शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

२९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


वयाच्या चाळीसाव्या वर्षी हातात पेन घेऊन १६ पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर भाऊ साठे यांची आज २६ ऑक्टोबर ही जयंती. अण्णा भाऊ साठे यांचे लहान भाऊ. पण एवढीच त्यांची ओळख नाही. शंकरभाऊंच्या आयुष्याचीही एक मोठी कथाय. एवढे दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या माणसाच्या कार्यावर प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी ‘शंकर भाऊ साठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात वेध घेतलाय. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक बाबूराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादीत भाग.

शाहीर शंकर भाऊ साठे (२६ ऑक्टोबर १९२५ ते १५ मार्च १९९६) यांचं संपूर्ण जीवन म्हणजे निवडुंगांच्या काटेरी फडावरुन आयुष्यभर अनवाणी चालणं. जन्माने मातंग. परिस्थितीनं दरिद्री. शिक्षणानं निरक्षर. हिंदीत म्हणतात, जब मुसीबतें आती हैं तो अपने बहनों को साथ लेकर आती है| तशी शंकररावांची अवस्था. कमालीची उपेक्षा. वंचना, उपासमार, कष्ट, दु:खद घटनांची न तुटणारी मालिका, एकाकीपण म्हणजे शंकरभाऊंचं आयुष्य.

१९३९ ला जन्मदाते वडील भाऊराव वारले. १० जून १९५६ ला आई वालूबाईचं निधन. १८ जुलै १९६९ ला मोठे बंधू लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचं निधन. ७ ऑक्टोबर १९६६ ला पत्नी जनाबाईचं निधन. आशा, उषा, चित्रा, रेखा आणि शेवटची जयश्री उर्फ शालिनी अशा पाच मुली आणि सहावा मुलगा संजयची आईविना सांभाळ करायची वेळ येणं, विवाहित मुलगा संजयचा अपघाती मृत्यू. पंकज आणि सचिन या दोन नातवंडांचीही जबाबदारी. अखेरची पाच वर्षे एकाकी. हे शंकरभाऊचं जीवन.

एक गोष्ट सोडली तर दाही दिशा अंधार

जगद्विख्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे लहान भाऊ एवढी एकच जमेची बाजू सोडली तर दाही दिशा अंधार ही परिस्थिती. उभ्या आयुष्यात शंकरभाऊंच्या हातात शंभर रुपयाची नोट कधीच आली नाही, हे विधान अनेकांना पटणार नाही; पण ते अक्षरश: खरं आहे. मी शंकरभाऊंना १९७१ पासून जवळून चांगला ओळखतो. १९५६ ते १९७१ मधे मी त्यांना अनेकदा पाहिलंय. त्यांची शेवटची दहा वर्ष खूप हलाखीत गेली. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, शहीद कॉ. गोविंदराव पानसरे, चंद्रकांत शेटे, खोपकर, साळवी, प्रा. बाबासाहेब घाटगे, प्रा, डॉ. शरद गायकवाड आणि मी स्वत:  अशांनी शंकरभाऊंना वेळेला मदत केली. कोणी कपडे घेतले; आकाशच फाटलं होतं. कसली मदत कसलं काय?

शाहीर शंकर भाऊ साठेंची उंची पाच फूट दोन इंच. काळा रापलेला रंग. डोक्यावरचे केस विरळ झालेले. धोतर, शर्ट, टोपी. पायात तुटलेली चप्पल. खांद्यावर टॉवेल. कधी कधी डोक्यावर फेटा. डोळे खोल गेलेले. लहानपणासूनच कुपोषण झालेली तब्येत. झिलकाऱ्याचा आवाज. झांज, तुणतुणे तर कधी डफ हातात. सोंगाड्यापासून मिळेल ती भूमिका तडीस नेण्याची कुवत. पण, अण्णा भाऊ, अमर शेख, दत्ता गव्हाणकर असे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध शाहीर नेहमीच मंचावर असल्याने त्यांना दुय्यम भूमिका मिळायची. पण हाडाचे कसलेले कलावंत, दांडगं पाठांतर, संयोजक, दिग्दर्शक, निर्माता होण्याची कुवत. प्रसंगी सारे वगनाट्य खेचून नेण्याची क्षमता शकरभाऊंमधे होती.

