कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

०३ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.

वर्ल्डकमधे दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या आशिया खंडातल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या टीमची सुरवात खूप वाईट झालीय. पाकिस्तानला पहिल्याच मॅचमधे १०५ रन काढता आले, तर श्रीलंकेला १३६ रनपर्यंतच मजल मारता आली. याउलट सगळेजण लिंबूटिंबू समजत असलेल्या अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळी करत २०० चा टप्पा पार केला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमधे बांगलादेश काय करते याकडे सर्वांचेच लक्ष होतं. पण बांगलादेशने आपण आता लिंबू टिंबू टीम नसल्याचं स्पष्ट केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमधे बांगलादेशने ३३० रनचा डोंगर उभारला.

बांगलादेशच्या रनरेटची दमदार उसळी

टॉस जिंकून आफ्रिकेने बांगलादेशला बॅटिंगसाठी पाचारण केलं. आपल्या फास्ट बॉलर्सची भीती दाखवून बांगलादेशला लवकरात लवकर गुंडळण्याचा त्यांचा होरा होता. कॅप्टन फाफ ड्यु प्लिसिसनेही त्यासाठीच आपल्या टीममधे आमलासारख्या बॅट्समॅनला डावलून ख्रिस मॉरिससारख्या ऑलराऊंडरला टीममधे स्थान दिलं.

टॉसवेळी टीममधल्या बदलाविषयी तो म्हणाला, ‘आम्ही खेळपट्टीवरील उसळी बघून हा बदल केलाय.’ पण प्रत्यक्ष मॅच सुरू झाली त्यावेळी बॉलने नाही पण, बांगलादेशच्या रनरेटने चांगलीच उसळी घेतली.

तमित इक्बाल आणि सौम्या सरकारने रबाडा, एनगिडी मॉरिस यासारख्या आफ्रिकेच्या तगड्या बॉलरांचा फक्त सामनाच केला नाही तर त्यांच्याविरुद्ध पॉवर प्लेमधे जवळपास ६ च्यावर रनरेटने रन काढले. नंतर या दमदार सुरवातीच्या पायावर शाकिब-अल-हसन आणि कॅप्टन मशिफकूर रहीमने एक एक मजला झपाट्याने चढवण्यास सुरवात केली.

या दोघांनी सौम्या सरकारने सेट केलेला रनरेट कुठंही खाली येऊ दिला नाही. या दोघांची बॅटिंग पाहून एखाद्या वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधलेच खेळाडू बॅटिंग करायला उतरलेत असं जाणवत होतं.

हेही वाचाः क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

वनडे, वर्ल्डकपमधली सर्वात मोठी धावसंख्या  

शाकिब आणि रहीमने केलेल्या या सेन्सेबल बॅटिंगचा धडा नक्कीच नवख्या अफगाणिस्तानच्या बॅट्समॅननी घ्यायला हवा. अशी सेन्सेबल बॅटिंग अफगाणिस्तानने केली असती आणि ५० ओवर खेळून काढले असते तर त्यांनी कालच्या मॅचमधे कांगारुंसमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं असतं.

अर्थात हा बॅटिंगमधला सेन्सेबलपणा मोठमोठ्या टीमबरोबर अनेक मॅच खेळल्यावर येतो. बांगलादेशची आताची टीमही पराभवातून शिकूनच तयार झालीय. आता या टीमला कोणत्या परिस्थितीत काय करायला हवं, कोणत्यावेळी आक्रमकता दाखवण्याची गरज आहे हे पक्कं ठाऊक झालंय. त्यामुळेच त्यांना आज आफ्रिकेसमोर ३३० रनचं आव्हान ठेवता आलं. ही त्यांची वनडेतली तसंच वर्ल्डकपमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर आहे.

खेळपट्टीचं गमक समजलेली टीम

आजच्या मॅचमधे शाकिब, रहीम, मिथून या तीन विकेट झटपट गमावल्यानंतर २५० वर असलेल्या बांगलादेशला आफ्रिका ३०० पर्यंत गुंडाळेल असं वाटलं होतं. पण मोहम्मदुल्लाच्या ४६ रनच्या आक्रमक खेळीमुळे ही टीम परिपक्व झालीय, याची जाणिव झाली. त्यांना वनडेमधे ओवरच्या कोणत्या स्लॉटमध्ये कुठल्या स्टाईलने खेळायला हवं याचं गमक समजलंय.

त्यामुळे वर्ल्डकपच्या आपल्या पहिल्याच मॅचमधे त्यांनी आफ्रिकेविरुद्ध वनडेतला आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर केला. पण बांगलादेश इथवरच थांबणार नाही त्याने आता कुठे विक्रम करण्याची सुरवात केलीय. अजून बरेच विक्रम ते यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नक्की करतील. तसंच बांगलादेश आता आशियातला ‘उगवता तारा’ नसून ‘चमकता तारा’ आहे, ही गोष्ट आजच्या मॅचने स्पष्ट केलीय.

हेही वाचाः 

अरुणा सबानेः एकटं राहणाऱ्या बाईच्या जगण्याची प्रेरणा

डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!

पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर