सुमनताई बंग: गांधी-विनोबांच्या विचारांसाठी समर्पित आयुष्य

०६ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सुमन बंग यांचं ३ एप्रिलला निधन झालं. गांधी-विनोबा विचारांनी भारावलेल्या पती ठाकूरदास बंग यांच्या सोबतीने त्यांनी सर्वोदयी समाजाचा ध्यास घेतला. भूदान चळवळीसोबत संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी काम केलं होतं. सोशल मीडियावर वायरल झालेला लेख इथं देत आहोत.

स्वातंत्र्य चळवळीने भारावलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल गावात १९२५ ला माझा जन्म झाला. देशभक्तीचं बाळकडू मला कुटुंबातूनच मिळालं. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे दारिद्र्याचं दु:ख, अपमान, अवहेलना बालपणीच भोगल्या. शाळेत जाताना साधारण जुनेच कपडे आणि तेलाशिवाय केसाच्या झिपऱ्या झालेल्या पाहताना शाळेत शिक्षिका रागवत. सहज धपाटा घालत.

शाळेत असताना स्नेहसंमेलनात नाटकाची तालीम पूर्ण झालेली असूनही मला वगळण्यात आलं. त्याची खंत वाटून मनात बीज रुजलं ते दरिद्री बांधवांसाठी विकासाच्या वाटा शोधण्याचं. पुढे सेवा दलाची स्वयंसेविका म्हणून शाखेचं संचलन, सदस्यांच्या नोंदी करणं आणि इतर कामं मी उत्साहात करायची.

त्याच दरम्यान मोठा भाऊ स्कॉलरशिपवर अमेरिकेला डॉक्टरी शिकायला गेला. डॉक्टर बनून खेड्यातल्या गरीब, तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याच्या वेडाने त्याला झपाटलं. पण शिक्षणात आलेल्या अडथळ्यांतून परिस्थितीशी समझोता करत अव्वल गुणांनी एस.एस.सी. पास झाल्यावर अर्थशास्त्र घेऊन बी.ए. फर्स्ट क्लासने पूर्ण केलं. समाजसेवेसाठी शिक्षणाचं व्यापक क्षेत्र निवडलं.

हेही वाचा: सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

सर्वोदयी विचारांचा साथीदार

बालपणापासूनच आजूबाजूच्या ग्रामीण वातावरणातल्या अन्यायकारक पुरुषी वर्चस्वाबद्दल मनात प्रचंड चीड होती. त्यामुळे स्वकर्तृत्वावरचा विश्वास वाढत होता. आपण लग्न न करता केवळ राष्ट्रसेवा आणि समाजसेवाच करायची मनात ठरलं होतं. आता माझे पती ठाकूरदास बंग यांच्या निधनानंतर आयुष्याकडे वळून पाहताना ईश्वराचे आभार मानावेसे वाटतात.

स्वातंत्र्य मिळाल्यावर आणि त्यानंतर, गांधी-विनोबा विचारांना अपेक्षित असलेल्या सर्वोदयी समाजाला साकार करणाऱ्या क्रांतियज्ञात, त्यांनी वयाची ७० वर्ष समर्पित केली. सर्वोदयी कार्यात, १९४२ च्या ‘करा किंवा मरा’ या गांधीजींच्या आवाहनाने प्रभावित होऊन प्रा. बंग यांनी प्राध्यापकीचा राजीनामा दिला. त्यांच्या भाषणानं प्रभावित होऊन त्यांच्यासोबत  ४० विद्यार्थ्यांनीही कॉलेज सोडलं.

टिपिकल सौभाग्य लेण्यांना फाटा

भूमिगत राहून असहकार मोहिमेंतर्गत जनजागृतीची कामं करू लागले. लग्नाचा प्रस्ताव मंजूर करताना त्यांची अट होती, की प्रखर ध्येयवादात झोकून देऊन काम करणाऱ्या तरुणीशीच लग्न करेन. सेवा दलातली माझी कामं त्यांच्यापर्यंत पोचली. माझी परीक्षा ठरली.