शंकरभाऊंचा स्वभाव नीतळ, सरळ, पारदर्शी, निरागस, विनोदी. अतिशय सहनशील, कष्टाळू, हसतमुख, संयमी, चिवट. एरवी जीवनात मूकपणा स्वीकारलेले, अंतर्मुख विनम्र व्यक्तिमत्व. मिळेल ते खाणारे. जागा मिळंल तिथं बसणारे, झोपणारे. मिळालेलं जीवन बिनतक्रार जगणारे. स्वत:च्या दु:खावर वेदनेवर विनोद करणारे. जीव लावणारे. मैत्रीला, स्मरणाला पक्के. विनम्र कलावंत.

झाडाखालचं झाड

अण्णाभाऊंचा लहान भाऊ. झाडाखालचं झाड. त्याच जे परिणाम असतात ते वाट्याला आलेलेच. पण सुरवातीच्या काळातच शंकरभाऊ आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व ठसवण्यात यशस्वी झालेले. बतावणी, विनोदी चुटके, तात्काळ सुचलेले संवाद, आवाजातली लयकारी, ताल ठेका, स्वरमेळ यांचे अचूक ज्ञान, नेमकी शब्दफेक. नेमके पॉज. बोलका सूचक अभिनय यामुळं शंकर हे अण्णा भाऊंचे कलासंपन्न भाऊ आहेत हे सिद्ध व्हायचं. त्यामुळं तमाशा, लोकनाट्य, कलापथक, सवालजवाब, वगनाट्य या सर्वच कलाप्रकारात शंकरभाऊ सिद्धहस्त कलावंत म्हणून मान्यताप्राप्त ठरले.

शंकरभाऊंच्या आयुष्यात १९४४ ते १९६६ हा काळ चढत्या क्रमानं मागणीचा राहिला. लालबावटा कलापथक, अण्णा भाऊ-अमरशेख लोकनाट्य तमाशा मंडळ, इप्टा थियटर, दत्ता गव्हाणकर कलापथक, अमर कलापथक, अण्णा भाऊंचे चित्रपट अशा रंगमंचीय कलामंचावर लहान-मोठ्या कामांसाठी शंकरभाऊ वावरत राहिले. लोककलेची त्यांनी केलेली सेवा दखल घेण्याजोगी महत्त्वाचीय.

चाळीशीत आला हातात पेन

शंकरभाऊंची लेखनप्रतिभा लक्षात यायल खूपच उशीर झाला. काबाडकष्टाचं धावपळीचं जगणं. आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी साधनसामग्री जमा करण्यातच हयात खपलेली. रोजीरोटीचा सवाल रोजच टांगलेला. अशात क्रमाक्रमाने घरात ओढवलेले नातेवाईकांचे मृत्यू. यामुळं शंकर भाऊ कागद पेनकडे वळले तेव्हा त्यांनी वयाची चाळीशी पार केलेली. १९६८ ला एका दिवशी अण्णा भाऊंनी शंकरभाऊंना जवळ घेतलं. अण्णा भाऊ जीवघेण्या मोठ्या आजारातून कसंबसं बाहेर पडत होते. आपण उठून नव्याने जास्त काही करु ही आशा मावळत चालली आहे हे त्यांना कळत होते.

अण्णा भाऊ शंकरभाऊंना म्हणाले, ‘शंकर तू माझी सावली. तू प्रतिअण्णाच आहेस. आजपर्यंत तू माझी चांगली साथ केलीस. माझा शब्द झेललास, राग पेललास, तऱ्हा सांभाळल्यास. आपण तत्त्वांसाठी जगलो. शोषणमुक्तीसाठी लढलो. समाजवादी समाजसत्तेसाठी रक्त आटवले. एक दिवस समतेचा, ममतेचा, मानवतेचा उगवणारच आहे. आपल्यासारख्या किती पिढ्या जातील सांगता येत नाही. शिवराय लढले. फुले शाहू, आंबेडकर त्यांचे समतेचे तत्त्वज्ञान सातत्याने मांडत राहिले. मार्क्स, लेनिन, माओ, डांगे कष्टकऱ्यांची फळी बांधताहेत. आपण लहान माणसं. पण आपला त्याग महान आहे. त्याचा अभिमान धर! खंड पडु देऊ नकोस. मी थकलो. हा माझा आवडता पेन धर. लिहायला सुरवात कर! तू चांगला लेखक होणार आहेस. शब्द विकू नकोस. नको ते लिहू नकोस. माझ्या मार्गावरुन चल. नैतिक लेखकांचा भविष्यकाळ उज्ज्वळच असतो. लोकलढा, लोकसंस्कृती, लोकचळवळ हाच आपला चिंतनविषय. लेखनविषय.’

शंकरभाऊ हुंदके देऊन रडत राहिले. अण्णा थोपटत राहिले. भावाचा आत्मविश्वास जागवत राहिले. शंकरभाऊंची शब्दसाधना सुरु झाली. शिक्षण नव्हते. सारे मौखिक. बोलणं, गाणं, किस्से सांगणं, अनुभवकथन. बाराखडीने वर्ष घेतले. अचूक वाक्यरचना, शब्दनिवड, विरामचिन्हं. अक्षर कुत्र्या-मांजरांची पावले. लेखनापेक्षा वाचनात गती. ध्यास घेतलेला. एखादं पान लिहून अण्णाभाऊंना दाखवणं. अण्णांच प्रोत्साहन, सखोल मार्गदर्शन. पण हे सगळं काळाला कसं आवडेल?

अण्णाभाऊ गेले. उभा कष्टकरी महाराष्ट्र पाझरला. पुरोगामी मध्यमवर्गही गहिवरला. आदरांजली, श्रद्धांजली, आठवणी, साहित्य प्रकाशन, साहित्य वितरण, वाचन, जयंती, स्मृतीदिन, स्मृतिज्योती, साहित्य संमेलनं, अभ्यासक्रमात अण्णाभाऊ, विद्यापीठांचं प्रबंध लेखन, स्मृतीकथन सांस्कृतिक महाराष्ट्राचं आकाश अण्णाभाऊंनी व्यापलं.

पण पुस्तकं छापणार कोण?

शंकरभाऊंची भावजखम खोलवर चरत गेलेली. स्मरणातून भावशब्द गळत राहिले. ‘माझा भाऊ अण्णा भाऊ’ हे चरित्र कागदावर उतरलं. आता शंकरभाऊंची लेखणी गतिमान झाली. त्यांनी चौदा कादंबऱ्या, काही कथा लिहिल्या. एकूण सोळा पुस्तकांची सामग्री शंकरभाऊंनी लिहून काढली.

शंकरभाऊ लिहत राहिले पण प्रकाशक मिळत नव्हते. पहिले ‘माझा भाऊ अण्णा भाऊ’ हे अण्णांच्या चरित्राचे पुस्तक २८ नोव्हेंबर १९८० ला सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिरात अनेकांच्या उपस्थितीत सन्मानानं प्रकाशित झालं. महाराष्ट्रानं या चरित्रग्रंथाचं उत्साहात स्वागत केलं. पहिली आवृत्ती हातोहात संपली. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि एका पाठोपाठ एक आलेल्या बारा पुस्तकांचं अशा एकूण तेरा पुस्तकांचं प्रकाशन पुण्यातील सुप्रसिद्ध विद्यार्थी प्रकाशनानं केलं.

या प्रकाशनाचे मालक खोपकर आणि साळवी यांनी यापूर्वी अण्णाभाऊंच्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे. शंकरभाऊंची सर्व पुस्तकं प्रकाशित करुन त्यांना थोडेफार मानधन देऊन विद्यार्थी प्रकाशनाने मराठी साहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं कर्तव्य बजावलंय. विशेषत: एकाही दुसऱ्या प्रकाशकाने शंकरभाऊंचे एकही पुस्तक प्रकाशित केलं नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रकाशनाचे काम महत्त्वाचं ठरतं.

शंकरभाऊंनी ‘माझा भाऊ अण्णा भाऊ’, ‘एकच काडतूस’, ‘सूड’, ‘घमांडी’, ‘काळा ओढा’, ‘हंबीरा’, ‘सगुणा’, ‘जग’, ‘सावळा’, ‘लखू’, ‘बायडी’ आणि ‘बाजी’ ही ग्रंथसंपदा. शंकरभाऊंची एक कांदबरी अप्रकाशित राहिली. एक अर्धी लिहून झाली आहे. अशी एकूण १४ पुस्तकं शंकरभाऊंनी १९८० ते १९९२ या काळात लिहिली. याशिवाय कुऱ्हाडीचा घाव, आम्हीही माणसे आहोत, राणोजी अशा कथा तर काही प्रचारगीतं, लावण्या त्यांच्या नावावर सापडतात. हे संकीर्ण साहित्य संशोधकाने संकलीत केलं आहे.

