विनोद दुआ: न पाहता आठवणं, बघून समाधान देणं

०५ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद.

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांच्या निधनामुळे भारतीय टीवी पत्रकारितेतला एक महत्वाचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेलाय.  दूरदर्शनमधून त्यांची या क्षेत्रात एण्ट्री झाली. इथंच 'जनवाणी', 'परख' असे कार्यक्रम त्यांनी केले. 'जनवाणी' कार्यक्रमातून तर थेट मंत्र्यांना प्रश्न विचारत त्यांना फैलावर घ्यायचे. हे निर्भीडपणे प्रश्न विचारायचं काम शेवटपर्यंत चालू राहिलं. लोकशाही, स्वातंत्र्याच्या बाजूने ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते शेवटपर्यंत त्याच निर्भीडपणे 'जन गण मन की बात' करू शकले.

एनडीटीवी इंडिया या न्यूज चॅनेलसोबतही त्यांनी काम केलं होतं. एनडीटीवीचे 'खबरदार', 'जायका इंडिया' 'गुड मॉर्निग इंडिया' असे कार्यक्रम त्यांनी केले. इंग्रजी, हिंदी, पंजाबी, उर्दू अशा भाषांच्या मिश्रणामुळे त्यांच्याकडून वेगळं भाषिक सौंदर्य अनुभवता यायचं. त्यांची बोलण्याची एक वेगळी ट्यून होती. त्यात सहजता असायची. विनोद दुआ आणि एनडीटीवीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी एकत्र काम केलं होतं. त्या आठवणी सांगणाऱ्या रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला अनुवाद.

एखाद्या ठिकाणी तुम्ही नवखे असता तेव्हा तिथल्या जुन्या व्यक्तीकडे तुम्ही फार आशेनं पाहता आणि थोडं दचकून असता. त्यानं पहावं म्हणून तुमची तळमळ चाललेली असते. नजर चोरून तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहता. त्याच्या सारखं किंवा त्यापेक्षा अधिक काही बनायचं वेड तुम्हाला लागलेलं असतं. त्याच्यासारखं काही आपल्याला बनता येत नाही पण तसंच काहीतरी वेगळं आपण बनतो.

हेही वाचा: रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

विनोद दुआ यांना आम्ही अशाच आशा-निराशेच्या सर्व प्रकारच्या चढउतारांमधे पाहिलंय. बराच काळ आम्ही एकत्र होतो. वैयक्तिक नाही पण एक प्रोफेशन म्हणून. या काळातल्या आठवणी वैयक्तिक संबंधांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात.

मी त्यांना कायमच नजर वर करून सरळ चालताना पाहिलंय. खरंतर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. एक व्यक्ती इतकी सरळ कशी काय चालू शकते? सहजासहजी त्यांची नजर इकडेतिकडे वळायची नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे बघायची शक्यता फारच कमी असायची. शेवटी मार्ग एकच, तो म्हणजे तुम्हीच त्यांच्यासमोर येणं. पण काहीतरी भरीव केल्याशिवाय समोर येणं शक्यच नव्हतं.

त्यांना मैफिली जमवणं आवडायचं. पण ऑफिसमधे चेले तयार करून नाही. आपल्या जवळच्या मित्रांच्या सोबतीनं ते मैफिलीत रंग भरायचे. प्रत्येक वेळी त्यांचं काहीतरी गुणगुणत एण्ट्री करणं दिलासा देणारं असायचं. विनोद यांचं गुणगुणत राहणं आजूबाजूला थट्टा-मस्करीचं वातावरण तयार करायचं. नॉर्मल वाटावं असं.

विनोद यांच्यात निष्काळजी वाटाव्यात किंवा दुर्लक्षित कराव्या अशाही काही गोष्टी होत्या. पण तो त्यांचा जगण्याचा भाग होता. त्यामुळे कधीकधी त्यांनी इतरांसाठी आखलेल्या सीमारेषा त्यांनाच ओलांडाव्या लागायच्या. हसत हसत कुणी भेटलं की त्यांना बरं वाटायचं. कुणीही सहज उपलब्ध होणं मात्र त्यांना आवडायचं नाही.

हेही वाचा: बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय

काम करताना त्यांनी प्रत्येकाला समान संधी दिली. लोक त्यांना सहज त्यांच्या चुका सांगू शकायचे. ते मात्र कुणाच्या चुका सांगायला लागले की, समोरच्याला पळता भुई थोडी व्हायची.

विनोद यांच्याकडे माहितीचा खजिना होता. त्यांची स्मरणशक्तीही अद्भुत होती. एखाद्या कवीचा अख्खा शेर, तुलसीदास यांच्या रचना, कबीरचे दोहे त्यांच्या तोंडी अगदी सहज यायचे. त्यांना इतकं सगळं चटकन कसं आठवत याची कल्पना करणंही आमच्यासाठी अवघड होतं.

विनोद दुआ टीवी समोर यायच्या आधी एका खोलीत तयारी करत व्यस्त असायचे. साहित्य आणि शास्त्रीय संगीत याची त्यांच्याइतकी माहिती इतर कुणालाही नसेल. आपण त्यांना कायमच काम करताना पाहिलंय. पण विनोद, विनोद दुआ कसे बनले हे आपल्याला माहीत नाही.

विनोद हे गणपतीचे फॅन होते. त्यांच्या घरी गणपतीच्या अनेक मूर्ती होत्या. कदाचित गणपतीकडूनच फिरस्तीची प्रेरणा घेऊन त्यांचं भारतभर फिरणं सुरू झालं असावं. भारतातल्या एकाच भागात ते अनेकवेळा गेले. वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेले. कॅमेऱ्यासमोरची त्यांची उपस्थिती एका नव्या भाषेचा जन्म व्हावा अशीच असायची. त्यांच्या भाषेत वेगळेपणा होता. नकाशा काढणाऱ्या एका उत्तम कार्टोग्राफरप्रमाणे हे सगळं असायचं.