मला त्या वेळी एकच प्रश्न विचारला, ‘मी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय आहे, मला फाशी होऊ शकते, तेव्हा तू काय करशील?’ देशभक्तीचे संस्कार बालपणीच रुजल्यामुळे मी चटकन म्हणाले, 'तुमचं अपुरं काम पूर्ण करेन.’ या उत्तराने प्रसन्न होऊन आमचं लग्न ठरलं. केवळ सहा आणे खर्चून गांधी प्रतिमेला हार घालून अत्यंत साधेपणाने आमचं लग्न झालं.

स्त्री-पुरुष भेदाला अधोरेखित करणारं कुंकू, बांगड्या आणि मंगळसूत्र या सौभाग्य लेण्यांना मी लग्नातच फाटा दिला होता. आमच्या लग्नानं माझ्या मनातलं देशप्रेम आणि समाजसेवेच्या तळमळीला अधिक समृद्ध बनवलं.

हेही वाचा: मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल

गांधीजींमुळे जगणं बदललं

स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, झेंडावंदन, विदेशी मालावरचा बहिष्कार, असहकार आंदोलनं सुरू होती. स्वातंत्र्याचे वारे संचारलेलं प्रत्येक मन ध्येयवेडं आणि निष्ठावंत होतं. ध्येयवेड्या निष्ठावंत पतीच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक कामात त्यांना साथ देताना, माझी ध्येयवादी मनोवृत्ती सुखावत होती. झोकून देऊन समरसून काम करणं, जिवापाड मेहनत करणं हेच आमच्या जीवनाचं सूत्र बनलं.

स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हं दिसू लागली. प्रा. बंग यांना ‘ओहायो’ युनिवर्सिटीतून, अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. करण्यासाठी पासपोर्ट आणि इतर कागदपत्र मिळाली. त्यावेळी गांधी कुटीत ते त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले. बापू म्हणाले, ‘अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी अमेरिकेत जाण्यापेक्षा खेड्यात जा!' बस्स! या विषयात अनेक सुवर्णपदकं मिळवूनही प्रा. बंग यांनी बापुकुटीबाहेर आल्यावर सगळी कागदपत्रं शांतपणे फाडून टाकली.

बापूजींच्या एका वाक्याने जीवनाची दिशा पालटली. काही काळ आमचे गोपुरीत वास्तव्य असताना विनोबांच्या मार्गदर्शनानुसार ‘कांचनमुक्तीचा प्रयोग’ करायचं ठरलं. त्यासाठी ‘सुकाभाऊ चौधरींकडून’ दान मिळालेल्या जमिनीवर आमचा ‘साधनाश्रम’ अगदी स्वश्रमातून तयार झाला. संपूर्ण स्वावलंबनाने शेतीची अवजारं तयार करून तीन वर्ष शेती केली.

पोटासाठी म्हणून शाळेत नोकरी

स्वेच्छा दारिद्र्याच्या या व्रतात, अत्यंत कष्ट करूनही वेळप्रसंगी मीठभाकरीही कशी पारखी होते, हा अनुभव आला, पण अपार कष्टातून मिळणाऱ्या अन्नाला गोडी अमृताची होती. १९५३ ला भूदान चळवळीत सक्रिय सहभागासाठी प्रा. बंगनी पुन्हा एकदा कॉलेजचा राजीनामा दिला.

पुढे विनोबाप्रेरित भूदान यज्ञात, त्यांनी आपलं जीवनदान घोषित केलं. त्या वेळी ‘साधनाश्रमाची शेती’ औजारांसोबत भूमिहीन लोकात वाटप करून भारत फिरण्यासाठी निघून गेले. अशोक आणि अभय या आमच्या दोघा मुलांच्या सांभाळ आणि शिक्षणाची जबाबदारी माझी एकटीची राहिली.

गरजेपोटी, चरितार्थासाठी, महिलाश्रम शाळेत सुरवातीला १२० रुपयात काही वर्ष नोकरी केली. मुलांना शाळेत सायकलने नेणं-आणणं, त्यांचा अभ्यास सांभाळून सगळी कामं स्वावलंबनाने पार पडायची.

हेही वाचा: १९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय

सेवाग्राममधली नयी तालीम

त्याच दरम्यान कुटुंबापलीकडे मन सतत झेपावत असताना, ‘साम्ययोग’ मासिकाच्या संपादनाचं काम मी काही वर्ष केलं. सूतकताई, खादी प्रशिक्षण, शेती मार्गदर्शन अशा रचनात्मक कामांमधून माझा जनसंपर्क वाढला. ग्रामीण स्त्रिया अपार कष्टांबरोबर अनिष्ट रूढी, परंपरा आणि चुकीच्या विचारसरणीला बळी पडतात ही गोष्ट माझ्या मनाला खटकायची.

