लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

२९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय.

भारतीय महिला क्रिकेट संघानं टी २० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवलं तेव्हा स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या इंडियन टीममधल्या दोन स्टार खेळाडूंचीच चर्चा होती. एक संघाची कर्णधार तर दुसरी उपकर्णधार. टीम इंडियाची सारी मदार त्यांच्यावरच होती. दोघीही दमदार बॅटिंग करतात. त्यामुळे संपूर्ण टीमलाच त्यांच्याकडून आशा असणं स्वाभाविकच होतं.

टीम इंडियाला पहिलावहिला टी २० वर्ल्डकप जिंकून द्यावा यासाठी त्यांच्यावर चाहत्यांचा दबाव असणार. या दोघींची क्रिकेटिंग प्रवृत्ती ही टी २० ला साजेशी आहे. त्यामुळे टीमची सगळीच धुरा या दोघींच्या खांद्यावर होती. वर्ल्डकपचे साखळी सामने येत गेले तसं या दोघींच्या खांद्यावर असलेली जबाबदारी टीममधली सगळ्यात तरूण बॅट्समन शफाली वर्मा हिनं उचललीय.

स्मृती आणि कौर साखळी फेरीत अपयशी ठरल्या, तरी भारताने एकही सामना हरला नाही. कारण दोन मुख्य खेळाडू फेल जात असतानाही टीमला सावरत यश मिळवून देण्याचा सिंहाचा वाटा शफालीनं उचलला. बॅट्समन म्हणून तिची बॉडी लँग्वेज ही एका सिंहिणीसारखीच आहे. गंमत म्हणजे ही भारताची सिंहीण आहे फक्त १६ वर्षांची! आणि टीममधे एंट्री करून तिला फक्त ६ महिने झालेत.

हेही वाचा : कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'

१६ व्या वर्षी दोन विक्रम नोंदवले

आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं. पण शफालीसाठी हे वरीस धोक्याचं ठरलं नाही. तिच्या टीनेजला शोभेल अशी फिअरलेस बॅटिंग करून ती वयाच्या १५ व्या वर्षीच वरिष्ठ महिला संघाच्या निवड समितीच्या मनात बसली. मग काय! या रोहतकच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शफालीसाठी टीम इंडियाची दारं उघडली गेली.

त्यातच आता एवढ्याशा वयात वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत ओपनिंगला खेळण्याची संधी तिला मिळाली. ही १६ वर्षांची अनुभवाची शिदोरी तिली आयुष्यभर कामी येणार आहे. मोठ्या मोठ्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या शफालीकडे पाहताना भविष्यात ती भारताची स्टार बॅट्समन होणार आणि तिचा काळ ती गाजवणार हे नक्की!

तिनं टीममधे एंट्री केली तेव्हा आल्या आल्या तिनं एक विक्रम आपल्या नावावर करून घेतला. टीम इंडियाकडून सर्वात कमी वयात टी २० मधे पदार्पण करणारी ती पहिली खेळाडू ठरली. त्यानंतर लगेचच स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर तिनं दुसरा विक्रम आपल्या नावावर केला. दोन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं पहिलं अर्धशतक ठोकून सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय खेळाडू म्हणून तिनं नाव कमवलं.

वर्ल्डकपच्या साखळी सामन्यात एवढ्या कमी वयाच्या पोरीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवलीय. आता प्रतिस्पर्धी संघाला स्मृती किंवा कौरची भीती वाटत नाही. तर चक्क शफालीची वाटते! पॉवर प्लेमधे शफाली भल्याभल्या बॉलरवर इतकी तुटून पडते की तिचं हे वय धोकादायक वाटू लागतं.

ताळेबंद विचारांना शफालीनं दिली मुठमाती

शफाली बॅटिंग करताना कायम चुईंगम खात असते. तिच्या अवखळ वयाला ते साजेसंही आहे. शफालीचं हे सोळावं वरीस एकदम बिनधास्त आहे! हा बिनधास्तपणा तिच्या बॅटिंगमधेही दिसतो. पण या बिनधास्त बॅटिंगमधे एक नजाकत आहे. तिचे स्ट्रेड ड्राइव डोळ्यांचं पारणं फेडतात. क्रिकेटच्या जगात बॉलरच्या डोक्यावरून हवेतून फटका मारणं म्हणजे त्या बॉलरचा स्वाभिमान दुखावण्यासारखं असतं. सोळाव्या वर्षातली ही शफाली सतत आणि अगदी सहज हा स्वाभिमान दुखावत असते.

क्रिकेट जगात पुरुषांमधे आपण अनेक टीनएजर खेळाडू वरिष्ठ संघाकडून खेळताना पाहिलेत. पण महिला क्रिकेटमधे हे थोडं दुर्मिळ आहे. याचं कारण या वयातल्या मुलींची ताकद चेंडू बाऊंड्रीपार धाडण्यासाठीही पुरत नाही, असा समज आहे. पण या समजाला आणि महिला खेळाडूंबद्दलच्या ताळेबंद विचारांना शफालीने मुठमाती दिलीय.

हरियाणामधल्या रोहतकच्या या हट्ट्याकट्ट्या शफालीचं सिक्स शॉट पुरुष चाहत्यांनाही वेड लावतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे हे सिक्सर हाफ बॅकलिफ्टमधून आलेत. सिक्स मारण्यासाठी आपली बॅट पूर्ण कोनात फिरवतही नाही. पण तिने मारलेला चेंडू आरामात साईड स्क्रीनच्या पलिकडे जाऊन पडतो. आता तिने आपली बॅट विराट किंवा धोनी सारखी पूर्ण कोनात फिरवली तर चेंडू कुठच्या कुठे जाईल!

हेही वाचा : टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

शफाली, स्वतःला आवर!

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकपमधे या तिच्या पॉवर प्ले मधल्या पॉवर पॅक्ट फलंदाजीच्या जीवावरच तर साखळीतला एक सामना शिल्लक असताना भारताने सेमी फायनल गाठली. पण भारताची माजी वरिष्ठ महिला खेळाडू डायना एडुल्जी यांनी १६ व्या वर्षात उधळलेल्या या खेळाडूला स्वतःवर आवर घालण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या मते तिने आपल्या विकेटची किंमत ओळखावी.

तिची वर्ल्डकपमधली तीन सामन्यातील फलंदाजी पाहता तिने आपण स्फोटक फलंदाज आहोत हे सिद्ध केलंच आहे. पण, आता तिने आपल्या विकेटचं मोल वाढवून तिशी चाळीशीत बाद होण्यापेक्षा मोठ्या धावा करण्याकडे लक्ष द्यावं. रोहित शर्मा मोठ्या खेळी करतो तोच कित्ता शफालीनेही गिरवावा याकडे एडुल्जींचा रोख असावा.

जरी एडुल्जींचं म्हणणं रास्त असलं तरी त्यांनी एकंदर या हरयाणवी शफालीची बॉडी लँग्वेज पाहता ती दुसरी वीरेंद्र सेहवाग आहे. ती म्हणेल 'एडुल्जी तुमचा सल्ला सर आंखो पर! पण मोठ्या धावा करणार आणि आपल्या ठेक्यातच चालणार. आरपार मारणार म्हणजे मारणार!'

हेही वाचा : 

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर