शरद पवारांचं बेरजेचं राजकारण निव्वळ पंतप्रधान होण्यासाठी नाही, तर

१८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांनी आपण थेट निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. आजपर्यंत आपण सांगितलं ते सगळे आम्ही ऐकत आलोत. आता आम्ही सांगतो ते एकदा ऐका, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केली. त्यामुळे आपण आगामी लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याचा विचार करू असा मानस पवारांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केला. पवारांच्या या भुमिकेतून त्यांनी लोकसभा निवडणूक किती गांभिर्याने घेतलीय याचे संकेत मिळतात.

भाजपला यश, पण वलय मोदींचं

गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांची जादू अशी काही मतदारांवर चालली होती, की त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. या निवडणुकीतल्या यशाने भाजपच्या विजयापेक्षा कितीतरी पटीने मोठं वलय नरेंद्र मोदी यांना मिळवून दिलं. 

या वलयाचा कोष नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच भोवती विणला. त्यामुळे हे यश भाजपचं नाही तर एकट्या मोदींचं आहे, असा उद्घोष भाजप तसंच त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्वच संघटनांच्या प्रमुखांकडून वेगवेगळ्या मंचावरुन होत राहिला. काही मोजकेच अपवाद वगळता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगाण गेल्या चार-साडेचार वर्षात पक्ष तसेच इतर संलग्न संस्थांच्या माध्यमातून गायले जाताहेत. यालाच सर्वजण गेल्या निवडणुकीपासून मोदींची लाट, मोदींचा करिश्मा असं म्हणताना दिसतात.

दोन वर्षांत परिस्थिती बदलली?

निवडणुकीनंतरची दोनेक वर्ष हेच सुरू होतं. मात्र मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची उदाहरणं गेल्या दोन वर्षांमधे सातत्याने दिसून येताहेत. गुजरातमधलं काठावरचं बहुमत असो, की कर्नाटकमधील निवडणूक, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतल्या निवडणुकीचा निकाल यामधे सत्ताधारी भाजपला लोकसभेसारखं घवघवीत यश मिळालं नाही.

उत्तर भारतातली महत्वाची तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली. दक्षिणेतही भाजपच्या हाताला सध्यातरी फारसं यश मिळताना दिसत नाही. कर्नाटकातला सत्तापरिवर्तनाचा प्रयत्नही फेल गेलाय. अजूनही कर्नाटकमधे काँग्रेस, जेडीएस आघाडी आपले आमदार फोडत असल्याचा आरोप भाजपवर करतेय.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सत्ताधारी पक्षाला अनुकूल असं वातावरण निर्माण होण्यासाठी सरकारला अनेक संधी होत्या. त्या संधींचं सोने मोदी किंवा त्यांचा पक्ष आणि संलग्न संघटनांना करता आलं नाही. उलट मोदीविरोधी सूर अधिकाधिक मजबूत होत असल्याचं दिसतंय. चाळीसेक पक्षांची सोबत हेही गेल्या निवडणुकीत भाजपचं बलस्थान होतं. पण आता एनडीएतले घटकपक्षही एक एक करून भाजपची साथ सोडताना दिसताहेत.

एनडीएमधे फाटाफूट विरोधकांची एकजूट

दुसरीकडे मोदींचं नाव घेऊन भाजपच्या विरोधात सर्वच विरोधक एकत्र येताहेत. त्यामधे या सगळ्या पक्षांतल्या विरोधकांना एकत्र येण्यासाठी बळ देण्याचं काम शरद पवार करताना दिसतात. उत्तरेत अखिलेश यादव आणि मायावती, पूर्वेत ममता बॅनर्जी, दक्षिणेत चंद्राबाबू नायडू, स्टॅलीन, कुमारस्वामी आणि पश्चिमेकडे तरुण नेतृत्व हार्दिक पटेल या सगळ्यांच्याबरोबर पवारांचे संबंध चांगले आहेत. हे सगळे जणच शरद पवारांकडे आदराने बघतात.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याबरोबरही पवारांचे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर सध्या तरी आकडेवारीच्या हिशेबाने नगण्य वाटणारा देशपातळीवरचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसशी पवारांचं सख्य आहेच. ओडिशामधेही पटनाईक यांच्याबरोबर हितसंबंध आहेत. या सगळ्यांची कधी थेट, तर अनेकदा पडद्यामागून बेरजेच्या राजकारणातून मोट बांधण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या बैठका घडवून संपर्कात राहण्यामधे पवार वाकबगार आहेत. पवारांच्या या खेळीचा लोकसभा निवडणूक निकालावरही नक्कीच परिणाम होईल, असं दिसतंय.

