शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

१९ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.

हवामान विभागाला आपल्याकडे फार गांभीर्यानं घेण्याची पद्धत नाही. पण गेल्या काही अंदाजांमधे हवामान विभागानं शंभरपैकी शंभर गुण मिळवलेत. यंदाही पावसाचा अंदाज होता. खरंतर आता ऑक्टोबर हीटचा हंगाम आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेनं सगळ्याच राजकीय पक्षांना घाम फोडलाय. प्रचारसभा दरवेळीप्रमाणे यंदाही झाल्या. पण २०१९च्या निवडणुकीतली साताऱ्यात झालेल्या सभेची इतिहासात नोंद घेतली जाईल.

बुधवारीच हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलेला. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात पाऊस पडेल, असा इशारा होता. विशेष सांगायचं म्हणजे हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडले, असं काही आपल्या इशाऱ्या म्हटलं नव्हतं. अशात गुरुवारी उकाडा फार वाढला. शुक्रवारी सकाळपासूनच सगळीकडे मळभ दाटलं होतं.

गेल्या ५ वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष कोणत्या मनस्थितीत होता, याचा अर्थ उलगडून कुणाला सांगायचा असेल, तर हे मळभ दाखवण्याची संधी विरोधकांकडे होती. अशातच मळभ असलेल्या वातावरणात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सोलापूरच्या पंढरपूर आाणि बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत सकाळी सभा घेतली.

पवारांना ऐकायला पाऊसही आला

संध्याकाळी पवार साताऱ्यात दाखल झाले. तोपर्यंत हवेतली आर्द्रता आणखी वाढली होती. पावसाच्या इशाऱ्याला नेहमीप्रमाणे सिरियसली न घेता राष्ट्रवादीची प्रचारसभा सुरु झाली. साताऱ्याचं जिल्हा परिषदेचं मैदान पवारांना ऐकायला सज्ज झालं होतं.

अस्पष्ट उच्चारांमुळे पवार भाषण करताना अनेकदा काय बोलतात, हे कळतही नाही. असं असलं, तरीही जिल्हा परिषदेचं ग्राउंड खच्चाखच भरलं होतं. पवार बोलायला उभं राहिले. आणि पाऊसही पवारांना ऐकायला आला.

लोकांना वाटलं पवार आटोपतं घेतील आणि निघून जातील. ऐकायला आलेल्यांनी आडोसा धरायला सुरवात केली. पण बघता बघता आडोशाला गेलेल्यांना पवारांनी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आडोसा सोडायला लावला.

पवारांची खेळी पेचात टाकणारी

भर पावसात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आपलं झंझावती भाषण सुरुच ठेवलं.  पवार पावसातच भाषण करताहेत, हे पाहून लोक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखीनच उत्साहीत झाले.

टाळ्या, शिट्ट्या, पवारांच्या नावाचा जयजयकार आणि राष्ट्रवादीचा जयघोष, असं सगळं पवारांच्या भाषणादरम्यान सुरुच होतं. भर पावसात ८० वर्षांचा म्हातारा, पायाला गंभीर जखम झालेली असतानाही, लोकांशी बोलत राहतो.

ही थोरच गोष्ट होती. पवारांची राजकीय खेळी सगळ्यांनाच पेचात टाकणारी असते. त्यांच्या या भर पावसात केलेल्या भाषणानंही जनतेला पेचात टाकलंय.

हेही वाचा : भीम परतून आल्यासारखं वाटतंय!

काय फरक पडणार?

पवारांनी भर पावसात भाषण केल्याचा विडिओ, फोटो वाऱ्याहून अधिक वेगाने वायरल झाले. त्यामुळे भाजपची सत्ता जाणार का? पावसात भिजत लोकांना साद घालणाऱ्या पवारांमुळे आघाडीच्या जागांमधे वाढ होणार का? पवारांना बदलेल्या माध्यमांची नस सापडलीय का? पवारांचा पॅटर्न बदललाय? या सगळ्या प्रश्नांवर गल्लोगल्ली चर्चा रंगतील, यात शंकाच नाही. पण नेमकं या सगळ्यातलं काय होणार?

भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी पवारांच्या पावसातील भाषणाची दाद देतेय. राजकीय विचारसरणीच्या पलिकडे जाऊन हे कौतुक होतंय, ही गोष्ट इथे नोंदवायला पाहिजे.

याचा नाही म्हटलं तरी थोडाफार परिणाम मतांवर होईलच. पण तो परिणाम नेमक्या कोणत्या भागातून येतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

तरूणांना आकर्षित करण्यात यश

राष्ट्रवादीबाबत पश्चिम महाराष्ट्रात बराच राग होता. सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीनं अन्याय केल्याची भावना होती. राग होता. चीड होती. मतदार संतापले होते. पण पवारांच्या पावसातल्या भाषणामुळे एक प्रकारची सहानुभुती मिळवण्यात पवार यशस्वी झालेत.

इतकंच नाही, तर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देणाऱ्यांनीच पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला होता, असं बिंबवण्यातही पवार यशस्वी झालेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या जागा काहीशा वाढतील, अशी शक्यता आहे. पण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मतदार घाम फोडतील असं दिसतंय.

पवार पावसात भिजल्याचे फोटो सोशल मीडियात एका रात्रीत वणव्यासारखे पसरले. त्यांच्यावर लोक लिहू लागले. त्यांची स्तुती करु लागले. याचा अर्थ तरुणांना आकर्षित करण्यात पवार यशस्वी झाले, असा घेता येऊ शकतो. 

हेही वाचा : #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

पुराची पाहणी करायला गेलेला एकमेव नेता

पश्चिम महाराष्ट्राला महापुरानं वेढा घातल्यानंतर लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हाही पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. ज्या वेगाने पावसात भिजल्याचे पवारांचे फोटो शेअर झाले, त्या वेगाने पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतरचे फोटो वायरल झाले नसतील.

पण पवारांव्यतिरिक्त कुणीही नेता पूराने वेढा घातला तेव्हा पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला नाही. आले ते पवारांनंतर. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा इतर कुठल्या नेत्यानं पवारांसारखा प्रयत्न केला नाही, असं लोकच बोलताना सांगतात.

पूरस्थितीला मोदी आले नाही आणि मतं मागायला मोदी आले, असा उलट टोला लोकांकडून हाणला जातोय. यातूनही हेच स्पष्ट होतंय, की पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. तिथे पवार जिंकलेत.

तरूणांना पवार आवडू लागलेत

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचं यश नोंदवताना म्हटलं होतं, 'तरुणांना म्हातारा नेता आवडतो.' सप्तर्षी यांच्या विधानाचा आधार घेऊन पवारांचं नेतृत्त्व तरुणांना आवडू लागलंय, असं म्हणायलाही वाव आहे.

मात्र नेतृत्त्व आवडणं आणि नेतृत्त्व स्वीकारणं, यातला फरकही नेमकेपणानं समजून घ्यायला हवा. कारण राज ठाकरेंना ऐकायला लोक येतात, पण मतं द्यायला येत नाहीत! त्याच लॉजिकवर आवडणं आणि स्वीकारणं यात फरक करता येवू शकतो.

हेही वाचा : आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं?

९ हा राज ठाकरेंचा लकी नंबर. गेल्या ९ तारखेला राज ठाकरे पुण्यातून आपल्या प्रचार सभांना सुरवात करणार होते. पण ९ तारखेला झालेल्या मेघगर्जनेमुळे राजगर्जना होऊ शकली नाही. त्यामुळे राज ठाकरेंना पवारांसारखं पावसाचं टायमिंग साधता आलं असतं, अशीही चर्चा सुरु झालीय.

मात्र यात एक गोष्ट अशीही समजून घ्यावी लागेल, की राज ठाकरेंच्या सभेआधीच पुण्यात पावसाला सुरवात झाली होती. मात्र साताऱ्यात शरद पवार सभेला बोलायला उभे राहिल्यानंतर पाऊस सुरु झाला.

त्यामुळे राज ठाकरे भर पावसात सभेत बोलायला उभं राहिले असले, तरी तिथे त्यांना ऐकायला कुणी आलं असतं का, याचाही विचार व्हायला हवा.

पवारांनी नव्या माध्यमाची नस ओळखली

जाणकारांच्या मते, याआधी पवारांनी निवडणुकांमधे किंवा इतरत्र कुठेही केलेल्या भाषणात पॉप्युलेटिव विधान केली नव्हती. पवार राजकारणातले कुंबळे किंवा मुरलीधरन होते, असं म्हटलं तरी चालेल. ते गुगली टाकून सगळ्यांची विकेट काढायचे.

यंदाच्या निवडणुकीत पवारांच्या भाषणांमधला सूर काहीसा बदललाय. ‘लहान मुलांशी कुस्ती खेळत नाही’, ‘पैलवान कोण’, इतकंच काय, ‘मोदी आणि शहांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही,’ अशीही विधानं पवारांनी केलीत.

‘ईडीला येडी करुन सोडलं’, सारखी विधानंही आपल्याला पवारांच्या तोंडून ऐकायला मिळाली. शरद पवारांच्या या बदललेल्या पॉलिटिकल टोनमुळेही अनेकांनी भूवया उंचावल्यात.