लवकरच होणार प्रकाशन

हे महत्त्वपूर्ण साहित्य नव्यापिढीसाठी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत लिहित झालेल्या निरक्षर, दरिद्री, दलित लेखकाच्या साहित्याची दखल मूळ प्रवाहानं साधी नोंदही घेतली नाही. सर्व अंगांनी उपेक्षा, अपमान, होरपळ केलेल्या, विस्कटलेल्या साहित्य आणि साहित्यिकाचा जीवनाचा, त्याच्या वाड्:मयीन कार्यकर्तृत्वाचा अत्यंत जिव्हाळ्याने अभ्यास करण्याचा चांगला प्रयत्न प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी केला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. या विषयाचा डॉ. कसाब यांनी त्यांना शक्य त्या पद्धतीने वैविध्यपूर्ण मुद्यांच्या आधारे अभ्यास केलाय. डॉ. कसाबांचा दृष्टिकोन लेखकाविषयी, अभ्यासाविषयी आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा काहीसा पक्षपाती आहे. आवश्यक तिथं ते तटस्थही होऊ शकतात.

‘शंकरभाऊंच्या साहित्याच्या मर्यादा’ असा स्वतंत्र मुद्दा घेऊनही त्यांनी चर्चा केलीय. डॉ. कसाब यांचा विषयनिवडीपासूनचा दृष्टिकोन जात जमात, वर्गीय चळवळीचा आहे. सन्माननीय अपवाद वगळता मराठीतील बहुतांश साहित्य संशोधन या दोषाने काळवंडलेलंय. तरी विषय निवडीच्या वेळच्या या नाजूक नात्यांची दखल घेतानाच निवडीनंतरचे संशोधन किती दर्जेदार पद्धतीचे आहे याचाही वेध अभ्यासकांनी घेतला पाहिजे.

चरित्रग्रंथाचं यशापयश

कसाब सरांनी अभ्यासाविषय असलेल्या शंकर भाऊ साठेंच जन्मगाव आणि त्या परिसराचा सखोल इतिहास तपासला आहे. अण्णाभाऊंच्या मातंग समाजाच्या इतिहासाची, स्वरुपाची तपशीलवार मांडणी केली आहे. शंकरभाऊंनी बारा कादंबऱ्याच लिहिल्या आहेत, हे गृहीतक संशोधकानं का? कसं स्वीकारलं आहे याची थोडीही चर्चा पुस्तकात नाही. या कादंबऱ्या आहेत, का दीर्घकथा आहेत, की चरित्रकथा आहेत याची थोडीतरी चर्चा अपेक्षित होती. मूळ लेखक अनघड असल्यामुळं ही चर्चा गरजेची होती. ‘कादंबरी’ या वाड्:मयप्रकाराची चर्चा मात्र कसाबांनी भरपूर केलीय. शंकरभाऊंच्या लेखनाचे विषय, त्यांचा आशय, तिथली वातावरण निर्मिती, भाषाशैली आणि व्यक्तिचित्रणं यांची तपशीलवार चर्चा पुस्तकात आलीय.

शंकर भाऊ साठे हा मुख्य प्रवाहाने पूर्णत: नाकारलेला; पण हजारो सामान्य वाचकांनी भरभरुन वाचलेला लेखक संशोधन विषय म्हणून निवडल्याबद्दल डॉ. मारोती कसाब यांना धन्यवद दिले पाहिजेत. मुख्य साहित्य प्रवाहांनी पूर्णत: नाकारलेले अण्णाभाऊ आणि शंकरभाऊ हे दोन्ही भाऊ संशोधन विषय ठरतात. हजारोंनी वाचक वाचतात. उशिरा का होईना मराठी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांची दखल घेतली जात आहे, ही आनंददायी घटना आहे.

शंकर भाऊ साठे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व

प्रा. डॉ. मारोती कसाब (९८२२६१६८५३)
प्रतिमा प्रकाशन, पुणे (९७६४४८७२७२)
पानं : ३४४
किंमत : ४०० रुपये