देशपातळीवर विविध पक्षांबरोबर ताळमेळ साधून सत्तासोपानापर्यंत जाण्यासाठी पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातही सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांबरोबरच ते सत्तेमधे सहभागी पक्षांच्या नेत्यांच्याही संपर्कात असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालंय. किंबहुना या पक्षांचे नेतेही पवारांच्या संपर्कात आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या नेत्यांच्या भेटीही त्यांनी घेतल्यात, घेत आहेत.

भाजपविरोधी आघाडीला पवार ‘पॉवर’

राज्यात भाजपबरोबर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या धोरणं ठरवणाऱ्या नेत्यांशी आणि प्रमुखांशीही पवारांचं बोलणं सुरू असतं. या सगळ्याचा परिपाक पाहिला तर त्यामधे भाजपविरोधी आघाडीला बळ मिळत असल्याचं दिसतं.

राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेकदा टीका केलीय. तेही पवार यांच्या संपर्कात असतात हे जगजाहीर आहे. घड्याळाच्या काट्यावर इंजिन चालणार अशा पद्धतीने मथळेही याअनुषंगाने सोशल मीडिया तसंच काही पेपरांमधे झळकलेत. आपल्या कट्टर विरोधकांनाही आपलंसं करणं या शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचाच हा एक महत्वाचा भाग म्हणता येईल.

कधीकाळी राजकारणात सक्रीय असलेले बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांना काही दिवसांपूर्वीच पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे आणलं. त्याचबरोबर गुजरातमधे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनाही राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पवारांनी गुजरातमधे मोठी खेळी केलीय. याच एकाला एक जोडत जाण्यातून बेरजेचं राजकारण करण्याची त्यांची हातोटी आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक सर्वमान्य नेते म्हणून पवार यांची प्रतिमा उभी झाली, तर आश्चर्य वाटायला नको. आता तीच प्रतिमा दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसतेय.

संख्याबळ नसतानाही एकजुटीसाठी प्रयत्न कशामुळे?

निवडणुकीच्या राजकारणात आकड्यांचा खेळ खूप महत्वाचा असतो. पवारांनीही आपल्याला याची जाणीव असल्याचं अनेकदा बोलून दाखवलंय. आकड्यांचा विचार करता आपला पक्ष खूपच छोटा आहे. त्यामुळे आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असूच शकत नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी अनेकदा दिलीय. या स्पष्ट जाणिवेतूनच त्यांनी विरोधक एकत्र आणण्याचं बेरजेचं राजकारण मात्र जोमाने चालू ठेवलंय.

एकूणच आज विरोधकांच्या एकतेचा विचार करता अनेक नेत्यांची नावं पंतप्रधान पदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. सध्या तरी या गोष्टी लोकसभा निवडणूक निकालानंतरच्या आहेत. त्यावेळी ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त त्या पक्षाच्या नेत्याचं नाव पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे असणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाही. पक्षाच्या संख्याबळासोबतच एखाद्याच्या सोबत असणाऱ्या संख्याबळालाही खूप महत्त्व येतं.

अशावेळी शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला खूप महत्त्व येईल. सरकारही येईल आणि या राजकारणात पवारांना पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली तर सर्वोच्च संविधानिक पद असलेल्या राष्ट्रपती पदाचे सध्यातरी ते एकमेव प्रबळ दावेदार असतील. त्यावेळी शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचा नक्कीच उपयोग होईल यात शंकाच नाही.