हेही वाचा : सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

मोदी, शहांपेक्षा जास्त भाव पवारांना

पश्चिम महाराष्ट्र किंवा एकूण महाराष्ट्रात रयतेचा राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आपल्यालाही मिळावी, यासाठी प्रत्येक नेता प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. ‘उदयनराजे भोसलेंना तिकीट देऊन चूक केली’, असा कबुलीनामा देणारे शरद पवार राजा, प्रजा आणि रयतेमधला राजा बनण्यासाठी लोकांची तशी दृष्टी तयार करण्यात यशस्वी झालेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं इतकं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे की सत्तेचं सारं वलय असलेल्या मोदी आणि शहांच्या प्रभावापुढे माध्यमांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडायला लावण्यातही त्यांना यश आलंय.

नरेंद्र मोदींच्या सभा तासनतास लाईव दाखवणाऱ्या टीवी चॅनेलच्या भाऊगर्दीत शरद पवार भाव खावून गेले. अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यापासून ते अजित पवार सापडेपर्यंत मराठी चॅनल्समधे फक्त एकच बातमी होती, ती म्हणजे पवार आणि पवार!

मीडियालाही घ्यायला लावली दखल

जळी, स्थळी काष्टी पाषाणी पवारच पवार होते. हा उल्लेख महत्त्वाचा आहे. कारण अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यादिवशी एकीकडे शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. तर दुसरीकडे यूएनमधे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु होतं.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कवरेजचा विचार केला तर मोदींचं यूएनमधलं भाषण ही मोठीच गोष्ट होती. मात्र पवाराच्या राजकीय खेळीमुळे मोदींचं भाषण मराठी चॅनल्समधे तरी दुर्लक्षिलं गेलं.

शुक्रवार, १८ ऑक्टोबरला बीकेसीमधे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचीही सभा झाली. या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे फोटो, विडीओ समोर आलेत. लोकसभेवेळी राहुल गांधींच्या सभेला झालेल्या सभेपेक्षाही कमी लोक महायुतीच्या महाप्रचारसभेला आले.

हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

पवार लढाई जिंकले!

३७०, आरे, राज्यातील महापूर हे विषय विरोधकांनी उचललेत. मात्र यामधे पीएमसी बँक खातेधारकांचा विषय जास्त भाजपला त्रास देवून जाईल, असं जाणकार सांगतात. अशा सगळ्यात पवारांचं पावसात भिजणं भाजपचे डोळे पाणावेल, असा सूर जोर धरतोय.

८० वर्षांचा म्हातारा पावसात भाषण करतो, ही महाराष्ट्राच्या राजकारणतली मोठी गोष्ट आहेच. कॅन्सरशी दोन हात केलेल्या माणसांने कशाचीही पर्वा न करता, उभा महाराष्ट्र पालथा घालणं, हे अन्य कुठल्या नेत्याला जमल्याचं आपल्या नजीकच्या इतिहासात कुठलं उदाहरण नाही.

अशात निवडणुकीच्या काळात फडणवीसांची महाजनादेश, आदित्यची जनाशिर्वाद किंवा मग राज ठाकरेंचा दोन किंवा फार फार तर चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा, हे पवारांपुढे दुय्यमच ठरतील. ही लढाईदेखील पवार जिंकलेत.

पुन्हा घडणार का नवी पिढी?

१९९९ मधे राजकारणाला आपण नवी पिढी दिली, असं शरद पवारांनी साम टीवीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. नवी पिढी घडवण्यात यश आल्याचा विश्वासही व्यक्त केला.

पार्थच्या सपशेल अपयशानंतर रोहित पवारांच्या राजकीय वाटचालीकडे आता सगळ्यांचे डोळे लागलेत. अशात पवार नवी पिढी पुन्हा तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीचा अनुभव कित्येक पावसाळे पाहिलेल्या पवारांकडे दांडगाच आहे.

सध्याची राष्ट्रवादीची पिढी काही भाजपची सत्ता उलथवून टाकू शकत नाही, हे पवारांनाही माहीत आहेच. पण पवारांची येणारी पिढी कितपत भाजपला आव्हान देऊ शकते, हे येणाऱ्या पावसाळ्यांवरुन कळेल. मात्र तोपर्यंत तरी शरद पवारांच्या पावसात भिजत केलेल्या भाषणाची प्रेरणा राष्ट्रवादीला जिवंत ठेवण्यासाठी पुरते का, हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे.

हेही वाचा : 

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?