शाहीर शहाजी काळे: महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेणारे कलावंत

२७ मे २०२१

वाचन वेळ : ९ मिनिटं


मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. 

मूळचे कोल्हापूरचे आणि गेल्या ५० वर्षांपासून मुंबईत असणारे गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी चौफेर कला कारकीर्द गाजवणारे जेष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी नुकतीच आपल्या वयाची पंचाहत्तरी गाठलीय. त्यांच्या कला क्षेत्रातल्या कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.

आईकडून कलेचा वारसा

२७ मे १९४७ ला कोल्हापूरमधल्या एका कलावंताच्या कुटुंबात शाहिर शहाजी काळे यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण घराणं कलावंतांचं होतं. १९५० च्या दशकात त्यांच्या आई सुलोचना काळे या कोल्हापुरातल्या प्रसिद्ध कलावंत होत्या. लोकनाट्य, संगीत नाटक, मूक सिनेमा अशा तीनही माध्यमांत त्या काम करत होत्या.

अगदी बालगंधर्वसारख्या दिग्गज कलावंतासोबत त्यांनी नाटकात काम केलं होतं. त्यांचे मोठे बंधू मधुकर काळे, बहिण लता काळे, स्वतः शहाजी काळे आणि त्यांचे वडिल बाबूराव काळे असं त्यांचं कुटुंब होतं.

त्या काळात कलेला तेवढी प्रतिष्ठा आणि पैसा नव्हता. त्यामुळे शाहिर शहाजी काळे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. आईकडून कलेचा वारसा मिळालेल्या लता काळेही कलावंत होत्या. मोठा भाऊ शिक्षण घेऊन नोकरी करू लागला.

कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण, नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण तर कीर्ती कॉलेजमधे पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. समाजशास्त्र या विषयात बीए केलं. रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य बॅरिस्टर पी. जी. पाटील हे त्यांचे शिक्षणक्षेत्रातले गुरु.

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

बालकलाकार ते सहाय्यक अभिनेता

शहाजी काळे यांना बालपणापासूनच कलेची आवड होती. चौथी-पाचवीत असताना त्यांनी कोल्हापूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत मानेंच्या ‘चिमण्यांची शाळा’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं. राजा गोसावी, सीमा, चित्तरंजन कोल्हटकर अशी दिग्गज कलावंत मंडळी यात होती.

ज्येष्ठ सिने दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या ‘सख्या सजना’ या सिनेमात शहाजींना सहाय्यक अभिनेता म्हणून काम करायची संधी दिली. त्यानंतर दत्ता मानेंच्या ‘हाथ लावीन तिथं सोनं’ या सिनेमातही त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली.

शाळेतून कॉलेजमधे आल्यावर घरच्या मंडळींनी तंबी दिली की, आता शिक्षणाकडे लक्ष द्या. नाटक, सिनेमा बंद करा. घरच्या मंडळींची आज्ञा शिरसावंद्य मानून शहाजींनी कीर्ती कॉलेजमधून बीएची पदवी घेतली.

व्यवसायात मन रमलं नाही

त्यांची माया जाधव यांच्याशी ओळख झाली. माया जाधव ‘नवरंग’ म्युझिकल नाईट हा कार्यक्रम करायच्या. या कार्यक्रमात गायक म्हणून शहाजींची एण्ट्री झाली. यात शाहिरी, लोकगीत, सिनेमातली गाणी ते स्वतःच्या आवाजात गायचे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती अशा काळात ओपन शो आणि नंतर थिएटरमधे त्यांनी कार्यक्रम केले. माया जाधव यांचे रेकॉर्ड डान्स हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता नोकरी, कामधंदा करा असा उपदेश घरातून झाला, म्हणून शहाजी काळे यांनी इचलकरंजीत चहा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात इचलकरंजीला महेशकुमार अँड पार्टी, बाबला ऑर्केस्ट्रा, मेलडी मेकर्स असे मोठे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम व्हायचे. हे कार्यक्रम पाहायला शहाजी जायचे.

ऑर्केस्ट्रा पाहत असताना त्यांच्यातला कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणजे कलावंताचा पिंड असलेल्या शहाजी काळेंना नाईलाजाने चहा पावडर विक्रीचा व्यवसाय करावा लागला, पण या व्यवसायात त्यांचं मन रमलं नाही.

