नवा प्लॅटफॉर्म आहे. टूलकिटमुळे अनेक आंदोलनं जगभर पोचली. जगभरातून या आंदोलनांना पाठिंबा वाढला. पण टूलकिटसारख्या गोष्टीमुळे देशद्रोहाचा खटला दाखल होईल असं कुणालाही वाटलं नसेल.
पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीवर देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यामुळे भारतात ते खरं ठरलंय. एकीकडे केंद्र सरकार आणि त्याचे समर्थक दिशा रवीच्या अटकेचं समर्थन करत आहेत. दुसरीकडे यामुळे देशभर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठलीय. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दिशाला समर्थन मिळतंय. अटकेचा निषेध होतोय. अशातच शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला जातोय. टूलकिट त्यासाठी निमित्त ठरतंय.
हेही वाचा: देशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात?
टूलकिट हे कोणताही मुद्दा समजून घेण्यासाठी बनवलेलं गुगल डॉक्युमेंट असतं. यात केवळ माहिती नसते. तर संबंधित मुद्यासंदर्भात आपल्याला नेमकं काय करायचंय? कसं करायचं हेसुद्धा सांगितलं जातं. थोडक्यात काय तर या गुगल डॉक्युमेंटमधे ऍक्शन पॉईंट असतात. एखादं आंदोलन, निदर्शनं, आणि त्याच्याशी संबंधित माहिती या टूलकिटद्वारे दिली जाते.
अमेरिकेतल्या 'ब्लॅक लाईव्ज मॅटर' 'ऑक्यूपाय वॉल स्ट्रीट' या आंदोलनातून टूलकिट चर्चेत आलं. तसंच कोरोना काळातलं 'अँटी लॉकडाऊन प्रोटेस्ट', 'क्लायमेट स्ट्राईक कॅम्पेन' अशा आंदोलनांमधेही टूलकिटचा वापर करण्यात आला. आपल्या आंदोलनाचं स्वरूप लोकांपर्यंत पोचावं हा त्यामागचा खरा उद्देश. त्यामुळे जगभरातले लोक या आंदोलनाशी जोडले गेले. ही आंदोलनं जगभर पसरली.
आंदोलनातल्या नियोजनाचा एक भाग असतो असंही म्हणता येईल. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याची जोरदार चर्चा होतेय. पण केवळ आंदोलक टूलकिट बनवतात का? राजकीय पक्ष, वेगवेगळ्या शिक्षण संस्था, सामाजिक संघटनाही टूलकिट बनवत असतात. आपला कार्यक्रम काय हे डिजिटल माध्यमातून लोकांना सांगायचा हा प्रयत्न आहे.
शेतकरी आंदोलनाशी संबंधित बनवलेलं हे टूलकिट तीन पानाचं आहे. त्यात बऱ्याच गोष्टी होत्या. भारतातलं शेतकरी आंदोलन, सध्याचं कृषी क्षेत्र, शेतकरी मोर्चासंदर्भातली माहिती यात होती. तसंच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करावं असंही म्हटलं होतं. त्यासाठी #FarmersProtest #StandWithFarmers असा हॅशटॅग वापरायचा सल्ला देण्यात आला.
टूलकिटमधला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचा. त्यांना मेल, कॉल करून शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही नेमकं काय करताय हे विचारणं. शिवाय लोकांना एकत्र यायचा सल्लाही देण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून १३ आणि १४ फेब्रुवारीला भारतीय दूतावास, मीडिया आणि सरकारी कार्यालयांच्या बाहेर निदर्शन करायचं सुचवण्यात आलं होतं.
या आंदोलनादरम्यान काही अडचणी आल्या तर नेमकं काय करावं, कुणाशी बोलावं याबद्दलही काही महत्वाच्या सूचना टूलकिटमधे करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ फोटो शेअर करणं, वीडियो बनवणं, मॅसेज करण्याचं आवाहनही या माध्यमातून करण्यात आलं होतं.
हेही वाचा: खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?
जगभरातले काही सेलिब्रेटी भारतातल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट करत होते. दुसरीकडे भारतातले बडे स्टार ही 'देशांतर्गत' गोष्ट आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उभे राहिले. दोन गट पडले. ३ फेब्रुवारीला ग्रेटा थुनबर्गनं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं. त्याच्या सोबतीनं आंदोलनाची माहिती देणारं एक टूलकिट जोडलं. ४ फेब्रुवारीला हे जुनं टूलकिट डिलीट केलं. पुन्हा एक नव्यानं जोडलं.
ग्रेटानं जोडलेल्या याच नव्या टूलकिटमुळे वाद निर्माण झाला. दुसरं ट्विट दिशानं एडिट केल्याचा ठपका दिल्ली पोलिसांनी ठेवला. शिवाय पहिलं ट्विट हे दिशा रवीच्या सांगण्यावरून डिलीट केल्याचा संशय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या दिशा रवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.
या एडिट केलेल्या टूलकिटचा संबंध थेट २६ जानेवारीच्या दिल्लीतल्या हिंसेशी जोडला गेला. त्याचा संबंध जोडत ही हिंसा पूर्वनियोजित असल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री असलेल्या प्रकाश जावडेकरांसोबत अनेक मंत्र्यांनी हे 'परदेशी कटकारस्थान' असल्याचा आरोप केला.
टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या बरोबर आणखी दोन नाव समोर आली. मुंबईच्या निकिता जेकब आणि बीडचा शंतनू मुळूक. या तिघांनीही हे टूलकिट खलिस्तानी समर्थकांची मदत घेऊन बनवल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत केला. दिशावर गुरुपतवंत सिंह पन्नू या खलिस्तानी समर्थकाचा प्रभाव असल्याचं दिल्ली पोलिसांनी न्यायालयात म्हटलंय.
ही सरकारची दडपशाही आहे असं म्हणत अनेक संघटना आंदोलन करतायत. दिशा रवी ही पर्यावरणावर काम करणाऱ्या फ्रायडेज फॉर द फ्युचर या संघटनेसोबत काम करते. केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तरुणाई सरकारच्या एखाद्या भूमिकेविरोधात आवाज उठवते त्यावेळी सरकारकडून त्यांच्यावर दबाव आणला जातो. दिशावर देशद्रोहाचा खटला दाखल करत अटक करणं हा त्याचाच भाग आहे.
सत्तेला प्रश्न विचारणं सरकारसाठी धोक्याचं असतं. मुळात टूलकिट कुणालाही बनवता येऊ शकतं. त्याचा वापर करून आपलं नियोजन करता येऊ शकतं. सध्या आपण डिजिटल जगात आहोत. त्यामुळे टूलकिट आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं. पण टूलकिटचा वेगळाच अर्थ लावत सरकार दबाव आणायचा प्रयत्न करतंय.
हेही वाचा:
मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’
रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा
स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
संविधान निर्मात्यांना माहीत होतं, देशात विध्वंस करू पाहणारी शक्तीही आहे!