हेही वाचा: प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

इतक्या मोठ्या आयुष्यात शतकी खेळी करत राहणं अवघड आहे. यातल्या अनेक डावात त्यांच्यावर शून्यावर बाद व्हायची वेळ आली. दुसरीकडे धावा काढण्यापूर्वीच आऊट होऊन माघारी परतायचे किस्सेही आहेत. अनेकवेळा विनोद यांच्या हातातून बॅटही सुटलीय. पण जिथं केवळ त्यांचीच नजर पडेल अशा बॉलवर त्यांनी निर्विवाद धावाही केल्यात.

त्यांना विनोद म्हणणं आवडायचं. आम्ही बराच काळ एकत्र होतो. त्यांनी कधी माझा हात पकडला तर कधी केवळ रस्ता दाखवला. गुडगावमधे कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. मी त्याचं लाईव कवरेज करत होतो. संध्याकाळी ऑफिसला परतलो. ऑफिसच्या पायऱ्यांवर विनोद भेटले. मला थांबवलं. म्हणाले 'जे केलं ते वर्ल्ड क्लास होतं. जगभरचा मीडिया जे करू शकत नाही ते तुम्ही करून दाखवलं.' वर्ल्ड क्लास म्हणजे नेमकं काय? हे त्यावेळी आणि आजही मला समजलेलं नाही. पण विनोद यांनी ते अशापद्धतीने सांगितलं होतं की, स्वतःच्या कामाबद्दलचा विश्वास वाढला.

आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी त्यांनी कॉल केला. केलेलं काम 'वर्ल्ड क्लास' असल्याचं सांगितलं. विनोद दुआ यांच्यासाठी 'वर्ल्ड क्लास' म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न मला कायम पडत राहिला. मी त्यांना याचा अर्थ कधीच विचारू शकलो नाही. कारण त्यांनी 'वर्ल्ड क्लास' म्हटल्यावर मी लाजाळूसारखं आनंदाने स्वतःला मिटून घ्यायचो. त्यांनी केलेल्या कौतुकानं मला अपार आनंद आणि प्रोत्साहन दिलंय.

स्वातंत्र्याला ५० वर्ष झाली होती. त्यावेळी एक कार्यक्रम करायचं ठरलं होतं. त्या कार्यक्रमातली माझी स्क्रिप्ट आधीच कुणी पहावी असं मला वाटत नव्हतं. मी ही गोष्ट विनोद यांना सांगितली. विनोद म्हणाले, 'तू काहीतरी खोडसाळपणा करत असशील' मी म्हटलं, 'नाही सर. पण काहीतरी लिहिण्या किंवा बनवायच्या आधीच ते एखाद्याला का दाखवायचं?' विनोद यांचं उत्तर आलं, 'ठीक आहे. कुणी विचारलं तर विनोद दुआ यांनी बघितलं असं सांग.'

हेही वाचा: पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच

त्यांनी विचारही केला नसेल की, ज्या विनोद दुआंच्या जीवावर हा सगळा कार्यक्रम झाला थेट त्यांच्यावर या कार्यक्रमातून टीका होईल. या अचानक झालेल्या टीकेमुळे मुरब्बी बॅट्समन असलेले विनोद दुआही थोडे दचकले. पण त्यांची हरकत नव्हती. हे फक्त रवीश करू शकतो असं म्हणत कार्यक्रमातल्या प्रत्येक भागानंतर त्यांनी माझं कौतुक केलं.

माझ्यामधे कायम एखाद्या नवख्या व्यक्तीसारखा संकोच असायचा. मी दररोज आत्मविश्वास गमवायचो. पण पुन्हा उभाही रहायचो. विनोद माझं कायम कौतुक करायचे. माझ्यात मीडियाबद्दलचं प्रेम वाढायला ते कारण ठरले. त्यांच्याकडून हे जे काही मिळालं, बस तेवढंच पुरेसं आहे.

आम्ही व्यक्तिशः फार जवळ नव्हतो, पण माझ्या आठवणीतले विनोद दुआ एखाद्या फार जवळच्या व्यक्तीपेक्षा कमी नाहीत. त्यांचं न पाहता आठवणं, बघून समाधान देणं कायम आठवणीत राहील. त्यांच्याकडून दाद मिळाली, कधी मिळालीही नाही. एक चांगला गुरू हेच तर करतो. हक्काचं काही देतो पण हिस्सा मागत नाही. तो वेगळ्या मार्गाने जातो आणि आपण इतर कोणत्या.

आपल्याला ज्यांनी काही दिलंय त्यांच्याबद्दल कायम ऋणी रहायला हवं. विनोद दुआ यांनी आत्मविश्वास दिला. तोच पुढच्या प्रवासात फार कामी आला. ज्याच्या मदतीने आपण ड्रायविंग शिकलो त्याची प्रत्येक वळणावर आठवण येईलच असं नाही. पण प्रवासातल्या कुठल्यातरी वळणावर काही गोष्टी आठवत राहतातच की!

तुमचा वेग बदलतो. प्रवासाचा बाज बदलतो. विनोद दुआ, दुआ साहेब, विनोद... तुम्ही आयुष्याच्या अशा प्रत्येक टप्प्यावर या बदलणाऱ्या गियरच्या सोबत कायम आठवत रहाल.

हेही वाचा: 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

बाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार

आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद

पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन