शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक

०२ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.

शंकर सारडा साहित्य क्षेत्रातल्या तरुणांनाही लाजवेल असं अत्यंत उत्साही आणि सळसळतं चैतन्य होतं. मराठी लेखकाला त्यांनी वैश्विक दृष्टिकोन बाळगायचं सांगत नोबेलची स्वप्न दाखवली. फक्त मराठीत दंग राहू नका इतर भाषेतही आपलं साहित्य न्या असं मागची २०-२५ वर्ष सांगणारे ते एक द्रष्टे समीक्षक होते.

सारडांचा जागतिक विक्रम

पुस्तकांची समीक्षा करणं हेच समीक्षकाचं काम नाहीय तर साहित्यिक घडवण्यातही महत्वाचं योगदान देणारे ते एकमेव समीक्षक होते. स्वत: साहित्यिकही. इथंच त्यांचं कर्तृत्व संपत नाही. समीक्षेत वावरत असतानाही लहान मुलांसाठी तब्बल २० रंजन करणाऱ्या अद्भुत कथांची पुस्तकं लिहिणारे ते सर्जक लेखकही होते. त्यामुळेच सारडांच्या साहित्य कर्तृत्वाला सीमा नाहीत.

शंकर सारडांनी आजपर्यंत साडेपाच हजार पुस्तकांवर लिहिलंय. हा एक जागतिक विक्रमच आहे. शक्यतो प्रसिद्ध लेखक आणि गाजलेल्या पुस्तकांवर लिहायची आपली खास मराठी समीक्षकी पद्धत. पण सारडांनी असा भेदभाव केला नाही.

अगदी पहिलं वहिलं पुस्तक लिहिणाऱ्या पण गुणवंत लेखकालाही त्याच्या पुस्तकावर लिहून नवीन, अधिक चांगलं लिहायला प्रेरणा देणारे एकमेव समीक्षक होते. त्यामुळे असंख्य लेखक प्रसिद्धीच्या झोतात आले. आज त्यातले अनेक प्रथितयश साहित्यिक बनलेत.

असंख्य लेखकांना प्रकाशात आणलं

आजचे प्रसिद्ध साहित्यिक आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ह. मो. मराठे 'नि:ष्पर्ण वृक्षवर भर दुपारी' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. खरं तर ही कादंबरी त्या काळात अत्यंत स्फोटक. तिच्या प्रकाशनासाठी कुणी पुढं येणं अशक्य होतं. अशा काळात शंकर सारडांनी १९६८ ला ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचं धाडस दाखवलं.

मराठी साहित्यालाही नवे धुमारे फुटले. सारडांचा मुळात दृष्टिकोनच व्यापक. जवळपास अर्ध जग पालथं घातल्यानं आणि जागतिक वाड्मयीन चळवळींशी संपर्क आल्यामुळे माय मराठी कुठं खुरटतेय याची जाण त्यांना आली नसती तर नवल. पण या जाणीवेला त्यांनी प्रत्यक्ष कृतीत बदलवलं. हे फक्त सारडाच करु शकले.

याच पद्धतीने विद्या सप्रे ते विश्वास पाटील अशा असंख्य लेखकांना सारडांनी प्रकाशाच्या झोतात आणायचं मोलाचं काम केलं. नुसती समीक्षाच नाही तर प्रकाशनपूर्व संपादन संस्कारही सारडांनी अनेक लेखकांच्या हस्तलिखितांवर केले. कधी संपूर्ण पुनर्लेखन करुन घेवून, त्या लेखनाचं साहित्यमूल्य वाढवलं.

हेही वाचा: बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

सृजनशील संयोजक आणि कार्यकर्ताही

लेखक, समीक्षकाचं सख्याचं नातं निर्माण करणारे सारडा हे एकमेव समीक्षक होते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यामुळेच वसंत कानेटकर, रमेश मंत्री, ह. मो. मराठे, शं. ना. नवरेंसारख्या अनेक दिग्गज लेखकांनी सारडांना आपल्या कृती अर्पण केल्या. सारडा महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीचे संपादक असताना जी. एं. सारखे उत्तुंग लेखकही आपल्या पुस्तकावर सारडा काय लिहितात याची आवर्जून वाट पहायचे. यातच सारं काही आलं.

पत्रकार म्हणून सारडांची ओळख मोठी आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी १९६२ ते १९६९ या काळात केलं. त्यावेळी सारडा अवघ्या तेविशीत होते हे लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर त्यांनी ऐक्य, लोकमत, ललित, देशदूत यात पत्रांचंही संपादन केलं. पण केवळ लेखक, समीक्षक, पत्रकार एवढीच सारडांची ओळख नाही. मराठी साहित्यातलं त्यांचं एक सृजनशील संयोजक, कार्यकर्ता म्हणूनही मोलाचं योगदान आहे.