कलावंत सोबतीण माया जाधव

१९७० ला ते कोल्हापूर सोडून कलाक्षेत्रात काम करण्यासाठी माया जाधव यांच्यासोबत मुंबईला आले. ऑर्केस्ट्रामुळे तीन-चार वर्षात माया जाधव यांचं नाव झालं होतं. मोठ्या ऑर्केस्ट्रात डान्सर म्हणून त्यांना खूप मागणी होती. त्यामुळे माया जाधव मुंबईत स्थिरस्थावर झाल्या होत्या. मुंबईत त्यांचं स्वतःचं घर होतं.

मुंबईला गेल्यानंतर पाच-सहा महिने शहाजी काळे त्यांच्यासोबत केअर टेकर म्हणून जायचे. त्याच काळात शाहिर साबळे माया जाधव यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्या ‘कशी काय वाट चुकला’ या नाटकात दोघांनाही काम करण्याची संधी दिली. त्या नाटकाचे माया जाधव यांनी काही प्रयोग केले. त्यानंतर ‘शाहिर साबळे आणि पार्टी’मधे शाहिर साबळे यांच्यासोबत त्यांनी आठ वर्ष काम केलं.

त्या काळात निर्माते दिग्दर्शक संजय खान यांनी ‘द ग्रेट मराठा’ या हिंदी सिरीयलमधे शहाजींना शाहिराची भूमिका दिली. लोकरंगभूमीवर तरबेज झालेल्या शहाजी काळे यांनी तीन दिवसांचं शूटिंग एकाच दिवसात पूर्ण करून दिलं. त्यामुळे त्यांच्या कामावर संजय खान खूप खूश झाले.

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

ऑर्केस्ट्रा लवली स्टार्सची चलती

दहा वर्षांच्या काळात माया जाधव आणि शहाजी काळे यांनी अनेक कामं केली. त्या काळात ऑर्केस्ट्राच्या तारखा घ्यायला कॉन्ट्रॅक्टर्स ऑर्केस्ट्रा मालकांकडे येत, तेव्हा प्रत्येकजण माया जाधव आणि शहाजी काळे यांच्या रेकॉर्ड डान्सची मागणी करायचे. त्यामुळे त्यावेळी सर्व नामांकित ऑर्केस्ट्रांमधून माया जाधव आणि शहाजी काळे यांना सर्व प्रकारचे डान्स सादर करायची संधी मिळाली.

ही गोष्ट दोघांच्या लक्षात आली आणि आता आपण स्वतःचं काहीतरी सुरू केलं पहिजे असं त्यांना वाटू लागलं आणि १९८० ला त्यांनी ‘ऑर्केस्ट्रा लवली स्टार्स’ सुरू केला. त्यात मराठी, हिंदी गाणी, लोकगीतं, लावण्या असा मनोरंजन करणारा मसाला ठासून भरलेला होता.

त्या काळात आनंद शिंदे यांचं ‘जवा नवीन पोपट हा’ हे  लोकगीत खूप लोकप्रिय झालं होतं. हे गाणं शहाजी काळे आणि माया जाधव स्टेजवर सादर करायचे. त्याचबरोबर शाहिर दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ या सिनेमातलं ‘ये जवळ ये लाजू नको’ या गाण्यावरही दोघे नाच करायचे. ही दोन्ही गाणी ‘वन्स मोअर’ व्हायची. त्यामुळे शाहिर काळे सर्वांना माहित झाले. लवली स्टार्स ऑर्केस्ट्राचे त्यांनी महाराष्ट्रभर भरपूर कार्यक्रम केले.

मराठीत समूहनृत्याची परंपरा आणली

दरम्यानच्या काळात भालचंद्र पेंढारकर यांनी त्या दोघांना पुन्हा बोलावून घेतलं आणि ‘संगीत होनाजी बाळा’ या संगीत नाटकात संधी दिली. त्यात माया जाधव यांनी गुणवती ही मुख्य भूमिका तर शहाजी काळे यांनी शाहिराची दुय्यम भूमिका केली. या नाटकाच्या निमित्ताने त्यांचा मुंबईतल्या साहित्य संघात प्रवेश झाला.

साहित्य संघात त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले. विद्याधर गोखले यांच्या नाटकातही काम केलं. त्यानंतर स्वतःची ‘कुलस्वामिनी’ ही निर्मिती संस्था स्थापन केली. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला असणार्‍या ‘हा डौल मराठीचा’ कार्यक्रमाची नव्याने रचना केली.

