छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही

०६ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`

छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू ६ मे १९२२ ला मुंबईच्या पन्हाळा लॉज या छत्रपतींच्या राजवाड्यामधे झाला. त्या वेळी त्यांचं वय होतं फक्त ४८ वर्षं. त्या वयातही ते मृत्यूला धैर्याने सामोरे गेले.

मृत्यू समोर दिसत असतानाही शाहू छत्रपती अंथरूणावर उठून बसले. ते सोबत्यांना म्हणाले, `मी जाण्यास तयार आहे. डर कुछ नही. सबको सलाम बोलो.` आणि ते शांतपणे मृत्यूच्या अधीन झाले. यानंतर त्यांचं पार्थिव कोल्हापूरला आणलं गेलं. तिथे लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचं दहन केलं.

हेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

पुण्यात शाहूंचा पुतळा उभारण्याचा ठराव

यानंतर लगेचच राजर्षींचं यथोचित स्मारक उभारण्यासाठी पुण्यामधे १४ जून १९२२ मधे काऊन्सिल हॉलमधे देवास (सिनियर)चे महाराज श्रीमंत तुकोजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ६०० निवडक प्रतिनिधींची सभा झाली. 

शाहू महाराजांचं स्मारक पुणे शहरात व्हावं, असा पहिला ठराव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडला. दुसरा ठराव भास्करराव जाधवांनी मांडला. त्यात त्यांनी सुचवलं की शाहू महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा उभा करावा आणि त्यांच्या ध्येयधोरणाला अनुरूप एक संस्था सुरू करावी.

या कामासाठी एक जनरल कमिटी नेमण्याचा ठराव बी. पी. जगताप यांनी मांडला. तर रावबहादूर सी. के. बोले यांनी या जनरल कमिटीमधून कार्यकारी मंडळ नेमण्याचा प्रस्ताव मांडला. या स्मारकाची पायाभरणी मुंबईचे गवर्नर सर लॉईडजॉर्ज यांच्या हस्ते करायचं ठरलं.

पुण्यात पूर्णाकृती पुतळा २०१३ला झाला

या समितीने जवळपास ४० हजार रुपये जमवले. पण पुढे १९२९पर्यंत या कामाला गतीच मिळाली नाही. तोपर्यंत कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रेरणेने शाहूंचा पूर्णाकृती पुतळा आणि शेतकी शाळा अशी स्मारकं उभी राहिली होती. कोल्हापुरातून पुण्यातल्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न सुरूच होते. 

पण पुण्यातील शाहू स्मारकाचं काम काही पुढे गेलं नाही. पुण्यात शाहूंचा पहिला पुतळा उभा रहायला १९६०चं दशक उजाडावं लागलं. आणि पूर्णाकृती भव्य पुतळा उभा राहिला तो आता सात वर्षांपूर्वी, म्हणजे २०१३ला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

शाहूंचं निधन झालं, तिथे स्मारक उभारावं

सभेत ठरलेल्या पुण्यातल्या स्मारकाविषयी तत्कालीन मंत्री आणि शाहू अनुयायी भास्करराव जाधवांनी ९ मे १९३०ला एक सविस्तर पत्र देवासच्या महाराजांना पाठवलं होतं. त्या पत्रात ते शाहू स्मारकाविषयी लिहितात, 'एक सुयोग्य स्मारक एव्हाना व्हायला हवे होते. महाराज,आपणच फक्त ते योग्य रीतीने करू शकाल.'

याच पत्रात भास्कररावांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याऐवजी वेगळ्याच स्मारकाची योजना स्वतंत्रपणे स्वतःच्या जबाबदारीवर देवासच्या महाराजांपुढे मांडली होती. ते या पत्रात पुढे लिहतात, 'पुण्यात प्रमुख अशा ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी श्री शाहू स्मारक समिती स्थापण्यात आली. आपण जमवलेली रक्कम व्याजासह सुमारे ४०,००० रू. असावी. उत्तम जागा खरेदीसाठी आणिपुतळ्यासाठी ही रक्कम अपुरी आहे.'