मराठी भाषेचं दुर्भाग्य

सातारा इथं १९९३ साली भरलेल्या साहित्य संमेलनाचे सारडा कार्याध्यक्ष होते. या संमेलनाइतकी आजवरच्या एकाही संमेलनाला एवढ्या साहित्यिक मूल्यांची आणि संयोजनाची उंची गाठता आली नाही. सारडा तसं आजवर अनेक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष झालेत.

सावंतवाडी इथं भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. मराठीची अविश्रांत एवढी साहित्यसेवा करुनही त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळू शकलं नाही. सारडांना त्याची खंत नव्हती. पण मला निश्चित खंत आहे. मराठी माणूस किती कृपण आणि कृतघ्न असतो हे मी या प्रकरणात पाहिलंय, अनुभवलंय.

'एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बनवायचं का?' याच मुद्द्यावर सारडांची योग्यता अन्य कोणाही साहित्य, समीक्षाकापेक्षा मोठी असतानाही पराभव करण्यात आला. हे मराठीचं आणि मराठी माणसाचं दुर्भाग्यच आहे.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

सारडांचा वैश्विक दृष्टीकोन

शंकर सारडा हे मराठी साहित्याचा परीघ विश्वव्यापी कसा होईल याचा व्यापक विचार करणारे, तशी सातत्याने मांडणी करणारे पुन्हा एकमेव समीक्षक. मराठी साहित्य इंग्रजीत अनुवाद होऊन जगभर पसरावं हा त्यांचा प्रयत्न. मी १९९८ ला इंग्रजी प्रकाशन विभाग काढून अनेक पुस्तकं सातासमुद्रापार नेली त्याची प्रेरणा सारडाच होते. आता तर अनेक मराठी प्रकाशकांनी इंग्रजी प्रकाशन विभाग सुरु केलेत. मराठीत नोबेलच्या तोडीची कलाकृती निर्माण होईल तेव्हा होईल पण मराठी साहित्याने पाश्चात्य जगात अनुवादित स्वरुपात प्रवेश करणं दिलासादायक आहे.

मराठीत विषय, वैविध्याची कमी राहिलीय. वैज्ञानिक घ्या की, समाजशास्त्रीय. अशा विषयांवर सहसा कादंबऱ्या लिहायला कुणी तयार नसायचं. पण सारडांनी चंद्रकांत मराठेंकडून 'केलाटाची हाक' सारखी भव्य विज्ञान कादंबरी लिहून घेतली. मला आनंद वाटतो की, मराठीतली ही पहिली स्वतंत्र विज्ञान कादंबरी मी प्रकाशित केली. पुढे रेखा बैजल या नवलेखिकेलाही त्यांनीच विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहायला प्रोत्साहन दिलं. त्यांचं एक पुस्तक मीही प्रकाशित केलंय. याचं कारण म्हणजे सारडांच्या वैश्विक दृष्टिकोनाशी मी पूर्ण सहमत होतो.

वर्तमानाशी नाळ, भविष्याचा वेध

मराठीतलं साहित्य बाहेर जावं असा त्यांचा आग्रह असायचा. तसाच जगात गाजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखन, लेखकांची ओळख मराठी वाचकांना व्हावी म्हणून त्यांनी असंख्य लेख लिहिले. मराठीत स्त्रीवाद ही संकल्पना नुकतीच कुठं चर्चेत आली. तेव्हा त्यांनी जगात गाजलेल्या स्त्रीवादी कादंबऱ्यांवर लेखन केलं. पुढे ते सर्व लेख 'स्त्रीवादी कादंबऱ्या' या शीर्षकाखाली मीच प्रकाशित केले.

त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मराठीतल्या महिला लेखिकांनाही नवी दिशा मिळाली. दूरदेशीचे प्रतिभावंत, काही लेखक: काही पुस्तकं, पुस्तकांचं जग अशी त्यांची पुस्तकं आपल्याला जागतिक साहित्य विश्वात अलगद नेऊन ठेवतात. आपली मराठी नेमकी कुठं कमी पडते याची जाणीवही होते आणि तशाच भव्य पण या मातीच्या कृती निर्माण करण्याचं बळ देतात.

वर्तमानाशी नाळ जुळवत भविष्याचा वेध घेणं त्यांची खासियत होती. ते ई-पुस्तकं, ई-मार्केटिंग या आधुनिक संज्ञा मराठी प्रकाशक, लेखकांसमोर ठेवत बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला शिकवायचे. त्यांच्या कामाच्या झपाट्याला विश्रांती नव्हती. पुस्तकातच जगणारा हा थोर माणूस होता. मला त्यांच्या मैत्रीचा अभिमान आहे. त्यांची सर्वाधिक पुस्तकं मला प्रकाशित करता आली याचा मला नितांत अभिमान आहे.

हेही वाचा: 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!