मराठी लोकरंगभूमीवर सगळ्यात पहिल्यांदा समूहनृत्याची परंपरा त्यांनी मुंबईत सुरू केली. वासुदेव, गोंधळ, जागरण, लोकगीत, शेतकरी गीत, लावणी, अभंग, पोवाडा, शाहिरी, सवाल जबाब अशा नवरंगांचा समावेश असलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमांची निर्मिती केली.

महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार

त्या काळात कमलाकर सोनटक्के हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक होते. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने पॅरिस इथं होणार्‍या ‘भारत महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी माया जाधव अणि शहाजी काळे यांच्या या कार्यक्रमाची निवड झाली.

८ ते १० कलावंतांना घेऊन ते पॅरिसला गेले. पॅरिसच्या आयफेल टॉवरखाली असलेल्या रंगमंचावर त्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचं सादरीकरण केलं. महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेली. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत त्यांनी यशस्वीपणे कार्यक्रम सादर केले. शो संपल्यानंतर प्रेक्षक या मराठमोळ्या कलावंतांना भेटायचे.

तिथल्या महिलांना माया जाधव यांनी नेसलेल्या भरजरी नऊवारी साडी, शालू, पैठणीचे खूप कौतुक वाटायचं. ही साडी कशी नेसायची याची प्रात्यक्षिकं मायाताईंनी या विदेशी महिलांना अनेकदा करून दाखवली. परदेशात या कार्यक्रमाचं खूप कौतुक झालं. पॅरिसवरून भारतात आल्यावरही झालं. त्यानंतर ‘भारत महोत्सव’ हा कार्यक्रम सलग ५ वर्ष मॉरिशस, इस्त्राईल, जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, रशिया या देशात सादर झाला.

सिनेमा आणि नाटकांमधे काम

त्यानंतर शहाजी काळे यांनी ‘सोळावं वरिस धोक्याचं’, ‘अठरावं वरिस लग्नाचं’, दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘बजरंगबली का बकरा’ अशी नाटकं केली. दिलीप कोल्हटकरांच्या नाटकाचे शेकडो प्रयोग केले. आपल्या मराठमोळ्या कार्यक्रमात गण, गवळण, मुजरा, लावणी, शाहिरी, पोवाडा, सवाल जबाब अशा पारंपरिक कलांबरोबरच, भव्यदिव्य सेटस्, आकर्षक नेपथ्य, दिमाखदार प्रकाशयोजना, ठेका धरायला लावणार्‍या संगीताची जोड दिली.

मुंबईत अनेक मान्यवरांशी त्यांच्या ओळखी झाल्या. सुषमा शिरोमणी यांच्या ‘फटाकडी’ या सिनेमात लिला गांधी यांच्यासोबत शहाजी काळे यांना ‘कडकलक्ष्मी’ची भूमिका करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा जसा गाजला तशीच कडकलक्ष्मीची शहाजी काळेंची भूमिकाही गाजली.

मराठी सिनेसृष्टीत शहाजी काळे यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी शहाजींचं नामांकन झालं. त्यानंतर वी. शांताराम यांच्या ‘झुंज’ या सिनेमात दलित पुढारी, ‘जिद्द’मधे तमाशा कलावंत, ‘शापित’ सिनेमात विनोदी भूमिका तर ‘सवत’, ‘ठकास महाठक’, ‘स्वराज’, ‘एक उनाड दिवस’, ‘रानपाखरं’ अशा ३५ हून अधिक मराठी सिनेमात त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

कलाकार दाम्पत्याची धडपड

१९९० च्या दशकात ‘चित्रपती वी. शांताराम’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कला कारकीर्दीवर आधारित कार्यक्रम करायचा ठरलं. या कार्यक्रमाच्या उभारणीसाठी माया जाधव, शहाजी काळे या कलाकार दाम्पत्याने खूप मेहनत घेतली. त्यासाठी माया जाधव यांनी आपले दागिने गहाण ठेवले. पण कार्यक्रमाचं बजेट आपल्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे त्यांनी साहित्य संघातल्या बाळ भालेराव यांची मदत घेतली.

