शहीद भगतसिंग: तरुणाईला प्रेरणा देणारा तत्त्वचिंतक

२८ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली.

आज २८ सप्टेंबर बरोबर ११४ वर्षांपूर्वी म्हणजे १९०७ मधे स्वातंत्र्याची ध्येयनिष्ठ लढाई लढणाऱ्या भगतसिंग यांचा जन्म झाला. भगतसिंग हे फक्त भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढत नव्हते तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी केलेली मांडणी फार महत्वाची होती.

भगतसिंग यांनी देशातले युवक, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी कसा असेल, जात धर्म आणि धर्मांधतेचं चित्र काय असेल याविषयीचं सखोल चिंतन केलं. त्यामुळे ते तत्वचिंतकही होते. त्यांनी लिहिलेले लेख, निवेदनं, पत्रकं, भाषणं आणि जेलमधल्या नोटबुकवरून त्यांचं तत्वचिंतक असणं ठळकपणे दिसतं.

भगतसिंग यांचा तरुणाईला संदेश

१६ मे १९२५ ला साप्ताहिक मतवालामधे 'युवक' नावाचा लेख भगतसिंग यांनी लिहिलाय. या लेखात युवक आणि त्यांचा उत्साह, जगातल्या क्रांत्यामधे युवकांची भूमिका याविषयीचं व्यापक विश्लेषण त्यांनी केलंय. युवक राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत अशी मांडणी करून युवकांनी जात, धर्म, वंश, प्रांत या भ्रामक कल्पनेत अडकू नये तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा असा संदेश त्यांनी दिलाय.

आपल्या भारतीय राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. It is the duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and humanism. आज कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असताना या दृष्टीची आणि दृष्टीकोनाची नितांत आवश्यकता आहे.

युवकांना उद्देशून लिहिताना ते म्हणतात, 'जगाच्या इतिहासाची पानं उघडून पहा, युवकांच्या रक्ताने लिहिलेले अमर संदेश आढळतील. जगातल्या सगळ्या क्रांत्याची, स्वातंत्र्य युद्धाची वर्णनं पहा त्यात केवळ युवकच भेटतील ज्यांना बुद्धिवंतांनी माथेफिरू, वाट चुकलेले म्हणून हिनवलंय, पण जे सुरक्षित किल्ल्यात बसले आहेत. त्यांना काय कळणार किल्ल्याच्या खंदकावर स्वतःच्या शरीराचे पूल तयार करणारे युवक कोणत्या पोलादापासून बनले होते.' हा संदेश मुळातूनच देशातल्या युवकांनी समजून घेतला पाहिजे.

हेही वाचाः खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

दिशा देणारं लेखन

क्रांतिकारक भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आंदोलनाची आणि लढ्याची माहिती आपल्याला काही प्रमाणात असते. पण त्यांची विचारनिष्ठा आपल्याला माहीत नसते.

२३ वर्ष ५ महिने इतकं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. इतक्या कमी वयात भगतसिंग हे सगळं कसं काय करू शकला असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्यादिशेनं पावलं पडायला हवीत. तरुणांची उत्सुकता वाढायला हवी.

भगतसिंग यांच्या अनेक लेख आणि टिपनांनी देशातल्या विद्यार्थी, युवा पिढीला एक दिशा दिलीय. त्यात 'सांप्रदायिक दंगे आणि त्यावरचे उपाय', 'अस्पृश्यतेचा प्रश्न', 'मी नास्तिक का आहे', 'विद्यार्थ्यांना आवाहन' अशा अनेक लेखांचा उल्लेख करता येईल.

भगतसिंगांचे चार महत्वाचे पैलू

त्यांच्या जीवनकार्य आणि विचार यामधे चार सुस्पष्ट आणि सामर्थ्यशाली पैलू पहायला मिळतात. ते म्हणजे साम्राज्यवादाविरुद्ध विनातडजोड संघर्ष, धर्मांधता आणि जातपातवादाशी कायमचं शत्रुत्व, भांडवलदार-जमीनदार वर्गाच्या राजवटीला ठाम विरोध आणि महत्वाचं म्हणजे मार्क्सवाद आणि समाजवाद हा देशासमोरचा एकमेव पर्याय असल्याची डोळस निष्ठा.

त्यांना अभिवादन करताना, या विचारसूत्राकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे त्यांचं नामस्मरण, उदोउदो करणाऱ्यांनी, भगतसिंगांचे विचार चुकीच्या पध्दतीने युवकासमोर ठेवणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे विचारसुत्र ठामपणे मांडायला हवं.

हेही वाचाः डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

जातपात आणि धर्मांधता

'कोरोना' वायरसशी आपण लढू पण राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा असलेल्या आणि राष्ट्रीय एकात्मतेला छेद देणाऱ्या जात आणि धर्मांधता याचा मुकाबला आपण कसा करणार आहोत हा कळीचा प्रश्न आहे. क्रांतिकारक भगतसिंग यांच्या विचारांचा स्विकार करणं त्यावरचं एकमेव उत्तर आहे.

जातपात आणि धर्मांधता ही आज प्रवृत्ती झालीय. ती प्रवृत्ती समजावून सांगितल्यामुळे किंवा परिस्थितीच्या दडपणाने बदलता येत नसते, कारण ती हितसंबंधातून निर्माण झालेली असते. ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी हितसंबंधावरच आघात करावे लागतात. भगतसिंग म्हणतात त्याप्रमाणे आपण कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे.

भगतसिंगांना खरं अभिवादन कोणतं?

भांडवलदार वर्गाच्या जैविक बुद्धिजीवीकडून सातत्याने 'विचारसरणीचा अंत', 'इतिहासाचा अंत' , ' तत्वज्ञानांचा अंत' असे व्यवस्था निर्मित वर्ग हितचिंतकांकडून गरजेनुसार जाहीर केले जातायत.  एवढंच नाही तर 'मार्क्सवादाचा अंत' असंही समाजमनात पसरवण्याची जणू स्पर्धाच सुरू झालीय.

दुसऱ्या बाजूला जागतिक कीर्तीच्या बीबीसी या प्रतिष्ठित माध्यमाकडून या शतकाच्या सुरवातीलाच घेण्यात आलेल्या व्यापक सर्वेक्षणानुसार जागतिक जनमतावर सर्वाधिक प्रभाव असलेला विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स यांचंच नाव पुढे आलंय. दलित-शोषित-कष्टकरी-कामगारवर्गाच्या शोषणमुक्तीचं मार्क्सने मांडलेलं शास्त्रशुद्ध समाजवादी तत्वज्ञान हेच मार्क्सच्या जागतिक प्रभावाचं कारण आहे.

दिशाभूल करणाऱ्या तत्वप्रणाली झिडकारून शोषणमुक्ती, मार्क्स, भगतसिंगांचे विचार समजून घेतले पाहिजे. तरच आपण शहीद भगतसिंग यांना प्रामाणिकपणे स्मरण करतोय असं म्हणता येईल. आज भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशात आज त्यांची आठवण काढली जातेय. ते अनेक देशातल्या युवकांचे प्रेरणास्रोत ठरतायत. यातचं त्यांच्या जीवनकार्याचं आणि विचाराचं महत्व अधोरेखित होते.

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

(डॉ. मारोती तेगमपुरे अंबड, जि. जालना इथल्या गोदावरी कला महाविद्यालयात अर्थशास्त्राचे विभागप्रमुख आहेत)