गोवा. गोमंतभूमी. नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहावेत अशी सुंदर यक्षभूमी. गोवा जरा उशिरा पाहिला. पण गोवा ही तारुण्यात पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. तारुण्यात आणि त्यानंतर आयुष्यभर सतत. बालपण हे गोवा कळण्याचं वय नाही. उसळणार्या समुद्राच्या फेसाळणार्या लाटा आणि त्या मोठ्या आनंदानं क्षणोक्षणी झेलणारा किनारा. गोव्यातल्या किनाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख.
जिथे सागरा धरणी मिळते तिथंच त्या कोण्या प्रेमिकेला त्याची वाट का पाहवीशी वाटते, हे अशाच एखाद्या सुंदरशा किनार्याला गेल्यावाचून कळत नाही. गोव्यातले समुद्र किनारे, अशीच प्रेमिकेला लागते तशी विलक्षण ओढ लावणारे आहेत. मी गोव्याला जाण्यापूर्वी अनेक कल्पना केल्या होत्या. समुद्राच्या, किनार्याच्या, गोमंतकीय सुंदरींच्या, तिथं सहजी मिळणार्या स्वस्त मदिरेच्या.
गोव्यातल्या सगळ्या महिला सुंदरच असाव्यात असं मला पूर्वी वाटायचं. पण सर्वच महिला सुंदर असतात, हा भ्रम होता. पण बाकीच्या कल्पना सत्यात उतराव्यात अशाच होत्या. गोवा म्हणजे समुद्र आणि समृद्ध निसर्ग. समुद्राशिवायही गोवा आहे आणि तोही विलक्षण लुभावणारा आहे. तरीही समुद्राचं म्हणून जे भव्य सौंदर्य आहे, ते काही वेगळंच.
गोव्याचे जिल्हे दोनच. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा. दोन्ही जिल्ह्यांना सागरानं वेढलेलं आहे. इथले सगळेच किनारे रमणीय आहेत. सगळे किनारे हे खरे तर सारखेच असले, तरी प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य हे आहेच. अत्यंत सुंदर असे ३४ किनारे गोव्यात आहेत. त्यातल्या काहींची ओळख करून देण्यातही पुनःप्रत्ययाचा आनंद आहे.
गोव्यात बहुतेक सर्वत्र उत्कृष्ट माशाचं जेवण मिळतं. पापलेट, सुरमाई म्हणजेच इसवण, तांबसो, मोडसो, बांगडा, लेपा इत्यादी मासे ताजे मिळतात. ताजेपणा हा त्याच्या चवीचा महत्त्वाचा घटक आहे. खेकडे, तिसर्यां किंवा शिंपले, कालव हे इतर सागरी खाद्य विशेष, केवळ गोव्याच्याच किनार्याला मिळणारा चनक किंवा चोनाक हा चवदार मासा हे मत्स्यविशेष गोव्यात बहुतेक सगळीकडे उपलब्ध असतात. गोमंतकीय पद्धतीने ते रांधलेले असतात.
गोव्यात जाऊनही कोल्हापुरी, पंजाबी, चिनी खाद्यपदार्थ मागणारे काही करंटे पर्यटकही गोव्यात येतात, ही गोष्ट वेगळी. पण गोव्यात येणार्यांना गोमंतकीय पदार्थांचा आस्वाद घेण्याची ओढ असते. अर्थात गोमंतकीय जेवणाची शाकाहारी खासीयतही आहे. क्वचित तीही मागणारे लोक असतात.
हेही वाचाः बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्यांसाठी काढला
दक्षिण गोव्यातला पाळोळे हा समुद्र किनारा अत्यंत शांत आहे. पांढर्या शुभ्र वाळूचा लांबलचक असा हा किनारा मडगावापासून ३८ किलोमीटरवर आहे. इथे खाण्याच्या आणि अर्थात पिण्याच्याही चांगल्या सोयी आहेत. पण पर्यटकांची वर्दळ कमी असलेला हा किनारा आहे. मडगावपासून जवळच ३९ किलोमीटरवर पाटणे हा किनारा आहे. हाही पर्यटकांची गर्दी अजिबात नसलेला. शांत, निवांत पहुडलेला. मात्र इथली वाळू सोनेरी रंगाची आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या चमचमत्या वाळूवरून चालत जाताना स्वर्गातील पाऊलवाट ही तर नाही, असं वाटत राहतं.
ज्वालामुखीच्या लाव्हारसातून निर्माण झालेला खडकाळ, काळ्या पाषाणाचा किनारा म्हणजे केळशी. इथल्या खडकाखडकातून पसरलेली पांढरी वाळू भुरळ घालणारी आहे. इथून जवळच डॉल्फिन मासे दिसू शकतात.
पाळोळे किनार्यापासून १५ मिनिटांवर आगोंद हा किनारा आहे. इथला समुद्र खूप शांत असतो. पोहोण्याची आवड असणार्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. या किनार्यावर ऑलिव रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येतात. या किनार्यावर मोबाईलची रेंज अजिबात पोचत नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचं कोणतंही साधन इथे उपलब्ध नाही. त्यामुळे एकांतभंग करणारं काहीच इथं नसतं.
आपल्याला हवी तीच सोबत घेऊन या ठिकाणी उपद्रवमुक्त राहण्याचा आनंद उपभोगता येतो. खाण्यापिण्याच्या सोयी अगदी कमी आहेत आणि राहण्यासाठी काही मोजकी विश्रामगृहं आगोंद किनार्यापासून जवळच्या अंतरावर आहेत. पण प्रत्यक्ष किनारा मात्र छान मोकळा आहे. इथला एकांत ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे.
पाळोळ्याच्या किंवा आगोंदच्या किनार्यापासून फक्त बोटीनं किंवा चालतच जाता येतं तो म्हणजे फुलपाखरू नावाचा किनारा. पामच्या झाडांच्या दाटीवाटीत हा किनारा आहे. पायी भटकंतीसाठी हे ठिकाण मस्तच! मडगावपासून ३९ किलोमीटरवर हा किनारा आहे. पण जाण्याच्या कसल्याही सुविधा नाहीत. इथून दिसणारा सूर्यास्त गोव्यातला सर्वात सुंदर मानला जातो.
हेही वाचाः हैदराबादेतल्या पोलिस एन्काऊंटरवर टाळ्या वाजवणाऱ्यांनी एकदा हे वाचावं
देवदार वृक्षांच्या दाटीनं नटलेला सोनेरी वाळूचा देखणा किनारा म्हणजे वेताळभाटी. नावात वेताळ आणि राजकीयदृष्ट्या तापलेलं गाव असलं, तरी किनारा मात्र शांत असतो. मडगावपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या या किनार्यावरून डॉल्फिन दर्शन घेता येतं. हा मडगावपासून दहा किलोमीटरवर आहे.
जवळच कोलवा हा किनारा आहे. हाही एक निवांत किनारा आहे. जवळच अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आहे. विदेशी पर्यटक तिथं श्रद्धेनं भेट देतात. भारतीय पर्यटकांपैकी हिंदू पर्यटकही चर्च बघायला जातात. हा बर्यापैकी वर्दळ असणारा किनारा आहे. खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सुविधा जवळपास भरपूर आहेत.
बाणावली हा एक प्रसिद्ध नारळाचा वाण ज्याच्या नावावरून आहे, तो बाणावली गावचा किनारा शांत आहे. इथला सागर निवांत पहुडलेला असतो. जवळच सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च आहे. परशुरामानं सोडलेला बाण या ठिकाणी पडला आणि त्याच्या पुढचा सागर मागे हटून गोमंतभूमी निर्माण झाली, अशी आख्यायिका आहे. म्हणून गोव्याला परशुरामाची भूमी असंही म्हणतात. बाणावली अधिक प्रसिद्ध आहे ती यासाठी. इथल्या किनारी भागात रस ऑम्लेट हा प्रकार टपर्यांवर मिळतो, तो अफलातून असतो. माशांचे पदार्थ अर्थात सर्वत्र मिळतातच.
खिशाला परवडणारी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असलेला किनारा मोबोरला आहे. हा किनारा चमकत्या वाळूचा आहे. या किनार्यावरही बर्यापैकी पर्यटक येतात. मडगावपासून १७ किलोमीटरवर हा किनारा आहे.
एकांत शोधणार्या निसर्गप्रेमींसाठी एक निर्जन किनारा आहे, तो म्हणजे बेतुल. विलक्षण शांतता आणि एकांत या ठिकाणी आहे. अवघ्या ६0 घरांचं हे गाव आहे. साळ नदीनं सागर आणि गाव यांच्यात सीमारेषा आखलीय. कवी अनिलांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे जिथे शांतता स्वतःला शोधत आलीय, असं वाटतं. इथं साळ नदीनं वर्तुळाकार वळण घेतलेलं असून एक छोटं खार्या पाण्याचं तळं तयार झाल्याचा भास होतो.
जवळच १७व्या शतकातला एक किल्ला आहे. बघण्यासारखं बराडी क्रॉस चर्च आहे. इथं पर्यटन कुटिरं फारशी नाहीत, खाण्यापिण्याच्या इतर सुविधाही तुरळक आहेत. कमालीची स्वच्छता आहे. एकदा गेलेला प्रवासी पुन्हा पुन्हा बेतुल किनार्याच्या ओढीनं जात राहतो, अशी जादूच या किनार्याची आहे. पण तरीही इथं फारशी गर्दी नसते, ही गंमत आहे. मडगावपासून बेतुल १७ किलोमीटरवर आहे.
हेही वाचाः परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?
एकही पर्यटन कुटिर किंवा खाण्यापिण्याचं ठिकाण नसलेला एक अतिशय प्रसिद्ध, परंतु एकांतात राहणारा निवांत, नयनरम्य किनारा म्हणजे गालजीबाग. हा एक आगळावेगळा किनारा आहे. वार्याच्या लहरीवर हळुवारपणे झुलणारी पामची झाडं इथं विपुल आहेत, त्याचप्रमाणे खडशेरणी नावाच्या झाडांची दाटी या ठिकाणी आहे. खडशेरणीला इंग्लिशमधे बीफ वूड ट्री असं नाव आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ऑलिव रिडले कासवं या किनार्यावर अंडी घालतात आणि त्यातून पिलं जन्माला येतात. आता निसर्गप्रेमी मंडळी कासवांचं संरक्षण करायला हिरीरीनं पुढं सरसावत आहेत. दीड किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा आहे. कासवांच्या संवर्धनासाठीच माणसांचा उपद्रव टाळण्याचा कासव संवर्धन केंद्राचा प्रयत्न असल्यानं माणसांच्या वावरावर निर्बंध आहेत.
शिरदोण हा पणजीच्या जवळचा किनारा शंखशिंपले गोळा करणार्या छांदिष्टांसाठी पर्वणीच होय. हा खडकाळ आणि वाळू यांचा किनारा आहे. जीझस नाझरेथचं चर्च जवळच आहे. ते बघण्यासारखं आहे.
गोव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाला पोळे हा किनारा आहे. पोहोण्यासाठी इथला सागर सुरक्षित आहे. चमकती शुभ्र वाळू किनार्याचं सौंदर्य वाढवते. स्थलांतरित पक्ष्यांचं निवासस्थान इथल्या वृक्षराजींवर असतं. कधीमधी डॉल्फिनही दिसतात. मौजमजा, नाचगाणी यासाठीच्या सोयी इथे आहेत. त्यामुळे हौशी, गुलहौशी पर्यटकांना इथं जल्लोष करता येतो.
दक्षिण गोव्यातच, पण पणजीच्या दक्षिणेला १४ किलोमीटरवर वास्कोजवळ बोगमाळो हा किनारा आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि मौजमजेच्या, खरेदीच्या सोयीसुविधा यांचा संगम बोगमाळोला आहे. स्थानिक कलाकारांच्या कलाकृती आणि इतर अनेक वस्तू विकण्याची दुकानं इथं आहेत. लोकांची गर्दी या किनार्यावर असते. पण किनारा स्वच्छ राखला जातो. सागराचं पाणी निळसर आणि शांत आहे.
बोगमाळो इथेच साहसप्रेमींना प्रशिक्षण देण्यासाठी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ डायविंग कार्यरत आहे. बोगमाळोपासून सात किलोमीटरवर हॉलंट हा पोहोण्यासाठी चांगला किनारा आहे. हा किनारा अत्यंत स्वच्छ आहे. या किनार्यावरून सूर्योदय अतिशय सुंदर दिसतो. इथं एखाद-दुसरं पर्यटन कुटिर सापडेल. बाकी तसा हा एकाकी किनारा आहे.
कांकोले हा आणखी एक एकाकी किनारा. यालाच टायगर बीच असं नाव आहे. जवळच काब- दि- राम हा किल्ला आहे. काब- दि- रामलाही वेगळा किनारा आहे. खणगिणी, खोला, काब -दि- राम हे एका रेषेत असलेले तीन किनारे आहेत. कांकोले किनार्याजवळ साधं चालत जाता येत नाही. अरुंद वाटेवरून पायर्या चढत जावं लागतं. ही दमछाक सोसून खाली उतरून एकदा किनार्याला पोचलं, की, मग मात्र वाह! क्या बात है!! जो नजारा समोर नजरेस पडतो, तो केवळ अप्रतिम असतो.
जंगल आणि साहसप्रेमींना खुणावणारा हा किनारा सागळ्या गदारोळापासून लांब आहे. एकही पर्यटन कुटिर किंवा राहण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही. इथं कोलव्यातून सुटणार्या बोटीतूनही जाता येतं.
हेही वाचाः गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं
उत्तर गोव्यातले बहुसंख्य किनारे हे गर्दीचे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतले पर्यटक थेट म्हापशाला पोचतात. विदेशी पर्यटक दाबोळी विमानतळावर उतरतात ते थेट पणजीला पोचतात. पणजी- म्हापशातून उत्तर गोवा जवळ पडतो.
कलंगुट हा एक प्रसिद्ध किनारा आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारची दुकानं आहेत. मद्यालयं आहेत. हॉटेल्स आहेत. इथले ग्रामस्थ बव्हंशी पर्यटनावर जगणारे आहेत. कलंगुटच्या किनार्यावरही अनेक विक्रेते आपापला माल विकायला येतात. रात्रीचा गोवा बघायचा, अनुभवायचा असेल, तर लोक इथल्या पब्जना गर्दी करतात. सदैव वर्दळ असणारा, तरीही सुंदर असा हा लांबलचक किनारा आहे. राहण्याच्या सर्व स्तरातल्या लोकांना परवडणार्या सुविधा इथे आहेत. पणजीतून १६ किलोमीटरवर हा किनारा आहे.
अंजुना किंवा हणजुना हा किनारा परदेशी नागरिकांचा आवडता आहे. गोव्यातल्या सगळ्याच किनार्यांवर उत्कृष्ट सागरी खाद्य मिळतं, तसं ते याही किनार्यावर मिळतं. खडकाळ भाग इथं जास्त आहे. इथंही तुडुंब गर्दी असते.
बागा हा किनारा विदेशी पर्यटकांनी व्यापलेला आहे. गोव्यात मद्य स्वस्तात मिळतं ही नवीन किंवा नवलाची गोष्ट नाही. तथापि बागा आणि इतकर काही किनार्यांवर चरस, गांजा, हेरॉईन यासारखी मादक द्रव्यं विकली जातात. प्रामुख्यानं नायजेरियन नागरिकांचा अशा अवैध व्यवहारात मोठ्या प्रमाणावर हात आहे. बागा किनार्यावर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि खिशाला परवडतील अशा खाण्यापिण्या, राहण्याच्या सोयी आहेत. मौजमजेची अनेक ठिकाणं आहेत. पब्ज, बार, स्थानिक, परप्रांतीय, विदेशी खाद्यपदार्थ असं सगळं भरपूर मिळतं. पणजीपासून २१ किलोमीटरवर बागा आहे.
हरमल हा किनारा पणजीपासून १६ किलोमीटरवर आहे. परंपरागत मत्स्यव्यवसाय या किनार्यावर मोठ्या प्रमाणात चालतो. वडाची झाडं, मोठमोठे पाषाण यांनी हा किनारा सजलेला आहे. पॅराग्लायडिंग, नौकाविहार अशा खेळांची सुविधा इथे आहे. या किनार्याचं वैशिष्ट्य असं की, अन्यत्र कुठंही नसलेलं गोड्या पाण्याचं तळं किनार्याला लागूनच आहे. खार्या पाण्यात न्हाऊन गोड्या पाण्यात पुन्हा आंघोळ करता येते.
हेही वाचाः जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे
पणजीतून ३२ किलोमीटरवर मांद्रे किनारा आहे. हा शुभ्र वाळूचा आहे. डॉल्फिन दर्शनाची ठिकाणं समुद्रात जवळच आहेत. शुभ्र सागरी गरुडाची संख्या इथं जास्त आहे. ऑलिव रिडले कासवांसाठीही हा किनारा प्रसिद्ध आहे. इथे तुलनेनं गर्दी कमी असते.
पक्ष्यांची विविधता पहायची असेल, तर मोरजीला जावं लागेल. इथे रशियन नागरिकांची एक वसाहत आहे. त्यांनी तिथं रशियाचा राष्ट्रध्वज लावलाय. त्यांनी इथल्या स्थानिकांची घरं विकत घेऊन ही वसाहत उभी केलीय. जवळून शापोरा नदी वाहते. इथं रात्री उशिरापर्यंत जल्लोष चालतो. मालिश आणि इतर पर्यायी उपचारांच्या सुविधा मोरजीत उपलब्ध आहेत.