त्यांनी साहित्य संघाचा हॉल एक महिनाभर तालमीसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला. शिवाय या कार्यक्रमासाठी लागणारा भव्यदिव्य सेटही तयार करून दिला. या कार्यक्रमाचे ९ प्रयोग झाले. कार्यक्रम लोकांना आवडला होता. प्रेक्षक कौतुक करत होते. पण बुकींग होत नव्हतं. त्यामुळे तोटा सहन करण्यापेक्षा हा कार्यक्रम आता बंद करायचा असा निर्णय दोघांनी घेतला.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी एक गुजराती रसिक प्रेक्षक आला होता. तो मध्यंतरात शहाजी काळे यांना भेटला. कार्यक्रम आपल्याला अतिशय आवडला असून आपल्याला याचे अनेक प्रयोग करायचे आहेत, असं तो म्हणाला. शहाजी काळे यांनी या कार्यक्रमाचं अर्थकारण त्याला समजावून सांगितलं. त्यालाही त्याने मान्यता दिली आणि मुंबई आणि मुंबईबाहेरच्या गुजराती प्रेक्षकांसाठी त्यांनी ८० ते ९० कार्यक्रम केले.

सुरेखा पुणेकरांना महाराष्ट्रभर पोचवलं

त्यानंतर शहाजी काळे यांनी मनोहर नरे यांच्या मदतीने ‘सोळा हजारात देखणी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यात माया जाधव यांनी सुरेखा पुणेकर यांना संधी दिली. सुरेखा पुणेकर यांना तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या लावणी महोत्सवात पहिला क्रमांक मिळाला होता. त्यांना पुण्यातून मुंबईत आणलं. रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, अदाकारी नव्या पद्धतीने शिकवली.

दिलखेचक लावण्या, मनमोहक अदाकारी, तडाखेबाज सवाल जबाब, ठेका धरायला लावणारं संगीत अशी चौफेर भट्टी जमली. शिवाजी मंदिरला शुभारंभाचा पहिला प्रयोग झाला. रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर घेतला. सर्व प्रमुख न्यूजपेपरनी या कार्यक्रमाचं तोंडभरून कौतुक केलं.

‘सोळा हजारात देखणी’चे सगळे शो हाऊसफुल्ल झाले. शिवाजी मंदिरला सुधीर भट, मोहन वाघ, मच्छिंद्र कांबळी असे दिग्गज नाट्य निर्माते यायचे आणि शहाजी काळे यांना मिळत असलेलं यश पाहायचे. कारण नाटकापेक्षा ‘सोळा हजारात देखणी’ पाहायला प्रेक्षक तुफान गर्दी करत होते. सुरेखा पुणेकरांचं नाव झालं. २०० प्रयोगानंतर सुरेखा पुणेकर ‘सोळा हजारात देखणी’तून बाहेर पडल्या.

कलावंत लावण्यांमुळे थेट सिनेसृष्टीत

त्यानंतर माया जाधव, शहाजी काळे यांनी सुरेखा पुणेकरांच्या जागी संजिवनी मुळे नगरकर यांना मुंबईत आणलं. त्यांना मुंंबईतल्या स्टेज शोचे धडे दिले आणि माया जाधव, संजिवनी मुळे आणि मेघा घाडगे यांनी या कार्यक्रमाची उंची वाढवली. जोडीला होती शहाजी काळे, बाळ नाईक यांची सवाल जबाबाची जुगलबंदी, पांडुरंग कुलकर्णी यांचं बहारदार निवेदन यामुळे ‘सोळा हजारात देखणी’ हा कार्यक्रम भन्नाट चालला.

या कार्यक्रमामुळे लावणी सम्राज्ञी संजिवनी मुळे नगरकर महाराष्ट्राला माहित झाल्या आणि नृत्याची बिजली मेघा घाडगे यांना मराठी सिनेसृष्टीची दारं खुली झाली. देखणीचे ५०० हून अधिक प्रयोग झाले. या कार्यक्रमाने नाट्यगृहावरचे तिकिट विक्रीचे रेकॉर्ड मोडले. लावणीच्या इतिहासात एक नवं सुवर्णपान लिहिलं गेलं.

त्यानंतर शहाजी काळे यांनी ‘तालासुरांची गट्टी जमली’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात संजिवनी मुळे, मेघा घाडगे, सुरेखा कुडची, विजया निकम आणि स्वतः माया जाधव होत्या. एकाहून एक सरस लावण्यांची मेजवाणी देणारा कार्यक्रम म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली, पण या कार्यक्रमानंतर प्रिया अरूण, मेघा धाडगे, सुरेखा कुडची, हेमलता बाणे या मराठी सिनेमात बिझी झाल्या. त्यामुळे शहाजी काळेंनी या कार्यक्रमाचे प्रयोग थांबवले.