शिक्षणातून मुलामुलींची वैचारिक बैठक पक्की व्हावी, तसंच मुला-मुलींना रोजगार मिळवून स्वावलंबी जीवन जगावं या उद्देशाने गांधी-विनोबा विचारप्रणालीची ‘नयी तालीम’ ही शाळा मी सेवाग्रामला काढली.

१९७४ ला आणीबाणीत मिसाबंदी अंतर्गत मला अटक होऊन १९ महिने बिहार आणि नागपूर जेलमधे रहावं लागलं. मुद्दाम ‘सी क्लास’ मागितल्यामुळे गरीब, अडाणी गुन्हेगार स्त्रियांशी संवाद साधता येऊन त्यांचे भावविश्व समजून घेण्याची संधीच एकप्रकारे मिळाली.

भारतभर पदयात्रा

माझी दोन्ही मुलं लहान असताना मी कौटुंबिक जबाबदारीत गुंतले होते; तरी माझा अशोक बारा वर्षांचा आणि अभय आठ वर्षांचा असताना, भूदान चळवळीत अखंड भारतभ्रमण करणाऱ्या पतीप्रमाणे, भूदान चळवळीला हातभार लावण्याचा उद्देश होता. आम्ही तिघे सुट्टीच्या दिवसात वर्धा जिल्ह्यातल्या गावोगावी भूदानाची भूमिका मांडत पदयात्रा करत होतो.

गावातल्या रस्त्यांमधून वादळ, ऊन-पाऊस झेलत चालणाऱ्या या पदयात्रांनी; खेड्यातल्या लोकांच्या अडीअडचणी, दु:खाचं जवळून दर्शन झालं. एक वर्षांसाठी घरादाराला कुलूप लावून, मुलांना शिक्षणासाठी खानदेशात मामाकडे ठेवून मी भारतभर पदयात्रेसाठी निघाले.

अडाणी, अशिक्षित, दरिद्री ग्रामीण शेतकरी आणि तळागाळातल्या लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी १९७७ साली ‘चेतना विकास’ या संस्थेची स्थापना झाली. १५० गावांमधे ‘चेतना विकास’चं समाजजागृतीचं काम सुरू आहे.  गावात बालवाडी, बालभवन आणि बालसंगोपन केंद्र सुरू करण्यात आली.

हेही वाचा: भंडाऱ्याच्या आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला?

माध्यमं वेगळी पिंड समाजसेवेचा

चेतना विकासच्या आमच्या फार्मवर माझा मोठा मुलगा अशोक आणि निरंजना बंग यांचा सेंद्रिय शेती, फळबागा, कम्पोस्ट आणि गांडूळ खत प्रकल्प सुरू आहे. गेली चाळीस वर्षांहून अधिक आमचं ‘सखी’ हे स्त्रियांचं, स्त्रियांसाठी, स्त्रियांनी चालवलेलं त्रैमासिक सुरू आहे.

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची गडचिरोली जिल्ह्यातली ‘शोधग्राम’ ही संस्था ग्रामस्वराज्याचं छोटेसं अंग आहे. त्यांची मुलं डॉ. आनंद आणि डॉ. अमृत आणि कुटुंबीय आरोग्यसेवा देतायत.

तरुणांसाठी ‘निर्माण’ संघटना ही गावच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जीवन समर्पण’ करणाऱ्या ४०० तरुणांची संघटित फौज आहे. ‘कोवळी पानगळ’ अर्थात ‘कुपोषण बालमृत्यू’ टाळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अशोक आणि पद्मजा बंग यांची मुलं डॉ. आकाश, डॉ. आलोक आणि त्यांच्या सुविद्य डॉ. पत्नी वर्धाजवळच्या कस्तुरबा हॉस्पिटलला आरोग्य सेवा देतायत. सेवेची माध्यमं वेगवेगळी असली, तरी पिंड एकच, समाजसेवेचाच.

हेही वाचा: 

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?