त्या पत्रात भास्करराव पुढे लिहतात, `त्यापेक्षा शाहू महाराजांचा अंत ज्या मुंबईत पन्हाळा लॉजवर झाला. त्या इमारतीचेच शाहूंचे स्मारक व्हावे. समाजाच्या कार्यासाठी हे भवन राखले पाहिजे होते. ही इमारत वसतिगृहास उपयुक्त असून मराठ्यांच्या कार्यक्रमास सोईचे केंद्र होते. ही इमारत करवीर दरबारकडून १,१०,००० रूपयास श्री. फनिबंध यांना विकण्यात आली. ही इमारत विकत घेऊन वसतिगृह आणि इतर कार्यक्रमासाठी योजिण्याची कल्पना मराठ्यांना पसंत पडेल व ते ठिकाण एक तीर्थक्षेत्र व तरुणांचे स्फूर्तिस्थान बनेल.'

ना मुंबईत स्मारक, ना पुण्यात 

शाहूंचं निधन झाल्यानंतर करवीर दरबारने लगेचच पन्हाळा लॉजची इमारत विकली. शाहू छत्रपतींचा हा पन्हाळा लॉजचा राजवाडा मुंबईतल्या गिरगाव भागातल्या खेतवाडी गल्ली नंबर १३ इथे होता. 

पुढे भास्कररावांनी या पत्रातच सुचवलंय, `या इमारतीचे सध्याचे मालक ही इमारत नजीकच्या काळात रू. ८० ते ९० हजारास विकणार आहेत. तेव्हा बँकेकडून या इमारतीच्या तारणावर रू.५० हजाराचे कर्ज घेऊन मान्य असल्यास हा व्यवहार पुरा करावा. नंतर देणग्या जमवून हे कर्ज परत करता येईल. ही इमारत ताब्यात आल्यावर देणग्यांसाठी मराठा शिक्षण परिषदेचे एक अधिवेशन ह्या इमारतीत भरवावे. सदर प्रसंगी शहरातील प्रतिष्ठितांची एक समिती बनवावी. रू. १००, १०, ५ आणि १ची तिकिटे ठेवावीत.`

थोड्या दिवसात रक्कम जमेल अशी भास्कररावांना खात्री होती. आणि ते त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार होते. देवासच्या महाराजांनी ही सर्व योजना आखण्यासाठी दोन प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवायचे होते. ही योजना तयार झाल्यावर ती स्मारक समिती आणि श्री राजाराम छत्रपती यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवायची, असंही पत्रात सांगितलं होतं. पण त्या योजनेला चालना मिळाली नाही. स्मारकाच्या कामालाही गती मिळाली नाही. 

हेही वाचा : शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

तिथे राजर्षींच्या नावाचा साधा फलकही नाही

स्वतः भास्करराव जाधवांनी प्रयत्न करूनही पन्हाळा लॉजच्या इमारतीत शाहूंचं स्मारक काही झालं नाही. त्यामुळे शाहू छत्रपतींचे निधन झालं, ती जागा पुन्हा एकदा एका पारशी ट्रस्टला विकली गेली. काही वर्षांपूर्वी या जागेवर एक 'इदूइला' नावाची टोलेजंग बिल्डिंग उभी राहिलीय. 

राजर्षी शाहू छत्रपती आजच्या प्रजासत्ताक भारताचे एक राष्ट्रपुरुष आहेत. अनेक राष्ट्रपुरुषांची जन्मस्थान आणि निधनस्थळं ही स्मारके झालीत. पण ज्या ठिकाणी या राजर्षी शाहूंनी अखेरचा श्वास घेतला, त्या ठिकाणी साधा एक फलकही नाही.

असं काय कारण घडलं की या ठिकाणी शाहूंचं स्मारक झालं नाही, याचा शोध मी अजूनही घेतोय. अर्थात कोल्हापूरला शाहूंच्या इच्छेनुसार त्यांची समाधी कोल्हापूर महापालिकेने बांधली. पण तीही त्यांच्या निधनानंतर तब्बल ९८ वर्षांनी. यामधे माझाही थोडाफार हातभार लागला, याचं समाधान आहे.

हेही वाचा : 

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य

कोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं?

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?

‘सदानंद मोरे सांगतायत, हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र 

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून : कुमार केतकर

(लेखक कोल्हापूर येथील इतिहास संशोधक आहेत. त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा संपादित लेख.)