हेही वाचा: शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

नवोदित कलावंतांना संधी

त्यानंतर कृणाल म्युझिक कंपनीचे जयेश वीरा आणि अरूण कचरे शहाजी काळे यांना भेटले. त्यांनी कृणाल म्युझिक कंपनीसोबत लावण्यांचा अल्बम करण्याची संधी दिली. सुरवातीला १८ लावण्यांचा पहिला अल्बम त्यांनी केला. तो तुफान लोकप्रिय झाला. या अल्बमच्या हजारो सीडींची विक्री झाली.

अल्बम बनवण्यात हातखंडा झाल्यानंतर शहाजी काळे आणि माया जाधव यांनी लावणी, लोकगीतं, कोळीगीतं, देवीची गाणी, होळीची गाणी, कव्वाली अशा सर्व प्रकारचे २५०० वीडियो अल्बम केले आणि या अल्बमने अनेक नवोदित कलावंतांना संधी दिली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन त्यांनी आपल्या ‘कुलस्वामिनी मुंबई’ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून शंकर पाटील लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ या कौटुंबिक लोकनाट्याची निर्मिती केली. माया जाधव, प्रियंका शेट्टी, रविंद्र बेर्डे, पांडुरंग कुलकर्णी आणि शहाजी काळे यांच्या या नाटकात भूमिका होत्या. या नाटकाचे त्यांनी १५० हून अधिक प्रयोग महाराष्ट्रात सादर केले.

कलाविश्‍वातही स्वाभिमानाने वावरले

१९७० ते २०२० अशी सलग ५० वर्ष या दाम्पत्याने आपली कला कारकीर्द अक्षरशः गाजवली. एक हरहुन्नरी कलावंत म्हणून नाव मिळवलं. शाहिर, गायक, अभिनेता, संयोजक, निर्माता, दिग्दर्शक अशी चौफेर कामगिरी केली. सर्वगुणसंपन्न असलेल्या या अभिनेत्याला त्या तुलनेत मराठी सिनेमातून मोठ्या प्रमाणावर संधी मिळायला हवी होती. त्यांच्या कला कारकीर्दीबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळायला पाहिजे होते, ते मिळाले नाहीत.

खर्‍या कलावंतांना प्रेक्षकांकडून मिळणारा टाळ्या आणि शिट्ट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हाच मोठा पुरस्कार असतो. लाखो मायबाप रसिक प्रेक्षकांकडून मिळालेल्या या आशिर्वादामुळे ते धन्य झाले. गरिबीतून पुढे आलेले, कलेशी प्रामाणिक, वेळेचे काटेकोरपणे पालन करणारे, नम्रता, हजरजबाबी, संयमी, प्रेमळ, नवोदितांना मार्गदर्शन आणि संधी देणारं व्यक्तिमत्त्व अशी त्यांची महाराष्ट्राच्या कला क्षेत्रात ओळख निर्माण झाली.

शाहिरी, गायन, नृत्य, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, संयोजन, संघटन असे सर्वगुणसंपन्न असलेल्या शाहिर शहाजी काळे हे ७५ वर्षांच्या आयुष्यात कधीच कुणाच्या दारात काम मागायला गेले नाहीत. स्वाभिमानी बाण्याने ते कलाविश्‍वात वावरले.

कोरोनात प्रबोधनासाठी पुढाकार

१९७० ते २०१५ अशी ४५ वर्ष मुंबईत काळाचौकी, परळसारख्या गजबजलेल्या परिसरात शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर स्वतःच्या मालकीच्या घरात राहणार्‍या शहाजी काळे आणि नृत्य समशेर माया जाधव २०१५ ला मुंबईच्या गजबजाटातून दूर असलेल्या पनवेल इथल्या नव्या घरात रहायला गेले. आनंदाने आपलं आयुष्य जगतायत.

वयाची पंच्याहत्तरी पार केली तरी त्यांच्यातला कलावंताचा उत्साह अजून कायम आहे. म्हणूनच या वयातही आणि कोरोना साथीच्या संकटातही मोठ्या हिमतीने ते प्रबोधन करतायत. त्याचाच भाग म्हणून कोरोनाविषयक जनजागृती मनोरंजनातून प्रबोधन करणार्‍या कार्यक्रमासाठी त्याच्या निर्मितीच्या बैठकीसाठी पनवेल तहसील कार्यालयात त्यांनी हजेरी लावली. सोबत काम करण्याची तयारी दाखवली.

हेही वाचा: 

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव

सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!