वागातुर हा काहीसा शांत किनारा आहे. मऊ आणि शुभ्र वाळूच्या या किनार्यावर नारळाची झाडं विपुल आहेत. जवळच शापोरा हा किल्ला आहे. किल्ल्यावरून सागराचं दृश्य मनमोहक दिसतं. पणजीपासून २१ किलोमीटरवर वागातुर आहे. शापोरा नदीवरून किल्ल्याला आणि किनार्यालाही शापोरा हे नाव पडलंय. हा शुभ्र वाळूचा शांत सागराचा मोहक असा किनारा आहे.
लांबीनं कमी, पण सुंदर असा किनारा म्हणजे सिक्केरी. किनार्याला लागूनच आग्वाद हा किल्ला आहे. या किल्ल्यालाच कारागृहाचं रूप देण्यात आलंय. पलीकडच्याच बाजूला आग्वाद किल्ल्यावरून खाली दिसणार्या सागराचं, किनार्याचं, नारळाच्या झाडांचं अतिशय मनमोहक विहंगम दृश्य पाहता येतं.
पणजी शहरातच, मिरामार किनारा आहे. सगळ्या पणजीवासीयांचं हे विसाव्याचं ठिकाण आहे. संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. एरवीही बराच गजबजलेला असणारा हा सदैव जागता किनारा आहे. इथून काही अंतरावर, शहरापासून सहा किलोमीटरवर दोन पावला हा खडकाळ किनारा आहे. पण तिथल्या जेटीलाच बरीच गर्दी असते. वरून सागर पाहाण्याचा आनंद इथून लुटावा.
मी कोल्हापुरात असताना पत्नीला घेऊन ३० वर्षात सहसा रंकाळ्यावर गेलो नसेन, इतक्या वेळा गोव्यात असताना दोना पावलाला मात्र नेहमी जात असे, एवढं माझं ते आवडतं जवळचं ठिकाण आहे. एक दूजे के लिये, सिंघम अशा सिनेमांचं शुटिंग या परिसरात झालंय. इथं कपडे, गॉगल्स, शोभेच्या वस्तू विकणारी अनेक दुकानं एका ओळीनं आहेत. नौकाविहाराच्या वेगवेगळ्या सुविधा दोना पावलावर आहेत.
दाबोळी विमानतळापासून जवळ असणार्या वेळसाव किनार्यावर स्टारफिश आढळतात. तसंच इथं सापडणारे शंख-शिंपले अत्यंत शुभ्र आहेत. नारळाच्या झाडांची दाटी असलेल्या या किनार्यावर खूप कमी पर्यटक येतात.
आश्वे हा सागर किनारा एकांतप्रिय आहे. हा खडकाळ, लांबलचक किनारा आहे. लोक इथं क्वचित येतात. या किनार्यावरही ऑलिव रिडले कासवं आहेत. त्यांचं काळजीपूर्वक जतन केलं जातं. प्राणीप्रेमी लोकच आश्वेला येतात.
गोव्याच्या सर्वाधिक उत्तरेला केरी हा किनारा आहे. तेरेखोल किल्ल्याच्या जवळचा हा किनारा आहे. तेरेखोल नदी इथून वाहते. जुना पोर्तुगीज किल्ला इथं आहे. त्याचं आता एका आलिशान हॉटेलमधे रूपांतर करण्यात आलंय. पणजीतून ५८ किलोमीटरवर केरी आहे. तेरेखोल नदीच्या पल्याड महाराष्ट्राची हद्द लागते.
असे हे गोव्याच्या सागरी किनार्यांचं रमणीय, मनमोहक, धुंद करणारं दर्शन. गर्दीत रमणार्यांसाठी सर्व सोयींनीयुक्त असे किनारे आहेत. एकांतप्रिय रसिकांसाठी एकांतप्रिय किनारेही आहेत. प्राणी, पक्षी प्रेमींसाठी किनारे आहेत आणि प्रेमिकांसाठीही आहेत. ज्यानं त्यानं आपला किनारा निवडावा. पण आयुष्यात एकदा तरी गोव्याला जावंच. कारण जो एकदा गेला, तो वारंवार जातच राहतो!
हेही वाचाः
पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट
नदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत?
तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम
झाडाखाली अडकलेल्या माणसाला सोडवायचं कुणी?
दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन